मोराणे सांडस : काय कमावले, काय गमावले ! (Morane Sandas- Village in change)

0
266

मोराणे सांडस हे माझे आजोळ; म्हणजे मामाचे गाव. ते नाशिक जिल्ह्याच्या सटाणा (बागलाण) या तालुक्यात आहे. मोराणे हे फड बागायती असणारे संपन्न गाव होते. आम्ही मामाच्या गावाला बैलगाडीने वर्षातून दोनदा जात असू. चौगावपासून पुढे हिंगणे, नागझिरी, पिंपरखेड, गाळणे व विराणे पोहाणे गावापर्यंत जंगलच असायचे. वडेल, वळवाडी, अंबासण ते मोराणे येथपर्यंतच्या रस्त्यावर निळ्याशार तुऱ्यांचा ऊस डोलताना दिसे. तसे हिरवेगार शिवार पाहण्यासाठी माझे डोळे आसुसलेले असायचे. आमची घरची गरिबी होती पण मामाची आम्हाला खूप साथ होती. आम्हा भावंडांना कधी एकदा मामाच्या गावाला जाण्यास मिळते असे होई. मामा-मामी आमचे लाड करत. आम्हाला आठ दिवस रोज कोणाच्या ना कोणाच्या घरी गोडधोड जेवण असे. सख्खे, चुलत, प्रेमाचे शेजारी असे सर्व जण आपुलकीने वागत.

मोराण्याचे दशरथ मामा मला सातवीपुढील शिक्षणासाठी मोराण्यालाच घेऊन गेले. ती गोष्ट 1967ची. माझे नाव मोराण्यापासून दोनतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नामपूर येथील हायस्कूलमध्ये टाकण्यात आले. मी अकरावीपर्यंत त्या शाळेत शिकलो. मोराणेहून पायी ये जा करत असे. पुढे, मी कॉलेजसाठी धुळ्याला गेलो, तरी सुट्टीमध्ये मोराण्याला थांबत असे, कारण माझे शिक्षण मामाच करत होता. माझे लग्नही मामाची मुलगी- अलकाशी झाले. त्यामुळे मोराणे गावाशी माझा संबंध कायम राहिला. त्या गावाने मला घडवले आहे.

मोराणे सांडस हे टुमदार खेडे मोसम नदीच्या तीरावर वसलेले आहे. ते सटाणा या तालुक्याच्या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. अंबासण, काकडगाव, सारदे, नामपूर, बिजोरसे ही मोराणेपासून जवळची गावे. त्या गावची लोकसंख्या अकराशेच्या जवळपास आहे. गावात माळी आणि मराठा यांची खूप मोठाली धाब्याची घरे होती तर इतरांच्या झोपड्याच होत्या. शंकर संपत बच्छाव (शंकर आप्पा), दादाजी गणपत शेवाळे, शंकर गरबड भदाणे (शंकर जिभाऊ), पांडुरंग लक्ष्मण शेवाळे, बाबूराव भिला वाघ, देवराव माधवराव राजपूत यांची घरे गावात सगळ्यात मोठी होती आणि त्यांना मानही गावात होता. त्या खालोखाल भिल्ल, राजपूत आणि भोई समाजाची घरे आहेत. गावाच्या मध्यवर्ती भागात मराठा, माळी, भोई राजपूत समाजाची घरे आहेत तर भिल्ल समाजासह इतरांची घरे गावाला लागून परिघावर आहेत. एक बन्शी मांगाचे घर, एक भिला बापू या पारधीचे घर, एक वसंत वाणीचे किराणा दुकान, एक घर पांडू मिस्तरीचे, एक घर भगवानदास बैरागीचे (बुवा दादा) असे वर्णन केले जाई. आमच्या गल्लीत जिरे माळी समाजाची काही घरे होती. धाब्याची चारपाच घरे सोडली तर बाकीच्या झोपड्या होत्या. गल्लीच्या टोकाला शेवटी महादेव मंदिराजवळ सय्यद नूरदादा आणि दादामियाँ हे दोन मुसलमान भाऊ राहत असत.

गावात मंदिरे दोनच होती. एक महादेवाचे तर दुसरे मारूतीचे. गावदेवता भवानी मातेचे मंदिर गावाच्या बाहेर, खळवाडीच्याही पलीकडे नदीच्या काठावर होते. गावकरी शेतकऱ्यांची खळी गावाभोवती होती.

शंकर आप्पाने गावात दगड आणि चुना यांचा वापर करून पहिले घर बांधले. चुना मळण्याचा घाणा महादेवाच्या पाराजवळ होता. वर्तुळाकार खोल घाण्यात वजनदार दगडी चाक फिरवले जाई. बैलाचा उपयोग करून दगडी चाकाने चुना मळला जात असे. पूर्वीच्या दगडी इमारती चुन्यात बांधलेल्या असत. धाब्याचेच पण कडीपाटाचे घर जास्त चांगले समजले जाई. खेड्यातील घरे ही धाब्याचीच असत. कडीपाटाऐवजी (सागवानी लाकडाच्या फळ्या) किलचन अंथरून त्यावर मातीच्या चिखलाचा थर दिला जाई. पावसाळ्यात धाबे गळू नये म्हणून खारीचा (चिकट माती) थर अंथरला जाई. एकवेळ सिमेंट काँक्रिटचा स्लॅब गळेल पण खारी पाणी गळू देत नसे. खेड्यातील घरे भिंतीला भिंत लागून असत. घरात प्रकाश येण्यासाठी धाब्याला (छताला) दोनतीन ठिकाणी मोकळी जागा सोडलेली असे. त्याला साणे म्हणत. ते प्रसंगानुसार उघडता व बंद करता यायचे.

एक कल्हईवाला वर्षातून एकदोनदा चांदवडहून गावात येई. तो तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई करायचा. स्टेनलेस स्टीलचा अवतार तेव्हा झाला नव्हता. घरातील भांडी ही मातीची व जर्मेल (अॅल्युमिनियम), पितळ, तांबे आणि काशाच्या धातूंची (कास्य) असत. जेवणाचे ताट, ताटल्या, गिरम्या या काशाच्या असत. एक ओतारू (समाज) वर्षातील काही दिवस गावी येऊन राही. त्याचा पाल बुवा दादाच्या घरासमोरील पिंपळाच्या झाडाखाली मांडलेला असे. तो बैलाच्या गळ्यातील घुंगरे, घंटा, मूर्ती बनवून देत असे. लुल्ले गरबड या गावची भराडी आणि वडार समाजातील काही माणसे त्यांच्या म्हशी घेऊन मोराणेला येऊन काही महिने राहत असत. त्यांची पाले नदीच्या काठी आमच्या घराच्या मागील दारी असत. ऊसाच्या सीझनमध्ये तेथे ऊसाच्या बांड्या भरपूर मिळत. ते लोक त्या बांड्यांच्या आशेने आलेले असत.

लग्नसमारंभाला सगळे गाव एक व्हायचे. प्रत्येकाच्या घरी जेवणाचे आमंत्रण असायचे. ते आमंत्रण द्यायचे काम अंबासणहून येणारा धर्मा न्हावी करे. धर्मा न्हावी हा सर्व गावाचा गवाहीचा (बलुतेदारी पद्धतीत धान्य दिले जाईल.) न्हावी होता. तो बोलण्यात चतुर आणि  हजरजबाबी होता. गावात कारणापासून (देवाचा नवस)  लग्न समारंभापर्यंत काहीही कार्य असले तरी संपूर्ण स्वयंपाक धर्मा न्हाव्याच्या देखरेखीखाली होई. त्याच्या स्वयंपाकाची ख्याती होती. त्याला दूरदूरच्या गावात राहणारे गावातील लोकांचे नातेवाईकही ओळखत. गावात एकी होती तसेच भाऊबंदकीही होती. सर्व जाती-धर्मातील माणसे मानलेल्या नात्याने एकमेकांशी बांधलेली होती. ती सख्ख्या नात्याइतकाच आदर ठेवून एकमेकांशी वागत. जातीयता तेव्हाही होती पण जातिभेद व जातीजातींत कटुता नव्हती. जातीवरून कोणालाही कमी लेखले जात नव्हते.

मोसम नदी पूर्वी बाराही महिने वाहती असे.

गावाजवळची मोसम नदी बाराही महिने वाहती असे. खळखळ करून वाहणारे त्या नदीचे पाणी स्वच्छ आणि शुद्ध होते. तेच पाणी मोराणेची माणसे पिण्यासाठी वापरत. मी नदीच्या धारेत हंडा भरून तो हंडा डोक्यावर धरून आणत असे व माथणी (लहान माठ-रांजण) भरून ठेवत असे. गावातील भोई आणि भिल्ल मोसम नदीच्या पाण्यात मासे धरत. वाहत्या गोड्या पाण्यातील मासे चवीला उत्कृष्ट असत. उन्हाळ्यात भोई लोक नदीच्या वाळूत डांगर, टरबूज आणि काकडीची वाडी लावत. माझा शाळामित्र मोहन भोई याचीही तशी वाडी होती. वाडी म्हणजे त्या लोकांची शेतीच होती. वर्षातून एक दोनदा त्याच्या वाडीवर जाऊन मनसोक्तपणे डांगर, टरबूज व लांब आकाराची काकडी खाण्यास मिळत.

मोसम नदी ही बागलाण तालुक्यातील साल्हेर, मुल्हेर येथील मांगी तुंगीच्या डोंगरावर उगम पावते. बागलाण आणि मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन मालेगाव जवळील खंडोबाच्या चंदनपुरी येथे गिरणा नदीला मिळते. साठ-पासष्ट किलोमीटर लांबीच्या त्या नदीवर मुल्हेर येथील उगमापासून ते मालेगावपर्यंत ब्रिटिशकालीन अठरा बंधारे आहेत. त्या बंधाऱ्यांत पाणी अडवून ते पाटांद्वारे शेतीला पुरवले जात असे. बारमाही पाण्यामुळे तेथे फड बागायती शेती विकसित झाली. फड बागायती क्षेत्रामुळे संपूर्ण मोसम खोरे भरभराटीस आले होते. बागलाण तालुका हा केवळ नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अग्रगण्य समृद्ध तालुका म्हणून ओळखला जाई. मोसम खोरे आणि गिरणा खोरे यांच्यामुळे बागलाण तालुका समृद्ध होता. त्या दोन्ही नद्यांचा उगम एकाच डोंगरावर आहे. मात्र त्यांचा प्रवाह उगमापासून वेगळा होतो आणि ते दोन्ही प्रवाह शेवटी चंदनपुरीत एकत्र येतात. गिरणा ही मोसमपेक्षा मोठी नदी आहे. म्हणून माझी माय रूपामाय ही तिच्या अहिराणी भाषेतील ओवीत म्हणायची… गिरणार कशी म्हणे / मोसम मनी भाची / इसना मेळ / चंदनपुरी पाशी. माहेरचे कूळ एकच असणाऱ्या आत्या व भाची यांचे नाते नद्यांना लावलेले आहे !

महादेव मंदिर

मोराण्याच्या शिवाराला पाणीपुरवठा करण्यासाठी गावाच्या वरच्या बाजूला, भवानी मंदिराच्या पलीकडे नदीवर ब्रिटिशकालीन बंधारा आहे. त्या बंधाऱ्याचे पाणी वाण्याचा डेरा, बाग, रोटी, वाफा, सातपाटी या फड क्षेत्रांना पुरवले जाई. गावकरी एकत्र येऊन कोणत्या फडात कोणते पीक घ्यावे हे ठरवत असत. शेतकऱ्यांवर बंधन एका फड क्षेत्रात एकच पीक घेण्याचे असे. पाणी मुबलक असल्याने जिकडे तिकडे ऊसच ऊस दिसे. शेतकऱ्याला स्वत:ला ऊसाला पाणी भरण्यास जाण्याची गरज नसे. फडाला पाणी भरण्यासाठी पंचायतीमार्फत पाटकरी, साळोणे नेमलेले असत. पांडू भैय्या हा माझ्या नात्यातील पाटकरी दुसऱ्या गावाहून मोराण्याला येऊन राहिला होता. नामपूरपासून ते अंबासणपर्यंत असे बरेच फड होते. इंग्रज सरकार शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करत असे. मोराणे हे सत्तर फडांची पाणीपट्टी वसूल करण्याचे केंद्र होते. सटाणा तालुक्यात आराई आणि मोराणे सांडस ही दोन केंद्रे वसुली जमा करण्याची होती. एक अधिकारी मोराणे येथे जमा झालेली पाणीपट्टी घेऊन मोराणे गावाहून सटाणा येथे जात असे. तो अधिकारी सटाण्याला जाण्यासाठी सांडणीचा (उंटाची मादी) वापर करत असे. सांडणीवर बसून सांडणीस्वार सटाण्याला जात असे म्हणून या गावचे नाव मोराणे सांडस असे पडले असे सांगतात.

गावापासून काही फर्लांगांवर एक ओढा होता. त्याला लोंढा हेच नाव आहे. लोंढ्याच्या दोन्ही बाजूंला फड बागायती असल्याने शेतातून झिरपलेले पाणी लोंढ्यात जाई. पाटाचे जादा झालेले पाणीही त्या लोंढ्यात सोडले जाई. त्यामुळे लोंढ्याचे पाणी कायम जिवंत राहत असे. तो लोंढा मोसम नदीला अंबासणच्या बंधाऱ्याजवळ मिळत असे. मामांकडे कामाला असणारा भिल्लाचा अनाजी माझ्यापेक्षा थोडा मोठा असेल. दुपारची वेळ ही विश्रांतीची वेळ असे. अना तेव्हा लोंढ्यात खेकडी धरत असे. आम्ही शेतातच जाळ करून, खेकडी भाजून खात असू. शिंदीची झाडे लोंढ्याच्या दोन्ही बाजूंला विपुल प्रमाणात होती. शिंदीची झाडे नारळाच्या झाडासारखी दिसतात. ती हिरव्यागार शिवाराच्या सौंदर्यात अधिक भर घालत. उंच डेरेदार आंब्याच्या झाडांची आंबराई उठून दिसत असे. शिंदीची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे निरा, गोड ताडी, आंबट ताडी भरपूर मिळे. मामांच्या मळ्याला लागून लोंढ्याच्या दोन्ही काठांवर शिंदीची दोन-तीनशे झाडे तजेलदार होती. आंध्र प्रदेशातील भंडारी लोक ताडी काढण्याचे काम करत. त्यांना वर्षभरासाठी ठेका दिला जाई. शिंदीच्या झाडाच्या कंठाजवळ खाच पाडून मातीच्या भांड्यात (गोबे) ताडी जमा करण्याची कला भंडारी लोकांनाच अवगत होती.

घरचेच ताडीबन असल्याने मला सकाळी सूर्योदयापूर्वी निरा भरपूर पिण्यास मिळत असे. निरा ही नारळाच्या पाण्यापेक्षाही गोड असते. निरा शरीरातील उष्णता घालवण्यासाठी उपयोगी असते. निरेसाठी तजेलदार झाड निवडून त्याला विशिष्ट प्रकारे तास करावा लागतो. गोबे (ताडी जमा करण्याचे मडके) चांगले धुतलेले असेल तर रात्रीतून जमा झालेली ताडी सूर्योदयाच्या आधी प्याली तर ती थोडी आंबटगोड लागते. जसजसे उन वाढत जाई, तसतशी ताडी आंबट होत जाई. लोक दारूसारखी नशा येण्यासाठी आंबट ताडी प्यायचे. पण ताडीची नशा अर्धा तासही टिकत नाही. ताडी पिणे हे वाईट समजले जात नसे. घरी पै पाहुणा आलेला असला तर मी सकाळच्या अंधारात जाऊन बादलीभर गोड ताडी घेऊन येत असे. बायामाणसेही तशी गोड ताडी पित. सकाळी ताडीबनात जाऊन निरा किंवा गोड ताडी पिणे, शाळेत जाण्याआधी एक दोन ऊस दाताने सोलून, चावून त्याचा रस प्राशन करणे हा माझा नित्य नेम होता. शिंदीच्या झाडाला येणाऱ्या फळांना शिंदोळे म्हणतात. शिंदोळ्याचे बी खजुराच्या बी सारखे असते. मात्र फळात गर कमी व बी मोठे असते. फळाला आंबट, गोड, तुरट अशी चव असते. ती फळे पिकून पावसाळ्यात लाल होतात. लांब चंबोलीच्या काठीच्या आकडीने घड गदागदा हलवला तर पिकलेले शिंदोळे बदाबदा खाली पडत. मी शिंदोळे भरपूर खाऊन पिशवीभर शिंदोळे घरी घेऊन जात असे.

मालेगाव तालुक्यातील लालचंद हिराचंद यांचा रावळगाव साखर कारखाना हा एकच जवळचा सोयीचा कारखाना होता. ऊसतोड करणारे कामगार बाहेरगावांहून येत. त्यांचा मुक्काम चार-सहा महिने मामाच्या मळ्याजवळ असे. ऊसतोडणीसाठी लवकर नंबर लागत नसे. म्हणून काही शेतकरी ऊसापासून गूळ तयार करत. नदीच्या पल्याड काकडगावच्या अनाजी पाटीलची क्रेशर (करसड) होती. तेथे मशीनच्या मदतीने ऊसाचा रस काढला जाई. दोन मोठमोठे चुल्हांगन होते. मोठ्या कढईत रस तापवून त्यापासून गूळ तयार केला जाई. ऊसाचा रस काढण्यापासून ते गूळाच्या भेल्या तयार होईपर्यंतची सर्व प्रात्यक्षिके मला पाहण्यास मिळत. गूळाची काकवी घरात एका मातीच्या घागरीत वर्षभर भरून ठेवलेली असे. शेवटी शेवटी घागरीच्या तळाशी काकवीचे रूपांतर खडी साखरेत होऊन जाई. काहीजण ऊसाचा गरम रस आणि गव्हाच्या पिठापासून बर्फी सारख्या पाटोड्या तयार करून ठेवत. बाजरीच्या भाकरीबरोबर काकवी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा तिळीचे तिखं खाण्यात मजा वाटे. काहींच्या घरात गूळाच्या भेल्या असत. त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांना खापराच्या पुरणपोळीचे जेवण हमखास मिळत असे. घरचाच गूळ, डाळ, आंबे असल्याने सिझनमध्ये कितीतरी वेळा आंबरस व पुरणपोळीचे जेवण मिळायचे.

मोराणे हे छोटेसे गाव. शिवाय मुख्य रस्त्यापासून थोडे बाजूला आहे. तेथे सर्व सोयीसुविधांचा अभाव होता. गावात वीज 1981पर्यंत आलेली नव्हती. गावात कोणतीही एस टी येत नव्हती. गावात पानटपरी काय पण चहाचे हॉटेलसुद्धा नव्हते. बागायती शेतीमुळे गाव समृद्ध होते व शेतमजुरही सुखी होते. भजन-कीर्तनाची गावाला सवय नव्हती. पांढरे शुभ्र धोतर व टोपी आणि सदऱ्यात वावरणारी माणसे काहीशी रंगेल स्वभावाची होती. काही जुन्या माणसांच्या डोक्यावर काळी कडक टोपी दिसायची. गावात वर्षातून एकदा तमाशा होतो. चैत्र पोर्णिमेला भवानी देवीची जत्रा भरते. जत्रा म्हणजे काय तर हलवायाचे एक दुकान येते, बस ! पण जत्रेनिमित्ताने कुस्त्या व रात्री तमाशा होई. मोराणेकरांसाठी तेव्हा करमणुकीचे साधन म्हणजे नामपूरला जाऊन सिनेमा पाहणे. नामपूरला ओपन थिएटर होते. नामपूरची जत्रा हेही मोराणेकरांचे आकर्षण असे. सोमवारी नामपूरचा बाजार भरतो. तो बाजार नामपूर परिसरातील तीस-चाळीस खेड्यांसाठी महत्त्वाचा असे.

मोसम नदीला महापूर 9 सप्टेंबर 1969 रोजी आला होता. महाराष्ट्रातील सर्व नद्यांना महापूर त्या दिवशी आले होते. तीन दिवस रात्र संततधार सुरू होती. मी तेवढा मोठा महापूर कधी पाहिला नाही. अंबासणचा बंधारा मोराणेच्या खाली एक किलोमीटरवर आहे. तो बंधारा 1944 च्या महापूरात फुटला होता. तो बंधारा चांगला राहिला असता तर 1969 च्या महापुरात पूराचे पाणी अडवले गेले असते व फुगवट्यामुळे मोराण्याला पूराचा वेढा पडून मोराणे गाव पाण्यात बुडाले असते आणि आणखी काय काय घडले असते त्याची कल्पनाही न करणे बरे.

काळ बदलला तसे मोराणे गावही बदलत गेले. नामपूरला जाण्यासाठी मोसम नदीवर पूल बांधला गेला आहे. गावाला ग्रामपंचायत आहे. गावाच्या विकासात सर्वात जास्त भर टाकली ती गावचे सरपंच बाळासाहेब भदाणे (बाळू आण्णा) यांनी. त्यांच्यातील धडाडी व समाजसेवेची आवड यांमुळे गावालाही एक चांगले वळण लागले. गावाला नळपाणी योजना आहे. बंदिस्त गटारे असून रस्तेही टकाटक झाले आहेत. बाळू आण्णा तरुण वयातच देवाधर्माकडे वळले. दशरथमामानेही वारकरी संप्रदाय स्वीकारला होता. धुळ्याजवळील अवधानचे बाबा, अंबासणचे कीर्तनकार काशीनाथबुवा यांनी मोराणेकरांवर धार्मिकतेचे संस्कार केले. जायखेड्याचे कृष्णाजी माऊली हे तेव्हा संत पदाला पोचलेले थोर देवभक्त. त्यांचा शिष्यपरिवार सर्व महाराष्ट्रात आहे. त्यांचा नारळाच्या कार्यक्रमाचा बहुमान पहिल्यांदा मोराण्याला मिळाला तो 2 जानेवारी 1987 या दिवशी. मोराण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम झाला असेल ! त्यानंतर दरवर्षी 2 जानेवारीला मोराणेला धार्मिक कार्यक्रम आयोजित केले गेले.

गावातील जुनी घरे

गावासभोवतालची खळी जाऊन तेथे काहींची घरे उभी राहिली आहेत. झोपड्या जाऊन धाब्याची घरे झाली आहेत. ज्यांची धाब्याची घरे होती त्याची सिमेंट काँक्रिटची घरे झाली आहेत. मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. शाळा मात्र पूर्वी चौथीपर्यंत होती व आजही चौथीपर्यंतच आहे ! इमारत कौलारू होती व आजही कौलारूच आहे. मोराण्याची बरीच मुले इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत जाऊ लागली आहेत.

सैदनूरदादा ग्रामपंचायतीची कोतवाली करायचा. सैदनूरदादा आणि गुलशनबोय हे जोडपे व त्यांचे कुटुंब गावाशी एकरूप झाले होते. त्यांनी तयार केलेल्या ताबूताच्या मिरवणुकीत नाचण्यास सर्व हिंदू मुले असत. एकदा मालेगावात हिंदू-मुसलमानांत दंगा झाला. मुसलमानांविरूद्ध हिंदूंमध्ये क्षोभ निर्माण झाला. त्याची झळ त्या मुस्लिम कुटुंबाला बसली. मोराणे गावाने त्यांना कसलाही त्रास दिला नाही, पण त्यांनाच असुरक्षित वाटू लागले, त्यांनी गाव सोडून मालेगावचा आसरा घेतला. पण ते सुख-दुःखाला अजूनही मोराण्याला येतात.

नामपूरचे एक उदार व धनाढ्य गृहस्थ नरहरीशेठ आलई यांची शंभर एकर कोरड शेती मोराण्याच्या जवळ होती. मोराणेकरांनी नरहरीशेठ यांना मोराण्याच्या बंधाऱ्यावरून पाणी घेण्याची अनुमती दिली. त्याची परतफेड म्हणून नरहरीशेठ यांनी मोराणे व काकडगाव दरम्यानची पस्तीस एकर पडिक जमीन मोराणे गावठाणला दिली. मोराणेकरांनी त्यातील थोडी जमीन मालेगावच्या गांधी विद्यामंदिर संस्थेला दान दिली. तेथे संस्थेचे सायन्स कॉलेज झाले आहे. मोराणेला लागून असलेल्या नदीपलीकडील नामपूरच्या जागेवर प्रशस्त सरकारी क्रीडा संकुल साकार झाले आहे. ते क्रीडासंकुल ओस पडल्यासारखे वाटते. मोराणेकरांनी उर्वरित जागेवर प्लॉट पाडून मोराणे येथील रहिवाशांना सम प्रमाणात वाटप केले आहे.

धरण मोसम नदीच्या उगमाजवळ हरणबारी येथे झाले आहे. तेथेच पाण्याचा प्रवाह अडवला गेल्यामुळे बारमाही प्रवाहित राहणारी नदी कोरडी पडत गेली. धरणाखालील काही गावांमध्ये काही नवीन बंधारे तयार झाले. नदीकाठच्या लोकांनी काठावर विहिरी खोदल्या. काहींनी नदीच्या वाळूतच खड्डे खोदले. नदीचा जिवंत प्रवाह आटला. ब्रिटिशकालीन बंधारे कोरडे झाले. पाट आटले. फड बागायती शेती योजना मोडकळीस निघाली. मोराणे परिसरात सर्वदूर दिसणारा ऊस व डौलाने डोलणारे ऊसाचे तुरे नामशेष झाले. शेतीला पाणी नाही म्हणून लोंढ्याचे झरेही आटले. शिंदीच्या झाडांना पुरेसे पाणी न मिळाल्याने त्यांच्यापासून निघणारी ताडीही आटली. खरी निरा आता कोणाला पाहण्यासही मिळत नाही. ताडीची काही झाडे शिल्लक आहेत. पण ताडी काढण्याची कला स्थानिक लोकांना अवगत नाही. कष्ट जास्त आणि मिळकत कमी. ऊसच राहिला नाही. मोराण्यासारख्या बागायती गावांची वाटचाल कोरडवाहू गावाकडे होऊ लागली. कालचक्र किती अगाध असते !

मोराण्याची फड बागायती शेती नाहीशी झाली. तेथील लोकांना मोट विहीर नाडाचा टप्पा नीट माहीत झालाच नाही. पाटाचे पाणी बंद झाले तेव्हा ज्याची ऐपत होती त्यांनी शेतात खोलवर विहीरी घेतल्या. विजेवर चालणाऱ्या मोटारी बसवल्या. काहींनी डिझेलवर चालणारे इंजिन बसवले. ऊसाची जागा कांदा आणि मका यांनी घेतली आहे. कधीतरी हरणबारी धरणाचे आवर्तन सुटते. उचल दिल्यासारखे नदीला पाणी येते. पाटाला पाणी आले तर विहिरी भरतात. फड बागायतीची शान या नवीन शेतीला नाही.

मोराणे सांडस या गावात दारूबंदी, कु-हाडबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण गाव परिसर हिरवाईने नटलेला दिसून येतो. या गावाला शासनाच्या तंटामुक्ती पुरस्काराने 2011-12 यावर्षी सन्मानित करण्यात आले आहे. गावात सर्व जाती एकोप्याने राहत असल्याने सन उत्सव आनंदाने साजरे केले जातात.

मोराणे गाव नामपूरवरच अवलंबून आहे. घरोघरी मोटर सायकली आहेत. ट्रॅक्टर व फोर व्हीलर गाड्या आहेत. नामपूरला शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी एस टी दोन वेळा मोराण्याला येते. यांत्रिक शेतीने शेतकऱ्यांचे पारंपरिक जीवन पार बदलून गेले आहे. मोबाईल आणि टीव्ही यांमुळे खेडीही शहराशी स्पर्धा करू पाहत आहेत !

गोविंद बी. मोरे  9588431912 gm24507@gmail.com

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here