कल्याण इनामदार आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे मान्यताप्राप्त कवी होते. त्यांच्या कवितेतून रचना, अभिव्यक्ती, आशय-विषय यांची विविधता आणि नादमयता यांचा सुखद प्रत्यय येतो. इनामदार यांची पाऊणशे पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना ‘कवितेचा ध्यास आणि कविताच त्यांची श्वास’ बनली…
कल्याण इनामदार मराठी कवितेच्या क्षेत्रात चाळीस वर्षे सातत्याने दर्जेदार लेखन करत आले. त्यांची कविता विविध वाङ्मयीन नियतकालिकांतून, मान्यवर दिवाळी अंकांतून आणि वेगवेगळ्या व्यासपीठांवरून रसिकांसमोर आली. त्यांची सुमारे पंचाहत्तर पुस्तके/पुस्तिका ‘प्रौढ आणि बालसाहित्य’ या वाङ्मयप्रकारांत प्रसिद्ध आहेत. त्यांचे काही बालकथासंग्रहही आहेत.
कल्याण इनामदार यांना कविता रक्तातून, जुन्या पिढीकडून आंदण म्हणून मिळाली. काव्याचा वारसा त्यांच्या घरातच होता. त्यांचे वडील डीएसपी होते. ते उत्तम कीर्तनकार होते. ते स्वत: पदे रचून ती कीर्तनातून गाऊन दाखवत. कल्याण इनामदार यांच्या पणजोबांनीही भक्तिमार्गाचा प्रवास करत असताना, लातूर येथे जिवंत समाधी घेतली. त्यांचे ज्येष्ठ बंधू कवी श्री.दि. इनामदार यांनीही त्यांच्यावर काव्यलेखनाचे संस्कार केले.
इनामदार यांची एकूण पाऊणशे पुस्तके आहेत. त्या पैकी चार कवितासंग्रह प्रौढ रसिकांसाठी आहेत. पहिला संग्रह ‘अबोलीची नक्षी’ 1972 साली प्रकाशित झाला. त्यांच्या कवितेची ठळक लक्षणे म्हणजे शब्दांचा फुलोरा, विलक्षण व चमत्कृतिपूर्ण कल्पना, थक्क करणाऱ्या अनोख्या प्रतिमा आणि नादमयता ही होत. ‘नादझोत’ ‘आत्मविभोर’, ‘ऋतुलाघव’ हे त्यांचे नंतरचे संग्रह. वेगळ्या थाटाच्या, थेट भिडणाऱ्या, बेचैन करणाऱ्या कविता त्यात वाचण्यास मिळतात. भावनांचा हळुवार शिडकावा, तर कधी जळजळीत वास्तव सांगणाऱ्या भेदक कविताही त्यात भेटतात. छंदोबद्ध, मुक्तछंदात्मक, गझल अंदाजाच्या आणि ओवीसदृश रचना त्या संग्रहात आहेत. वाचक काही वेगळीच रूपके आणि चित्रविचित्र शीर्षके यांमुळे थक्क होतो. ‘गर्भार कळ्या होताना’ या कवितेत – ‘एकांत लपेटून घ्यावा, नादावे झिंगुन गाणे, बोभाटा होण्याइतुके, वाऱ्यात नको कुजबुजणे’
अशा विलक्षण प्रतिमा आणि शब्दकळा भेटतात.
हातात स्क्रू ड्रायव्हर, पाना इत्यादी हत्यारे घेणारा यांत्रिक माणूस तो; पण त्याच इनामदार यांनी बालकुमारांसाठी हजारो कविता वेचल्या आहेत; शब्दफुलांचा सडा शिंपला आहे. त्यांनी बालकवितांची सुमारे पंचेचाळीस छोटेखानी पुस्तके, बालकथांची सुमारे वीस पुस्तके, कुमारकविता, मुलांसाठी मुक्तछंदात रचना असे उदंड काम केले. त्यांच्या गाजलेल्या आणि पुरस्कारांनी गौरवलेल्या ‘धमालगाणी’, ‘छम् छम् छडी’, ‘गाणारे गाल’, ‘फुलपाखरांचे डोळे’, ‘मजेचे थेंब’, ‘नवलाईचे झाड’, ‘अजब गाणी’, ‘उलट्या सुलट्या देशात’ या पुस्तकांत छोट्यांचे भावविश्व छान साकारले आहे. मुलांना भावतील असे त्यांचेच खास शब्द, साधे-सोपे विचार, लयबद्ध अल्पाक्षरी रचना यांमुळे त्या बालकविता मुलांना त्यांचेच उद्गार वाटतात. त्या रचना प्रासादिक आहेत, तशा चमत्कृतिपूर्णही आहेत. विचार देणाऱ्या आहेत, तशा त्या खुद्कन हसवणाऱ्याही आहेत. ‘दात पडले अग्गोबाई! म्हणतील सारे-बोचराबाई, सगळेजण म्हणतील की आली आली दातपडकी…’ अशा अनुभवजन्य कवितेतून दुधाचे दात पडण्याचे वयच कवितेत उतरून आले आहे. ‘शहाण्या मुली का रडतात? दुधाचे दात पडतात’ अशी समजूत घालणारी आईही त्यात अखेरीस येते. मुलांच्या पाच ज्ञानेंद्रियांना आणि संवेदनांना ताजे करणाऱ्या; तसेच, भावनिक-मानसिक पोषण करणाऱ्या अशा त्यांच्या कविता मोठ्यांनाही स्मरणरंजनाचा आनंद देतात.
इनामदार यांनी राजकीय व्यंग, सामाजिक जाणीव, लाचारी-लाचखोरी इत्यादी विषयांवरील रोखठोक, वेधक आणि भेदक कविता लिहिल्या आहेत. त्यांनी ‘मोडीत आयुष्य घातले तरी खाली उरते त्याची जात’, ‘देश दुभंगत आहे’ यांसारख्या पंक्तींमधून सामाजिक आशय परखडपणे मांडला आहे. त्यांच्या कवितेतून रचना, अभिव्यक्ती, आशय-विषय यांची विविधता आणि नादमयता यांचा सुखद प्रत्यय येतो. त्यांच्या काही कविता मात्र गूढ-गहन, संदिग्ध आणि दुर्बोध वाटतात. शब्दांच्या फुलोऱ्यात आशय लपला जातो. यमक, छंद-वृत्त यांची सजावट निर्दोष असली, तरी काही कवितांचा गाभा हरवल्यासारखा वाटतो.
त्यांचा ‘ऋतुलाघव’ हा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात प्रेमाच्या ऋतूचे विलक्षण दर्शन घडते. त्या कवितांत निसर्गातील ऋतुचक्र आणि मानवी मनात फुलणारे प्रणयाचे ऋतुचक्र यांचा मनोज्ञ भावबंध आहे. ते मनात फुलणाऱ्या, सुकणाऱ्या ऋतूंचे बहर-विभ्रम अल्पाक्षरी रचनांमधून मांडतात. त्या रचना ऋतूंसारख्या लाघवी आहेत, कारण त्यात गूढ-गर्भितार्थ असतो आणि त्यांचा शेवट चमत्कृतिपूर्ण, कलाटणी देणारा असतो.
‘स्वप्ने उजाडलीयत, आपण एकमेकांना गिरवू, लौकिकाचा सूर्य, डोळ्यांतून मिरवू …’ लौकिक पातळीवरील अलौकिक प्रेम, प्रेमाची प्रचिती, प्रणयाराधन, गवसलेल्या प्रेमाची माधुरी, प्रेयसीशी असलेले अद्वैत… हे सारे काही कवी वाचकाला सांगत जातो – ‘तुला किती गं सांगावे, नको उकलून मूठ, हात तुझ्याच रेषांचे जाळे विणलेले थेट’ अशा काही मनोरम, काही सूचक, काही थेट तर काही गूढ कवितांचा ‘ऋतुलाघव’ मनात रेंगाळत राहतो.
इनामदार यांची हुकूमत छंदोबद्ध रचनेवर होती. त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे यमकांचे सौंदर्य, मात्रांची अचूकता, लयबद्धता आणि प्रयोगशीलता. ती त्यांच्या बालकवितांमध्येही विशेषत्वाने आहेत. मुलांचे भावविश्व, कल्पनाविश्व, अनुभवविश्व, स्वप्निल विचार म्हणजे त्यांची बालकविता आहे. त्यात विपुल संगत-विसंगत गोष्टी, चमत्कृती आणि चातुर्य यांची धमाल पखरण पदोपदी आहे. बालगाणी, बडबडगीते, संस्कारगीते, स्फूर्तिगीते, देशभक्तीपर गाणी, कुमारकविता, दीर्घरचना, बालकुमारांसाठी मुक्तछंदातील रचना आणि बालकथा असे विविधरंगी साहित्य त्यांच्या हातून साकारले.
इनामदार आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे मान्यताप्राप्त कवी म्हणून विख्यात होते. त्यांच्या अनेक रचना स्वरबद्ध झालेल्या आहेत. त्यांनी पुणे, मुंबई आणि दिल्ली येथील आकाशवाणी आणि दूरदर्शन यांवरून काव्यरचनांचे कार्यक्रम सादर केले. त्यांनी मुंबई दूरदर्शनच्या ‘काव्यसंध्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. ते पुण्यातील ‘काव्यशिल्प’ या कवींच्या संस्थेचे संस्थापक होते. त्यामुळे त्यांची कविता दृक्, श्राव्य, रंगमंचीय अशा अन्य माध्यमांतून रसिकांसमोर येत होती. ती अनेक कवी संमेलनांमधून ऐकली जात होती. इनामदार यांनी ‘मराठीतील गीतरचना : स्वरूप आणि विकास’ हा विषय घेऊन पीएच डी 1986 साली केली. त्या प्रबंधाचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
चैतन्याच्या लाटेवरले पक्षी आम्ही मुले, नव्या दिसाची पहाट अमुच्या पंखावरती फुले’ इनामदार यांनी दुर्दम्य आशावाद, उमेद आणि उत्साह देणाऱ्या कुमारकविताही विपुल लिहिल्या आहेत. त्यांची कविता ‘बालभारती’ व ‘गोमंतभारती’ या दोन्ही पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाली आहे.
इनामदार यांच्या बालकथांची – ‘फटफजिती’, ‘हातचलाखी’, ‘एका पुरीची गोष्ट’, ‘शहाण्यांच्या सावल्या’, ‘नवलाईचा गाव’, ‘वानरनगरी’, ‘निवडुंगाची फुले’ इत्यादी पुस्तके बालवाचकप्रिय आहेत. अभिनव गोष्टी- भाग 1 ते 5 प्रसिद्ध असून, त्यांचा इंग्रजी अनुवादही प्रसिद्ध आहे. इनामदार यांचा ‘जन्मात राहिलो वजा’ हा दीर्घ कवितासंग्रहही विलक्षण आहे.
सातत्याने विपुल, वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार लेखन करणारे कल्याण इनामदार यांचे 14 जुलै 2008 रोजी झालेले आकस्मिक निधन चटका लावून गेले. ते ‘कवितेचा ध्यास आणि कविताच त्यांची श्वास’ असल्याने त्यांच्या कवितेतून वाचकाला चिरकाल भेटत राहतील.
कल्याण इनामदार यांचे ‘अबोलीची नक्षी’, ‘नादझोत’, ‘आत्मविभोर’, ‘ऋतुलाघव’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचे ‘धमालगाणी’, ‘छम् छम् छडी’, ‘गाणारे गाल’, ‘फुलपाखरांचे डोळे’, ‘मजेचे थेंब’, ‘नवलाईचे झाड’, ‘अजब गाणी’, ‘उलट्या सुलट्या देशात’, ‘फुलपंखी गाणी’, ‘प्रकाशयात्री समृद्धगीते’, ‘प्राण्यांची गाणी’, ‘आभाळाचे पंख’, ‘पाखरवेडी आणि पऱ्यांचा देश’, ‘गाणी वेची चला’, ‘अघडम् पडघम’, ‘झाडे गेली रुसू’, ‘आभाळवेधी’, ‘एक टाळी गाण्याची’, ‘शाळा एक शाळा’, ‘ऐल गाणी, पैल गाणी’, ‘मातीचे गाणे’, ‘बागुलबुवा हिसका’, ‘गावभर धसका’, ‘आंदण चांदण’, ‘झिम् फुला झिम’, ‘झिंटुकली गाणी’, ‘डिंग डाँग डिंग’, ‘डराँव डराँव’, ‘आभाळझेप’, ‘दोनावर एक एकवीस’, ‘नवलाईची नवलनगरी’, ‘अजब गाणी’, ‘आभाळाच्या गावात’, ‘आंगणवेल’, ‘भुलभुलैया’, ‘चिंगा आणि चिंगी’, ‘साखरगाणी’, ‘जंगलजीम’, ‘गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या’, ‘हिरवे हिरवे गाणे’, ‘अक्षरगाणी’, ‘भातुकली गीते’, ‘टिप टिप पावसा’, ‘अजबगजब’, ‘भुताचे रूप’, ‘आगळ्या वेगळ्या कविता’ हे बालगीतसंग्रह मुलांचे भावविश्व उलघडतात. इनामदार यांनी ‘तळ्याचा राजा’, ‘सशाभाऊ, टिपूनाना आणि मंडळी’, ‘घर हरवलेली परी’, ‘मोरपंखी डोळे’, ‘शहाणी मुले’, ‘गोड पाण्याचा घोट’, ‘पुण्याईचा पाढा’, ‘देवाची लेकरे’ यांसारख्या बालकथा लिहिल्या. त्यांनी ‘न्यू अर्थ, न्यू स्काय’, ‘साँग ऑफ फार्मर्स’ असे इंग्रजी लेखनही केले.
आश्लेषा महाजन –9860387123 ashlesha27mahajan@com
————————————————————————————————————————–