रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील सुसरोंडी-पालशेतची ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ हे आश्चर्यच ठरले आहे ! तिचा शोध पुण्याच्या डेक्कन पोस्ट ग्रज्युएट रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. अशोक मराठे यांनी 2001 साली लावला. ती किमान नव्वद हजार वर्षे जुनी असावी. भारताच्या साडेसात हजार किलोमीटर लांब समुद्र किनाऱ्यावरील ती पहिली गुहा आहे. ती मानवनिर्मित गुहा (17° 26 एन, 73° 15 ई) आहे.
पालशेत हे गाव गुहागर-हेदवी मार्गावर गुहागरपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. ती गुहा समुद्रकिनाऱ्यापासून दोन किलोमीटर आत, समुद्रसपाटीपासून पंच्याऐंशी मीटर उंचीवर सुसरोंडी भागात ‘सुंदर’ नदीच्या उगमाजवळील जांभ्या दगडात आहे. ते ठिकाण पालशेत ते पोमेण्डी मार्गावर निवोशी गावाजवळ बारभाईच्या पूर्वेस एक किलोमीटर अंतरावर येते. स्थानिक लोक तिला ‘वाघबीळ’ म्हणून ओळखतात. तेथे पोचण्यासाठी डोंगर चढून किमान वीस मिनिटांची पायपीट करावी लागते. सुंदर नदीच्या दोन्ही तीरांवर, जांभ्या दगडाचे विस्तीर्ण पठार पसरलेले आहे. पावसाळ्यात त्या भागातून छोटेमोठे असंख्य ओहोळ अरुंद आणि खोल घळयांतून वाहत असतात. ते दृश्य अतिशय मोहक असते. गुहा त्याच नदीपात्रात साधारण साडेचार मीटर उंचीच्या धबधब्याशेजारी आहे. तिच्या जवळ जिवंत झरा आहे. गुहेचे प्रवेशद्वार आयताकृती आहे. त्याची रुंदी दीड मीटर, उंची अडीच मीटर आहे. ते दक्षिणेला आहे. मराठे यांनी गुहेत उत्खनन 2001 साली केले होते. तेव्हा त्यांना 2.7 मीटर खोलीवर हातकुऱ्हाड, तोडकुऱ्हाड, फरशी, तासवा यांसारखी पुराश्मयुगीन चोपन्न हत्यारे सापडली होती. इतकी जुनी काही दगडी हत्यारे तामिळनाडूमध्ये चेन्नईजवळील पल्लवम येथे सापडली आहेत. गुहेमधील पहिला आदिमानव हा होमो इरेक्टस प्रकारचा होता. त्याच्या पाठीचा कणा ताठ होता. मात्र त्याच्या बुद्धीचा विकास पूर्ण झालेला नव्हता. त्याची प्रगती जंगलातील अन्न गोळा करणे आणि दगडी हत्यारे फेकून प्राण्यांची शिकार करणे येथपर्यंत झालेली होती. पालशेतसारख्या अच्युलियन मानवाच्या गुहेतील वास्तव्याचे पुरावे भारतात विविध बावीसहून अधिक ठिकाणी मिळाले आहेत.
पालशेतला नारळ आणि सुपारी यांच्या बागा आहेत. मराठे यांनी त्या गावात पुरातन बंदर आणि त्याच काळातील सागरी बांधकाम यांबाबतही संशोधन केलेले आहे. तेथील बंदर खुद्द गावात लक्ष्मीनारायण मंदिराला लागून, कुंभारआळी आणि बापटआळी भागात आहे. ते इसवी सन 2 ते 16 पर्यंत अस्तित्वात होते. तेथून समुद्रापर्यंतचे अंतर दोन किलोमीटर इतके आहे. बंदराच्या बांधकामाचे अवशेष समुद्रापर्यंत दिसून येतात. एका ग्रीक खलाश्याने पहिल्या शतकात लिहिलेल्या ‘पेरिप्लस मॉरीस एरिग्रायर’ या प्रवासवर्णनपर पुस्तकात कोकण किनारपट्टीतील काही बंदरांचा उल्लेख आहे. त्यात ‘पालमपट्टई’ असे म्हटले आहे, ते पालशेतला गृहित धरून. त्या बंदरातून ग्रीस आणि रोम यांच्याशी व्यापार तिसऱ्या शतकादरम्यान चालत होता. ते बंदर सतराव्या शतकात सलग झालेल्या दुष्काळांमुळे मागे पडले असावे. बंदर अर्धगोलाकार बुरुजाच्या आकाराचे आहे.
पूर्वी गुहागर तालुक्यात सुरळ येथे प्राचीन शिवमंदिर आणि मानवनिर्मित सोळाशे वर्षपूर्व गुहा सापडली आहे. वेळणेश्वरमध्ये दहाव्या शतकातील बंदराच्या खुणा सापडल्या होत्या. त्यात मानवी देहाचे सांगाडे, आठ हजार वर्षांपूर्वीची समुद्र भिंत आणि जगातील सर्वात जुन्या मानवी वसाहतीचे नमुने मिळाले आहेत. श्रीवर्धन-केळशी-आंजर्लेपासून विजयदुर्ग-सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत असलेल्या मानवनिर्मित बांधकामास पणजीच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ने दुजोरा दिला आहे. ते बांधकाम सुमारे सव्वादोनशे किलोमीटर लांब आणि तीन मीटर रूंद आहे. ते दगडी असून, सलग नाही. त्याबाबत सलग सहा वर्षे संधोधन सुरू होते. त्या साऱ्यांतून मराठे यांनी हडप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीन आणि देशातील सर्वांत पुरातन ‘कोकण संस्कृती’ अस्तित्वात असल्याचा उलगडा केला होता. मराठे जुलै 2011 मध्ये निवृत्त झाले व त्यानंतर ते संशोधन थंडावले.
गुहेचा शोध लागल्यानंतर गावातून तेथपर्यंत जाण्यासाठीच्या मार्गावर चुन्याने रंगवलेले पांढरे दगड ठेवून, रस्ता समजेल अशी व्यवस्था केली गेली होती. त्यालाही दोन दशकांचा काळ लोटला आहे. तेव्हा देशभरातील अनेक अभ्यासक, पर्यटक आणि चिकित्सक यांची पावले पालशेतच्या दिशेने वळली होती. गुहेचा परिसर निसर्गरम्य आहे. सुंदर नदीच्या पात्राचे पाणी बांध घालून अडवले तर त्या ठिकाणी असलेल्या मुबलक जागेचा उपयोग करून सुंदर पर्यटन स्थळ आकाराला येऊ शकते.
जागतिक पुरातत्त्वीय वारसा स्थळांमध्ये, नेरळ-माथेरानच्या ‘नॅरो गेज टॉय ट्रेन’ला स्थान लाभले आहे. ते वगळता, हजारो वर्षांचा इतिहास कोकणाला आहे. मात्र तेथील एकही स्थळ हे जागतिक महत्त्वाचे मानले जात नाही. अशोक मराठे संशोधित केळशी (तालुका दापोली) येथील निश्चित कालमापन असलेल्या त्सुनामी निर्मित जगातील एकमेव वाळूच्या टेकडीसह समुद्रातील आठ हजार वर्षांपूर्वीचे बांधकाम आणि पालशेतची पुराश्मयुगकालीन गुहा यांसारखे संशोधन ‘जागतिक पुरातत्त्वीय वारसास्थळ यादी’त समाविष्ट होण्यास हवे. तो कोकणचे पर्यटन जागतिक नकाशावर नेण्याचा सामर्थ्यशाली मार्ग आहे.
डॉ. अशोक मराठे Pranav Teerth Mission (020) 2613 3573, guruji@pranavteerth.com
– धीरज वाटेकर 9860360948 dheerajwatekar@gmail.com
———————————————————————————————-