महाराष्ट्र देशा (My Maharashtra)

29
508

जिल्हा रायगड. तालुका सुधागड. गाव अष्टविनायकातील पालीजवळचे वावळोली. मी उभी होते तेथील आमच्या समजल्या जाणाऱ्या शेताच्या शोधात. रणरणते ऊन डोक्यावर. आजुबाजूला भेगा पडलेल्या ओसाड जमिनी. कोठे तारेच्या कुंपणांनी बंदिस्त केलेल्या; तर कोठे, त्यावर अर्धवट बांधकामे करून पडलेल्या. मी जवळपास तीस वर्षांच्या कालावधीनंतर त्या भागात आले होते- आमचे शेत शोधत. हातात फडफडणारे सातबाराचे उतारे. बरोबर शासकीय सर्व्हेअर. तो ज्या दिशेला जमीन शोधत चालेल त्या दिशेला आम्ही जावे, जेथे थांबेल तेथे थांबावे ! चालत चालत एका मोठ्या कातळापाशी आलो आणि ‘युरेका’ म्हणावे तशी मी आनंदोद्गार काढून थांबले. सगळ्या आठवणी परकरी पोरीगत धावत आल्या. हाच तर तो कातळ, ज्याच्यावर गवताच्या पेंढ्या टाकून मी चांदण्या रात्री झोपण्यातील सुख अनुभवले होते ! भाताची झोडणी करण्याची ही जागा. तो कातळ वडिलांचा खास आवडता. सभोवताली उंच निवडुंगाचे बेट…

मी वडिलांच्या हौसेच्या नजरेने सभोवार पाहिले तर हिरव्यागार शेतात मी माझ्या आईसोबत उभी होते. भरताड-भेगाळ जमिनीतील कभिन्न काळ्या कातळाने शेताची ओळख पटवली. मी अतीव आश्चर्याने मागे वळून पाहिले, तर पालीचा सरसगड किल्ला त्याचा पाची बोटांचा पंजा पसरून उभा होता. मनात आले, ‘अरेच्चा ! हा स्पॉट इतका सुंदर आहे, होता !’ विस्तीर्ण आभाळ आणि त्याच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला काळाकभिन्न सरसगड ! पाली गावाकडून एकसलग दिसणारा सरसगडाचा कातळ तेथून अगदी पंजा उलगडून उभा आहे. तसे तर, सरसगडाचे दर्शन पालीत शिरता शिरताच होते. विविध कोनांतून उलगडणाऱ्या पाच बोटांच्या त्या गडाचे नवल सांगताना आजी म्हणत असे, की पांडव तेथे आले होते, त्यातील भीमाची ही पाच बोटे ! सणसणीत उन्हातही सरसगडाचा आणि आमच्या शेतजमिनीतील कातळ पाहून मी शीतल झाले खरी ! ‘आपल्या जमिनीचा’ अर्थ आपोआपच समजला. आपली जमीन, आपला गाव, आपला देश, आपला महाराष्ट्र !

महाराष्ट्र म्हणजे दगडांचा देश. लोणावळ्याहून निघून राजमाचीला मैलोनमैल चालत जाताना, मध्येच कधीतरी उजव्या हाताला डोंगरात लागायची एक भव्य तासलेली दगडाची लांबच लांब भिंत. त्या भिंतीचा जसा आब जाणवायचा, दबदबा वाटायचा तसा आधारही वाटत असे. ती भिंत दरड होऊन आपल्यावर कोसळणार नाही ह्याची खात्री; जी हिमालयात चालताना वाटत नाही, ती वाटे. त्या उभ्या भिंतीचा ताशीवपणा कधी पाण्याच्या धारा अंगावर घेताना दिसत तर कधी रात्री चालताना चांदण्यात न्हालेला आढळायचा. ती भिंत आहे तशीच आहे, तशीच राहणार आहे याचा दिलासाही चालताना मनास वाटे. हाच राजमाचीचा रस्ता लोणावळ्याऐवजी कधी पलिकडून कोंदिवड्याहून चालावा तर दगड-धोंड्याची चढणवाट आणि चढ चढून गेल्यावर शेवटी सापडायची दगडांची बनलेली एक चौकट, ज्याला तिथे ‘खिडकी’ म्हणायचे. त्यापलीकडे विस्तीर्ण असे पठार. संपूर्ण महाराष्ट्राचा हा दगड म्हणजे भूगोलाच्या भाषेत डेक्कन ट्रॅप. दक्षिणी कातळ. काही कोटी वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जागी दोन-तीन हजार फूट खोल भाग होता. पृथ्वीच्या हालचालींमुळे भेगा पडून लाव्हारसाच्या नद्या वाहण्यास लागल्या. लाव्हा थंड झाला, त्याची माती झाली, पुन्हा लाव्हा पसरला. असे होत होत थराथरांनी वर चढणारा हा महाराष्ट्राचा काळाभोर कातळ तयार झाला. यातील एकेका थराची उंची साधारण दहा फूटांपासून पन्‍नास फूटांपर्यंतही आहे. सह्याद्रीतील अनेक डोंगरांमध्‍ये ही रचना अगदी स्‍पष्‍ट दिसते. शिवाजी महाराजांनी काही ठिकाणी हे कातळ दोरही लावता येणार नाही अशा प्रकारे तासून घेतले आहेत. काही गडांना नैसर्गिक कातळभिंती आहेत. त्यातीलच हा एक सरसगड किल्ला. पाली गावाच्या मागे उभा असलेला.

आमचे गाव सिद्धेश्वर. अंतर पालीपासून दोन किलोमीटर. सिद्धेश्वर हे दुर्वे कुटुंबीयांचे मूळ गाव. त्यामुळे पालीमधील अष्टविनायक आणि देवळामागे उभा असलेला सरसगड अंगणात उभे असल्याप्रमाणे ओळखीचे. मी कधी तरी एकदा सरसगडावर जाऊनही आलेली आहे. खालून त्याच्या बेचक्यातील पायऱ्या कळत नाहीत. पण तेथवर पोचलो की दिसतात अगदी कातीव, दगडी पायऱ्या. त्या गडावर जाण्यासाठी उत्तर आणि दक्षिण,  दोन्हींकडून वाट आहे. समुद्रसपाटीपासून साधारण साडेचारशे मीटर उंचीचा तो किल्ला त्याच्या कातळमाथ्यामुळे लक्ष वेधून घेतो. उत्तरेकडील वाट तलई गावातून जाते तर गणपती मंदिराजवळून जाणारी वाट रुळलेली आहे. आम्हीही त्याच  वाटेने गेलो होतो. दीड-दोन तासांची चढाई आहे ती. खाली पाली गाव दिसते, तर उजवीकडे तीन सुळके दिसतात, तीच ती भीमाची बोटे. मध्यावर पोचलो की घळीत पायऱ्या खोदलेल्या दिसतात. गुढघाभर उंच अशा खूपशा पायऱ्या चढून जाईपर्यंत दमछाक होते. वर पोचल्यावर, डावीकडे गडाचा कातळमाथा आहे. तो गडाचा बालेकिल्ला. तेथेच खाली पाण्याची टाकी आहेत. काहीसे अस्फुट स्मरते की तेथे काही गुहा आहेत. बालेकिल्ल्यावर महादेवाचे देऊळ आहे. महाभारतकालीन पांडवांच्या कथा भारतात सर्वत्र रुजलेल्या असतात. सरसगडाविषयीही आख्यायिका आहे, की पांडवांनी त्या गुहांमधून मुक्काम केला होता. या गडाच्या माथ्यावरून सह्याद्रीच्या रांगांमधील अनेक किल्ले दिसतात.

मी सरसगडाचा आणि एकूणच महाराष्ट्रातील कातळ सोडून पुन्हा वावळोलीतील आमच्या शेतातील कातळावर परतले. सावली नसूनही कातळावर बसले. सरसगडाच्या पूर्वेलाच असलेल्या दूर क्षितीजावरील सुधागडावर दृष्टी गेली. त्याही गडाविषयी लिहिता येईल. वाटले, ह्याच परिसरात टिपण्याजोग्या किती गोष्टी आहेत ! सिद्धेश्वर गावातील सिद्धेश्वराचे मंदिर, आमचा मूळपुरुष बापूजी यांचे मंदिर, दुर्वे यांचे मूळ घर. ते घर फार पूर्वी कधीतरी नांदते-वैभवशाली असताना, घरावर दरोडा पडला होता. तेव्हा दरोडेखोरांशी दोन हात करताना दोन पहारेकऱ्यांचा प्राण गेला. त्यांची स्मारके गावात आहेत. अशा कितीतरी जागा, पुढे काही अंतरावर एकवीस गणपतींचे स्थान, पालीतच असलेले उन्हेरे नावाचे उन पाण्याचे झरे आणि प्रसिद्ध बल्लाळेश्वर देऊळ ! पालीपासून काही अंतरावर डोंगरांच्या रांगा ओलांडत गेलो होतो ते वरदायिनी मंदिर. ‘आता तिथवर गाडी जाते.’ कुणीसे म्हणाले.

एका गावात इतके काही विखुरलेले, लिहिण्याजोगे आहे तर छत्तीस जिल्हे, तीनशेअठ्ठावन्न तालुके आणि त्यातील सुमारे पंचेचाळीस हजार गावे मिळून बनलेल्या महाराष्ट्रात लिहिण्याजोगे, नोंदी करण्याजोगे किती असेल ! वाटले, ‘मोगरा फुलला’ निमित्ताने उभा महाराष्ट्रच लिही म्हणून मला खुणावत आहे का? ही एक नवी सुरुवात तर नव्हे ?

चला, तर मग सीमोल्लंघन करून सोने लुटू या.

– राणी दुर्वे 9619663972 ranidurve@gmail.com
——————————————————————————————————————-

About Post Author

29 COMMENTS

  1. राणी तुझा लेख वाचताना माझ्या डोळ्यासमोर राजमाचीचा बालेकिल्ला आला. खूप मस्त. मनापासून अभिनंदन 🙏🌹

  2. खूप सुंदर वर्णन केले आहे, आजपर्यंत पालीला गणपतीच्या दर्शनाला बरेचदा जाणे झाले पण आता हे वाकबून या सरसगडावर जायला हवे असे वाटतेय

  3. मराठी साहित्याच्या नकाशावर पाली – सिद्धेश्वरला तुम्हीच प्रथम आणलंत!
    मन:पूर्वक धन्यवाद!

    • आता किहीम-चोंढी बद्दलही लिहीते . तुमच्या comments बद्दल धन्यवाद.

  4. राणी, तुझ्या डोळ्यांनी सिद्धेश्वराचा परिसर पाहिला अन् मनाने अनुभवला.भीमबैठक पाहिली होती पण भीमाची पाच बोटं ऐकली नव्हती. तुझं ललित लेखन वाचायला नेहमीच आवडतं. सुरुवात छानच झाली आहे.

  5. राणी, छान , तुझ्या नजरेतून तू सरसगड व तुझ्या मूळ गावाची सैर घडवलीस ! ( आता माझ्या सर्व सहली इतरांच्या नजरेतूनच ! ) पण आपली मूळ किती घट्ट असतात , ती आपल्याला कशी ओढून नेतात आणि पूर्वीच्या आठवणी लख्ख होऊन डोळ्यासमोर येतात , जणू मधला काळ पुसून जातो . अशीच महाराष्ट्रातल्या अनामिक ठिकाणी आम्हाला घेऊन जा .

  6. राणी खूप सुंदर लेख .
    परत एकदा तू तुझ्या बरोबर पाली , सिद्धेश्वर चा छान प्रवास घडवला आणि एक प्रवास दृष्टी दिली .
    तुझे लेखातील शब्द प्रयोग /वाक्य रचना मनाला खूप भावले… ‘ चालत चालत एका मोठ्या कातळा पाशी आलो…..सगळ्या आठवणी परकरी पोरिगत धावत आल्या .’ मनापासून सलाम

  7. ‘मोगरा फुलला’ मधील राणीचा पहिला लेख वाचला आणि आता यापुढे राणीच बोट धरून अख्खा महाराष्ट्र फिरण्याचे वेध लागले. राणीची लेखन शैली अशी अनोखी आहे की तिने आपल्या लिखाणातून अक्षरशः सजीव शब्दचित्र रेखाटले आहे. आपण तो अनुभव प्रत्यक्षात घेत आहोत असं सतत वाटत रहातं इतकं आपण तिच्या लिखाणात गुंतून पडतो. त्याचबरोबर आपल्या मुळांशी जोडणारी जी एक भावना प्रत्येकाच्या मनात असते तिला राणीने छान साद घातली आहे. त्यामुळे वाचक आपापल्या स्वतःच्या अश्या भावूक आठवणींशी जोडला गेला असेल.
    पुढल्या लेखाची प्रतीक्षा आहे.

  8. छान लेख.सुधागड,सरसगडाचे ट्रेक आणी दुसर घर जणू असलेल्या राजमाचीच्या आठवणी आल्या.

  9. प्रादेशिक साहित्य लयाला जात असताना असे तुझे लेख म्हणजे चमचमणारे प्रकाशकण !

  10. राणी, तू बोट धरून छानच फिरवून आणलं सिद्धेश्वर आणि पाली मधून!! तुझ्या शब्दांना धरून, तुझ्याबरोबर भ्रमंती करण्याचा आनंद वेगळाच!!

  11. खूप छान लेख. बल्लाळेश्वर, सरसगड,सुधागडचे ट्रेक आणी दुसर घर जणू अशी राजमाची सार्‍या आठवणी आल्या

  12. सहज सुंदर शब्दचित्र ऊतरलं आहे. सह्याद्रीचा कातळाचा देश! महाराष्ट्र देश! आणि माझी जमीन…माझा गाव! असे सगळे तरंग जाणवतात. रसपूर्ण लेखन राणी. अभिनंदन

  13. राणी दुर्वे यांनी महाराष्र्ट देशा या आपल्या लेखाद्वारे त्यांचे मुळ गावः पाली, जिल्हाः रायगड याचे तसेच गावाच्या आजुबाजुचा परिसराचे यथार्थ वर्णन केले आहे. लेख वाचत असतांना तो परिसर आपल्या नजरेसमोर चित्ररुप घेऊन उभा ठाकतो. लेख अत्यंत वाचनीय झाला आहे. विशेषत्वाने त्यांची साधी, सोपी, सरळ लेखनशैली आपल्याला एका नव्या अनुभुतीचा आनंद देते. त्यांनी अशा तर्‍हेचे लिखाण सातत्याने करावे ही विनंती.

  14. आपण सरसगडचे वर्णन छान केले आहेत. आपल्या महाराष्ट्रातील सरकारने येथील निसर्गाची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे. उन्हेरे गरम पाण्याचे कुंड जवळचे डोंगर खोदायला सुरुवात झाली होती, तो संपला आहे, काही दिवसात हे राजकारणी पालीचा किल्ला पण खोदून टाकतील. दोन नद्या मधील क्षेत्र बंगल्या साठी विकले गेले, नद्यांचे पाणी प्रदूषित केले आहे. सुधागड तालुक्यातील निसर्गावर होणारा अत्याचार थांबला पाहिजे. माझी विनंती आहे त्यावर लिहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here