माणूस ज्या प्राण्यांचा सांभाळ करतो, ज्या पद्धतीने त्यांच्यावर प्रेम करतो, त्याच्या कितीतरी अधिक पटीने ते प्राणी कोणत्याही बंधनांशिवाय माणसावर प्रेम करतात. माणसाच्या सद्भावाचा तो एक विशेष घटक आहे. कुत्रा हा प्राणी त्याच्या स्वतःपेक्षा कित्येक पटींनी त्याची काळजी घेणाऱ्यावर प्रेम करतो. मांजराचे लडिवाळ बोलावणे – भूक लागल्याची तक्रार करणे, कुत्र्याचे माणसाच्या आवाजाकडे सतर्क लक्ष असणे या अनुभवण्याच्या गोष्टी असतात. मांजरा-कुत्र्यांच्या माणसाबरोबर असण्याने आपलेपणा, प्रेम, संवेदनशीलता, जिव्हाळा, काळजी या भावना जागृत होतात, वाढीस लागतात. मी पुण्यातील संस्कृत भाषेच्या गाढ्या अभ्यासक सरोजा भाटे यांच्याशी फोनवर बोलणे सुरू करण्याआधी त्यांच्या मांजरांबद्दलची ख्यालीखुशाली विचारते; मग कशासाठी फोन केला त्याबद्दल बोलणे सुरु होते. असा फोनसुद्धा एक ऊर्जा निर्माण करतो. त्यांनी त्यांच्या लहानपणापासून आत्तापर्यंत त्यांचा किती वेगवेगळ्या प्राण्यांशी संबध आला आणि ते त्यांच्या आयुष्यात कसे आपलेसे झाले याबद्दल लिहिलेला हा लेख. ‘सद्भावनेचे व्यासपीठ’चे इतर लेख सोबतच्या लिंकवरून वाचता येतील.
– अपर्णा महाजन
माझं प्राणिविश्व (My World of Animals)
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. माझी आई होती तेव्हा. नेहमीप्रमाणे, एका संध्याकाळी आम्ही दोघी कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडे भाजी आणायला गेलो. त्याचा मुलगा, नुकतेच लग्न झालेला, त्याला मदत करायला आलेला दिसला. मला पाहून म्हणाला, “भाटेकाकू, आजच सकाळी तुमची आठवण काढली होती. मी बायकोला सांगत होतो तुमची गोष्ट”. “कोणती बाबा?” “मी लहान होतो तेव्हा अशाच तुम्ही दोघी भाजी आणायला आला होतात. समोरच्या कोपऱ्यावर एक आजी भाजी विकायला बसल्या होत्या. त्यांच्या पाठीमागे त्यांनी ठेवलेल्या पाटीला एक गाढव सारखं ढुशा मारायचं न् त्या त्याला हाकलायच्या. ते पाहून तुमच्या आई तुम्हाला म्हणाल्या, “अगं, त्याला पाणी हवंय, जा घरून बादलीत पाणी घेऊन ये”. मग तुम्ही धावत घरी जाऊन बादलीत पाणी आणलं आणि ते गाढव मनसोक्त पाणी पिऊन गेलं. मी बायकोला ही गोष्ट सांगून म्हटलं, की हे खरं प्राणिप्रेम !”
मी तो प्रसंग विसरले होते. पण त्याने सांगितल्यावर आठवले की परतताना मी आईला विचारले होते, “तुला कसे कळले त्या गाढवाला तहान लागली होती ते?” त्यावर आई म्हणाली “अगं, ते गाढव त्या बाईने तिच्या पाटीत ठेवलेल्या, पाण्याच्या चरवीकडे सारखे बघत होते”.
प्राणिप्रेमाचे बाळकडू हे असे आईकडून मला मिळाले. अजून एक-दोन बालपणीच्या आठवणी आहेत. माझे दोन शाळकरी भाऊ सुट्टीत मावशीकडे मणेराजुरीला गेले होते. येताना मोठा खिशात खारीचे एक पिल्लू घेऊन आला. डोळे असलेला मांसाचा गोळा. आईने ओळखले, खारीचे पिल्लू. आम्ही दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच वडिलांच्या नव्या नोकरीच्या जुन्नर या गावी एसटीतून गेलो. जाताना आईने ते पिल्लू एका जाळीदार कापडी पिशवीत तिच्या हातात ठेवले होते. मी तीन-चार वर्षांची होते तेव्हा. एवढेच आठवते, की ते पिल्लू जुन्नरच्या आमच्या घरात दोन-तीन महिने राहिले. त्याची झुपकेदार शेपटी आकार घेऊ लागली होती. ते फक्त आईला हात लावू द्यायचे. ते ती भाकरी करताना तिच्या मांडीवर झोपलेले असायचे. मात्र जुन्नरची थंडी त्याला सोसली नाही आणि ते संपले.
आम्ही एकदा सोलापूरच्या मावशीकडे गेलो असताना तेथील बागेत वनभोजनाला गेलो. मी इकडेतिकडे भटकत माकडांच्या पिंजऱ्यापाशी आले. जाळीतून हात आत घालून माकडांशी मैत्री करू पाहत असतानाच एका माकडाने झडप घालून माझ्या उजव्या हाताच्या कोपराजवळ चावा घेतला, लचकाच तोडला ! रक्तबंबाळ मला पाहून लोकांनी आरडाओरडा केल्यावर मावशीच्या भगवान नावाच्या सेवकाने त्याच्या सायकलवरून मला सिव्हिल हॉस्पिटलला नेले. त्यावेळी घातलेल्या टाक्यांचे व्रण मी माझ्या शौर्याची खूण म्हणून दाखवते ! पुढे, माझ्या एका डॉक्टर होऊ घातलेल्या मैत्रिणीने सांगितले, “पंचवीस-तीस वर्षांनी कदाचित तू माकडासारखी ओरडू लागशील”. तेवढी वर्षं मी त्या भीतीच्या छायेत काढली. सुदैवाने आजपर्यंत मी माणसासारखीच बोलते आहे !
आठवतेय तेव्हापासून माझ्या अवतीभवती मांजरे आहेत. लहानपणी तर आईकडे एकावेळी नऊ मांजरे होती. ती त्यांचे सगळे लाड पुरवी. एकाला उकडलेला लाल भोपळा, दुसऱ्याला चुरमुरे आणि बाकीच्यांना सुकट-बोंबिल, जे आमच्या वाड्यातल्या, मोलमजुरी करणाऱ्यांच्या घरात सहज मिळे. बाळंतिणीचे लाड विचारू नका. ताज्या दूधपोळीवर तुपाची धार ! कधीकधी कालवून द्यायची वेळ माझ्यावर आली तर मी बाळंतिणीला द्यायच्या आधी गुपचूप एक घास तोंडात कोंबायची!
नंतर माझे लग्न झाले. आईचेही घर बदलले. बंगला मिळाला. तिथेही आईला पिल्लू सापडले. प्रजा वाढली. मग बाहेरच्या मांजरांना घरात घेणे थांबवले, पण खायला घालणे थांबवले नाही. पण घरची मांजरे न् बाहेरची मांजरे असे त्यांचे दोन भाग झाले. ‘बाहेर’ची प्रजाही वाढू लागली. आई हैराण. माझ्या एका मांजरवेड्या मैत्रिणीने बायका वापरतात त्याच संततिप्रतिबंधक गोळ्या मांजरीला द्यायला सांगितले, फक्त एकाऐवजी अर्धी गोळी रोज द्यायची. घरात आणि बाहेर मिळून पाच माद्या. केमिस्टकडून पाच पाकिटे दर दोन महिन्यांनी आणायची. त्यावर मांजऱ्यांची ‘चिकणी’, ‘भुरी’, ‘बाहेरची राखी’, ‘बाहेरची काळी’ अशी नावे लिहायची. दररोज सकाळी अर्धी गोळी दुधात खलून ते दूध त्या त्या मांजरीला पाजायला आई जातीने हजर असे. एखादी ‘बाहेरची’ एखाद्या दिवशी आली नाही की आईचा जीव टांगणीला. एकदा केमिस्टकडे मी पाच पाकिटं मागितली न तो माझ्या तोंडाकडे बघतच राहिला ! मग खुलासा करावा लागला !
मारामारी करून जखमी होऊन परतलेल्या बोक्यांना दवाखान्यात पळवणे तर नित्याचेच. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या ‘दादा’ बोक्यांना मी दगड मारून पिटाळत असे (माझे घर आईच्या घराशेजारीच होते). एकदा आई स्वैपाकघराच्या दाराच्या पायरीवर बसून एका बोक्याला खायला देत होती. जवळ जाऊन पाहिले तर बाहेरचा ‘दादा’बोका. तिला म्हटले “अगं, तुझ्या बोक्यांना हा मारतो न् त्याला खायला काय घालतेस?” म्हणाली, “त्यालाही जीव आहेच ना! आणि मारामारी करणे हा बोक्यांचा स्वभावधर्मच असतो. आपण फक्त वाचवायचा प्रयत्न करायचा”.
आईचे हे मांजरप्रेम माझा मुलगा कुणाल आणि त्याची मुलगी मही यांच्यात तंतोतंत उतरले आहे. एकदा लहानपणी कुणाल कचरापेटीतून एक पिल्लू घेऊन आला. मी ओरडल्यावर म्हणाला, “अगं, तेच माझ्या मागे मागे आलंय. बघ आता तेच घरात आलंय”. मग काय तेव्हापासून मांजरे आमच्याकडेही वस्तीला असतात. त्यांची आजारपणे, दवाखाने, बाळंतपणे, शी-शू काढणे सगळं मागे लागले ते आजपर्यंत. कुणालच्या बंड्याला सतावणाऱ्या ‘दादा’ बोक्याला हिकमतीने पोत्यात पकडून, गाडीत घालून कुणाल दूरवरच्या सोसायटीत सोडून आला. दादा बोका आठ दिवसांनी पुन्हा आमच्या घरासमोर हजर. मग पुन्हा त्याला पोत्यात पकडून गाडीत घालून तळजाईच्या टेकडीवर सोडून आला, एका हॉटेलच्या भटारखान्याच्या मागच्या बाजूला. तेव्हापासून मात्र तो परतला नाही. महीचा ‘जिंजर’ असाच एकदा गायब झाला. रात्रीच्या अंधारात टॉर्च घेऊन आम्ही आजूबाजूच्या बंगल्यांच्या आवारात घुसून शोध घेतला. तो सोसायटीच्या बागेत दोन-तीन दिवसांनी सापडला, कुत्र्यांनी फाडलेल्या अवस्थेत. महीने आकांत केला. तो जिथे पडला होता तिथली माती एका पुरचुंडीत भरून ती पुरचुंडी तिने बरीच वर्षं तिच्या अभ्यासाच्या कपाटात ठेवली होती. ती त्याच्या मृत्युदिनी उपास करत असे. “मग, माझा भाऊ होता तो” म्हणे. एक दिवस, दुपारी शाळेतून रिक्षाने आली, मला म्हणाली, “अज्जू, चल लवकर, आमच्या शाळेजवळ एका मांजराला गाडीने ठोकरलंय, त्याला घेऊन येऊ”. त्याच रिक्षानं जाऊन ते जखमी पिल्लू आणले, त्याचं औषधपाणी केले. एका पेटकेअर इस्पितळाला फोन केला, ते म्हणाले, ‘घेऊन या’. दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन जाणार होतो, पण रात्रीच त्याने ‘राम’ म्हटले.
घरात सध्या तीन माद्या आहेत. दर तीन महिन्यांनी पाळणा हलतो. कुणालला कसेबसे राजी करून एकीचे ऑपरेशन केले. इस्पितळातून घरी आणल्यावर, शुद्धीवर येताच तिने पोटाची पट्टी चावून काढायला, इकडेतिकडे सैरावरा पळायला सुरुवात केली. सगळ्या खिडक्यादारे बंद करून तिला बैठकीच्या खोलीत ठेवले न् झोपायला गेले. झोप येईना म्हणून थोड्या वेळाने उठून तिच्याकडे गेले तर ती गायब. आम्ही तिघांनी रात्रभर आजूबाजूला शोध घेतला. पट्टी बांधलेल्या स्थितीत भेलकांडत चालत होती. पळूही शकत नव्हती. बाहेर कुत्री, बोके. सगळेच घाबरून गेलो. ती सकाळी संडासाच्या वरच्या खिडकीतून सुखरूप परतली. संडासाचे दार चुकून अर्धे उघडे राहिले होते तिथून उडी मारून ती सटकली होती.
सध्या घरच्या तीन, एकीचा बछडा आणि बाहेरच्या दोन माद्या, एक बोका एवढी प्रजा आहे. बाहेरच्या प्रत्येक खेपेला पिल्ले झाली की ती मोठी झाल्यावर त्यांना घेऊन दारात येतात. वर्षापूर्वी बाहेरच्या मांजरीचे एक पिल्लू जबरदस्तीने पकडून कुणालने माणसाळवले. तिची ही घरातली प्रजा. म्हणून त्या बाहेरचीला आम्ही ‘आज्जी’ म्हणतो. एकदा कुणाल म्हणाला, “आपल्या ‘झिप्रा’ला (आज्जीची ही पणती!) आज्जीआजोबा झाले ! ते बघ दारात”. आज्जी तिच्या दोन पिल्लांना घेऊन दारात उभी होती, एक बोका न् एक मांजरी.
खरी कसोटी बाहेर मुख्य दारापाशी घोटाळणाऱ्या कुत्र्यांपासून या मांजरांना वाचवताना लागते. कुत्र्यांना बिस्किटांची सवय लावल्यामुळे तीही दारातून हटत नाहीत. कधीकधी, कुंपणावरून उड्या मारून मांजरांमागे धावतात. रात्री-अपरात्री उठून त्यांना हाकलावे लागते. जाता येता दिसणाऱ्या मरतुकड्या कुत्र्यांना घाल्यासाठी बिस्किटपुडे पर्समध्ये ठेवत असे. कधीकधी रिक्षातून उतरून, रस्त्याच्या कडेला कुत्र्याला बिस्किटं खाऊ घालून मग पुढे जायचे. वीसेक वर्षांपूर्वी बडोद्याला प्राच्यविद्या परिषद होती, मी परिषदेची सहचिटणीस होते. एकदा संध्याकाळी आवारात फिरताना काही सदस्यांनी मला कुत्र्याला बिस्किटे घालताना पाहिले तेव्हापासून ते मला ‘बिस्कुटमॅडम’ म्हणू लागले. तेव्हापासून त्यांची सहानुभूती मिळून बहुधा त्यांची मते मिळून मी एकमताने निवडून येऊ लागले ! प्राणिप्रेम हे असेही फळते कधीकधी.
– सरोजा भाटे 9890198448 bhatesaroja@gmail.com
गाँधी टॉलस्टाय कार्ल मार्क्स बर्नॉर्ड शॉ जॉन एफ कैनेडीचे गुरु थोरो सांगायचे की माणसांशी कसं वागायचं हे मला प्राण्यांनी शिकवलं.