झाशीची राणी लक्ष्मीबाई

3
135
_Rani_Lakshmibai_1_0.jpg

झाशीच्‍या राणी लक्ष्‍मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्‍मीबाई गंगाधरराव नेवाळकर. त्‍या एकोणीसाव्‍या शतकात ब्रिटीशांच्‍या ‘ईस्‍ट इंडिया कंपनी’विरोधात झालेल्‍या 1857 च्‍या स्‍वातंत्र्य उठावातील अग्रणी सेनानी होत्या. त्‍यांनी त्‍या उठावात गाजवलेल्‍या शौर्यामुळे त्‍या क्रातिकारकांचे स्‍फूर्तीस्‍थान होऊन गेल्‍या.

लक्ष्‍मीबाई या मूळच्‍या महाराष्‍ट्रातील सातारा जिल्‍ह्याच्‍या. धावडशी हे त्‍यांचे माहेर. त्‍यांचे माहेरचे नाव मणिकर्णिका तांबे असे होते. त्‍यांचा जन्‍म मोरोपंत तांबे आणि भगिरथीबाई तांबे या दांपत्‍याच्‍या पोटी 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला. लक्ष्‍मीबाईंचे वडिल मोरोपंत तांबे दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे बंधु चिमाजी अप्पा यांचे व्यवस्थापक म्‍हणून काम पाहत. लक्ष्‍मीबाई तीन-चार वर्षांच्‍या असताना त्‍यांच्‍यावर मातृवियोगाचे दुःख कोसळले. त्‍या पुढे ब्रह्मावर्त येथे दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या आश्रयास गेल्‍या.

नानासाहेब पेशवे बंधु रावसाहेब यांच्यासोबत ब्रह्मावर्ता येथील वाड्यात तलवार, दांडपट्टा व बंदुक चालवणे आणि घोडदौड असे शिक्षण घेत असत. लक्ष्‍मीबाईंनी त्यांच्यासोबत युद्धकला आत्‍मसात केली. सोबत मोडी अक्षर ओळख आणि लेखन-वाचन अशी विद्या अवगत केली. त्‍या सात वर्षांच्‍या असताना त्‍यांचा विवाह झाशी संस्थानचे अधिपति गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी 1842 साली थाटामाटात पार पडला. त्‍यांचे नाव विवाहानंतर ‘लक्ष्मीबाई’ असे ठेवण्यात आले. कालांतराने त्‍या झाशीची राणी म्हणून संबोधल्या जाऊ लागल्या.

ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला. त्यात झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा 13 मार्च 1854 रोजी काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने ‘माझी झाशी देणार नाही’ असे स्फूर्तिदायक उद्गार काढले! तरीही राणी लक्ष्मीबार्इंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करत काही काळ कृतिविना शांत बसावे लागले.

धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर, थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई जन्मत: कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या, परंतु त्या राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या आणि वाढलेल्या होत्या. त्यांना अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत होते. लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. राणी लक्ष्मीबार्इंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळवले. राणी लक्ष्मीबाई मल्लखांब विद्येतही तरबेज झाल्या. लक्ष्मीबार्इंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पुरुषप्रधान संस्कृती असणार्‍या समाजाने त्यांना दुर्लक्षित करू नये म्हणून धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.

1857 चा उठाव झाला. झाशीतही शिपायांचा उद्रेक 5 जून 1857 ला घडून आला. केवळ पस्तीस शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. तेव्हा राणी लक्ष्मीबार्इ इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता किल्ल्यावर राहण्यास गेल्या. ब्रिटिशांनीही राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास 22 जुलै रोजी सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या! परंतु परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामा होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता व भविष्याबद्दल चिंता होती. लक्ष्मीबार्इंनी मात्र खंबीरपणाने परिस्थिती हाताळली.

दरम्यान, 21 मार्च 1858 ला सकाळीच सर ह्यू रोज ब्रिटिश फौजेसह झाशीजवळ आले. त्याने राणींना नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहवे असे कळवले. राणींनी ह्यू रोज यांच्या भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी लक्ष्मीबार्इंनी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून त्यांना एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचवले. ह्यू रोज यांनी झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला. झाशीची बाजू दोन-तीन दिवस अभेद्य राहिली. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा, त्यांच्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. युद्धाच्या नवव्या दिवशी मात्र इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ती खिंडारे बुजवण्यासाठी काम रातोरात केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते.

इंग्रजांनी झाशीला पाणी पुरवठा करणारी विहीर आणि दारूगोळा तयार करण्याचा कारखाना उद्वस्त केले. राणी लक्ष्मीबार्इंनी सर्व फौजेला धीर देताना त्यांना स्वत:च्या बळावर लढण्याचे आवाहन केले. राणी शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून संतापल्या आणि प्रत्यक्ष रणांगणात उतरल्या. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोज थबकला. लक्ष्मीबार्इंनी सर्व फौजी अधिकार्‍यांशी चर्चा करून घेतलेल्या निर्णयानुसार रातोरात झाशी सोडले. राणींनी ब्रिटिशांना सतत अकरा दिवस झुलवत ठेवले. ह्यूज रोज यांनीही म्हटले, की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’

राणी त्या पराभवानंतर पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेल्या. तेथेही लक्ष्मीबार्इंनी सैन्यामध्ये फिरून इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चेबांधणी करावी याविषयी चर्चा केली. त्याच वेळी ब्रिटिश अधिकारी स्मिथ याने सैन्यासह 17 जून 1858 रोजी सकाळीच हल्ला चढवला. त्या वेळी लक्ष्मीबाई तलवारीचे सपासप वार करत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. इंग्रज अधिकारी स्मिथ यांचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या ब्रिटिश दमाची फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. राणींचा निभाव दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर लागला नाही. त्यांचा घोडा एका ओढ्यापाशी अडला. घोडा काही केल्या ओढा ओलांडत नव्हता. तेथे इंग्रजांशी लढत असताना, राणी लक्ष्मीबाई रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांच्या डाव्या कुशीत तलवार घुसली, परंतु इंग्रज पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना ओळखू शकले नाहीत. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. त्यांची इच्छा त्यांचा देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षीं मरण स्वीकारले. त्या शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

(ज्ञानेश्वरी स्वर्णिमा, 1 ते 15 जून 2017 वरून उद्धृत, संस्कारित-संपादित)

About Post Author

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here