प्रा. रमेश पानसे ही व्यक्ती नसून स्वतःच एक संस्था आहेत! प्रचंड ऊर्जा, उर्मी, अभ्यास, तळमळ, लोकसंग्रह, कल्पना, उत्साह हे सर्व त्या व्यक्तीजवळ आहे. बालशिक्षणात त्यांचे योगदान प्रचंड आहे. त्यांना शिक्षणऋषीच म्हणता येईल. त्यांनी 2020 साली ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले आहे. प्रसिद्ध अमेरिकन विचारवंत मार्क ट्वेन म्हणायचे, ‘मला खूप शिकायचे होते. पण ही शाळा आड आली.’ रमेश पानसे यांनी चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी विचार केला, की मुलाच्या शिक्षणात अडसर बनून राहणारी ही शाळाच बदलली तर? पानसे हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक. उत्तम प्राध्यापकी चालू असताना त्यांच्या जीवनाला एकदम कलाटणी मिळाली, ती बालशिक्षणातील एक मोठे नाव अनुताई वाघ यांच्यामुळे. कोसबाडसारख्या अतिशय मागास आणि दुर्गम अशा आदिवासी भागात बालशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या अनुतार्इंनी चालवलेला अंगणवाडी प्रकल्प बघण्यास पानसे गेले. पानसे यांना तेथे फार आवडले. तेथेच त्यांच्या अंतर्मनाला जाणवले की त्यांचा पिंड ‘बालशिक्षण’ हा आहे. त्यांनी अनुतार्इंबरोबर कामाला सुरुवात केली. अनुतार्इंनी ताराबाई मोडक यांच्याबरोबर काम केले होते. अनुतार्इंकडे प्रचंड ऊर्जा होती. रमेश पानसे हे त्यांचे भाचे. त्यांनी अनुतार्इंचे शिष्यत्व स्वीकारले. पण पानसे नावाच्या प्राध्यापकात एक मूल दडलेले आहे. म्हणून त्यांना प्रश्न पडला, शिकायचे कशासाठी? पोटासाठी? मग सुरू झाला ‘ग्राममंगल’ नावाचा ज्ञानयज्ञ. त्यातूनच स्थापना झाली ती ठाणे (आजचा पालघर) जिल्ह्यातील ऐने या गावी ग्राममंगलच्या पहिल्या शाळेची.
|
आदिवासी पाड्यांवरील मुले |
शाळा केवळ अंगणवाडीच्या वयोगटातून बाहेर पडलेल्या आदिवासी मुला/मुलींसाठी प्राथमिक आणि माध्यमिक वर्ग चालवावेत इतका माफक उद्देश घेऊन सुरू झाली. गरिबी आणि शिक्षणाविषयीची अनास्था यामुळे शाळेसाठी विद्यार्थी मिळणे दुरापास्त होते. पानसे यांनी ऐने या गावी मुक्काम ठोकला आणि ते दारोदार ‘मुलांना आमच्या शाळेत पाठवा’ अशी वेगळीच भीक आदिवासी पालकांकडे मागू लागले. शाळेची पुढील वाढ अभावाच्या जगात होते तशीच देणग्यांच्या बळावर झाली. परंतु पानसे यांच्यापुढे वेगळाच प्रश्न उभा राहिला. त्यांच्या लक्षात आले की शहरी मुलांना शिकवणे आणि आदिवासी मुलांना शिकवणे यांत मोठा फरक आहे. शिक्षणाच्या शहरी मोजपट्ट्या तेथे निकामी होत्या. निसर्गात बागडणाऱ्या मुलांना त्यांच्या कलाने शिकवणे भाग होते. पानसेसर विचार करत, यासाठी काय करता येईल? त्यांचे बालशिक्षण आणि मुलांची मानसिकता यांवर वाचन आणि संशोधन सुरू झाले. अनुतार्इंनी सोप्या भाषेत लिहिलेल्या पुस्तकांचे पारायण सुरू झाले. शिक्षणपत्रिका या मासिकाचा पानसे यांना उपयोग झाला. पानसे हे त्या साऱ्या वाचन आणि
|
अनुताई वाघ |
विचारमंथनातून महाराष्ट्रातील मुलांना योग्य अशा एका शिक्षणपद्धतीकडे झुकले. त्यांना जाणीव झाली, की शहरी मुले आणि आदिवासी मुले यांची मानसिकता एकच असते. मुलाला स्वानुभवातून शिकायला आवडते. मुले स्वत: केलेल्या प्रयोगातून जास्त लवकर शिकतात. शहरात चार-पाच वर्षांनंतर मुलांच्या मनाचा, बुद्धीचा आणि शिक्षणाचा ताबा पालक, शिक्षक आणि सभोवतालची मोठी माणसे घेतात. कारण त्यांना पुढील पिढी त्यांच्याप्रमाणे घडवायची असते. आदिवासी पालक तसे करू शकत नाहीत. पानसे यांनी वेगळा विचार सुरू केला. मुले तर त्यांची ती शिकत असतात. शिकण्याची प्रक्रिया त्यांच्या मेंदूच्या पातळीवर कशी चालते? अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले. त्यांनी त्या विषयावर पुन्हा वाचन केले, निरीक्षण केले, बालमानसशास्त्राचा अभ्यास केला. त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींशी चर्चा केल्या.
पानसे यांचे आदिवासी मुलांना शिकवून मुख्य प्रवाहात आणणे इतकेच मर्यादित ध्येय होते, परंतु ते सर्व स्तरांतील लहान मुलांचा विचार करू लागले. त्यातून नव्या शिक्षणपद्धतीचा उगम त्यांच्या मनात सुरू झाला, ती म्हणजे ‘ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धत’. तो शब्दप्रयोग 2000 सालापासून व्यवहारात आला. ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीचे महत्त्वाचे काही मुद्दे आणि फायदे असे आहेत :
· शिकणे ही क्रियाशील आणि अनुभवाधारित प्रक्रिया आहे.
· मेंदूची वाढ शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे होते.
· शिकणे ही एक व्यक्तिगत व सामाजिक कृती आहे.
· स्व-शिक्षण नवनवीन आव्हाने अंगावर घेण्यास प्रवृत्त करते.
· शिकण्याच्या प्रक्रियेत शिक्षक शिकवणारा नसतो तर मार्गदर्शक व मदतनीस असतो.
· अनुभवातून मिळणारे ज्ञान दीर्घकालीन स्मृतीत जाते; अनुप्रयोगाच्या (application) वेळी सहज उपलब्ध होते.
· ज्ञानाचे रुपांतर विचारात, वर्तनांत व कृतीत होते आणि शहाणपण येते.
· आकलन शक्ती वाढती राहते.
· रचनावादी शिक्षणपद्धतीने समस्या निवारणाची क्षमता वाढते.
· आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात ज्ञानलालसा आणि ते मिळवण्याची जिज्ञासा जागृत राहते.
|
पानसे सरांची पुस्तके |
जीवन आणि शिक्षण यांचा घनिष्ट संबंध असतो. ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया आनंददायीच असते. ज्ञान आणि त्याला मिळण्यासाठीचे वातावरण निर्माण करणे हे पालकांचे आणि शिक्षकांचे काम आहे. जीवन घडवणे आणि जीवनाचा आस्वाद घेणे हेच शिक्षणाचे प्रमुख उदिष्ट असले पाहिजे. आधुनिक जीवन हे सतत बदलणारे आणि प्रवाही असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये हे बदल स्वीकारण्याची ताकत निर्माण होणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांत समस्या निवारण्याची क्षमता निर्माण करणे हेच ज्ञानार्जनाचे वा शिक्षणाचे कारण असले पाहिजे. चालता येत नाही असे लहान मूल नैसर्गिक रीत्या दोन पायांवर उभे राहून चालण्याचा प्रयत्न करते. ते पडले तरी पूर्ण चालायला येईपर्यंत त्याचा प्रयत्न सोडत नाही. मुलापुढे त्याला चालायला येत नाही अशी समस्या नसते. त्याला स्वत:ला स्वतंत्रपणे चालायला येईपर्यंत मूल प्रयत्न करत राहते. ते कोणीही शिकवण्याची वाट बघत नाही. मूल स्वप्रयत्नातून ते साधते, चालण्याचे ज्ञान मिळवते. त्यात उभे राहणे, तोल सांभाळणे, एक एक पाउल टाकणे इत्यादी गोष्टींचे ज्ञान स्वतःच मिळवते. शेवटी, त्याला इतका सराव होतो की त्या चालण्यात सहजता येऊन ते मूल पळूदेखील शकते!विद्यार्थी त्याच तऱ्हेने स्वत:च्या कृतीतून/रचनेतून शिकत असतो. शिक्षकाने त्याला फक्त वेगवेगळ्या रचना (Modeling) करण्यास उद्युक्त करायचे आणि मदत (Catalyst) करायची.
रचनावादात अनुभवाला महत्त्व असल्याने मेंदूचा विकास जास्त वेगाने होतो. पानसे यांनी ऐने येथील शाळेत रचनावादाची अंमलबजावणी केली आणि मुलांच्या सभोवतालचे व त्यांच्या संस्कृतीतील संदर्भ घेऊन त्यांना समजणाऱ्या भाषेत शिक्षण सुरू केले. आदिवासी मुलांत त्याचे उत्तम परिणाम दिसून आले. पानसे यांनी पियोज, वाग्तोस्की या शास्त्रज्ञांच्या त्या विषयावरील संशोधनाचा अभ्यास केला. सरकार दरबारी त्या पद्धतीचा अंगीकार व्हावा यासाठी प्रयत्न केले. प्रस्थापित शिक्षणपद्धतीत तो आमूलाग्र बदल होता, रूढ शिक्षण संकल्पनेला मोठा धक्का होता. त्यामुळे त्यास विरोध झाला. पानसे यांनी पुण्यात ऑफिस थाटले आणि गांधीभवनच्या सहभागातून शहरी मुलांसाठी लर्निंग होम (शिकते घर) नावाचा प्रयोग सुरू केला. तेथे शिक्षक, पालक यांच्या सहभागातून ज्ञानरचनावादीपद्धतीने मूल शिकते. लर्निंग होम ही शाळा नसून शिकते घर आहे. त्यांनी वाईलादेखील तसाच प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. लोक रचनावादाचा स्वीकार करू लागले आहेत. सरकारनेदेखील प्राथमिक शाळेत त्या पद्धतीचा स्वीकार केला आहे. ग्राममंगल केवळ एक शाळा राहिलेली नाही, तर रचनावादी शिक्षणपद्धतीची चळवळ झाली आहे.
|
ग्राममंगलची ऐने येथील शाळा |
ग्राममंगल हा बहुपेडी वृक्ष झाला आहे. ऐने आणि विक्रमगड या आदिवासी क्षेत्रातील शाळा, पुण्यात लर्निंग होम नावाची रचनावादी शाळा, अनेक बालवाड्या, रचनावादी शिक्षणासाठी लागणारी साधने डिझाइन करून बनवणे आणि विकणे, वेगवेगळ्या शाळांत रचनावादावर प्रशिक्षण देणे, रचनावाद प्रशिक्षणानंतर त्याचे परिणाम (impact analysis) साधतात की नाही हे बघण्यासाठी ऑडिट अशा अनेक अंगांनी ग्राममंगल काम करत आहे. संस्थेतर्फे हजारो शिक्षक रचनावादावर प्रशिक्षित केले जातात.
पानसेसर या वयातदेखील सरकारी वा खाजगी शिक्षण समित्यांवर सदस्य या नात्याने मार्गदर्शक म्हणून काम करतात. बालशिक्षण या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याने देत हिंडत असतात. त्या निमित्ताने एकटे प्रवासदेखील करतात. त्यांनी बालशिक्षण या विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत व संपादित केली आहेत. ते रोज काही ना काहीतरी विचार लिहून काढतात. उत्तम कविता करतात. त्यांचा कामाचा उरक, उत्साह, जोश पाहिला की कार्यकर्त्यांत प्रचंड उर्मी येते. लोकसंग्रह करणे, वेगवेगळ्या क्षेत्रांतील माणसे ग्राममंगलच्या कामाशी जोडणे हा त्यांचा आवडता उद्योग झाला आहे. कोणतीही सरकारी मदत ग्राममंगलने जाणीवपूर्वक टाळली आहे. केवळ लोकांच्या मदतीने आणि सहभागातून संस्था चार दशके चालली आहे. पानसे यांचे काम अखंड चालू राहणार आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण धोरण जाहीर झाले आहे. त्यात 5+3+3+4 ही पद्धत स्वीकारण्यात आली आहे. रमेश पानसे यांनी बालशिक्षणात सुचवलेले बदल तंतोतंत त्या धोरणात स्वीकारण्यात आले आहेत. त्यांच्या कार्याची त्यांच्या ऐशीव्या वर्षी मिळालेली ही भेटच होय.
– श्रीकांत कुलकर्णी 9850035037
shrikantkulkarni@grammangal.org
श्रीकांत कुलकर्णी हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर. ते पुण्याचे. त्यांनी इंजिनीयर म्हणून सदतीस वर्षे काम करत असताना पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मशीन ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर या क्षेत्रात निर्मिती केली आहे. त्यांनी लेखन हा छंद वयाच्या पन्नाशीनंतर जाणिवपूर्वक जोपासला. त्यांचा व्यवसायाला सामाजिक जाणिवेचे अधिष्ठान देणा-या व्यक्ती, तसेच सेवाव्रती व्यक्ती व संस्था यांचे योगदान लेखनातून मांडणे हा उद्देश आहे. कुलकर्णी ललित लेख, राजकीय व्यंग, प्रवासवर्णने अशा त-हेच्या लेखनातून व्यक्त होतात. त्यांच्या ‘माझ्या नजरेतून’ या ब्लॉगवर शंभराहून अधिक लेख प्रसिद्ध आहेत.
———————————————————————————————————
श्री रमेश पानसे यांच्या संबंधी वृत्तपत्रांतून येते तितकीच माहिती मला असते. इथे तशी पुस्तके मिळत नाहीत . त्यामुळे लेख वाचून आनंद झाला
ग्राम मंगलचे प्रयोग समजले. क्षानरचनावादाचा अंगिकार करुन सगळेच शिकते झाले श्रीरमेश पानसे यांचे सर्व प्रयोग शैक्षणिक धोरणात बालशिक्षणात स्विचारले गेले.याचा अभिमान वाटला.त्यांच्या महान कार्याला वंदन!
वंदनीय कार्य!ज्ञान मिळवण्याचे वातावरण व समस्या निवारण क्षमता विद्यार्थ्यांमधे निर्माण करण्यासाठी ज्ञानरचनावादाचा अंगिकार करायलाच हवा.