अपंग मूल घरात जन्माला आले, की त्याचा चांगला-वाईट परिणाम कुटुंबाला भोगावा लागतो. घरातील अन्य तरुण-तरुणींचे विवाह जुळताना समस्या निर्माण होतात. त्या मुलाच्या जन्माला स्त्रीला कारणीभूत ठरवले जाते. त्यात स्त्री भरडली जाते. मूल आईबरोबर चोवीस तास असते. मतिमंद मुलांना कुटुंबाच्या-समाजाच्या प्रेमाची, मायेची गरज असते. कुटुंबानेच फटकारले तर त्या मुलांच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण होते. अशा वेळी मूल अजून एकलकोंडे बनून त्याची मानसिक वाढ खुंटते. पालकांनी – कुटुंबातील सदस्यांनी अशा मुलांना स्वीकारावे, यासाठी सामाजिक जागरूकतेची गरज निर्माण झाली. त्या गरजेतून १९९२ साली ‘संवेदना काउन्सिलिंग सेंटर’ सुरू करण्यात आले. त्या सेंटरच्या माध्यमातून कौटुंबिक व सामाजिक पातळीवर मतिमंदांच्या वाढीतील स्थित्यंतरे, त्यांची मानसिकता याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबवण्यात येतात. मतिमंद मुलांच्या भावंडांच्या कार्यशाळा घेतल्या जातात. काउन्सिलिंग सेंटरमध्ये मानसिक आजार असणारे लोक, व्यसनाधीन- जीवनात हताशा अनुभवणारे तरुण, घटस्फोटितसुद्धा काउन्सिलिंगसाठी येतात. काउन्सिलिंग सेंटरमुळे काही विस्कटणारे संसार सांधले गेले आहेत. काही तरुण व्यसनमुक्त झाले आहेत. या सेंटरमार्फत विशेष मुलांच्या पालकांसाठी व शिक्षकांसाठी चाईल्ड डेव्हलपमेंटचा तीन वर्षांचा कोर्स शिकवला जातो.
संचालक – रेवती हातकणंगलेकर
नवजीवन शाळा,
जुना बुधगाव रस्ता, रेल्वे गेटजवळ,
संभाजीनगर, सांगली – 416 416
(०२३३) – २३२१४८३१0, २३२१४८३
navjeevan.sangli@rediffmail.com
– वृंदा राणे-परब