रूपाली रोडे परिवारासोबत
भारतातून दक्षिण आफ्रिकेत आणि तेथे बारा वर्षे राहिल्यानंतर, दोन लहान मुलांना घेऊन न्यूझीलंडला येण्याचा निर्णय म्हणजे भलतेच धाडस होते, आमच्यासाठी! पण न्यूझीलंडसारख्या सुरक्षित देशात स्थायिक व्हावे असे आम्हाला वाटले आणि त्या दृष्टीने नोकरी, व्हिसा असे सगळे सोपस्कार करून न्यूझीलंडमध्ये ऑकलंड या गावी आलो; बघता बघता, त्याला तीन वर्षेही झाली.
सुंदर दक्षिण आफ्रिका! उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर, सुपीक आणि मौल्यवान खनिजांनी समृध्द, जगातील सगळ्यांत मोठ्या अभयारण्यांपैकी उत्तम वन्यजीव संपदा… यापेक्षा आणखी सुख ते काय हवे? पण दक्षिण आफ्रिका अपप्रवृत्तीच्या काही लोकांमुळे असुरक्षित झाली आहे. त्यामुळे त्या देशात काही ठिकाणी विशेष काळजी घेऊनच जावे लागे. प्रवास करताना काही रस्ते, काही भाग वगळावे लागत. सतत सजग राहणे आमच्या अंगवळणी पडले होते. दक्षिण आफ्रिकेत ठिकठकाणी विजेच्या तारांची कुंपणे कॉलनीच्या, घरांच्या भोवती आणि ऑफिसांच्या गेटांवर गन्स बाळगून असलेले दोन-दोन, तीन-तीन संरक्षक पहारेकरी… त्याउलट न्यूझीलंडमध्ये कोठे कुंपणच नाही! येथील सुरक्षित, मोकळ्या वातावरणात पहिल्यांदा घराबाहेर पडण्याचा अनुभव शब्दांत सांगताच येणार नाही. आमचा तो मानसिक प्रवास विलक्षण होता.
न्यूझीलंडमध्ये ऑकलंडला अडीच वर्षे राहून, डिसेंबर महिन्यात (2019) अभिजीतच्या नविन नोकरीनिमित्ताने लिचफिल्ड जवळच्या गावी आलो. कौलारु टुमदार घरे, छोटेसे गाव; त्यामुळे सगळीच एकमेकांच्या ओळखीची, मनमिळाऊ आणि कष्टकरी माणसे! मेनरोडवर असलेली काही तुरळक दुकाने, एकुलते एक सुपरमार्केट. गावाच्या एका टोकाला आमचे घर. घराची बाग पाहूनच मी खूष झाले! गुलाबांनी डवरलेली झाडे, द्राक्षांनी लगडलेले वेल, एका बाजूला नारळ आणि न्यूझीलंडचे खास उंच फर्न! मागील बाजूला लिंबांनी भरलेले झाड! आम्ही त्या घरात पटकन रमलो.
न्यूझीलंडमध्ये शाळा 1 फेब्रुवारीला सुरू होतात. मुलांच्या शाळा सुरू झाल्या आणि सगळ्यांचेच रुटीन नियमित होऊन गेले. चीनमधून कोरोनाच्या बातम्या येत होत्या. त्या ऐकताना तो आजार जगातील कानाकोपऱ्यात, अगदी न्यूझीलंडपर्यंतही पोचेल असे वाटलेच नाही. न्यूझीलंडला कोरोनाची पहिली केस 28 फेब्रुवारी 2020 ला सापडली. इराणमधून आलेल्या एका रहिवाशाबरोबर तो जीवघेणा व्हायरस येथपर्यंत येऊन धडकला होता. तशाच काही प्रवाशांमुळे रुग्णांची संख्या हळूहळू वाढत गेली. तेव्हा परदेशी प्रवाशांना 3 मार्चला देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या. न्यूझीलंडमध्येही विलगीकरणाच्या व्यवस्था करण्यात आल्या. पहिला लॉकडाऊन 20 मार्चला सुरु झाला. लॉकडाऊनचे निर्बंध लेव्हल 1 ते 4 या संसर्ग पातळ्यांप्रमाणे घालण्यात आले. रुग्णांची संख्या वाढतच होती. इतर देशांच्या तुलनेत न्यूझीलंडमध्ये जीवितहानी बरीच कमी झाली. तरीही, 3 जूनपर्यंत बावीस मृत्यू आणि एक हजार एकशेचोपन्न रुग्ण असे बाधितांचे आकडे न्यूझीलंडमध्ये आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण वाढत गेले होते.
पहिल्या पंचेचाळीस दिवसांच्या लेव्हल 4 लॉकडाऊनमध्ये रोज दुपारी 1 वाजता पंतप्रधान जसिंडा आर्डर्न आणि आरोग्यमंत्री अॅशली ब्लूमफिल्ड यांनी संसर्ग पसरू नये म्हणून कशी काळजी घ्यावी याची माहिती नियमित दिली. त्याचबरोबर रुग्णांची संख्या, त्यांची राज्य-शहरानुसार क्रमवारी, संसर्गाचे कारण, रुग्णांच्या आणि कुटुंबाच्या विलगीकरणाची सर्व माहितीदेखील प्रसारित होत असे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे उभारली गेली. फिरती चाचणी केंद्रेदेखील निर्माण करण्यात आली. त्यामुळे सगळ्या छोट्या गावांपर्यंत चाचणी करणे सोपे होत गेले. जसिंडा आर्डर्न ह्यांचे उत्तम प्रतिनिधित्व, छोट्या छोट्या बाबींपासून स्त्रीसुलभ काळजीने घेतलेली खबरदारी – उदाहरणार्थ, फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गांच्या मुलांसाठी शाळा व डे केअर सेंटर्स पूर्ण खबरदारी घेऊन, मोजक्या शिक्षकांच्या देखरेखीत चालू ठेवली गेली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत खंड पडला नाही, वृध्द व्यक्तींसाठी सकाळी आठ ते नऊ ही सुपरमार्केटची वेळ राखीव ठेवली गेली. असे खूप आत्मीयतेने व काळजीने घेतलेले निर्णय हे एका स्त्रीच्या उत्तम व्यवस्थापनाचे उदाहरणच आहे!
टीव्ही-इंटरनेट माध्यमातून सतत माहिती, नम्र सूचना आणि मनोधैर्य वाढवणारे उपक्रम ह्यामुळे लॉकडाऊन खूप सहज निभावून गेले. नागरिकांनीही उत्तम सहकार्य केले. जीवनावश्यक सुविधा, रुग्णांना घरपोच वैद्यकीय आणि इतर सामान योग्य ती खबरदारी घेत पोचवले गेले. लॉकडाऊनच्या काळात फक्त माहितीसाठी विशेष पोलिस हेल्पलाईन, कौन्सिलिंग लाईन हे सगळेच व्यवस्थापनाचा आदर्श म्हणून गणले जाईल. त्यामुळे घराबाहेर पडूनही खबरदारीचे जणू काही आश्वासन मिळत होते.
अभिजीतचे फॉनटेरा कंपनीतील (अत्यावश्यक सेवेत मोडणारे) फील्ड वर्क असलेले काम आणि नविन ठिकाणी नुकतेच स्थिरावत असताना, छोट्या गावी संसर्गाच्या स्थितीत आपले कसे होणार असे विचार मनात येत होतेच. पण भारतीय संस्कृतीत स्वच्छतेचे, घरगुती उपायांचे, ताज्या गरम चौरस आहाराचे, मन:शांती अणि मनोधैर्य वाढवण्याचे जे संस्कार स्वाभाविक मिळाले होते त्यांचा खूप मोठा आधार वाटला. (बाहेरून आल्यावर हात-पाय धुणे, भाज्या धुऊन घेणे, साबणाने हात वेळोवेळी धुणे, खोकल्याची लक्षणे दिसताच आले-मध-मीरे ह्यांचा उपयोग करणे, लिंबू-हळद रोजच्या आहारात नेमाने घेणे, पूजा करणे, स्तोत्रे म्हणणे) लहानपणी भावंडांबरोबर आईने पाठ करून घेतलेली रामरक्षा, वेगवेगळी स्तोत्रे, मानसपूजा म्हणताना परमेश्वराची योजना, प्रेम जाणवत होते. व्हॉट्सअॅप ग्रूप्सवर चांगले काही वाचायला, शिकायला, ऐकायला मिळणे हेही भाग्यच! पुणे येथील गीताव्रती अनुराधा म्हात्रे (हेमाताई रानवडे) यांची भगवद्गगीतेची लेखमाला, श्लोक खूप आनंददायी होते.
नविन जागी आलो असल्यामुळे स्थानिक मित्र-मैत्रिणी, नातेवाईक जवळजवळ नव्हतेच; पण इंटरनेटमुळे भारतात व इतर देशांत संपर्क करता येतो ह्याचे खूप बरे वाटले. आपले आपण जगताना तो खूप मोठा मानसिक आधार होता आणि आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने काय किंवा सध्याच्या गावी भारतीय वाणसामान सत्तर-पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावरील दुकानांत मिळत असल्याने घरात जास्त सामान भरून ठेवणे ही सवय पडून गेली आहे. त्याचा फायदा लॉकडाऊन काळात झाला. ह्या काळात मुलांबरोबर गप्पा मारणे, मूव्हीज-बोर्ड गेम्स ह्यांचा खूप आनंद घेता आला.
न्यूझीलंड हा मुळातच निसर्गसौंदर्याने नटलेला देश आहे. घराबाहेर न पडता येणे म्हणजे त्या अमर्याद सौंदर्याला मुकणे! अप्रतिम समुद्रकिनारे, फर्नची जंगले, नदयांचे स्वच्छ पाणी! मुलांबरोबर चहाचा आस्वाद घेत, अंगणातून दूरवर दिसणारे हिरवेगार डोंगर न्याहाळताना खूप मजा वाटत होती. माझ्यासाठी, न दिसणाऱ्या व्हायरसच्या भीतीपेक्षा सुंदर निसर्गाचा आस्वाद घेणे – मग ती खिडकीतून दिसणारी पर्वतांची रांग असो की अंगणात बहरलेला गुलाब असो, द्राक्षांनी लगडलेला वेल असो की धुक्यातील पहाट असो… ह्या कलाकुसरीतील त्याचे अस्तित्व म्हणजेच सुख!
थंडीच्या दिवसांत शाळेला सुट्टी मिळणे म्हणजे मुलांना मज्जाच! दक्षिण अफ्रिकेपासूनच मुलांना स्वत:ला रमवण्याची सवय असल्याने, नविन गावामुळे, लॉकडाऊनचा त्यांना फारसा त्रास झाला नाही. लेकीची चित्रकला त्या दरम्यान तिला खूप आनंद देऊन गेली. लेकाला गेम्स आणि सायकलिंगचा आनंद मिळाला. शाळांनी ईस्टरच्या सुट्ट्या या लॉकडाऊनमधेच संपवून मग झूम मीटिंग्स करून मुलांना अभ्यास व इतर अॅक्टिविटीज़ करायला लावल्या; व अभ्यासाची पार्सले घरपोच पाठवली – पेन्सिलपासून ते ईस्टरएगपर्यंत व्यवस्थित पॅक केलेले पार्सल मुलांची क्लास टिचर स्वत: घरी पोचवते. त्यावेळी मी मात्र लहानपणी वर्गात खाल्लेल्या छडीचा अनुभव खरा, की शिक्षकांचा मुलाना हा जो अनुभव येत आहे तो खरा हे चिमटा काढून तपासून पाहते! हा अनुभव मला आई म्हणून नक्कीच सुखावह आहे.
सगळे नियम पाळले गेल्याने न्यूझीलंडमध्ये 20 मे पासून एकही नविन केस नाही, तरीही सुपरमार्केटमध्ये शिस्तीत अंतर ठेवून लाईन लावणे, सॅनिटाइजरचा वापर अजूनही चालू आहे. तीन वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये आलो, तेव्हा एअरपोर्टवर कस्टम्स चेकमध्ये कोठलेही ब्रँड नसलेले खाद्यपदार्थ आणल्यावर कडक कारवाई होते हे ऐकून आश्चर्य वाटले होते. त्या गोष्टीचे महत्त्व कोरोनानंतर जास्त जाणवत आहे. जगभरातून चाललेल्या कोविद-19 आणि अशा सगळ्या जीवघेण्या विषाणूंवर होत असलेल्या संशोधनांना यश मिळो, सगळे आप्तस्वकीय सुखरूप असोत आणि आपल्या जवळच्यांचे प्रेम, सहकार्य आणि मानसिक आधार अशा कोणत्याही संकटांना तोंड देण्याचे बळ मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना!
– रूपाली रोडे roopali.rode@gmail.com
————————————————————————————————
About Post Author
रूपाली पानसरे-रोडे यांनी औरंगाबाद येथे पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी त्यापुढील मास्टर ऑफ़ कंप्युटर सायन्सचे शिक्षण नाशिक येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर प्रोग्रामर म्हणून तीन वर्षे काम केले. त्या सध्या गृहिणी असून स्वयंपाकाची आवड, निसर्गप्रेम यातून जीवनाचा आनंद घेत आहेत.
न्यूझीलंडची सगळी परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहिली. खूप छान लिहिले आहे.
न्यूझीलंड मधिल लोकांची शिस्त व सकारचे नियोजन याचे कौतुक वाटले.रुपाली यांनी खूप सुंदर शैलीत वर्णन केले आहे.
रुपाली खूपच छान व्यक्त झाली आहेस.देशातल्या शिस्तीचे वर्णन वाचून खूपच चकित झाले .एकंदरीत सर्व लेख वाचून न्यूझीलंड बघावेसे वाटले .काळजी घेऊन सांभाळून रहा .अनेक शुभेच्छा . सौ.अंजली आपटे .
THANK YOU SO MUCH 🙏
Thank you Hematai🙏
Thank you🙏
Thank you Anjalitai🙏
रूपाली खुपच छान लिहीले आहेस. न्युझिलंड मधील सर्व परिस्थीती डोळ्या समोर आली.पण करोनाच्या काळात तुमच्या सरकारचे नियोजन व तेथील लोकांमधील शिस्त खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तरीही सर्वांनी काळजी घ्यामिनल घरत
नूझीलंड मधील शिस्त आज पर्यंत ऐकत आलो होतो. तेथील निसर्ग सौन्दर्य आपल्या अनुभव कथनातून प्रत्यक्षात अनुभवल्यासरखे वाटत आहे.
Thank you so much!🙏
Thank you so much! Kharach khup sundar nisarg ahe.
खूप छान लेखन
वाह रूपाली खरच खूप छान लिहिले बारीक तपशीलवार सहित लिहिलेलं असल्यामुळे न्युझीलँड अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. न्युझीलँड सरकारचे पण खरंच खूप कौतुक, विशेष करून तिथल्या लेडी पंतप्रधान.
Thank you🙏
Thank you🙏 खरच ग्रेट आहेत पंतप्रधान!
Wahhh Rupa …..U written it so nice dear…u really show us two countries from ur writing Liked it very much Stay safe….stay blessed….😊
Thank you so much.
अतिशय सुंदर भाषेत संपूर्ण चित्र उभे केले आहे .एकुणच न्यूझीलंड मधली परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहिली. आत्तापर्यंतच्या सर्व लेखात हा लेख खूप आवडला.- डॉ. अविनाश वैद्य 9167272654
खूप खूप धन्यवाद सर 🙏
न्यूझीलंड मधिल लोकांची शिस्त व सरकारचे नियोजन याचे कौतुक वाटले.रुपाली यांनी खूप सुंदर शैलीत वर्णन केले आहे.सौ.अनुराधा म्हात्रे. पुणे.