कासव संशोधनाला नवी दिशा देणारा एक प्रयोग 25 जानेवारी 2022 रोजी कोकणात करण्यात आला. तो म्हणजे कासवांनी घरटी तयार केल्यावर त्यांना उपग्रह टॅगिंग करण्याचा ! त्या दिवशी, प्रथमच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वेळास येथे प्रथमा नावाच्या कासवाला व दापोलीतील अंजर्ले येथे सावनी नावाच्या कासवाला उपग्रह टॅगिंग करण्यात आले. अर्थातच, त्यावेळी त्यांनी तेथे घरटे केले होते. त्याच प्रमाणे वनश्री, रेवा व लक्ष्मी अशी नावे दिलेल्या कासवांना अँटेना बसवून पुढच्याच महिन्यात- फेब्रुवारीमध्ये गुहागर येथून समुद्रात सोडण्यात आले. हे काम महाराष्ट्र वनविभागाचा कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था यांच्या वतीने करण्यात आले. त्यांतील सावनीने केळशी या गावच्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पुन्हा अंडी घातली. सावनी कासवाला अँटेना 25 जानेवारी रोजी बसवली होतीच, त्यामुळे सावनीची तब्येत व तिच्या हालचाली यांची माहिती नित्य मिळत आहे व मिळत राहील.
सागरी कासवांच्या सात प्रजाती जगभर आहेत. महाराष्ट्रात ऑलिव्ह रिडले ही प्रजाती वीण करते. एका ग्रीन टर्टलने सिंधुदुर्गात घरटे केल्याची नोंद आहे. हॉकबील जातीची कासवे काही प्रमाणात महाराष्ट्रात दिसतात, पण ती येथे घरटी करत नाहीत. लेदर बॅक जातीच्या कासवाच्या एक-दोनच नोंदी पश्चिम किनाऱ्यावर आढळल्या आहेत.
महाराष्ट्रातील सागरी कासवांकडे नव्या घडामोडींमुळे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे. काही लोक त्यावर संशोधन करत आहेत. कोणी तापमान व त्याचा परिणाम यावर काम करत आहेत. कासवांच्या वीण हंगामात कांदळवन प्रतिष्ठान यांच्या वतीने पाच कासवांच्या माद्यांना सॅटेलाईट अँटेना बसवण्यात आला. कासव संरक्षण व संवर्धनाचा प्रवास प्रगतिपथावर असून अभ्यास अधिकाधिक सखोल होत आहे.
सागरी कासव अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येते, कासव त्या हंगामात रात्रीच्या वेळेस अंडी घालून परत जाताना त्याला पकडले जाते. कासवांच्या पाठीवर विशिष्ट प्रकारे अँटेना चिकटवली जाते. नंतर काही वेळाने त्याला पाण्यात सोडले जाते. अँटेनामध्ये मोठ्या कालावधीपर्यंत पुरणारी बॅटरी असते. ती पाण्यात कार्यरत राहू शकते. कासव ठरावीक वेळानंतर श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर डोकावते. त्यावेळी अँटेना ते उपग्रह असा संपर्क प्रस्थापित होतो व त्यातून कासवांचा संपूर्ण प्रवास नोंदला जातो. ही पद्धत प्रगत असून याचा प्राण्याला कोणताही त्रास होत नाही. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्थेने कासव संरक्षणाची मोहीम 2002 साली चालू केली. ती मोहीम वीस वर्षांनी महामार्गावर पोचली आहे. कासवांचा अभ्यास, संरक्षण व संवर्धन यांमध्ये दिवसेंदिवस प्रगती होत आहे, असे या घटनेचे वर्णन पर्यावरणप्रेमी भाऊ काटदरे यांनी केले आहे.
(सृजनसंवाद दिवाळी अंकात (2022) प्रकाशित झालेल्या भाऊ काटदरे यांच्या लेखातून)
—————————————————————————————————————————-