फलटण संस्थानामध्ये एकोणिसाव्या शतकात वाचनालयाची स्थापना झाली. ती कामगिरी संस्थानचे अधिपती मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांची. तेव्हा तिला ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ असे म्हटले गेले. स्थापना दिन आहे 9 ऑगस्ट 1870. म्हणजे लायब्ररीला दीडशे वर्षे होऊन गेली आहेत. तालुका पातळीवरील वाचनालय हे त्या काळी अप्रूप होते. मुधोजीराजांनी दोन हजारांपेक्षा अधिक ग्रंथ वाचनालयात संग्रहित केले. ते जुने ग्रंथ हे त्या वाचनालयाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ते ग्रंथ जतन करण्यात आले आहेत.
मुधोजीराजांनी या ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’संबंधी म्हटले होते, की “शिक्षणाने माणसाला वाचायला शिकवले; पण काय वाचावे हे शिक्षण सांगत नाही. ती उणीव येथे भरून निघेल” वाचनालय नाईक-निंबाळकर यांच्या मनमोहन राजवाड्याजवळ आहे.
‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’चे नाव 1902 मध्ये बदलले. निमित्त ठरले ब्रिटिश महाराणी व्हिक्टोरिया यांचा हीरक महोत्सवी वाढदिवस. तो 1897 मध्ये इंग्लंडात मोठ्या दिमाखात साजरा झाला. ते वारे भारतात पोचण्यास त्यानंतर पाच वर्षे लागली. त्यावेळी लायब्ररीचे नाव ‘व्हिक्टोरिया डायमंड ज्युबिली लायब्ररी, फलटण’ असे करण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यावर ते चित्र बदलले. ग्रंथालयाची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे 27 एप्रिल 1953 रोजी करण्यात आली. त्याचे पुन्हा नामकरण महाराष्ट्र दिनी, 1 मे 1962 रोजी ‘छत्रपती शिवाजी वाचनालय’ असे करण्यात आले.
राजछत्राखाली उभारल्या व वाढल्या गेलेल्या या वाचनालयाला कधी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला नाही. मूल तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला यावे, वैभवात जगावे तसे या वाचनालयाचे झाले आहे. सुरुवातच भव्य इमारतीत झाली. ब्रिटिशकालीन वैभव असणारी ती वास्तू मूळ तीन मजली होती. भव्य आणि प्रशस्त अशा त्या वास्तूत लाकडाचे आखीवरेखीव दुर्मीळ काम केलेले होते. आकर्षक वास्तुरचना तत्कालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कॄष्ट नमुना समजली जाई. त्यामुळे ती फलटणचे भूषण होती व काही प्रमाणात आहेही. पण काळाबरोबर इमारतीतील सागवान लाकूड कुजले, मोडकळीला आलेल्या भिंती कलल्या. पावसाचे पाणी गळत गळत तळमजल्यापर्यंत येऊ लागले. तेव्हा संचालक मंडळाने धडाडीचा निर्णय घेतला- 2018 साली इमारतीचे वरचे मजले पाडले. इमारत पूर्वीसारखी कौलारू उरली नाही. संजीवराजे नार्इक निंबाळकर यांनी दुरुस्तीसाठी पाच लाख रुपयांची देणगी दिली. इमारत एक मजली उरली आहे. वर पत्रा घातला आहे. ग्रंथालयाचे एकूण क्षेत्रफळ एकशेऐंशी चौरस मीटर म्हणजे एकोणीसशेपन्नास चौरस फूट आहे.
वाचनालयात सत्तावीस अभिलेख आहेत. बावीस हजार सातशेतेरा ग्रंथ आहेत. पैकी दोन हजारांपेक्षा जास्त दुर्मीळ ग्रंथ आहेत. ग्रंथसंपदा इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांमधील आहे. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, कंपनी लॉ, ऋग्वेद संहिता, मध्ययुगीन चरित्रकोश, विश्वकोश, संस्कृतिकोश असे मौल्यवान ग्रंथ व संदर्भग्रंथ आहेत. त्यांचा लाभ सव्वातीनशे सभासद घेत असतात. वाचनालयात नवीन काळाच्या गरजेप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आहे. पीएच डी, एम फिल करणारे ज्ञानोत्सुक संशोधक, एमपीएससी-यूपीएससी-सेट-नेट; विविध विषयांच्या प्रवेशपरीक्षा देणारे करिअरवेडे विद्यार्थी-उमेदवार अशा वाचकांसाठी वाचनालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वाचनालयात अशा प्रासंगिक वाचकांसाठी वेगळी अभ्यासिका आहे. लहान मुलांसाठी ‘बालविभाग’ आहे. तेथेही थोडी फार लहान मुले येतात. काही सुशिक्षित पालक त्यांच्या पाल्यांना आणतात- वाचनाची सवय लागावी यासाठी खास प्रयत्न करतात. वाचनालयाचे सचिव श्रीकृष्ण देशपांडे यांनी बोडके नावाच्या मुलाचा उल्लेख केला. ‘त्या मुलाला वाचनाचे वेडच लागले आहे’ असे ते म्हणाले. ते फलटणमधील अनेक मुले अशी ग्रंथवेडी व्हावीत यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. ते शाळा शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वाचनाला प्रेरित करतात. दहावी ते बारावीच्या मुलांना वाचनाची आवड लागावी म्हणून वार्षिक केवळ शंभर रूपयांमध्ये पुस्तके वाचनास देण्याची त्यांची योजना आहे. वाचनालयाचा इयत्ता पहिली ते चौथी दरम्यानच्या मुलांना एप्रिल ते जून या सुट्टीच्या काळात पुस्तके वाचण्यास देण्याचा उपक्रमही आहे. केवळ महिलांसाठी म्हणून एक वाचनकक्ष आहे; मात्र महिला वाचक अपेक्षित संख्येने येत नाहीत अशी खंत ग्रंथपाल सुनील पवार यांनी बोलून दाखवली.
वाचनालय जितके जुने आहे, तितकेच अद्यावत आहे. वाचक सभासदांना जलद गतीने पुस्तक मिळावे म्हणून वाचनालयात संगणक बसवण्यात आला आहे; त्याच्या जोडीला ‘बारकोड’ पद्धतीची अद्ययावत प्रणालीसुद्धा आहे. सातारा जिल्ह्यात ती प्रणाली सर्वप्रथम याच शिवाजी वाचनालयात वापरली गेली. सभासदांना त्यासाठी ओळखपत्र देण्यात आले आहे. वाचनालयातील पुस्तकांचे वर्गीकरण करून त्यांची नोंद संगणकात ठेवण्यात आली आहे. आधुनिक बुकरॅक, सुखावह आसनव्यवस्था, पंखे, पिण्याचे पाणी इत्यादी सोयी वाचकांसाठी आहेत. ‘वाचनालयाचा व्याप, पसारा मोठा आहे. त्या मानाने आम्हाला शासकीय अनुदान कमी पडते’ असे वाचनालयाचे पदाधिकारी सांगतात. अनुदानाची ही तूट फलटणमधूनच काही दानशूर व्यक्ती भरून काढतात. माजी नगराध्यक्ष स.रा. भोसले, जी.बी. माने, बबनराव क्षीरसागर, मस्जिदभाई शेख, आशालता चमचे, हरिभाऊ निंबाळकर, टी.जी. इनामदार या सगळ्यांनी वाचनालयाला जपले आहे. ती नावे त्यांच्या कार्यामुळे फलटणच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक इतिहासात ठळकपणे नमूद झालेली आहेत.
वाचनालयाला महाराष्ट्र शासनाकडून ‘शतायु ग्रंथालय’ म्हणून सन्मानपत्र 19 मे 2006 रोजी मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘शतकोत्तर वाचनालय’ योजनेतून वाचनालयाचा पाच लाख रुपये देऊन त्यावेळी गौरव करण्यात आला. वाचनालयात पंधरा वर्तमानपत्रे, पाच साप्ताहिके, एक पाक्षिक आणि पंचवीस मासिके येतात. ती वाचकांना वाचनासाठी मोफत उपलब्ध असतात. दररोज सुमारे तीस वाचक वाचनालयात येतात. सभासद संख्या वाढावी ती पाचशेच्या वर जावी यासाठी सचिवांसह सर्व कार्यकारिणी सदस्य प्रयत्न करत असतात.
वाचनालय वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवते. छत्रपती शिवाजीमहाराज जयंती, कामगारदिन, महात्मा फुले जयंती, हरिभाऊ निंबाळकर स्मृतिदिन, वाचनालयाचा स्थापनादिन अशा वैशिष्ट्यपूर्ण दिवशी कार्यक्रम आयोजित केले जातात. कधी रक्तदान शिबिर, कधी लेखक-गुणवंत यांचा गौरव, नामवंतांची व्याख्याने अशा कार्यक्रमांनी वर्ष गजबजलेले असते. त्याशिवाय ग्रंथालयामार्फत साखळी ग्रंथालय योजना, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांचे यशस्वी आयोजन केले जाते.
वाचनालयामार्फत फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाचनालयांना ग्रंथसंपदा देऊन वाचनाचा प्रसार केला जात आहे. वाचनालयामार्फत साखळी देवघेव योजनेअंतर्गत तालुक्यातील मुधोजी हायस्कूल, यशवंतराव चव्हाण हायस्कूल, व्यंकटेश वाचनालय (साखरवाडी), प्रेरणा वाचनालय (बिबी) व जय हिंद वाचनालय (कोळकी) यांना ग्रंथ उसनवार देण्यात येतात.
दत्तो वामन पोतदार, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, शिवाजीराव भोसले अशा अनेकांचा पदस्पर्श या ग्रंथालयाला झाला आहे. अध्यक्ष अजित शिंदे, सचिव श्रीकृष्ण देशपांडे, रवींद्र बर्गे, रवींद्र फौजदार, विलास बोरावके, महेश साळुंखे, सुभाष भांबुरे, विजयकुमार पाटील आणि तुषार नाईक निंबाळकर हे पदाधिकारी आहेत.
सुनील पवार, ग्रंथपाल, छत्रपती शिवाजी वाचनालय, फलटण 8830086948
– माधुरी दाणी 9405543858 1950madhuri@gmail.com
———————————————————————————————-
आपल्या छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाची अशीच आणखी प्रगती होत राहो ही सदिच्छा. सर्व संचालक मंडळ उत्तम सामाजिक कार्य करीत आहेत त्यांना शुभेच्छा. Thinkmaharashtra व माधुरीताई दाणी यांचे मुळे ही माहिती मिळाली धन्यवाद.
Interesting information. Thanks🌹🙏