वसंत पटवर्धन हे ‘प्रगती प्रतिष्ठान’चे संस्थापक. ते बी.कॉम झालेले. पटवर्धन ‘इंडियन ह्यूम पाइप’ कंपनीत नोकरीला होते. त्यांचे कामानिमित्त पालघरमध्ये १९६२ ते १९७२ या दहा वर्षांच्या काळात येणे-जाणे होत होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की जव्हार-मोखाडासारख्या आदिवासी भागातील लोक देवभोळे व अंधश्रद्धाळू आहेत. त्यामुळे भोंदू भगत त्यांचा गैरफायदा घेतात. पालघरमध्ये ऐंशीच्या दशकात प्राथमिक सुविधांची वानवा होती; आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्तच! त्यामुळे कुपोषण, गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त होते. ती परिस्थिती पाहून वसंत पटवर्धन यांनी ‘प्रगती प्रतिष्ठान’ या संस्थेची १९७२ मध्ये स्थापना केली. संस्थेने आरंभी वैद्यकीय सेवेसाठी एक पूर्ण वेळ डॉक्टर नेमला; त्याच बरोबर वैद्यकीय पथकाद्वारे आदिवासीबहुल भागात फिरता दवाखाना सुरू करण्यात आला. दोन तालुक्यांत तीन आरोग्य केंद्रे होती. वैद्यकीय पथक दर आठवड्यात आरोग्य केंद्रांना भेट देऊन रुग्णांवर औषधोपचार करत असे. संस्थेने तशी वैद्यकीय सुविधा सतरा वर्षें पुरवली; शासनाचे आरोग्य केंद्र स्थापन झाल्यावर ती सुविधा बंद केली गेली.
‘प्रगती प्रतिष्ठान’चे ‘प्रगती विद्यार्थी वसतिगृह’ मोखाड्यामध्ये पस्तीस वर्षांपासून सुरू आहे. वसतिगृहात आठवी ते दहावी इयत्तेतील अठ्ठावीस विद्यार्थी राहतात. ते विद्यार्थी ‘कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थे’त शिक्षण घेतात. वसतिगृहाचा २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सातशेबहात्तर पाड्यांमधील सातशेएकोणऐंशी विद्यार्थ्यांनी त्या वसतिगृहाचा फायदा घेतला आहे.
जव्हार, मोखाडा यांसारख्या आदिवासी भागात गोरगरीब लोकांना पोटाची खळगी भरण्याची भ्रांत होती. ‘प्रगती प्रतिष्ठान’ने रोटरी क्लब व इतर संस्था यांच्या सहाय्याने वाड्या-पाड्यांवर सौरदीप वाटले. संस्थेच्या प्रयत्नातून पाच हजार सातशेसत्तेचाळीस कुटुंबांची अंधारमय घरे सौर ऊर्जेवर चालणा-या एलईडी दिव्यांनी प्रकाशित झाली आहेत. मोखाडा तालुक्यातील सहा आश्रमशाळांना सौर ऊर्जेद्वारे वीज व्यवस्था पुरवण्यात आली आहे. कर्णबधिरांच्या ‘सौर आशा केंद्रा’मार्फत गावात सौरदीपांची जोडणी करणे, त्यांची देखभाल करणे ही कामे केली जातात.
संस्थेने ‘आयसीआयसीआय बँके’च्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या सहभागातून जव्हार तालुक्यातील एैना, झाप व पाथर्डी ग्रामपंचायतींच्या सात पाड्यांत ‘सौरग्राम प्रकल्प’ राबवला आहे. प्रकल्प स्वतंत्र ऊर्जा केंद्रांद्वारे यशस्वी करण्यात आला. त्या सौर सिस्टिमवर टीव्ही, पंखा, तसेच धान्य गिरणीदेखील सुरू होते. ‘सौर प्रकल्पा’चा दोनशेपाच कुटुंबांना फायदा झाला आहे. सर्व कुटुंबे नियमितपणे वीजबिले भरतात. ‘सौरग्राम योजने’तील घरांतील दिव्यांची जोडणी कर्णबधिर युवकांनी केली आहे.
संस्थेने जव्हारमध्ये जलसंधारणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी नैसर्गिक नाले, ओहोळ यांवर तेहतीस बंधारे बांधले आहेत. त्याचा फायदा दोनशेचाळीस शेतकरी कुटुंबांना पिण्यासाठी व शेतीसाठी झाला आहे. संस्थेने मोगरा लागवड केलेल्या काही शेतक-यांना शेततळी बांधून दिली आहेत. त्यामुळे त्या शेतक-यांचे उत्पन्न वाढले आहे. संस्थेने भविष्यात पाणीप्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. संस्थेने नैसर्गिक पाणी स्रोतांवर सिमेंट बंधारे, वनराई बंधारे, वायरमेश, तसेच शेततळी बांधण्यावर भर दिला आहे. ओढ्यातील गाळ, रेती, दगड काढून पाणीसाठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
संस्थेने कृषी विकासाला चालना म्हणून ‘सिजेण्टा फाउंडेशन इंडिया’ यांच्या सहकार्याने विविध गावांत ‘शेती सुधार उपक्रम’ सुरू केला. त्या उपक्रमाद्वारे शेतक-यांना शेतीतील सुधारित तंत्राची माहिती, पीक हंगाम नियोजन, भात आणि भाजीपाल्याच्या योग्य जातीची निवड, पीक व्यवस्थापन यांबाबत मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांना शेणखत, जीवामृत, पिकांसाठी खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रणाबाबत माहिती दिली जाते. प्रशिक्षण कार्यक्रमाचा तीन हजार शेतकऱ्यांना फायदा झाला. खरीप हंगामात भातशेतीच्या बरोबरीने भाजीपाला पिकवला जातो. पाण्याच्या उपलब्धतेनुसार हिवाळ्यातही शेतकरी कारली, भेंडी, मिरची, दुधी, शिराळी, फरसबी, वांगी यांसारखी पिके घेतात. संस्थेकडून शेतकऱ्यांना विविध भागांतील बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सुमारे नऊशे एकोणचाळीस शेतकरी दोनशेएकोणनव्वद एकरांवर भाजीपाला करतात. संस्थेने आधुनिक पद्धतीने भाजीपाला रोपे तयार करण्यासाठी पॉलिहाऊसची उभारणी केली आहे. तसेच, संस्थेने ‘आयडीबीआय बँके’तून शेतकऱ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ मिळवून दिली आहेत. त्यामुळे शेतक-यांना पीक कर्ज व दीर्घ मुदतीचे कर्ज मिळवणे सोपे झाले आहे. ‘प्रगती प्रतिष्ठान’ने शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे महत्त्व पटवून दिले. पावसाळ्यानंतरही शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जव्हार तालुक्यातील आळ्याचीमेट, तसेच विक्रमगड तालुक्यातील डोंगरीपाडा येथील शेतकरी गटांना सौर पंपांद्वारे ठिबक सिंचन यंत्रणा बसवून देण्यात आली. या भागातील शेतकरी गटांची फार्मर्स प्रोड्यूस ऑर्गनायझेशनमध्ये नोंदणी झाली आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना विकता येतो. साधारणत: शेतक-याला एका हंगामात दहा गुंठा जागेतील भाजीपाला लागवडीतून सुमारे वीस हजार रुपये उत्पन्न मिळते.
‘प्रगती प्रतिष्ठान’च्या वतीने जव्हार तालुक्यातील आकरे ग्रामपंचायतीच्या वाकीचा पाडा व बेहेडपाडा येथे बालवाडी सुरू आहे. त्यात तीन ते सहा वर्षें वयोगटातील पस्तीस बालकांना खेळ, गाणी, गोष्टी यांच्या माध्यमांतून शिकवले जाते. त्यांना सकस आहारही देण्यात येतो. ‘प्रगती प्रतिष्ठान’ने ‘अपंग पुनर्वसन व आदिवासी युवक स्वयंरोजगार केंद्रा’मार्फत ‘कर्णबधिर विद्यालया’तील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्या विद्यालयातील काही माजी विद्यार्थी वारली चित्रकार, तर काही मूर्तिकार आहेत. संस्थेने त्या युवकांनी बनवलेल्या वारली चित्रकलेच्या विविध वस्तू व पेपरमॅशच्या (रंगीत कागदांची आभूषणे) वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.
‘प्रगती प्रतिष्ठान’च्या विविध उपक्रमांसाठी वार्षिक खर्च चार कोटींच्या वर येतो. तो खर्च संस्थेच्या ‘कॉर्पस फंडा’च्या व्याजातून, विविध बँकांच्या-संस्थांच्या मदतीतून व लोकांनी दिलेल्या देणग्यांतून चालवण्यात येतो. संस्थेचा कार्यभार बेचाळीस लोक मिळून सांभाळतात. ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘विद्यार्थी सहायक समिती, वरोरा, जि. चंद्रपूर’ या संस्थेकडून २०१६ चा ‘श्रद्धेय बाबा आमटे मानवता पुरस्कार’ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
सुनंदा पटवर्धन ९४२३०२७९३१
– वृंदा राकेश परब
आपल्या संस्थेचे नाव मी ऐकूण
आपल्या संस्थेचे नाव मी ऐकूण आहे.पण वास्तवात भेट होत नाही.काम उत्तम आहे.सौरऊर्जा व जल नियोजन हे उत्तम.पण सर शासन अशा संस्थांना जलयुक्त शिवार ची कामे देत नाही.असो. काम चांगले.
एन.बी.भारती[डा.तिवारी निवास.]
RTI महासंघ प्रतिनिधी.
मु.पो.ता.हदगाव जि.नांदेड.
मोबा.९५९५६०१६४३
email..narenbharati4@gmail.com
प्रगती प्रतिष्ठान
नमस्कार,…
प्रगती प्रतिष्ठान
नमस्कार,
आपले काम उच्च दर्जाचे व समाजाभिमुख आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोचण्याचे महतवाचे कार्य आपण करत आहात.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले कार्य काय आहे हे समजू शकेल का ? हे विचारण्याचे धाडस यासाठी केले के सध्या मी एका संस्थेसाठी शिक्षण क्षेत्रात ऐच्छिक काम करत आहे, त्यात पालघर मधील वनवासी मुलांना एका परिक्रमाद्वारे ईंग्रजीचा अभ्यास देण्याचे काम ऑनलाईन करत आहे. असाच एखादा शैक्षणिक प्रकल्प आपण राबवत असाल / प्रकल्प सुरु करणार असाल तर मी त्यात सहभाग घेऊ इच्छितो. कृपया मला तसे कळविल्यास मी आपल्या संपर्कात राहीन. आपल्या माहितीसाठी माझा व्हॉटस ऍप नंबर ९१७०६६५९१००७ देत आहे.
आपला आभारी.
मुकुंद चासकर