एखाद्या व्यक्तिच्या एका डोळ्यात व्यंग असेल, त्याचा एक डोळा सरळ बघताना बाहेरच्या बाजूला कानाकडे वळत असेल तर त्याला ‘काणा’ किंवा ‘चकणा’ असे म्हणतात. त्याला संस्कृतमध्ये ‘चक्षुष्काण’ असा शब्द आहे. तो शब्द महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मराठी शब्दकोशात आहे. पण ज.वि. ओक यांच्या गीर्वाण लघुकोशात नाही. तेथे ‘काण’ (वि.) असा शब्द आहे आणि त्याचे एक डोळ्याचा, फुटका, आणि डोमकावळा असे अर्थ दिले आहेत.
अशा व्यक्तीशी बोलताना पंचाईत होते. तिचा काणा डोळा समोरच्या व्यक्तीकडे वळला असेल तर ती त्या व्यक्तीला पाहत आहे आणि त्या व्यक्तीशी बोलत आहे असे वाटते. परंतु प्रत्यक्षात तसे नसते. ती व्यक्ती त्या डोळ्याने पाहत नसते. त्यामुळे ती संबंधित व्यक्तीकडे दुर्लक्ष करत आहे असा त्या व्यक्तीचा समज होतो. त्यावरून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे या अर्थाचा ‘काणाडोळा करणे’ हा शब्द प्रयोग रूढ झाला.
चकणा माणूस एका डोळ्याने पाहत असल्यामुळे त्याला काण हा संस्कृत शब्द वापरला आहे. तसेच डोमकावळा मान वाकडी करून शोधक नजरेने पाहतो, म्हणून त्यालाही एकाक्ष म्हणजेच काण म्हणत असावेत.
पण चकणा हा शब्द मराठीत मूळ ‘चकाणा’ यावरून आला असावा. चकाणा हा शब्द योग्य वाटतो पण तसा शब्द मराठी शब्दकोशात नाही. तो मला मर्ढेकरांच्या एका कवितेत अचानक दिसला.
व्यक्ती एखाद्या रस्त्यावरून अक्षरशः शेकडो वेळा गेलेली असते त्या रस्त्यावरचे प्रत्येक दुकान त्या व्यक्तीला परिचयाचे असते (निदान तसा त्या व्यक्तीचा समज असतो). तरीही एखाद्या दिवशी त्या रस्त्यावर एखादे दुकान पहिल्यांदा त्या व्यक्तीच्या नजरेस पडते. खरे म्हणजे ते नवीन नसते, पण अचानक त्याची जाणीव होते आणि ‘इतके दिवस कसं दिसलं नाही ?’ असे म्हणून ती व्यक्ती चकित होते. मर्ढेकरांच्या एका कवितेबाबत असेच झाले
(पंचगव्य-शर अखिल जगाचे)
दात विचकुनी गेली रात्र
सूर्य पाहतो जरा चकाणा
मच्छरदाणीवरी बांधुनी
छप्पर गेला कोण शहाणा
ती कविता अनेक वेळा वाचली होती, पण त्यातील चकाणा हा शब्द मी चकणा असेच समजून वाचत होतो. पण एकदा अचानक त्यातील काना दिसला आणि मी चकित झालो. मर्ढेकरांची शब्दांवरील पकड पाहून सलाम केला.
‘चक्षुष्काण’वरूनच चकाणा शब्द तयार झाला असावा आणि चकाणाचा अपभ्रंश चकणा असा झाला असावा.
तसं पाहिलं तर ‘च’ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यावरील आचार्य अत्रे यांचा विनोद सर्वांच्या परिचयाचा आहे. “संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे हे बरोबर, पण ‘च’ कशाला ?” असे यशवंतरावांनी विचारल्यावर अत्रे उत्तरले,” तुमच्या आडनावातला च काढा, काय राहतं? वहाण. म्हणून च महत्त्वाचा.”
परंतु येथे गंमत आहे ‘चकाणा’तील च काढला तरी तो ताठ कण्याने सांगतो, ‘मी काणाच.”
– डॉ. उमेश करंबेळकर
chanagli mahiti..
chanagli mahiti..