मुरूड : वंदनीय विद्यार्थ्यांचे विद्यालय

8
441

शाळेतील शिक्षक वंदनीय असतात; पण एखाद्या शाळेतील विद्यार्थीही वंदनीय असतात हे वाचून कोणालाही अचंबा वाटेल. अशी शाळा आहे दापोली तालुक्यातील ‘मुरूड’ या गावातील. सन 1834 मधील ती शाळा एकशेनव्वद वर्षे झाली तरी त्याच इमारतीत भरते. संपूर्ण काळवत्री दगडातील बांधकामाची ती वास्तू इतकी वर्षे ठामपणे उभी आहे. एकही दगड हललेला नाही की वासा बदललेला नाही. जुन्या पद्धतीच्या काही खुर्च्या अजूनही आहेत. कालानुरूप रंगरंगोटी आणि प्लास्टर एवढाच काय तो बदल !

शाळेच्या स्थापनेपासून तिला अनेक सेवाभावी शिक्षक लाभले. त्यामुळे थोड्याच दिवसांत ‘त्या शाळेत उत्तम शिक्षण मिळते’ असा लौकिक सर्वत्र पसरला. आजूबाजूच्या गावांतील मुलगे शाळेत येऊ लागले. सुरुवातीला ‘मुलगे’च शिक्षण घेत होते.

शाळेत शिकलेल्यांपैकी एका वंदनीय विद्यार्थ्याचे नाव आहे ‘धोंडो केशव कर्वे’. त्यांनी केलेले स्त्री-शिक्षणाचे, स्त्री-उद्धाराचे कार्य सर्वश्रुत आहे. त्यांना त्या शाळेत घातल्याची, तसेच त्यांचे नाव कमी केल्याची नोंद शाळेच्या दप्तरी पाहण्यास मिळते.

शाळेतील दुसरे वंदनीय विद्यार्थी आहेत रँग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे. त्यांची रँग्लर परांजपे म्हणून ओळख आहे. त्याच शाळेत पहिले धडे गिरवणारे रघुनाथराव मुंबई विद्यापीठाच्या बी एससी परीक्षेत पहिले आले. त्यांनी इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात ‘मॅथेमॅटिकल ट्रायपॉस’ परीक्षेत सर्वप्रथम येऊन ‘सिनियर रँग्लर’ हा बहुमान 1896 मध्ये मिळवला. ते असा मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय/भारतीय ठरले. ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक आणि नंतर प्राचार्यही 1902 मध्ये झाले. ते मुंबई इलाख्याचे कायदेमंडळाचे सदस्य असताना, त्यांच्याकडे शिक्षण खाते होते. ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी भारताचे पहिले उच्चायुक्त म्हणून ऑस्ट्रेलियात कामगिरी बजावली. त्यांना ब्रिटिश सरकारने ‘केसर-ए-हिंद’ हा किताब बहाल केला.

ज्योतिष विशारद शंकर बाळकृष्ण दीक्षित हे या शाळेतील आणखी एक वंदनीय विद्यार्थी. त्यांना केवळ पंचेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभले. घरची गरिबी आणि प्रकृती तोळामासा. तरीही ते शिकत राहिले- गणित, ज्योतिष, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच यांचे ज्ञान घेत राहिले. त्यांनी गणित आणि ज्योतिष या विषयांवरील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी नऊ पुस्तके प्रसिद्ध केली. त्यांतील भारतीय ज्योतिषशास्त्र, ज्योतिर्विलास आणि हिंदू पंचांग ही पुस्तके फार प्रसिद्धी पावली. त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांत दिलेल्या दिवशी इंग्रजी तारीख कोणती होती हे नक्की ठरवण्याचे महत्त्वाचे सूत्र शोधून काढले. त्यांचा ‘भारतीय ज्योतिषशास्त्र’ हा ग्रंथ तितकाच उपयुक्त ठरत आहे. त्यांच्या ग्रंथांची भाषांतरे झाली आहेत.

एक वक्तशीर व्यक्तिमत्त्व म्हणून लौकिक मिळवणारे विश्वनाथ नारायण ऊर्फ रावसाहेब मंडलिक हेही याच शाळेचे एक वंदनीय विद्यार्थी. त्यांच्या येण्या-जाण्यावरून लोक त्यांची घड्याळे लावून घेत, एवढे ते वक्तशीर. एकदा वेळेपूर्वीच बोट सुटून गेली, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून देऊन स्वतःसाठी खास दुसरी बोट सोडण्यास लावणारे रावसाहेब; एवढी त्यांची ओळख म्हणजे केवळ एक झलक आहे. ते येथील शाळेतील शिक्षणानंतर पुढे कॉलेजमधील परीक्षांच्या नऊ विषयांपैकी आठ विषयांत पहिले आले. नोकऱ्या करत आणि सोडत वकील झाले, ते आयुष्यभर. त्यांनी ‘नेटिव्ह ओपिनियन’ नावाचे वर्तमानपत्र चालवले. त्यांनी ‘सिंधी भाषेचे व्याकरणकार’ म्हणून लौकिक मिळवला. त्यांनी हिंदू धर्मशास्त्रावर महत्त्वपूर्ण काम केले. ‘मनुस्मृती’ ग्रंथाची संशोधित आवृत्ती अनेक महत्त्वपूर्ण टिपा देऊन प्रसिद्ध केली. रावसाहेबांच्या नावाची नोंद शाळेच्या दप्तरी आहे.

‘बाळबोध व्याकरण’ या पुस्तकामुळे मोठी प्रसिद्धी लाभलेले रा.भि. जोशी मुरूडच्या या शाळेत पहिल्या दोन इयत्ता शिकले. त्यांचा मराठी भाषेचा दांडगा व्यासंग होता. मराठी भाषेची घटना, प्रौढबोध व्याकरण, शब्दसिद्धी हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारण अशा सुधारणांचा स्वतःच्या कृतीने आणि लेखनाने पुरस्कार केला. त्यांनी त्यांच्या बहिणीचा पुनर्विवाह स्वतःच्या जबाबदारीवर पार पाडला. त्यासाठी गावाने त्यांच्यावर बहिष्कार घातला तरी ते डगमगले नाहीत. त्यांचा त्यांच्या वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी मृत्यू झाला.

मुरूडमध्ये वैद्यराजांची एक परंपराच होऊन गेली. त्या परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे ‘वैद्यराज आत्माराम वामन दातार’. त्यांनी मुरुडच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्याच गावात पारंपरिक वैद्यकीय शिक्षण घेतले. पुढे, त्यांनी अहमदनगरला ‘आयुर्वेद तीर्थ’ पदवी संपादन केली. ते ‘आयुर्वेदाचार्य’ 1938 मध्ये झाले. ‘पंचभौतिक चिकित्सा’ हा त्यांचा महत्त्वपूर्ण असा संशोधित ग्रंथ आहे. आयुर्वेदातील सर्व ग्रंथ त्रिदोष पद्धतीवर लिहिलेले आहेत. मग ही ‘पंचभौतिक चिकित्सा’ काय आहे, त्या बाबतचा उलगडा त्यांनी ग्रंथात साधार केला आहे. त्याशिवाय त्यांची ‘आयुर्वेदांतर्गत हृद्रोग’, ‘वनस्पतींचे स्वभाव- अर्थात औषधी गुणधर्मशास्त्र’ अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. शिवाय, त्यांनी तीसेक संशोधित निबंध वाचले. त्यांचे शिष्य सांगली-मिरज भागात आहेत. त्यांच्या नावे सांगली येथे पंचभौतिक चिकित्सा केंद्र कार्यरत आहे.

अशा या वंदनीय विद्यार्थ्यांच्या नंतरही स्वकर्तृत्वाने नामवंत झालेल्या आणखी काही विद्यार्थ्यांनी या शाळेत पहिले धडे गिरवले.

श्रेष्ठ कादंबरीकार श्री.ना. पेंडसे यांचे आजोळ येथेच होते. ते काही काळ येथे वास्तव्याला होते. त्यांच्या ‘गारंबीचा बापू’ कादंबरीतील गारंबीचा परिसर याच परिसरातील. ‘हद्दपार’ कादंबरीतील ‘दुर्गेश्वर’ म्हणजे मुरूडच. त्यांनी ‘गारंबीचा बापू’ नाटकाचा पहिला प्रयोग मुरूड हायस्कूलच्या मदतीसाठी केला. ते पुढे मुंबईत राहत असले तरी मुरूडशी त्यांचा संबंध कायम होता. वर्षातून त्यांच्या एकदोन खेपा मुरुडला होत असत. त्यांनी महर्षी अण्णासाहेब कर्वे जन्मशताब्दी सोहळ्यात कार्यवाह म्हणून काम केले होते. ‘पेंडसे यांच्या कादंबऱ्यांतील परिसर पाहण्याचा’ एक कार्यक्रम 1982 साली आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अनेक साहित्यिकांसह त्यांच्या मुरूडच्या शाळेला भेट दिली होती.

मुरुडच्या शाळेतील दुसरे एक विद्यार्थी ‘स्वरबहार’ विश्वनाथ बागूल. त्यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने संगीतक्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. त्यांना मराठी शाळेत शिक्षणाबरोबर गावातील भजन-कीर्तनांनी गायनाची गोडी लागली. त्यांना पंडीत राम मराठे यांचे शिष्यत्व लाभले. त्यांनी मराठे यांच्याबरोबर नाटकांचे दौरे केले.

एकदा पं. राम मराठे आजारी असताना, त्यांचे नाटकातील काम बागूल यांनी केले. ते गाजले. तेव्हापासून त्यांना नाटकात प्रमुख भूमिका मिळू लागल्या. ‘सुवर्णतुला’, ‘प्रीतिसंगम’, ‘संगीत स्वयंवर’ अशा नाटकांत केलेल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. कीर्ती शिलेदार आणि विश्वनाथ बागूल ही संगीत नाटकातील जोडी गाजली. ‘स्वरसम्राज्ञी’ नाटकाने बागूल यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. आचार्य अत्रे यांच्या ‘प्रीतिसंगम’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला स्वत: अत्रे उपस्थित होते. बागूल यांचे गाणे ऐकून अत्रे उद्गारले, “अरे, हा तर स्वरबहारच !” तेव्हापासून बागूल यांना ‘स्वरबहार’ ही उपाधी लागली.

मुरुडची शाळा 10 ऑगस्ट 1834 रोजी स्थापन झाली. शाळेत 1842 पासूनचे बरेचसे रेकॉर्ड उपलब्ध आहे. त्यानुसार शाळेचा पहिला विद्यार्थी ‘विनू दातार’ हा आहे. त्यावेळी वडिलांचे नाव लिहीत नसावेत. एवढेच नव्हे, तर नोंद घरगुती नावानेच होत असे. (उदाहरणार्थ, जग्या आचवल) 1844 पासून संपूर्ण नाव, तर 1879 पासून जन्मतारखाही नोंद करू लागले. फक्त ब्राम्हण आणि सोनार विद्यार्थी 1834 ते 1845 सालापर्यंत दाखल झालेले दिसतात. भंडारी, मराठा 1845 पासून तर मुस्लिम विद्यार्थी 1841 पासून दाखल झाले. बहिणा केळकर नावाची पहिली मुलगी 1865 मध्ये दाखल झाली.

शाळेतील इयत्ता पाचवीपासूनचे वर्ग माध्यमिक विद्यालयाला 1973 पासून जोडले गेल्याने ती शाळा इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी अशा चार वर्गांची राहिली आहे.

– विनायक नारायण बाळ 9423296082 vinayak.bal62@gmail.com
———————————————————————————————

About Post Author

8 COMMENTS

 1. खूपच छान, अभिमानास्पद माहिती. या मुरुडच्या शाळेतले पहिले विद्यार्थी विनू दातार यांची अधिक माहिती उपलब्ध आहे का? यांच्या पुढच्या पिढ्या कुठे आहेत? मी याच घराण्यातली, म्हणून कुतूहल. मुरुडला महर्षी कर्वे यांचा शंभरावा वाढदिवस साजरा झाला, तेव्हा मी तिथे होते.

 2. माहितीपूर्ण लेख . पाच भौतिक चिकीत्सा या ग्रंथाचे लेखक आयुर्वेदाचार्य आत्माराम वामन दातार असे मला स्मरते. मुरूडच्या शाळेतील विद्यार्थी आत्माराम वासुदेव की आत्माराम वामन दातार?

 3. दोन आठवड्यापूर्वी मी पहिल्यांदाच दापोली आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर पाहून आलो. वाटेत मुरुड गावाची पाटी पण वाचली.हा लेख आधी वाचला असता तर या प्रसिद्ध महान व्यक्तिच्या स्थळांना भेट देता आली असती. अप्रतिम माहिती या लेखातून मिळाल्याने खूप आनंद झाला.

 4. खूप सुन्दर माहिती बाळसर..अधिक लेखनाची अपेक्षा आहे…नीला उपाध्ये

 5. फारच सुरेख
  स्तवनीय शाळा
  खरे पाहाता “ चेंबूर हायस्कूल “ ला अेवढा इतिहास नसेल
  पण बरेच निष्णात विद्यार्थी आहेत
  तसेच “ किंग्ज जोर्ज “ शाळेला १०० वर्ष झाली.

 6. सुनिल दातार (स्वरबहार विश्वनाथ बागुलांचे शिष्य)

  अत्यंत सुंदर संकल्पना आणि शिर्षकही खास अभिनंदन विनायक बाळगुरुजी(सर) म्हणून आपणासही वंदन ! याच शाळेने घडविलेला विद्यार्थी पुज्य महर्षी कर्वे सारखे भारतरत्न भारताला दिले तसेच वैद्यकिय क्षेत्रात बुद्धिचातुर्याने अद्भूत कामगिरी आयुर्वेदात करुन आयुर्वेदाचार्य किताब पंचभौतिक चिकित्सा सुरु करुन मिळविला ते पुज्य आत्माराम वासुदेव दातार हेही याच शाळेचे विद्यार्थी आडव दातार असल्याने नामोल्लेखाचा मोह आवरता आला नाही कारण सर्वच त्रिवार वंदनीय असेच आहेत आणि माझ्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे माझे पुज्य गुरुवर्य ज्यांनी आपल्या सौंदर्य, उत्तम गायन व तितकाच सुंदर अभिनय या त्रिवेणी संगमाच्या आधारावर संगीत रंगभूमीवर बहार उडवून दिली गाजवली ते स्वरबहार विश्वनाथ बागुल याच शाळेचे विद्यार्थी आणि संकल्पना ज्यांची तेसुद्धा वंदनीय शिक्षक बनले ते बाळगुरुजी याच शाळेचे विद्यार्थी असणार ! सर्वांनाच- त्रिवार वंदन !

 7. शाळांची चरित्रे मजेदार संदर्भ शृंखला होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here