जगाला प्रेम अर्पावे ! (Offer love to the World)

समाजात सगळीकडे अस्वस्थता पसरलेली असताना, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काय करायला हवे? संवेदनशीलतेने विचार करणाऱ्या माणसांच्या मनात असा प्रश्न असंख्य वेळा उद्भवतो. त्याचे समी‍करणातून देण्यासारखे उत्तर नाही. समाजाच्या परीघामध्ये ज्ञान, धर्म, राजकारण, लैंगिकता, स्त्री-वाद, पुरुषप्रधानता अशा क्षेत्रांतील विचारांचे सत्य समजून घेण्यासाठी, संकुचित विचार आणि वर्तन याबाबत सजगता येण्यासाठी सर्वांनी कार्यरत झाले पाहिजे. असा बदल म्हणजे सुधारणा होणे. तो जास्त वेळा झाला तरच समाजात चांगुलपणा नांदेल. द्वेषाने, हिंसेने किंवा तिरस्काराने पसरते ते केवळ वैरभावाचे पोषण. सत्याने, निर्वैरभावाने, जगाकडे प्रेमाच्या, स्नेहाच्या आणि आत्मीयतेच्या नजरेतून पाहिले तर मनामनांतला सद्भाव जागृत होईल, जपला जाईल. मानवी विचारांना, भावनांना स्पर्श करणारा गीताली विनायक मंदाकिनी यांचा लेख वाचायलाच पाहिजे.

– अपर्णा महाजन

————————————————————————————-

जगाला प्रेम अर्पावे !

धर्म व संस्कृती हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा सखोल असा अंश असतो. तो तात्त्विक, कृतिरूप आणि सामाजिक संबंधरूप अशा तिन्ही पातळ्यांवर प्रकट होत असतो. त्यात बदल घडवणे शक्य नाही असे नाही, तो बदल नित्यता आणि परिवर्तन यांचे संतुलन ठेवून, घडवून आणला जाऊ शकतो. मात्र ते पथ्य पाळण्यास हवे. व्यक्तीच्या ठिकाणी श्रद्धेचा परिपोष व्यक्ती जन्मल्यापासून अक्षरश: शेकडो मार्गांनी होणाऱ्या आणि तिला सर्वांगांनी प्रभावित करणाऱ्या संस्कारांमधून होत असतो. धर्माचा व्यक्तीच्या मनी-मानसी शिरकाव सकारात्मक अथवा नकारात्मक पद्धतीने रोज कानांवर आदळणारे हजारो धर्म-विशिष्ट ध्वनी, आख्यायिका, प्रार्थना, मिथके, कहाण्या, पोथ्या, पुराणे, कीर्तन-प्रवचने, उत्सव-यात्रादी मेळावे इत्यादींमधून झालेला असतो. संस्कृती निर्माण करण्याचे आणि तिला पिढ्यान् पिढ्या संक्रमित करण्याचे काम विशिष्ट प्रज्ञावंत व प्रतिभासंपन्न व्यक्ती यांच्यापेक्षाही लक्षावधी सामान्य माणसे रोजच्या जगण्यातून करत असतात.

धार्मिक कर्मकांड हा सांस्कृतिक अंगाने व्यक्तीच्या जगण्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य म्हणजे अस्मितेचा भाग बनलेला अथवा बनवला गेलेला असतो. हे लक्षात ठेवून अतिशय जोखमीने कर्मकांडात विषमता, शोषण कसे आहे हे सांगत त्या कर्मकांडांना सर्जनशीलपणे मुक्तिदायी वळण लावण्यासंदर्भात सखोल चर्चा होण्यास हवी, कारण विषमता व शोषण यांवर आधारित पारंपरिक कर्मकांडांना नाकारल्यावर सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणारी दैनंदिन जीवनातील पोकळी विधायक पर्यायाने भरून काढण्यास हवी. नाही तर आजवर झाले तसे कर्मकांडांच्या अंगाने धर्मांधतेला हवा दिली गेली आणि दुसऱ्यांच्या धर्माच्या संदर्भात द्वेष- हिंसा भडकावत स्वधर्माभिमान चेतवला गेला असे होईल. तशा त्या कर्मकांडातून झालेल्या ध्रुवीकरणाचे दुष्परिणाम सद्यकाळात आपण अनुभवत आहोत.

परिवर्तनासाठी सिद्धांत हा सर्वसामान्यांच्या मानसिकतेचा भाग होणे आवश्यक असते. ते समाजकारण व राजकारण असते. तो सिद्धान्त अनुभवाच्या पातळीवर प्रत्ययास येतो. तो जगावा लागतो. त्यात नुसती घोषणाबाजी करून चालत नाही. स्त्रीवादी विचारवंत ज्ञानक्षेत्रामधील मूलभूत संकल्पना, विचार यांमधील पुरुषप्रधानता, पुरुषकेंद्रितता उघडकीस आणतात. स्त्री अभ्यासकांनी स्त्रियांच्या भिन्नत्वाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन पुरुषकेंद्रितते विरोधी सैद्धांतिक मांडणी सुरू केली आहे. स्त्रिया हा केवळ विश्लेषणाचा विषय नाही. स्त्रीवाद नावाचे नवे राजकीय भान आहे. स्त्रियांच्या अनुभवाच्या परिप्रेक्ष्यातून ज्ञाननिर्मिती करणे सुरू आहे. सत्य, वस्तुनिष्ठता, मूल्यनिरपेक्षता, विवेक यांना एकच एक अर्थ नाही हे स्त्रीवादी सिद्धांतातून मोकळेपणाने सांगितले गेले आहे. त्यामुळे हे मान्य झाले आहे, की सत्य, वस्तुनिष्ठता, मूल्यनिरपेक्षता, विवेक हे सर्व शब्द संदर्भाधिष्ठित असतात. ज्ञान निर्माण करणारी व्यक्ती ही त्या त्या काळातील राजकारण, इतिहास आणि लैंगिकता या चौकटींपासून मुक्त नसते. आजवरचे थोर तत्त्वज्ञ, संत-महंत पुरुषही या सर्वांपासून मुक्त नव्हते. तसेच, आजचे चळवळीतील, आंदोलनातील पुरुषही त्यांपासून मुक्त नाहीत !

ज्ञानशास्त्राच्या क्षेत्रात निखळ अनुभवांना संकल्पनांच्या व पर्यायाने सिद्धांताच्या पातळीवर नेऊन ठेवणे म्हणजे विशिष्ट अनुभवाला वैश्विक परिमाण देणे होय. विशिष्ट व वैश्विक हे दोन्ही घटक आपोआप घडत नाहीत, तर ते समाजात प्रभुत्व गाजवणाऱ्या शक्ती त्यांच्या त्यांच्या हितसंबंधांनुसार रचत असतात. विशिष्ट म्हणजे हिणकस, गौण, अनावश्यक तर वैश्विक म्हणजे विशेष महत्त्वाचे, मुक्तिदायी इत्यादी इत्यादी आहे. त्यामुळे विशिष्ट आणि वैश्विक यांत ताण असतो. विशिष्टाकडून वैश्विकतेकडे जाण्याच्या प्रवासाचा सामाजिक पाया संकुचित असतो. तो स्त्रियांना, बहुजनांना वगळणारा असतो आणि म्हणूनच अभिजनवादीही असतो ! हे वास्तव स्त्रीवादाने अधोरेखित केले. स्त्रीवादी अभ्यासकांनी पुरुषप्रधान व्यवस्थेतील वैश्विकता ही पक्षपाती आहे हे समोर आणले. कारण त्यामध्ये पुरुषालाच वैश्विक मानले आहे. तो परिपूर्ण व सर्वव्यापी, क्षमता व परिपक्वता असलेला, विवेकदर्शी, भावनांच्या आहारी न जाणारा इत्यादी इत्यादी. उलटपक्षी स्त्री अधिक भावनाप्रधान, भोळी, श्रद्धाळू, तुलनेने कमी बौद्धिक क्षमता असलेली; ती विशिष्टतेचे प्रतीक आहे. याला विरोध करण्यास हवा. विशिष्टाकडून वैश्विकतेकडे जाण्याच्या प्रवासाचा सामाजिक पाया स्त्रिया आणि बहुजन यांना त्यात सामावून घेत व्यापक करण्यास हवा. तसा आग्रह स्त्रीवादी अभ्यासक करतात.

स्त्रीवादात स्त्री हा शब्द असला तरी तो स्त्रियांपुरता मर्यादित नाही. स्त्रीवाद हे शोषितांचा-वंचितांचा, दुर्बलांचा विचार करणारे, हिंसेला नकार देणारे, सर्जनाला जपणारे आणि शांतीची मागणी करणारे, अखिल मानवजातीला कवेत घेणारे दर्शन आहे हे विशेषत: पुरुषांनी लक्षात घेतले पाहिजे- त्यांनीच स्त्रीवादी व्हावे असे जिव्हाळ्याने सुचवावेसे वाटते. स्त्रीवाद सर्व प्रकारच्या विषमतेचा विचारही विरोधापेक्षा संवादी सुराने व्हावा असे मानतो. तसाच विचार अभ्यासात आणि चळवळीतही करावा. स्त्रीवाद सत्तेच्या महारचनांबरोबर मानवी नात्यातील सूक्ष्म रचनांचा विचार करतो. स्त्रीवाद ही एक राजकीय भूमिका आहे. स्त्रीवाद लक्षात आणून देतो, की बाई असणे हा शारीरिकतेशी संबंधित घटक आहे; तर स्त्रीत्व किंवा बाईपणा, पुरुषत्व किंवा पुरुषपणा आणि एलजीबीटी आयक्यू यांचे इतरत्व हे सामाजिक, सांस्कृतिक-राजकीय-आर्थिक माहोलात घडवले जाते.

धर्मांधता आणि असहिष्णुता हे हातात हात घालून एकत्रपणे वावरत असतात. त्यातून हिंसा आणि क्रौर्य यांचा जन्म होतो. धार्मिक असणे आणि धर्मांध असणे यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. बहुसंख्य माणसे धार्मिक असतात, धर्मांध नसतात. सर्व धर्मांमध्ये मूलभूत नैतिक शिकवण मानवतावादी आहे. गांधीजींच्या मते धार्मिक रूढी-परंपरांमधील अन्याय, शोषण हे सारे समाजासाठी नुकसानकारक असतेच; पण धर्म मानवी जीवनात प्रेम, भक्ती, नि:स्वार्थ सेवा, त्यागमय जीवन, साधी राहणी या मानवी गुणांची शिकवणही देतो. ते गुण रूढी, व्रत यांमधून मनुष्याला सहजसाध्य होतात. धर्माचीही सकारात्मक बाजू सर्जनशीलपणे वापरणे गरजेचे आहे. धर्माचे संस्थाकरण, सत्ताकारण झाले, की त्यात शोषण, अन्याय यांचा शिरकाव होतो. त्यातून व्यक्तिगत मनःशांती आणि सामाजिक स्वास्थ्य, दोन्ही हरवते. यावर उपाय म्हणून संस्थात्मक धर्म नाकारून स्वधर्म स्वत: घरात निगुतीने जपण्यास हवा. स्वधर्म कसा असावा? अनेक धर्मांमधील पटतील, भावतील ती तत्त्वे अंगीकारून त्यांची एक सुरेखशी गोधडी करावी. तिला मानवतेच्या सूत्राने जोडले गेलेले असेल. तसा मानवी मायेची ऊब असलेला ज्याचा त्याचा स्वधर्म व्यक्तीची चांगली वाढ-विकास करेल. लोकशाहीत स्वधर्म पाळणे हे श्रेय आहे. हा स्वधर्म अनामिक असल्याने त्याचे नाव घेऊन कोणी कोणाचा अपमान करू शकणार नाही. आनंदात राहण्यासाठी उत्स्फूर्त व्यवहार करणे हे जितके योग्य तितकेच अति काटेकोर जाचक नियम नसणे आणि लवचीकता असलेले नियम असणे आवश्यक आहे. न काचणारे नियम शोधून काढणे, आत्मसात करणे हाच स्वधर्माचा शोध होय. हे नियम व्यक्तीच्या जीवनात उमलत जातील. ते पाळताना आनंद तर होईलच, पण अधूनमधून नियम मोडले तर फार दुःख करण्याचे कारण नाही. स्वधर्म पाळताना अंतरंग आणि बहिरंग यांचे अद्वैत लक्षात येऊ लागेल आणि त्यातून आपपरभाव नाहीसा होऊ शकेल. दुसऱ्याच्या स्वधर्मातील चांगले तत्त्व माणसाला गवसेल आणि त्याचा स्वधर्म सुधारण्यास मदत होईल. ही एक आनंददायी आणि सततची अशी प्रक्रिया आहे. त्यातून व्यक्ती आणि व्यवस्था लोकशाहीवादी, समता-स्वातंत्र्य-मैत्रभाव या पायावर उभी राहून समाज स्वास्थ्यपूर्ण, सद्भाव जपणारा आणि आनंदी होईल.

हे सर्व भाबडेपणाचे आहे असे वाटू शकते, पण ‘करके देखो’ ! कारण आजच्या असहिष्णू, धर्मांध आणि हिंसक वातावरणामध्ये माणसाच्या हातात ही एकच आनंददायी गोष्ट त्याच्या स्वाधीन आहे.

माणसे निर्वैर भावाने बदलू शकतात. अडीच अक्षरी प्रेमाची किमया तर सर्व जाणतातच. ‘जगाला प्रेम अर्पावे’ हा साने गुरुजींचा मंत्र आचारविचारात घेऊन चालत राहू या. सत्यकी जय हो ! जय जगत !!

(छायाचित्र – परिवर्तन पुस्तकावरून साभार)

गीताली विनायक मंदाकिनी 9822746663 saryajani@gmail.com
———————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here