इंदापूरचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्याप्रमाणेच अनेक ब्राह्मण कुटुंबीयांची स्वतःची खाजगी मंदिरे तेथे आहेत. ते गावही पुणे जिल्ह्यातच आहे. देशपांडे कुटुंबीयांचे दत्त व बालाजी मंदिर, पंढरी यांचे खंडोबा मंदिर, गोसावी कुटुंबीयांचे मुरलीधर व विठ्ठल मंदिर, गुजराथी वैष्णव कुटुंबाचे श्रीराम मंदिर वगैरे वगैरे. त्यांतील काही मंदिरांची माहिती उपलब्ध होते. भार्गवराम तलावाच्या उत्तर दिशेला श्री व्यंकटेश (देवस्थान) कसबे इंदापूर ट्रस्टचे व्यंकटेश म्हणजेच बालाजीचे मंदिर प्राचीन आहे. तो ट्रस्ट देशपांडे कुटुंबीयांचा असून सध्या दीपक नारायण देशपांडे, अरविंद जनार्दन देशपांडे आणि सुहास दिनकर देशपांडे हे ट्रस्टी आहेत. मंदिराच्या बाजूला ट्रस्टची दहा एकर जमीन असून, त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्यातील काही लोकांकडून मिळणारे तुटपुंजे भाडे हे मंदिराचे उत्पन्न आहे.
व्यंकटेशाचे ते मंदिर इंदापूरमधील सर्वात पुरातन आणि श्रीमंत मंदिर असावे. मिळकतीच्या इनामाचा (1245 सालाचा) दस्तऐवज उपलब्ध आहे. त्यानंतर 1838 नंतरचे रेकॉर्ड मोडी लिपीतील आहे. रामचंद्रराव देशपांडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी- जानकीबाई यांच्या नावाची तत्कालीन उप जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीची 1937 सालची सनद ट्रस्टकडे आहे. त्या सनदेमध्ये इनाम म्हणून दिलेल्या अनेक गावांचा उल्लेख असून त्यांचा विस्तार सध्याच्या कर्नाटक राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन पोचतो. त्याच इनाम मिळकतीचे रूपांतर सार्वजनिक विश्वस्त संस्थेत 1955 मध्ये करण्यात आले. नारायणराव देशपांडे यांनी दिलेल्या अर्जानुसार धर्मादाय आयुक्तांच्या आदेशान्वये ट्रस्टची स्कीम 1996 मध्ये अस्तित्वात आली आणि देशपांडे कुटुंबीयांना ट्रस्टच्या कारभारात अधिकृत व रीतसर सहभाग मिळाला. दरम्यानच्या काळात, ट्रस्टच्या बहुतांश जमिनीवर अतिक्रमण झालेले होते.
नगरपरिषदेची ब्रिटिशकालीन जुनी इमारत मंदिराच्या जागेतच होती. नगरपालिकेचे आता नवीन प्रशस्त इमारतीत स्थलांतर झालेले असून जुनी इमारत वीस वर्षांपूर्वी पाडण्यात आली आहे. बखळ जागा नगरपालिकेच्या ताब्यात असून व्यंकटेश मंदिर ट्रस्टने जमिनीवरील त्यांचा हक्क सोडलेला नाही. मंदिर परिसरात प्रवेश करताच डाव्या हाताला श्री गजाननाचे छोटेसे सुबक मंदिर आहे. प्रतिवर्षी दसऱ्याच्या दिवशी मंदिरात होमहवन वगैरे विधी होतात. त्या दिवशी भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शनास येतात.
एकमुखी दत्ताचे मंदिर खडकपुरा भागात मुख्य रस्त्यावर आहे. तेही देशपांडे कुटुंबीयांच्या मालकीचे आहे. ते नक्की कधी बांधले त्याची माहिती उपलब्ध नाही.
इंदापूरच्या पश्चिम दिशेला रामवेस नाका येथील श्रीरामाचे प्राचीन मंदिर मालोजी राजे यांच्या कालखंडात बांधलेले आहे. इंदापूर येथील गुजराथी वैष्णव हे मालोजी राजे यांच्या काळापासून पिढ्यान् पिढ्या त्या मंदिराची देखभाल करत आहेत. मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या संगमरवराच्या मूर्ती आहेत. बांधकाम दगडी व सागवानी लाकडात आहे. जीर्णोद्धाराचे काम 1853 व 2013 साली करण्यात आले अशी माहिती श्रीराम मंदिराचे विश्वस्त मदनदास शहा यांनी दिली. मंदिराचे बांधकाम साधारण चारशे वर्षांपूर्वीचे आहे.
जुने प्रशस्त विठ्ठल मंदिर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर आहे. ते गोसावी कुटुंबीयांच्या मालकीचे आहे. तेथे आषाढी – कार्तिकी एकादशीला दर्शनासाठी भाविक गर्दी करतात. गावातील कासारपट्टा भागात दुसऱ्या गोसावी कुटुंबीयांच्या मालकीचे छोटेखानी पण सुबक मुरलीधर मंदिर आहे. तेथे जन्माष्टमीच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो.
– विलास पंढरी 9860613872 vilaspandhari@gmail.com
ओम बंगला,61 अ, वारजे पुणे-411058
———————————————————————————————-