मोहन रणसिंग याचे जीवन तळचा समाज जागा होत होता त्या काळात घडले; त्यामुळे तो वयात आल्यावर, नोकरीत स्थिरावल्यावर समाजकार्यास लागला. किंबहुना मोहनसारख्या शेकडो कार्यकर्त्यांचा समाजाला जागे करण्यात, समाजाचा विकास करण्यात हातभार लागला आहे. ही गोष्ट चाळीस वर्षांपूर्वीची, परंतु गेल्या पंधरा-वीस वर्षांत समाजात असे परिवर्तन होत गेले, की ते कार्यकर्ते काहीशा विफल अवस्थेत समाजापासून दूर, आत्ममग्न मनस्थितीत उर्वरीत काळ कंठत आहेत. ते एक वेगळेच ‘सोशल डिस्टन्सिंग’. समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी या समाजस्थितीची चिकित्सा केली पाहिजे.
मोहन बाबली रणसिंग याचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ गावाजवळच्या पिंगुळी या खेड्यात झाला.त्याला आधी तीन भावंडे होती, त्यानंतरही तीन-चार भावंडे झाली. समाजात त्यावेळी अतोनात दारिद्र्य आणि अपार कष्ट होते. तळच्या समाजात तर फारच, परंतु विकासाच्या सरकारी धोरणांमधून सोनेरी स्वप्ने दिसू लागली होती. मोहन याचे वडील भिक्षा मागून आणत. त्याला ‘हिंडपावर जाणं’ असे म्हणत. त्या भिक्षेला तो समाजव्यवस्थेचा भाग म्हणून सामाजिक मान्यता होती. त्यांची भटकंती त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावापासून दूर, साठ मैलांवरील गोव्यापर्यंत असे. त्यांना जे धान्य व पैसे मिळत त्यावर कुटुंबाची गुजराण होत नसे. त्यामुळे मग घरामध्ये सतत भांडणतंटे, मारामाऱ्या, दुखणीखुपणी चालत. आईच्या कधी कधी अंगात येई, मग तर तिचा रुद्रावतार बघायलाच नको. तशातच आई-वडिलांनी अर्थार्जनासाठी दारू गाळण्याचा धंदा सुरू केला. वडील बाहेर असत, त्यामुळे आईलाच तो उद्योग करावा लागे. मदतीला मुले असत. मोहन हे सारे वर्णन हसत हसत करतो, पण त्यामधून त्याचे आतले दु:ख प्रकट होत असते.
मोहन ठाकर समाजाचा. त्याचे लहानपण बिकट परिस्थितीत गेले. तो त्यातून सावरून उभा राहिला. त्याने त्या लहानपणाची कहाणी एका पुस्तकात मांडली आहे, ती विलक्षण वेधक-वाचनीय आहे. मोहनने त्या पुस्तकात त्याच्या जन्माची पार्श्वभूमी, त्याचा जन्म, त्याची शाळा, त्याचे शाळेतील प्रेमप्रकरण, त्याचे कुटुंबातील संघर्षमय जगणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला भोगावे लागलेले जातपंचायतीचे आव्हान असे सारे विस्ताराने लिहिले आहे. पुस्तकाचे शीर्षकच -गावदाबी असे बोलके आहे. म्हणजे जातपंचायतीस द्यावा लागलेला दंड. ती दोन-पाचशे रुपयांची रक्कम आताच्या काळाच्या संदर्भात नगण्य वाटते, परंतु त्यामागील जुलूम – तो व्यक्तीच्या मनाची सालडी सोलत जातो. मोहन व त्याचे कुटुंबीय यांनी ते सारे भोग भोगले;नव्हे, ती मंडळी त्यांना पुरून उरली.
मोहनने जातपंचायतीला पुढे, मुंबईत राहून मोठे आव्हान उभे केले, परंतु तेथे, सिंधुदुर्गात जगणारे कुटुंब – ते जातीचा बहिष्कार कसा सहन करणार? शेवटी, मोठ्या भावाने पंचायतीचा दंड भरून बहिष्कारातून सुटका करून घेतली! मोहनची अवस्था ‘मी जिंकलो – मी हरलो’सारखी झाली. त्याचे समाधान एवढेच, की नंतर जातपंचायत व्यवस्थाच मोडून पडली! मोहनला तीस-चाळीस वर्षांपूर्वी झालेली घुसमट अजून त्रस्त करते.
मोहनचा आणि माझा स्नेह विशेष जुळला, त्याचे कारण म्हणजे त्याचे समाजहिताचे स्वप्न मोठे होते. शिवाय, त्याला दूरदृष्टी होती. समाजाची पक्की माहिती असल्याशिवाय त्याच्यासाठी कोणतीही योजना आखता येणार नाही यासाठी सर्व समाजांनी त्यांची त्यांची माहिती गोळा करावी व ती ‘फेडरल’ स्वरूपात एकत्र संकलित करावी अशी एक मोठी योजना त्याने आखली. तेव्हा मंडल आयोगाच्या अहवालामुळे सर्व छोट्यामोठ्या जातसमुहांना, गावसमुहांना त्यांची त्यांची ‘ओळख’ लाभत होती. पण ते समूह स्वतःपुरते पाहणारे इतके संकोची होते, की मोहनची विशाल योजना त्यांच्यापर्यंत पोचेना. मग मोहननेही तो नाद सोडला आणि स्वतःच्या ठाकर समाजाच्या विकासकार्याची धुरा उचलली. त्याने त्यांच्यासाठी विविध तऱ्हेचे कार्य केले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज स्थापन करून, न्यायालयीन लढाई देऊन जातीचे दाखले मिळवले; समाजातील शिकणाऱ्या मुलांचे सत्कार घडवून आणले. ठाकर हा आदिवासी समाज, केंद्राची तशी त्याला मान्यता होती. महाराष्ट्र सरकारने मात्र वेगळी भूमिका घेतली त्यातून तो लढा उद्भवला. वर्षापूर्वी त्याची दोन पुस्तके प्रकाशित झाली तेव्हा त्याचे दीडदोनशे चाहते, मुख्यतः गावकरी उपस्थित होते. त्यात त्यांच्या कुडाळ हायस्कूलच्या शंभर वर्षांच्या इतिहासाचे पुस्तकदेखील आहे. एरवी मात्र समाजातील लोक उपक्रमास फार प्रतिसाद देत नाहीत, स्वान्त राहू इच्छितात असा त्याचा अनुभव आहे.
मोहनचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. पण त्याचा मोठा भाऊ ना.बा.रणसिंग हा मॅट्रिकपर्यंत शिकू शकला. त्यांना शिक्षक म्हणून गोव्यात नोकरी लागली. घरात जणू दिवाळीचा सण आला! मोहनसुद्धा दहावी पास झाला आणि ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ’सारख्या ठिकाणी नोकऱ्या करू लागला. नंतर त्याने मुंबईत येऊन मुंबई महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरी पत्करली. तेथे त्याला बढत्या मिळत गेल्या.
त्याने मुंबईत महत्त्वाची गोष्ट केली म्हणजे कॉलेजशिक्षण घेतले. तो मराठी विषय घेऊन एमए झाला. मोहन हा फार संवेदनाशील माणूस आहे. तो एका बाजूला समाजकार्यकर्ता असला तरी दुसरीकडे मराठी कवितेत रमणारा कोमल हृदयाचा गृहस्थ आहे. त्याचे कवितांचे बालपणापासूनचे वेड पुढे शांता शेळके-केशव मेश्राम यांच्या प्राध्यापकी सहवासात कॉलेजमध्ये अधिक बहरून आले.
एकदा शांता शेळके ज्ञानेश्वरीचा पंधरावा अध्याय शिकवत असताना कळसुत्री बाहुल्यांचा उल्लेख (का साई खेड्याची गती | सूत्रतंतू || ) आला. शांताबार्इंनी केलेले विवरण बहारदार होते, पण मोहनला वेगळीच चेतना मिळाली. शांताबाई बोलत असताना, त्याला त्याच्या ठाकर समाजातील कलाधन आठवले. महाराष्ट्रात कळसुत्री बाहुल्यांचे खेळ होत, ते त्या समाजाकडून. त्याखेरीजही नाना तर्हेचे कलाकसब ठाकर समाजाच्या अंगी आहे. त्याच सुमारास, रणसिंग याच्या वाचनात संगीतकार वसंत देसाई यांनी ठाकरकलेचे ऋण मान्य केल्याचे आले. देसाई यांनी म्हटले होते, की त्यांच्या संगीत रचनांवर ठाकर समाजाच्या लोकसंगीताचा प्रभाव आहे. मोहन रणसिंगने या लोककला, मौखिक परंपरा यांच्या संशोधनाचा ध्यास घेतला. त्याचा पिंगुळी पंचक्रोशीतील लोककलांबद्दलचा लेख 1 मे 1977 रोजी ‘लोकसत्ते’त प्रसिद्ध झाला. त्यातून कुडाळजवळच्या पिंगुळी या मोहनच्या छोट्या गावाला आगळे महत्त्व आले. चित्रकथीचा अनमोल ठेवा तेथे सापडला. मोहन रणसिंग त्यातील प्रत्येक प्रयत्नाशी कमीजास्त जोडला गेलेला मी पाहिला आहे. त्यावेळचे ‘महाराष्ट्र राज्य कला शिक्षण’ संचालक बाबुराव सडवेलकर यांनी ते धागे सूत्रबद्धरीतीने जोडून घेतले. ते संचित जपण्याच्या दिशेने पावले पडली. दूरदर्शनने वृत्तांत सादर केला आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणी कौल यांनी चित्रे दाखवत कथाकथनाचा तो प्रकार पडद्यावर मुद्रित करून ठेवला आहे. मोहनच्या नऊ पुस्तकांपैकी सहा पुस्तके ठाकर समाज आणि त्याच्या कला यासंबंधातील आहेत.
मोहनने ठाकर कलेचा वारसा जपावा म्हणून ठाकर संस्कृती भवन उभारण्याची योजना आखली, पाच गुंठे जागा मिळवली, पण पुढे समाजाकडून प्रतिसाद मिळेना, पैसा उभा राहिना. त्याचे स्वप्न मनात राहिले. तो म्हणाला, की विचित्र गंमत बघा, हायवेलगत म्हणून अगदी माफक किमतीत मिळवलेल्या त्या जागेपैकी तीन गुंठे जागा रस्ता रुंदीकरण योजनेत सरकारने घेतली. त्याचे पंधरा लाख रुपये मिळाले. आता संस्थेकडे थोडे पैसे आहेत, तर जागा नाही!
मोहन परखड बोलतो. त्यात हल्ली विषाद आला आहे. समाज इतका आत्ममग्न होत गेला आहे, की समाजकार्याचे कोणास काही पडलेले नाही असे सतत त्याच्या बोलण्यात येते! तो अनुभव त्या काळातील बहुतेक समाजकार्यकर्त्यांचा आहे.
मला वाटते, कार्याचे दिशा आणि कार्यासाठी संघटन या दोन्ही पद्धतींत बदल करण्याची गरज आहे. यापुढील काळात समाजगट, समूह यापेक्षा व्यक्ती महत्त्वाची होणार आहे. व्यक्तीचे गुणविशेष व व्यक्तीचे शक्तिसामर्थ्य जाणले पाहिजे. त्या वैशिष्ट्यांच्या आधारे नेटवर्क हे यापुढील समाजसंघटन असेल. मोहनचा मुलगा आणि मुलगी अत्याधुनिक विद्यांत विशेष स्थानी आहेत. ती समाजाच्या प्रगतीची दिशा आहे.
मोहन रणसिंग 9820814620
– दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.
अशा संवेदनशील माणसांची माहिती ह्या सदरातून मिळते .रायगड जिल्ह्यात पण मला वाटत ठाकर आणि कातकरी समाज पाहिला आहे .लेख माहितीपूर्ण सौ .आंजली आपटे दादर