नोरा रिचर्ड्स पंजाबी रंगभूमीची आयरिश आजी (Nora Richards – The Irish Mother of Punjab’s Theatre)

1
164

मी कबीर बेदी या नटाच्या The stories I must tell या पुस्तकाचा (आत्मचरित्र) अनुवाद केला तेव्हा त्याच्या आईवडिलांवरील प्रकरण वाचल्यानंतर मला त्याची आई फ्रेडा बेदी यांचा शोध अधिक तपशिलात जाऊन घ्यावा असे वाटले. फ्रेडावर दोन पुस्तके आहेत; तर त्यामधून आणखी एका वेगळ्याच व्यक्तीवर जाऊन धडकलो ! त्या नोरा रिचर्डस. अँड्रयू व्हाईटहेड यांच्या फ्रेडाबाबतच्या पुस्तकात लिहिले आहे, की फ्रेडा जेव्हा कांगडा जिल्ह्यातील आंद्रेत्ता येथे राहण्यास गेली तेव्हा तिला नोरा रिचर्ड्स नावाच्या आयरिश अभिनेत्रीने मोकळी जमीन दिली. फ्रेडाने तिचे घर तेथे उभे केले. साहजिकच, उत्सुकता निर्माण झाली की ही नोरा कोण? ती हिंदुस्तानात का आणि केव्हा आली होती? आणि ती अभिनेत्री होती तर तिने कांगडासारख्या दूर, निसर्गरम्य जिल्ह्यात राहण्याचे का ठरवले? म्हणजे ती रंगभूमी प्रगत असलेल्या एखाद्या भागात का राहिली नाही? त्यातून नोराचे चरित्र कळले ते अफलातून आहे.

नोराचा उल्लेख अनेकदा ‘मदर ऑफ पंजाबी थिएटर’ आणि ‘लेडी ग्रेगरी ऑफ पंजाब’ असा आत्मीयता आणि आदर यांच्या पोटी केला जातो. तिच्या आंद्रेत्ताला ‘मेम दा पिंड’ असेही म्हटले जाते. ‘ट्रिब्यून’ या वृत्तपत्रातील तिला श्रद्धांजली वाहणाऱ्या दोन वर्षांपूर्वीच्या, 31 ऑक्टोबर 2021 च्या अंकातील लेखात ‘तिचा उल्लेख ‘पंजाबी नाटक दी नक्करदादी’ असा केला जातो’ असे म्हटले आहे. पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठाने तिला सन्माननीय डी लिट पदवी 1970 साली दिली. तिचे निधन वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी, 1971 साली झाले. तिच्या दफनशीलेवर वाक्य कोरले गेले – Rest tired soul, your work of life is finished.

नोराच्या जीवनावर लिहिलेले इंग्रजी नाटक ‘Thy work is done’ हे चंदिगढ येथे 3 मे 2019 रोजी सादर झाले. ‘दि नॅरेटर्स’ या संस्थेने सादर केलेले ते पहिले नाटक होते. नाटक लिहिले होते जानेमाने पंजाबी नाटककार डॉ. आत्मजित यांनी. त्यांनीच नाटकाचे दिग्दर्शनही केले होते.

नोराची अधिक माहिती कळते ती तिचा नवरा फिलिप्स रिचर्डस यांच्या संकलित पत्रव्यवहारातून. नोराचा जन्म 26 ऑक्टोबर 1876 मधील. तिचे मूळ नाव नोरा मेरी हटमन. तिचे शिक्षण बेल्जियममध्ये, ऑक्सफर्ड, सिडनी अशा विविध ठिकाणी  झाले. ती तरुण होण्याआधीच आयरिश रंगभूमीवर अभिनेत्री बनली. ती रंगभूमीवर काम करू लागली तेव्हा रंगभूमीवर आणि इतरत्रही, आयरिश भाषेची पीछेहाट चालू झाली होती. आयरिशच्या जागी इंग्रजी भाषेचे वर्चस्व वाढू लागले होते. गिलेक (Gaelic) लीग नावाची एक संघटना 1893 मध्ये स्थापन झाली होती. तिचे उद्दिष्ट होते, आयरिश भाषेचा वापर रोजच्या व्यवहारात वाढवणे आणि आयर्लंडचे जे इंग्रजीकरण वाढत्या प्रमाणावर चालू होते त्याला अटकाव करणे. आबी थिएटर (Abby Theatre) नावाची नाट्यसंस्था त्या दोन गोष्टींसाठी काम करत होती. त्याचबरोबर, आयरीश ही संवादाची भाषा, प्रमाण भाषा की बोलीभाषा हा वादही चालू होता. नोराची कारकीर्द त्या वातावरणात घडत होती.

तिचे लग्न फिलिप्स रिचर्डस नावाच्या इंग्लिश माणसाशी 1908 साली झाले. ती हिंदुस्तानात 1911 साली आली. फिलिप्स हे लाहोरच्या दयालसिंघ कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नोकरीसाठी भारतात आले होते. ते कॉलेज दयालसिंघ मजिठिया यांनी स्थापन केले होते. ते दानशूर, समाजसुधारक आणि बँकर (सावकार) होते; ब्राह्मो समाजाचे कट्टर अनुयायीही होते. फिलिप्स हे युनिटेरियन या ख्रिस्ती धर्मपंथाचे अनुयायीदेखील होते. ब्राह्मो समाज हा युनिटेरियन पंथाला जवळचा. फिलिप्स यांना दयालसिंघ यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये प्राध्यापकाची जागा दिली, त्याला काही अंशी उभय पंथांतील साम्य हे कारणीभूत होते असे मानले जाते.

‘इंडियन डस्ट’ या शीर्षकाचा फिलिप्स रिचर्ड्स यांच्या कौटुंबिक पत्रांचा एक संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी त्यातील एका पत्रात रामलीला पाहण्यास गेलो होतो असा उल्लेख केला आहे. “तो प्रयोग हिंदूंच्या दसरा या सणाला होतो. प्रेक्षकांत बसलेल्या मुलांचे चेहेरे अगदी कोवळे आणि भावदर्शी होते.” पंजाबमध्ये त्या वेळी लोककलांचे व प्रहसनांचे प्रयोग भरपूर होत असत, परंतु रंगमंचावरील नाट्यप्रयोग पाहणारे लोक फारच थोडे असत. लाहोरच्या रंगभूमीवर प्रहसने, विडंबने यांच्याबरोबर पुराणकथांवर बेतलेली नाटके असे प्रयोग भरपूर होत असत, परंतु समाजसुधारणावाद्यांचा उत्साह मात्र नाटके करण्याबाबत फार नव्हता.

नोराने तिची रंगभूमीविषयक आस्था लाहोरमध्ये आल्यावर कॉलेजच्या वाङ्मयीन आणि नाट्यक्षेत्रातील कार्याकडे वळवली. नोराने कॉलेजात इंग्रजी नाटके बसवण्यास सुरुवात केली. दरवर्षी दोन नाटकांचे प्रयोग होत. तिने ‘मिडसमर नाईट ड्रिम्स’ या नाटकाचा प्रयोग 1911 साली केला. ते तिने शेक्सपीयरच्या तीनशेव्या जन्मदिनानिमित्त 1916 साली पुन्हा रंगमंचावर सादर केले. ‘अॅज यू लाइक इट’ व ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांचे प्रयोग नोराच्या पुढाकाराने 1912 आणि 1913 या वर्षी झाले. पहिल्या नाटकासाठी एक तात्पुरते अँफी थिएटर उभे केले होते. चार आणे एवढे तिकिट होते आणि थिएटर पूर्ण भरले होते. नोराने 1912 मध्येच आणखी एक नाटक सादर केले होते- ‘स्प्रेडिंग द न्यूज’. ते आयरिश रंगभूमीवरील प्रख्यात नाट्यनिर्माती, दिग्दर्शिका लेडी ग्रेगरी हिने लिहिलेले होते.

फिलिप्स रिचर्ड्स यांनी मे 1911 मधील एका पत्रात ते हिंदुस्तानात नोकरीसाठी जाणार आहेत हे लिहिले. ते लाहोर येथे दयालसिंग कॉलेजमध्ये सप्टेंबर 1911 मध्ये दाखल झाले. लंडनमधून हिंदुस्तानात आल्यावर स्थिरावण्यासाठी पती- पत्नींना काही काळ लागला असेल हे लक्षात घेतले की नोराच्या तेवढ्या अल्पावधीत नाटके करू लागण्याचे कौतुक वाटू लागते.

‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाट्यप्रयोगाच्या वेळी काय काय घडले ते फिलिप्स रिचर्ड्स यांनी त्यांच्या आईला 6 एप्रिल 1913 रोजी लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे. त्या पत्राची शैली काहीशी मिश्किल आहे. पत्रातील महत्त्वाचा भाग याप्रमाणे- “या आठवड्याचा विषय नाटक हा आहे. ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकातील काही दृश्ये सादर झाली. प्रेक्षकांत इतर कॉलेजांमधील प्रोफेसर आणि इतर मोठी माणसेही बरीच होती. नोरा स्टेजवर इतर कलाकार येण्यापूर्वी आली आणि तिने लाईटवाल्या माणसाला काही सूचना दिल्या. अभिनय चांगला झाला. खास करून कोर्टाच्या प्रवेशातील जमावाचा- कधी रागावलेले तर कधी खुश होणारे लोक – ‘जमलेल्या लोकांत’ केवल नावाचा आमचा एक विद्यार्थी होता. तो इतका गोड हसतो, की त्याच्या हसण्याचा संसर्ग ‘जमावातील’ साऱ्यांना तात्काळ होई.

“प्रिन्सिपॉलनी नाटक संपल्यावर, नोराच्या गळ्यात एक भलामोठा हार घातला. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. नोरा स्टेजवर एखाद्या देवतेसारखी ताठ बसली होती. मग प्रिन्सिपॉलनी भाषण केले. त्यांनी आम्हा दोघांचा उल्लेख छान जोडपे असा केला. त्यांनी पूर्व आणि पश्चिम यांच्या एकत्र येण्यावर- मनोमीलनावर- जोर दिला आणि नोराचा उल्लेख ‘कॉलेजची आई’ असा केला. मग त्यांनी निळ्या रेशमी कापडात गुंडाळलेली लहानशी पेटी नोराच्या हातात ठेवली. त्यात एकशेपंचवीस रुपये होते. ती भेट तिच्या हाती देताना ते म्हणाले, ‘कॉलेज ट्रस्टींना तुमच्याबद्दल वाटत असलेल्या भावनांचे हे प्रतीक आहे.’

“मी नोराच्या वतीने आभार मानले. मी म्हटले, की नोराने नाटकांचे जे प्रयोग केले, ते पैशांसाठी नव्हे. अर्थात पैसे घरी घेऊन जात आहोत म्हणून आम्ही खंत करणार नाही. मात्र, त्याचबरोबर, नोरा फार उदात्त आहे आणि नाटक करण्यात तिचा स्वार्थ नाही अशी समजूत लोकांनी करून घेऊ नये. प्रिन्सिपॉल महोदयांनी सूचित केले तसे हा प्रयोग तिने कॉलेजच्या प्रेमापोटी केलेला नाही. म्हणजे कॉलेजबद्दल तिला प्रेम नाही असे मला म्हणायचे नाही. परंतु तिने हे प्रयोग तिला नाट्यकलेबद्दल जे प्रेम वाटते, त्यापोटी केले. या प्रेमासाठी तिने काही लोकांना बळीचे बकरे केले आहेत- उदाहरणार्थ सहा आठवड्यांचा काळ ! कडक शिस्तीत तालीम करण्यास लावून विद्यार्थ्यांना, मला तिने मॅनेजर म्हणून नेमले. मी व कॉलेजचे प्रिन्सिपॉल असे आम्ही दोघेदेखील त्या बळीच्या बकऱ्यांत आहोत आणि इतरही काही. त्या सगळ्यांचे बळी देऊन तिने स्वतः मात्र स्वार्थत्यागाबद्दल लौकिक मिळवला आहे ! नंतर मी पैसे दिल्याबद्दल कॉलेजचे आभार मानले आणि योग्य विनिमयानंतर ती रक्कम दुप्पट होईल अशी आशा व्यक्त केली.”

त्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी रिचर्ड्स यांनी आईला जे पत्र लिहिले आहे त्यातून नोराच्या नाट्यविषयक कामाची प्रगती समजते- “कॉलेजच्या मागच्या भागातील एक इमारत म्हणजे नोराचे थिएटर आहे. सध्या तालमी चालू आहेत. पोशाख तयार होत आहेत. काही पोशाखांना रंग लावला जात आहे. आज एका कमिटीची बैठक आहे. ते त्यात साऱ्या गोष्टींच्या आर्थिक बाजूंबद्दल चर्चा करणार आहेत. यावेळचे नाटक आहे Coriolanus. थोडक्यात कामांची अगदी गर्दी-गडबड आहे.”

फिलिप्स रिचर्ड यांनी दयालसिंघ कॉलेजमधील त्यांच्या नोकरीचा राजीनामा 1914 सालच्या डिसेंबर महिन्यात दिला. ते तेथून इस्लामिया कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून (1 फेब्रुवारी 1915) गेले. त्यांचा दयालसिंघ कॉलेजमध्ये निरोपसमारंभ झाला, त्यापाठोपाठ नोरालाही समारंभपूर्वक निरोप दिला गेला. हार, भाषणे, तिच्यावर लिहिलेल्या कवितांचे गायन असे सर्व उपचार झाले. तिला पंजाबी पोषाखासाठी चमकदार रंगांचे कापड दिले गेले.

दयालसिंघ आणि अन्य कॉलेजांतून होत असलेल्या इंग्रजी नाट्यप्रयोगांशिवाय त्या वेळेस ‘पारशी थिएटर’ हे जागृत होते. ती मंडळी, शेक्सपीयरच्या नाटकांची उर्दू भाषेतील रूपांतरे/अनुवाद रंगभूमीवर मोठ्या प्रमाणावर आणत असत. ‘हॅम्लेट’ व ‘ऑथेल्लो’ 1898 साली, ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ 1900 साली, ‘किंग लिअर’ 1906 साली आणि ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ 1909 साली असे नाटकांचे उर्दू अनुवाद ‘पारशी थिएटर’ने सादर केले होते.

नोराने ‘सरस्वती स्टेज सोसायटी’ या नावाची संस्था 8 मार्च 1915 या दिवशी स्थापन केली. शेक्सपीयरची नाटके करणे हे लाहोरमधील तत्कालीन ‘पारशी थिएटर’च्या धारणांच्या विरूद्ध होते. ‘पारशी थिएटर’ नाटके करत ती व्यावसायिक; आर्थिक उत्पन्न मिळतील अशी. नोराने त्या थिएटरच्या पेक्षा वेगळी नाटके करण्याचा प्रयत्न केला, त्यामागे आयर्लंडमधील आयरिश-इंग्रजी भाषा संघर्ष कारणीभूत होता असा निष्कर्ष अभ्यासकांचा आहे. नोराने असे सांगितले, की आता पंजाबी भाषेत नाटके लिहिली गेली पाहिजेत व त्यांचे प्रयोग अधिक केले गेले पाहिजेत. तत्कालीन इंग्रजी सत्तेने पंजाबमध्ये उर्दू आणि इंग्रजी ही शिक्षणाची व राज्यकारभाराची भाषा राहील असे जाहीर केल्याने पंजाबी या स्थानिक भाषेला, आयर्लंडमधील आयरिश भाषेचे भोग भोगावे लागत होते. नोराच्या पंजाबी भाषेच्या नाटकांना पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांमागे आयर्लंडमधील अनुभव आणि पंजाबी व आयरिश भाषकांच्या स्थितीतील साम्य हे दोन प्रवाह होते. तिने यासंबंधी तिची भूमिका या शब्दांत मांडली आहे- “आमच्या नाट्यमंडळांना शेक्सपीयरच्या नाटकांचे प्रयोग करून थकायला झाले असेल तर ते स्वाभाविक आहे. त्यांनी त्यांच्या सभासदांना आवाहन करावे, की पुढील नाट्यप्रयोगांसाठी नवी कथानके, स्वतःची कल्पनाशक्ती लढवून आजच्या परिस्थितीचे चित्रण धीटपणे करणारी पुरवावी आणि ती पंजाबी भाषेतच असावीत.”

नोराने एकांकिकांच्या स्पर्धा 1912 पासून भरवल्या. तिचा विद्यार्थी ईश्वरचंदर नंदा याने लिहिलेली ‘सुहाग’ ही एकांकिका 1913 मधील स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरली. ती रंगभूमीवर आलेली पंजाबी भाषेतील पहिली एकांकिका. ती ‘दुल्हन’ या नावाने पुढे प्रकाशित झाली. त्याच लेखकाने पुढे, 1922 मध्ये ‘सुभद्रा’ नावाची विधवाविवाहाच्या प्रश्नावरील एकांकिका लिहिली. त्या एकांकिकेचे प्रयोग अनेक कॉलेजांतून झाले. नंदा यांनी वीसहून अधिक नाटके लिहिली. नोराने एकांकिकांच्या स्पर्धा भरवल्या. आश्चर्य वाटावे असा एक तपशील त्या संदर्भात मिळाला- पुढे मोठे शास्त्रज्ञ म्हणून विख्यात झालेले शांती स्वरूप भटनागर यांनी 1912 सालच्या स्पर्धेत उर्दू भाषेत ‘करामती’ (Wonder worker) या शीर्षकाची एकांकिका लिहून पहिले बक्षिस मिळवले होते. (स्पर्धेत त्याचा इंग्रजी अनुवाद सादर झाला होता.) त्यानंतर तिने आठवडाभर एकांकिकांचे प्रयोग केले. त्या एकांकिका पंजाबी भाषेत असत. भटनागर यांनी कॉलेजच्या नाटकांतून अभिनयही केला व चांगला अभिनेता म्हणून त्या दिवसांत नाव मिळवले. विद्यार्थ्यांत पृथ्वीराज कपूर आणि बलराज सहानी होते. पृथ्वीराज यांनी स्थापन केलेल्या ‘पृथ्वी थिएटर्स’च्या कल्पनेचा उगम त्या दिवसांत आहे असे अभ्यासक मानतात. ईश्वरचंदर नंदा जेव्हा मुलतानला निघाले तेव्हा नोराचे उद्गार होते-“ तो स्वतःची ताकद शेक्सपीयरच्या नाटकांच्या निर्मितीपेक्षा, पंजाबी नाटके निर्माण व विकसित करण्यावर, खर्च करेल अशी आशा आहे”.

नोराचे नाटकांचे काम वाढत राहिले. रिचर्ड नोव्हेंबर 1916 मध्ये लिहिलेल्या एका पत्रात म्हणतात – “नोरा तिच्या नाटकांच्या कामात बुडाली होती, त्यातून ती अजून बाहेर आलेली नाही. मला वाटते, ती आणखी पंधरवड्याने तुम्हाला पत्र लिहू शकेल.” त्यानंतर रिचर्ड यांच्या पत्रांतून मधून मधून नोराच्या नाट्यसेवेसंबंधाने उल्लेख वाचण्यास मिळतात.

14 -7- 1918 – नोरा आणि मी दोघांनी अशी सवय लावून घेतली आहे, की हेच काम साडेअकरा वाजेपर्यंत करायचे. नोरा नाटके लिहित बसते; मी निबंध लिहिण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो.

30-7-1918 – आम्ही काही शीख मित्रांबरोबर राहण्यास गेलो. नोराला पंजाबी नाटकांबद्दल जी कळकळ वाटते, त्यामुळे त्यांना नोरा फार आवडू लागली आहे.

16-2-1919 – नोरा रोज सकाळी आंघोळीला जाण्यापूर्वी शिखांच्या बोधवचनांचे एक पुस्तक वाचते आणि एखादे वचन तिला भावले, की त्यावर विचार करत राहते. आजचे बोधवचन आहे, सोशिकपणा आणि सुमधुर शब्द !

10-3-1919 – युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार हे वाङ्मय व वक्तृत्वसभा यांचे सेक्रेटरी आहेत. नोराने त्यांना लिहिले, की “या वर्षीच्या शेवटच्या मीटिंगमध्ये त्यांनी ‘मिडसमर नाईट ड्रीम’ या नाटकाचा प्रयोग होईल असा प्रस्ताव मांडावा. तिने पात्रयोजनाही सुचवली आहे- नोरा टायटेनिया, रजिस्ट्रार बॉटम इत्यादी.” पण प्रकरण पुढे सरकले नाही. मी प्रार्थना करतो, की नाटकाचा प्रयोग न होवो. कारण तालमीची सारी जबाबदारी नोरावर पडेल आणि आधीच ती कामांत प्रचंड बुडाली आहे.

नोराने स्वतःला पंजाबी संस्कृतीत मुरवून घेतले. ती इंडियन होम-रूल चळवळीची खंदी समर्थक होती. फिलिप्स रिचर्ड्स यांचे निधन 1920 मध्ये झाले. त्यानंतर नोरा इंग्लंडला परत गेली. नोराच्या लंडनच्या चार वर्षांच्या काळातील तिच्या कार्याबद्दल फार तपशील मिळत नाहीत, परंतु एक मिळतो तो तिची हिंदुस्तानबद्दलची आत्मीयता सिद्ध करणारा आहे. लंडनमध्ये त्या वेळेस एक लघुपट प्रदर्शित झाला. त्यात हिंदुस्तानविषयक तुच्छता व्यक्त करणारी काही दृश्ये होती. नोराने त्या विरूद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. तिला अटक झाली आणि एक महिन्याचा कारावास भोगावा लागला. ती कारागृहातून बाहेर आली, तेव्हा तिची आर्थिक परिस्थिती वाईट होती. दयालसिंघ मजिठिया यांनी तिला पत्र पाठवून म्हटले, की कलाविषयक तुमचा छंद जोपासण्यासाठी तुम्ही हिंदुस्तानात परत यावे. मात्र तिला ते तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे सोपे नव्हते. तरीदेखील तिने मोलमजुरीची कामे करून पैसे साठवले आणि ती हिंदुस्तानात परतली. ते साल होते 1924. ती आली आणि अनेक हालअपेष्टा सोसत ती कांगडा जिल्ह्यातील आंद्रेत्ता येथे पोचली. तेथे तिने साधे मातीचे एक घर बांधले. त्यानंतर तिने आंद्रेत्ता येथे नाट्यविषयक काम सुरू केले.

तिला पंधरा एकर जागा कशी मिळाली यासंबंधी वेगवेगळे दावे केले जातात. एका लेखात असे वाचण्यास मिळाले, की तिला एका इंग्लिश माणसाने स्वतःची मोठी इस्टेट विकण्याची तयारी दाखवली व नोरा हिंदुस्तानात आली. दुसरा उल्लेख मिळतो एका उदार महिलेने तिला काही जागा दिली व त्यावर तिने घर बांधले. अधिक विश्वसनीय उल्लेख वाटतो तो म्हणजे, 1935 मध्ये कांगडाच्या डिस्ट्रिक्ट कमिशनर यांना तिने विनंती केल्यावर त्यांनी तिला पंधरा एकर जागा देणगी म्हणून दिली. त्यावर तिने नाट्यगृह बांधले आणि नाट्यशिक्षणाचे वर्ग सुरू ठेवले. ती वृत्तपत्रांतून लेख लिहित राहिली. तिचे रंगमंचावर नाटके सादर करण्याचे काम चालूच होते.

तिच्या नावावर काही पुस्तके आहेत- The flower maker (1910), Sati (1914), Mare brooms (1933), Drama in education (1945), Historical play let’s (1946), Village play (1955), Play writing and play making (1956), The son coming home (1956), Biography of scientist S S Bhatnagar, Country life (1970) .

गुरुचरण सिंह या शिल्पकाराशी तिची भेट 1956 साली झाली. त्या भेटीदरम्यान तिने त्यांना सुचवले की त्यांनी आंद्रेत्ता येथे येऊन तिच्या ‘चमेली बाग’ नावाच्या कुटीजवळच्या मोकळ्या जागेत एक वर्कशॉप सुरू करावे. गुरुचरणसिंह तेथे पाच वर्षांनी आले आणि त्यांनी वर्कशॉप सुरू केले. त्यांचा मुलगा मानसिम्रन आणि त्याची पत्नी मेरी यांनी आंद्रेत्ता येथे स्थायिक होण्याचे 1983 मध्ये ठरवले. तेथे त्यांनी विविध प्रकारची भांडी (Studio pots) बनवण्यास सुरूवात केली. आज, आंद्रेत्ता हे ‘शिल्पकला आणि पॉट मेकिंग’ यांचे प्रतिष्ठित केंद्र बनले आहे !

पंजाब विद्यापीठाने नोराचे विद्यार्थी ईश्वरचंद्र नंदा यांच्या निधनोत्तर 1968 साली त्यांच्या जन्मदिवशी एक समारंभ आयोजित केला होता. त्यांनी नोराला त्या समारंभाच्या उद्घाटनासाठी बोलावले. त्यांनी तसे पत्र लिहिले, तेव्हा त्याच्या उत्तरात तिने लिहिले- “शरीराने मी समारंभाला उपस्थित राहू शकत नाही किंवा त्यात सहभागी होऊ शकत नाही; परंतु मनाने मी तुमच्यासोबतच आहे. पंजाबी रंगभूमीची पथदर्शी सेवा करणाऱ्या नाटककाराच्या जन्मतिथीला आयोजित केलेल्या समारंभास अनेक नाटककार येत आहेत, यामुळे मला खूप आनंद झाला आहे. जिवंत रंगभूमी म्हणजे माणसाला माहीत असलेल्या सांस्कृतिक माध्यमांतील सर्वात गतिशील असे माध्यम आहे. माणसाला आवाहन करणाऱ्या साऱ्या गोष्टींत नाटक हे असे आहे, की त्याचे प्रलोभन त्याला आवरताच येत नाही. जर लोकांची अशी काही कला असेल तर ती नाटकच होय. नाटक म्हणजे रंगमंचावरील प्रकाशझोताच्या दोन्ही बाजूंना जीवनचैतन्याने स्पंदन पावणारी माणसे. फुरसतीचे आयुष्य नाटकांशिवाय अधुरे आहे” (तेव्हा नोराचे वय ब्याण्णव होते.)

तिने आंद्रेत्ता येथे जे भव्य विश्व निर्माण केले त्यामागे तिची शिस्त होती. तिच्या शिस्तीच्या आठवणी बी.सी. सन्याल (शिल्पकार, चित्रकार, कलाशिक्षक) यांनी सांगितल्या आहेत. “नोरा कामाच्या बाबतीत फार वक्तशीर होती. अनेकदा, ती मला भेटायची ती हातात खुरपे घेतलेल्या अवस्थेत. तिने नोकरांना शिस्तीने काम करण्याची सवय लावली होती. त्यांना काम करताना हुक्का पिण्यासाठी, चहा पिण्यासाठी, जेवणासाठी असे ब्रेक असत. वेळ झाली की ती घंटा वाजवून हाक मारत असे – “चला, हुक्का प्या, हुक्का प्या.” वेळ संपला की परत कामाला लागण्यासाठी घंटा वाजवत असे. तोच प्रकार चहा आणि जेवण यांच्या वेळेबाबतीत.”

मुकुंद वझे 9820946547 vazemukund@yahoo.com

संदर्भ: 1) विकिपीडिया 2) hpgeneralstudies.com 3) A ‘Mem’ in Green room of colonial Lahore- Sakoon n Singh 4) Indian Dust – Philips Richards 5) babushahi.com – First play on ‘mother’ of Punjabi Theatre Norah Richards-29-4-19 (6) indianetzone.com- Norah Richards – founder of Punjabi Theatre (22-7-2009) (7) Punjabi Theatre : from Nora Richards to Sitara Ashgar – Academy of the Punjab in North America (8) Indianpanaroma.in – How did this Irish actress became an eternal icon of a small Himalayan Village.
———————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here