आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे घर, स्वतःची नोकरी आणि व्यवसाय या परिघाबाहेर सहसा कोणी जात नाही, कारण ते सारे एकत्रितपणे सांभाळणे हीच तारेवरची कसरत असते ! परंतु या विधानाला काही अपवाद असतात. ठाण्यातील कौस्तुभ साठे हे त्यांपैकी एक. ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ या कंपनीमध्ये ‘पोर्टफोलिओ मॅनेजर’ या पदावर कार्यरत असणाऱ्या कौस्तुभ साठे यांचे त्यांच्या समाजकार्याबद्दलचे हे मनोगत.
– अपर्णा महाजन
———————————————————————————————-
नाना साठे प्रतिष्ठान : पुढे नेण्यासाठी वारसा (Passing on the legacy)
आजोबांचे समाजकार्य त्यांनी दिलेल्या शिकवणीतून ‘आयुष्य जगताना एक दिशा असावी’ – समर्थपणे सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न वेगवेगळ्या आघाड्यांवर यशस्वी होत गेला आहे. माझे आजोबा प्र.शं. ऊर्फ नाना साठे. ते जुन्या ठाण्यातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आधारस्तंभ मानले जात. ते ‘समर्थ सेवक मंडळ’ आणि ‘हनुमान व्यायामशाळा’ ह्या संस्थांचे अध्यक्ष. त्यांचा स्वातंत्र्य-संग्रामातील सहभाग. त्यांनी येऊरच्या आदिवासी मुलांच्या उत्कर्षासाठी केलेले काम असे विविध क्षेत्रांत त्यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्याबद्दल त्यांना ठाणे महापालिकेचा ‘ठाणे-भूषण’, पुणे महापालिकेचा ‘ऋषीतुल्य व्यक्ती’ अशा काही पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. आजोबांनी “मी केलेले कार्य देवाला अर्पण केले आहे, त्यामुळे मला पुरस्कार देऊ नका.” असे वारंवार वेगवेगळ्या संस्थांना सांगितले होते ! त्यांनी ‘भगवद्गीता’ पाचशेहून अधिक जणांना विनामूल्य शिकवली होती. मला त्यांनी नावारूपाला आणलेल्या, मोठ्या केलेल्या संस्थांमध्ये काम करण्यासाठी अनेकांकडून अनेकदा विचारणा झाली; परंतु काळ बदलला होता आणि मला फक्त शिक्षणक्षेत्रात सीमित राहायचे नव्हते, म्हणून मी त्यास प्रांजळपणे नकार दिला.
मात्र, आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना काही ना काही देऊन जाते, यावर माझा ठाम विश्वास आहे. मी स्वाक्षरी-संग्रह गेली पंचवीस वर्षे जोपासला आहे. त्यातून मला अनेक क्षेत्रांतील चार हजार सहाशेहून अधिक दिग्गजांना भेटण्याची संधी मिळाली आहे. अनेक संस्था, त्यांचे कार्य, त्यांना येणार्या अडचणी स्वाक्षरी संग्रहाच्या माध्यमातून जवळून बघता आल्या आहेत. त्याच वेळी, मला भोवताली असलेल्या भीषण परिस्थितीची जाणीवसुद्धा झाली. माझा स्वाक्षरी-प्रवास अनेक लोकांपर्यंत पोचत असताना मी समाजासाठी काय करू शकतो असे विचार डोक्यात येत. अर्थात, ते संस्कार आजोबांचे काम जवळून अनुभवल्याने आणि त्यामध्येच सर्व बालपण गेले असल्याने आपसूकच माझ्यावर झाले होते. ‘व्यक्ती घडत असताना समाजाचे तिच्यावर असंख्य उपकार असतात आणि ते शक्य तितक्या वेळा, जमतील तसे फेडायचे असतात’ ह्या विचारांनी मला प्रेरित केले. मग मी ठाण्यातील अनेक संस्थांना शक्य ती मदत करत गेलो; परंतु त्यामधून मानसिक समाधान होत नव्हते. तसेच, फक्त वस्तू अथवा पैसे या स्वरूपांत केली गेलेली मदत मला प्रत्यक्ष गरजू समाजापर्यंत पोचवू शकत नव्हती.
त्यामुळेच, स्वतःला योग्य वाटेल ती मदत स्वतः घेऊन गरजूंना देणे सुरू केले. अर्थात ‘आभाळ फाटलेले असल्याने’ मी एकटा ते कोठेकोठे शिवणार आहे, ही मर्यादा जाणवत असते. पण तरी काही समविचारी सुह्रुद जवळ असल्याने, कुटुंबीय आणि मित्रपरिवार ह्यांना एका छताखाली आणून, ‘नाना साठे प्रतिष्ठान (NSP)’ या संस्थेची स्थापना ऑगस्ट 2022 मध्ये केली आहे. तो समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते, अविनाश आणि नंदिनी बर्वे ह्यांनी उभ्या केलेल्या, मतिमंद मुलांच्या ‘घरकुल’ या वसतिगृहात झाला. त्याच वेळी ‘घरकुल’, तसेच अनाथ प्राण्यांसाठी काम करणार्या ‘पाणवठा’ या संस्थांना सहाय्य केले. काही लोक एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात केली जाणारी ती मदत पाहून खूप समाधान वाटले आणि मला खूप मोठा टप्पा पार करणे शक्य होईल. याचीही जाणीव झाली. ‘नाना साठे प्रतिष्ठान’ गरजूंना आवश्यक ती मदत योग्य वेळी मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे; वर्षभराच्या आतच, जवळपास बारा प्रकल्प ‘नाना साठे प्रतिष्ठान’च्या माध्यमातून पूर्ण झाले आहेत.
येऊरच्या आदिवासी मुलांना शिक्षणसाहित्य वाटप, दिवाळीच्या दिवशी केलेले साडेतीनशे किलोंच्यावर कपडे आणि खेळणी यांचे वाटप, आनगावची गोशाळा आणि वृद्धाश्रम ह्यांना अत्यावश्यक वस्तूंची मदत, ठाण्यातील जीवन-संवर्धन फाउंडेशन या अनाथाश्रमाला भेट असे काही उपक्रम या वर्षभरात राबवले गेले. त्याच दरम्यान सिंधुताई सपकाळ ह्यांच्या विचारांनी प्रेरित झालेला जय होलमुखे हा तरुण मला भेटला. तो कॅन्सरसारख्या भयानक आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना मदत करतो. ते कळल्यावर आम्ही क्षणाचाही विचार न करता, त्याच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’मध्ये भारतातून येणाऱ्या रुग्णांसाठी अनेक संस्था मोफत अन्नदान करतात. त्यांपैकी जयच्या ‘अन्नदाता सुखी भव’ त्या संस्थेला आम्ही शेकडो किलो धान्य, डबे, काही हजार प्लेटस देणगी दिले आहेत. हे सहाय्य वारंवार करण्याचे आहे. ठाण्यातून टेम्पो भरून पाठवला, की पुढील काही महिने त्या गरजूंना रात्रीच्या जेवणाची भ्रांत नसते… गरज नसते. या कामाबद्दल आमच्या टीमचे अनेकांनी कौतुक करून भरभरून प्रतिसाद दिला आहे. आम्ही हे अन्नदान दर तीन महिन्यांनी करत असतो.
जगातील सर्वोच्च रणभूमी ‘सियाचीन’ येथील सैनिक बांधवांसाठी ‘ऑक्सिजन जनरेशन प्लांट’ आणि ‘रिफिलिंग सेंटर’ सुरू करणार्या सुमेधा चिथडे यांचा मुक्त संवाद, ‘नाना साठे प्रतिष्ठान’ने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त आयोजित केला होता. विविध क्षेत्रांतील मान्यवर त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकावणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट नियोजन, ज्वलंत समस्या आणि सुमेधा यांची ओघवती शैली ह्यांमुळे सर्व श्रोते स्तब्ध झाले होते. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘नाना साठे प्रतिष्ठान’ने राष्ट्रीय पातळीवरील योगदान दिले नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर वारीतील वारकर्यांना ‘नाना साठे प्रतिष्ठान’ कडून अन्नदान करण्यात आले.
‘नाना साठे प्रतिष्ठान’ या संस्थेला मोठे करण्यात अनेक दानशूर व्यक्तींचा वाटा आहे. अनेक हितचिंतक आम्हाला महिना शंभर रुपये या योजनेअंतर्गत अथवा एखाद्या कॅन्सरविषयक अथवा वारी यासारख्या उपक्रमाला देणगी स्वरूपात मदत करतात. प्रशांत दामले, वंदना गुप्ते, अर्थतज्ज्ञ डॉ.अभिजित फडणीस, ‘जाई काजळ’चे सर्वेसर्वा राजेश गाडगीळ, संगीतकार मिलिंद जोशी, शेफ निलेश लिमये, टेबल-टेनिस चॅम्पियन मधुरिका पाटकर अशा दिग्गजांपर्यंत संस्थेचे कार्य पोचले आहे. त्याचा फायदा संस्थेला होत असतो.
ठाण्यातील ‘देणे समाजाचे’ ह्या सद्भावना महोत्सवात, साहित्यिक प्रवीण दवणे आणि मानसोपचारतज्ज्ञ आनंद नाडकर्णी ह्यांच्या हस्ते मला गौरवण्यात आले. त्यामुळे जबाबदारी वाढल्याची जाणीव वीणा गोखले यांनी करून दिली आहे. ठाण्यातील हा महोत्सव सलग दोन वर्षे पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी माझ्यासारख्या अनेकांनी हातभार लावले आहेत.
मी स्वतः त्या अनुभवातून शिकत सक्षम झालो आहे. मी कोठलेही यश हे सहज मिळत नसते, त्याबरोबर त्या कामातील त्रुटींसाठी टीका, अवहेलना पचवण्याची ताकद स्वाभाविकपणे तयार होत असते.
सध्याच्या काळात, सामाजिक भान हरपून गेले आहे. तरुण पिढीला त्याची जाणीव करून देणे हे मोठे आव्हान आहे. एखाद्या लहान कामाचे विशाल स्वरूप प्राप्त करून देणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने, माझे माझ्या सहकाऱ्यांसह काम सुरू आहे.
मला मिळालेले यश हे फक्त माझे नसून, त्यामागे अनेकांचा वाटा असतो. त्यामधूनच समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा मिळू शकते. ही सामाजिक बांधिलकी जपताना ‘मी काहीतरी वेगळे करत आहे’ हे चुकूनही मनात न आणता, तो रोजच्या जीवनाचा एक भाग आहे, हे मी स्वतःला समजावत माझे समाजकार्य माझे आजोबा, आई-वडील; तसेच, मला ‘आउट ऑफ द बॉक्स’ विचारांना प्रेरित केलेल्या अनेक दिग्गजांना समर्पित करत आहे.
– कौस्तुभ साठे 9833109398 aus.sathe@gmail.com
———————————————————————————————
सर्वसामान्य माणसासारखे आयुष्य न जगता, सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेवून आपण हे कार्य करीत आहात. त्याबद्दल “नाना साठे प्रतिष्ठानच्या” सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन!!!!