नाणेघाट (Naneghat)

6
727

सातवाहन हे इसवी सन पूर्व 222 ते इसवी सन 228 या काळातील महाराष्‍ट्रातले पहिले ज्ञात ऐतिहासिक राजघराणे. त्‍यापूर्वीचा महाराष्‍ट्राचा इतिहास फारसा उजेडात आलेला नाही. कल्याण-जुन्नर मार्गावरील नाणेघाटाच्‍या परिसरात सातवाहनांच्या राज्‍यांची प्रथम स्‍थापना झाली. पुढे गोदावरीच्‍या काठाने वाढत जाऊन ते उत्‍तरेत थेट माळवा, राजस्‍थानपर्यंत आणि दक्षिणेत आंध्रात पसरले. सातवाहनांच्या चार-साडेचारशे वर्षांच्या काळात एकूणच व्‍यापार उद्योगाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नाणेघाट हा तेव्‍हा उत्‍तरेकडून कोकणात उतरण्‍याचा मुख्‍य मार्ग होता. जुन्‍नर हे सातवाहनांचे राजधानीचे शहर आणि व्‍यापारी केंद्र असल्‍यामुळे तेथे अनेक रोमन, ग्रीक व्‍यापाऱ्यांनी वस्‍ती केल्याचे पुरावे सापडतात. सातवाहन काळात व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि रहदारीच्या असलेल्या या नाणेघाटाचा परिचय करुन देत आहेत सुनंदा भोसेकर. ‘थिंक महाराष्ट्र’वरील ‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख सोबतच्या लिंकवरुन वाचता येतील.

– राणी दुर्वे

नाणेघाट

          कल्‍याणहून ओतूरकडे जाणाऱ्या मार्गावर असलेला नाणेघाट चढून जाताना मनात एक सूक्ष्‍म थरार उमटतो. किमान अडीच हजार वर्षे तरी तो रस्‍ता जुना आहे. सह्याद्रीचा कोट फोडून तयार केलेल्‍या त्‍या रस्‍त्‍यावरून चालणारे व्‍यापाऱ्यांचे काफिले दिसायला लागतात. बौद्ध भिक्षूंचे जत्‍थे, बैलांवर माल लादून जाणारे लमाणांचे तांडे, यात्रेकरू दिसतात. तेव्हा भोवतालचे जंगल दाट असेल. आजही बऱ्यापैकी झाडोरा आहे. त्या रस्त्याने कितीवेळा चालत गेले असेन ते आता आठवत नाही. अगदी पहिल्या वेळी रात्रीचा ट्रेक केला होता. तेव्हा शनिवारी अर्धा दिवस सुट्टी असायची. ऑफिसमधून सुटल्यावर कल्याण गाठले आणि तेथून ओतूरकडे जाणाऱ्या एसटीत बसलो. संध्याकाळी घाट चढायला सुरुवात केली. मध्यरात्रीच्या सुमारास वर गुहेत पोचलो. सकाळी उठून पुढे जाऊन घाटघरहून बस घेतली आणि परत फिरलो. तेव्हा आजूबाजूच्या परिसरात फिरणे झाले नाही. नंतर दोन तीन वेळा कोणाकोणाला नाणेघाट दाखवायला घेऊन गेले. मित्रमैत्रिणींना, परिचितांना सह्याद्रीच्या पायावर घालून आणणे हा माझा तरूणपणीचा छंद होता. एकदा पावसाळ्याच्या तोंडावर काजवे बघायला गेलो. पावसाळी हवेत किंवा चांदण्यारात्री या रस्त्यावरून चालण्यासारखे सुख नाही. एकदा तर आम्ही चौघी मैत्रिणी नाणेघाट चढून वर गेलो, वरचे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी हे किल्ले बघून परत फिरलो. हे सगळे सातवाहनांचे किल्ले. त्या पाच-सहा दिवसांत सहज देवळांमध्ये, सरपंचाच्या किंवा ग्रामसेवकाच्या घरी राहिलो. त्या निर्जन, दुर्गम किल्ल्यांवर निवांतपणे भटकत होतो. सह्याद्रीचे भरभक्कम अस्तित्व आणि मोकळा वारा. क्षणभरसुद्धा असुरक्षित किंवा अस्वस्थ वाटले नाही.

नाणेघाटाची पायथ्यापासूनची उंची दोन हजार फूट आहे. चढही बेताबेताने आहे. धाप लागत नाही. अधेमधे पायऱ्याही आहेत. नाणेघाट ही इतर घाटांप्रमाणे डोंगराच्या कडेनी किंवा नदीच्या प्रवाहाच्या बाजूने जाणारी नैसर्गिक वाट नाही. तो डोंगर फोडून तयार केलेला रस्ता आहे. घाटाच्या चढणीची सुरुवात वैशाखरे गावापासून होते. या गावाच्या नावाची व्युत्पत्ती वैश्यगृह म्हणजे व्यापाऱ्यांचा थांबा अशी सांगितली जाते. या वाटेशी संबंधित एक दंतकथा आहे. सातवाहन राजाने, कोणता ते नाव माहीत नाही; हा रस्ता बांधण्याचे आवाहन केले ते नाणा किंवा नाना आणि गुणा ह्या दोन भावांनी स्वीकारले. दोघांनी दोन वाटांनी रस्ता बांधायला घेतला. नाणाचा आधी बांधून झाला म्हणून रस्त्याचे नाव नाणेघाट. घाट चढून गेल्यावर दिसणाऱ्या जकातीच्या रांजणामुळे नाणेघाट हे नाव पडले अशीही समजूत आहे.

घाट चढून वर गेले की ती सुप्रसिद्ध, प्रशस्‍त गुहा आहे. गुहा म्‍हणायचे पण प्रत्‍यक्षात ते दगडात कोरून काढलेले लेणे आहे. साधारणत: पन्‍नास-एक माणसे तेथे आरामात राहू शकतात. जवळच पाण्‍याची टाकी आहेत. जरा पुढे गेल्यावर जकातीचे रांजण आहेत. रांजणात बुडी मारून पाहाता आली असती तर एखादे जुने नाणे सापडेल अशी आशा वाटते. हे जकातीचे रांजण आहेत की वाटसरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती याबद्दल तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. घाटाचे रक्षण करणारा वरचा जीवधन किल्‍ला सातवाहनकालीन आहे. नाणेघाटातल्‍या गुहेत सातवाहनांची राजमाता नागणिका हिचा शिलालेख आहे. त्याची भाषा प्राकृत आणि लिपी ब्राह्मी आहे. तब्बल वीस ओळींच्या या शिलालेखात नागणिकेने विविध यज्ञ करून ब्राह्मणांना उदंड दक्षिणा दिल्‍याचे उल्‍लेख आहेत. या शिलालेखात महाराष्ट्रासाठी ‘महारठी’ हा शब्द येतो. पतीच्या निधनानंतर तिचा मुलगा राजपुत्र वेदीश्री अल्पवयीन असताना नागणिकेने राज्‍यकारभार केला. या लेण्‍यात नागणिका, तिचा पती सिरीसातकर्णी, यांच्यासह सातवाहन कुळातल्या सात व्यक्तींच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या. आता त्या शिल्लक नाहीत, त्यांची नावे आणि पायांचे अवशेष दिसतात. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हे पुतळे पाहिल्याचे उल्लेख पर्यटकांनी केले आहेत. नंतर ते गायब झाले. यात महत्त्वाचे हे की चोवीसशे वर्षांपूर्वी एका स्‍त्रीने येथे समर्थपणे राज्‍य केले !

सध्या हे प्रशस्त लेणे जाळी आणि दरवाजा लावून बंद करण्यात आले आहे. त्याला कारणही ट्रेकर्स आणि टुरिस्टच आहेत. अलिकडच्या काळात लेण्यांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा आणि दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असायचा. सगळ्यात कहर म्हणजे एका मैत्रिणीने सांगितले की काही मित्रमैत्रिणींबरोबर ती नाणेघाट चढून गेली तर लेण्यामध्ये एक वधूवर परिचय समारंभ चालला होता. बसेस भरून माणसे आलेली होती. लेण्यात हातात माईक घेऊन लग्नेच्छू त्यांच्या त्यांच्या अपेक्षा सांगत होते आणि बाहेर मोठमोठ्या पातेल्यांमध्ये अन्न रटरटत होते. निषेध नोंदवणेही शक्य नव्हते म्हणून त्यांनी सरळ घाटघरचा रस्ता धरला. दोन हजार वर्षे ज्या मोकळ्या जागेने पांथस्थांना आसरा दिला ती आता बंद झाली आहे. रात्री घाट चढून गेल्यावर मोकळ्या पठारावर पथाऱ्या  पसराव्या लागतील. असो.

सातवाहनांचा काळ साधारत: इसवी सन पूर्व 222 ते इसवी सन 228 असा मानला जातो. हे महाराष्‍ट्रातले पहिले ज्ञात ऐतिहासिक राजघराणे. त्‍यापूर्वीचा महाराष्‍ट्राचा इतिहास फारसा उजेडात आलेला नाही. नाणेघाटाच्‍या परिसरात या राज्‍यांची स्‍थापना झाली. जुन्‍नर ही त्‍यांची पहिली राजधानी. गोदावरीच्‍या काठाने वाढत जाऊन ते उत्‍तरेत माळवा, राजस्‍थान आणि दक्षिणेत आंध्रात पसरले. सातवाहन काळात व्‍यापार उद्योगाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पैठण, तेर, नाशिक, जुन्‍नर ही गावे भरभराटीला आली. कल्‍याण, सोपारा, चौल या बंदरांमधून इटली, ग्रीस, इजिप्‍त इथल्‍या शहरांशी व्‍यापार चाले. अनेक शिलालेखांमध्‍ये ‘धेनुकाकट’ या गावाच्‍या नावाचा उल्‍लेख येतो. इथल्‍या यवनांनी म्‍हणजे रोमन आणि ग्रीकांनी बौद्ध विहारांना देणग्‍या दिल्‍याचे उल्‍लेख आहेत. काही तज्ज्ञांच्‍या मते ‘धेनुकाकट’ किंवा ‘धान्‍यकटक’ हे आजच्‍या जुन्नरचे जुने नाव आहे. पण या नावावर दावा सांगणारी इतरही काही प्राचीन शहरे आहेत.

नाणेघाट हा तेव्‍हा उत्‍तरेकडून कोकणात उतरण्‍याचा मुख्‍य मार्ग होता. जुन्‍नर हे राजधानीचे शहर आणि व्‍यापारी केंद्र असल्‍यामुळे तिथे अनेक रोमन, ग्रीक व्‍यापाऱ्यांनी वस्‍ती केली असावी. या व्‍यापारामुळे रोमन भांडी, मद्याचे कुंभ, काचेचे सामान, ब्रॉन्झचे पुतळे अशा वस्‍तू सातवाहनकालीन घरांच्‍या उत्‍खननात सापडल्‍या आहेत. तर याच काळातली भारतीय बनावटीची हस्‍तीदंती मूर्ती इटलीतल्‍या पाँपे इथल्‍या उत्‍खननात सापडली आहे. शिल्‍पकलेमध्‍येही सातवाहनांची अशी स्‍वतंत्र शैली होती. याचा उत्‍कृष्‍ट नमुना कार्ल्‍याच्‍या लेण्‍यांमध्‍ये पाहायला मिळतो. चैत्‍यगृह बांधणाऱ्या  जोडप्‍यांचे हे पुतळे आहेत. कान्‍हेरीतही असे पुतळे आहेत. हे पुतळे पाहता महाराष्‍ट्रातली त्‍या काळातली माणसे चांगली गुटगुटीत व आनंदी होती असे समजायला हरकत नाही.

नाणेघाटातून प्रवास केल्याचे उल्लेख परदेशी प्रवाशांच्या प्रवासवर्णनांमध्येही आढळतात. पंधराव्या शतकाच्या अखेरीस रशियन प्रवासी अफनासी निकितीन याने चौलहून जुन्नरला जाताना या रस्त्याने प्रवास केला होता. 1675 च्या मे महिन्यात ईस्ट इंडिया कंपनीत सर्जन म्हणून काम करणाऱ्या जॉन फ्रायरने जुन्नरहून मुंबईला परत जाताना नाणेघाटाचा रस्ता धरला होता. जुन्नरला जाताना तो भिऱ्या घाटातून गेला होता. तो घाटापाशी आला तेव्हा तीनशे बैलांचा एक तांडा कोकणातून मीठ घेऊन वर येत होता, त्यामुळे त्याचा खोळंबा झाला. नाणेघाटातल्या पाण्याच्या टाक्यांचा त्याने उल्लेख केला आहे, ती अद्यापही आहेत. आश्चर्य म्हणजे नाणेघाटातल्या गुहेत तेव्हा होत्या त्या सातवाहन काळातल्या मुर्तींचा किंवा तिथल्या शिलालेखांचा उल्लेख त्याने केलेला नाही.

नाणेघाटातला दगड हा डाईक या प्रकाराचा अग्निजन्य खडक आहे. लाव्हारस जेव्हा जमिनीच्या भेगांमध्ये शिरून थंड होतो आणि त्याचा खडक बनतो त्या खडकाला अंतर्निर्मित अग्निजन्य खडक म्हणतात आणि थंड होण्याचे प्रमाण अतिशय संथ असल्याने हे खडक कठीण असतात. नाणेघाटातल्या डाईकमध्ये असलेल्या आडव्या भेगांमुळे तो फोडणे सुलभ झाले. ह्या फोडलेल्या आडव्या दगडांच्या पायऱ्या केलेल्या आहेत. दुसरा रस्ता बांधायला सुरुवात केली होती तो गुणाचा घाट किंवा गुणेघाट नानाच्या अंगठ्याच्या खाली पहायला मिळतो. गुहेच्या वरती पाहिले तर एक दणकट भिंत दिसते. ती चढून जायला मागून चांगली वाट आहे. खालून ही भिंत अंगठ्यासारखी दिसते. नानाचा अंगठा या नावाने हा सुळका प्रसिद्ध आहे.

सातवाहनांच्‍या काळात बौद्ध धर्माबरोबर वैदिक धर्मालाही पुन्‍हा चालना मिळाली. सातवाहन स्‍वत: वैदिक धर्माचे अनुयायी होते. तरी त्‍यांनी बौद्ध भिक्षूसाठी विहार बांधले, चैत्‍यगृहे कोरून घेतली. सर्वसामान्‍य जनता ही मोठ्या प्रमाणात बौद्ध होती. सातवाहनांची सगळ्यात मोठी देणगी म्‍हणजे त्‍यांची राज्‍य कारभाराची भाषा महाराष्‍ट्री प्राकृत होती. या महाराष्‍ट्री प्राकृतातून मराठी भाषा उत्‍क्रांत झाली. एकाही सातवाहन राजाचा लेख संस्‍कृतमध्‍ये नाही. सधन समाज आणि सहिष्णू धार्मिक वातावरण ही सातवाहन-कालीन महाराष्ट्राची वैशिष्ट्ये होती. नाणेघाटात जीवधन गडाच्या टोकावर साडेचारशे फूट उंचीचा एक सुळका आहे. त्‍याला वानरलिंगी किंवा खडा पारशी म्‍हणतात. सातवाहनांच्या वारश्याच्या पार्श्वभूमीवर ताठ उभा असलेला सुळका. जेव्‍हा केव्‍हा आपण महाराष्ट्राच्या सांस्‍कृतिक वारशाचा विचार करतो तेव्‍हा हा इतिहास मराठी व्‍यक्तिमत्‍वामागे या सुळक्‍याप्रमाणे उभा असतो.

-सुनंदा भोसेकर 9619246941 sunandabhosekar@gmail.com

About Post Author

6 COMMENTS

  1. छान लिहीलायस.वाचताना पुर्नभेटीचा आनंद आणी नव्या गोष्टी समजल्या.

  2. सुनंदाचा खूपच मौलिक माहितीचा अभ्यासपूर्ण, लेख आहे..
    जॉन फ्रायर वैद्यकीय पदवी घेतल्यावर सन १६७२ मध्ये मुंबईत आला. त्यावेळी मुंबई हे दलदल, डास यामुळे रोगराईने भरलेलं बेट होतं, मुंबई बेट पोर्तुगीझ राजाने आपल्या मुलीच्या लग्नात इंग्लंडचा राजा चार्ल्सच्या याला आंदण म्हणून दिलं.{आपल्यासारखाच झब्बू आहेर).मुंबई ताब्यात आल्यावर ब्रिटीशांनी त्यात सुधारणा केल्या. आणि ब्रिटीशांवर उपचार करायला ईस्ट इंडिया कंपनीने त्याला मुंबईला पाठवलं. त्याकाळात देशावरून समुद्रालगतच्या गावांना जायला फौजांना पुण्याहून भोर घाट, सातारा कोल्हापूरवरून अंबा, अणुस्कुरा घाट होते. मुंबईला किल्ला बांधल्यावर ब्रिटीशांनी समोर पनवेलवर जेठी बांधून, पनवेल, चौक, खोपीवली, घाट, राजमाचीवरुन खंडाळा असा पुणे असा मार्ग तयार केला. राजमाचीला त्यांना आपल्या झोपलेल्या राजाचा चेहरा वाटावा असा आडव्या कड्याचा, त्याखाली नाक, आणि त्याखाली दाढी असा सहयाद्रीचा सुळका दिसला त्याला त्यांनी ड्यूक्सनोज नाव दिलं. (आता त्याला गो.नि.दांचं नाव द्यायला हरकत नाही) फ्रायर देशावर मुघलांकडे गेला तेव्हा त्याला मालशेज घाटातून नालासोपार्‍यावरुन बोटीने मुंबईला यावं लागलं. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी बौद्ध भिख्खू याच मार्गाने जात म्हणून त्यांनी त्यामार्गावर लेणी तयार करून आपल्या वसतीची सोय केली..

    • Renaming DN as GoNiDa cliff is amazing thought,
      But his daughter Dr Veena Jee Deo must also take the keen interest.
      His granddaughter could use her stardom for the cause.
      I had suggested to Deo’s to talk to railways and have tab at Talegaon station with GoNiDa’s bio,
      Railway charges minor fee.
      But “we shall think” was typical answer.
      Other states people treat ancestors with pride.
      But that espirite de corps is missing in Maharashtra.
      I only hope ace writers like,
      Vasant Vasant Limaye & Anand jee Palande take lead for Renaming prosess through Girimitra Sammelan.
      With warm regards.

  3. धन्यवाद स्मिताताई. जॉन फ्रायरचा प्रवासवृत्तांत मी वाचला आहे. फारच इंटरेस्टींग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here