वाटूळ हे वारकऱ्यांचे गाव ! पवित्र तो देश, पावन तो गाव | जेथे हरीचे दास जन्मा येती || आषाढी-कार्तिकी पायी वारी. कीर्तनात रममाण होऊन नाचणारे कीर्तनकार आणि कीर्तन ऐकण्यासाठी जमलेले आबालवृद्ध… माझ्या आजी, काकी नऊवारी साडी नेसून, डोक्यावर पदर घेऊन कीर्तनात तल्लीन झालेल्या आठवल्या की जाणवते तोच खरा वाटूळगावचा इतिहास ! वाटूळच्या तांबळवाडीत बीजेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. अवघ्या पंचक्रोशीतील लोक बीजेसाठी तांबळवाडीत येतात. कीर्तनाचा, महाप्रसादाचाही लाभ घेतात. माझ्या लहानपणी वाहनांची सोय नव्हती. लोक पायीच येत-जात असत. अगदी लांज्यापर्यंतपण आम्ही पायीच जात असू. खूपच लांब जायचे असेल तर बैलगाडी हा एक पर्याय होता. पहाटे म्हणजे कोंबडा आरवला, की बैलगाडी जुंपायची आणि भाकरी-भाजी कपड्यात बांधून घेऊन निघायचे. चांदण्या रात्री बैलगाडीतून जायची मजा काही औरच होती. धुरळा उडवत बैल धावत असायचे. निसर्ग म्हणजे काय हे कळण्याइतके वय नव्हते तेव्हा ! पण पाखरांचा किलबिलाट, ऋषीमुनींप्रमाणे ध्यानस्थ बसलेले डोंगर आणि मध्येच झुळझुळ वाहणारी नदी दिसली की मन प्रसन्न होत असे. तांबडे फुटले, की पूर्व दिशा उजळून निघायची आणि थोड्याच वेळात ताऱ्यांचा लालभडक सखा डोके वर काढायचा… अहाहा !! खूप सुंदर सूर्योदय ! आम्ही उगवत्या सूर्याला नमस्कार करून, नदीकिनारी बसून भाकरी खायला घेत, नदीचे थंडगार पाणी पिऊन पुढे निघायचो.
गाडीचे बैल, जोताचे बैल; तसेच, गाईवासरे म्हणजे मोठी संपत्ती होती त्या काळात. दुभत्या गाईम्हशी घरी असल्या की त्यांचा हातभार संसाराला लागत असे. आण्या-दोन आण्याचे दूध विकून तिखटमीठ घेता येई. तसेच, सगळ्यांकडे कोंबड्यासुद्धा पाळत असत. तेही उत्पन्नाचे साधन होते. पैशांचा वापर कमीच असायचा. गरज मालाची अदलाबदल करून भागवता येत असे. कधी कधी, सेवांचीही देवाणघेवाण असे. गुरांसाठी वाडा असायचा तर लाकडे ठेवण्यासाठी खोप असायची. वाडा-खोप गवताने शाकारलेली असायची. कोंबड्या तिन्हीसांजेला घरी येत असत, त्यांना डालग्याखाली झाकत असत. एखादी कवट (अंडे) घालणारी कोंबडी कॉकॉ ऽक-कॉकॉ ऽऽक अशी ओरडत असे. ती तसे ओरडली, की समजावे, तिने कवट घातले ! कवटाची पोळी आणि तांदळाची भाकरी आम्हाला खूप आवडायची.
सकाळी उठल्यावर केरवारा (वावर), चुलीला पोतेरे, फुलझाडांना पाणी घालणे, गुरे सोडणे, कोंबड्या सोडणे ही लहानमोठी कामे असायची, पण स्त्रियांना पहाटे उठून दळण दळावे लागत असे. माझी आई जात्यावर दळताना ओवी म्हणायची, “पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम… तुळशी खाली राम पोथी वाची…” ओवीचा मधुर स्वर कानात घुमायचा आणि जात्याची घरघर म्हणजे ते एक वाद्यच वाटायचे ! आवाजाने आम्हाला जाग यायची, पण आम्ही पुन्हा झोपी जात असू. आई मात्र दळत असायची. पायरीवर मिणमिणता दिवा ठेवून, ओवी म्हणत म्हणत धान्य दळून होत असे. भात घिरटण्यासाठी घिरट होती, तर घिरटलेले भात व्हायनात कांडून-पाखडून, घोळण्यात घोळून मग तांदूळ-कणी वेगळी केली जायची. ती कामे दुपारच्या वेळी केली जात.
उन्हाळ्यातून भाजावळीचीही कामे असत. गवत कापणे-कवळ तोडणे-गोवऱ्या गोळा करणे-इंधनासाठी लाकडे गोळा करणे-शेणी थापणे अशी खूप कामे असत. पण ती सगळी कामे मनापासून केली जात. कधी कधी, गडीमाणसे बोलावावी लागत. तीनचार गडी (पुरूष) पाचसहा पैरी (बायका) अशी कुणबी समाजाची माणसे कामाला येत. त्यांना ती सकाळी आल्यावर चहा, पानसुपारी, नंतर न्याहरी; दुपारी जेवण आणि काही पैसे दिले जायचे. भाजावळीची कामे झाली, की शेतकरी मिरगाची (मृग नक्षत्र) वाट बघायचा. त्यावेळी राखण देणे ही एक प्रथा होती (अजूनही आहे). मिरगाचा पाऊस पडला की पेरणी, दाड काढणे, लावणी, बेणणी, कापणी अशी कामे लागोपाठ असत. मुख्य शेती भातशेती ! वाटूळात आय् आर् आठ आणि सोनपळ; तसेच, धने साल अशी भाताची बियाणी मला आठवतात. सोनपळ हा लाल तांदूळ होता. त्याचे खिमाट (भरपूर पाणी घालून मीठ टाकून केलेला पातळ भात) खूप चवदार लागत असे. नाचणी, वरी ही पिकेही घेत असत. हरीक म्हणून एक धान्यही पिकवले जाई. हरकाचा भात पांढराशुभ्र, आख्खा असायचा सुक्या गोलम्याचे सार आणि हरकाचा भात खूप मस्त लागायचा. पण तो लहान मुलांना देत नसत. गडीमाणसांना मात्र पाहिजे तेवढा हरकाचा भात दिला जायचा. रेशनवर मिलो (कावली) म्हणून लाल रंगाचे धान्य मिळायचे. त्याच्या भाकरी करत असत. भाकरीचे पीठ मळण्यासाठी लाकडी काटवट होती.
बांधावर उडीद लावत. उडीद भाजून, भरडून त्याचे पीठ करून ठेवले जाई. आयत्या वेळी पीठात फक्त कांदा-मीठ-मिरची घालून, पाणी टाकून कालवले की ‘डांगर’ तयार होई ! नाचणीची भाकरी-डांगर लय भारी ! भाते कापून झाली, की फेब्रुवारी-मार्चमध्ये त्याच मळीत कुळीथाचे पीक घेत असत. कुळथाची पीठी आणि भात, सोबत चुलीत भाजलेला सुका बांगडा म्हणजे मेजवानीच ! गावात आंबा, फणस, काजू, रातांबे अशी फळझाडे भरपूर होती. आंब्या-फणसाची साठे केली जात. रातांब्याची कोकमे केली जात. तसेच, त्यांच्या बियांपासून रातांबीचे तेलही काढले जायचे. ही सर्व कामे स्त्रिया न थकता करत. चाकरमानी आले की घर भरलेले असायचे. ते जायला निघाले की म्हाताऱ्या आजी खूप रडायच्या… “बावा संबालून जा. पोचल्यावर पत्र लिव.” असे आवर्जून सांगायच्या. त्यांना भेट म्हणून तांदूळ, पोहे, कोकम आणि गावच्या इतर काही वस्तू दिल्या जात.
बावाचे (चाकरमानी) आठएक दिवसांनी पत्र यायचे. वाचणारा कोणी नसायचा. थोडे शिकलेली मुले मुंबईत गेलेली असायची. शिकलेला कोणीतरी एखादा असायचा, त्याच्याकडे जाऊन पत्र वाचून घ्यायचे. कधी कधी, पोस्टमन (भुजाआप्पा) स्वतः पत्र वाचून दाखवत. ते लांबूनच आरोळी द्यायचे, ‘अगे काको, पत्र आलाय. भायेर ये. तुझ्या लेकाचं पत्र हाय’. काको डोक्यावरचा पदर सावरत बाहेर यायची. “वाच वाच ! काय लिवलय?” लेकाची खुशाली ऐकायला काकोचे कान टवकारायचे.
‘तीर्थरूप आईस, साष्टांग नमस्कार. मी सुखरूप आहे.’ बाकी इतर मजकूर असायचा आणि शेवटी ‘तुझा लाडका बावा.’ ‘सुखरूप आहे’ हे शब्द ऐकून माऊलीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळायचे. भोळीभाबडी पिढी होती ती ! लेकाने डब्बल कार्ड पाठवलेले असायचे. दुसऱ्या कार्डवर मुंबईचा पत्ता असायचा. मग कोणाला तरी सांगून त्याचे उत्तर द्यायचे. आठपंधरा दिवसांनी खुशाली कळत असे. तातडीचा निरोप असेल तर ‘तार’ हा एक प्रकार होता. तार सुखाची, दु:खांची- दोन्ही प्रकारची असायची. पण … ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असे म्हणतात ना ! एखाद्याची तार आली, की काळजात धडधड व्हायची. तारवाला सायकलवरून येत असे. तार वाचेपर्यंत जिवात जीव नसायचा. पण ती तार (कधी कधी) आनंदाची असायची. ‘अ ब क फायनल पास’. असे मोजके शब्द असायचे. पण मग मात्र सर्वांचे चेहरे खुलायचे आणि गावचे पेढे म्हणून हातावर गूळ ठेवला जायचा. दु:खाची तार ‘अमूक सिरियस लगेच निघा’ अशी असायची. तसेच, त्यावेळी पोस्टाने मनीआर्डर यायची. चाकरमानी महिन्यातून एकदा दहा/वीस रुपये पाठवत असत. ते पैसे सही किंवा अंगठा देऊन घेतले की रविवारची वाट बघायची.
वाटूळ तिठ्यावर रविवारी आठवडी बाजार भरायचा. बाजारात सुकी मच्छी म्हणजे गोलीम, बांगडे, शिंगटा, डागोळी वगैरे अनेक प्रकारची मच्छी असे. ओली मच्छी, मटण, शिवाय खाऊची दुकाने, किराणा दुकानेही असत. चार आण्यांचे पंचवीस लाडू येत होते. किराणा सामान कागदात बांधून देत. गुळाचा वापर जास्त होता. गूळसुद्धा कागदात बांधून देत असत. आम्ही घरी आल्यावर कागदाला चिकटलेला गूळ तळहातावर पाठीमागे लावून चाटत होतो. त्यातही एक मजा होती. वाटूळ तिठा हे मध्यवर्ती ठिकाण; सर्व वाड्यांतून लोक तिठ्यावर यायचे. एकमेकांची चौकशी करत, ‘राम राम ! नमस्कार !’ अगदी आपुलकी असायची त्या शब्दांमध्ये. चाकरमानी गावी आला असेल तर त्याच्याभोवती गावकरी जमायचे. ‘बावा कधी आलास? मुंबैत सगली खुशाल ना !’ असे म्हणत गालावरून हात फिरवणारी ती माणसे म्हणजे मायेचा ओलावा. त्या स्पर्शात वेगळीच जादू होती. मग चाकरमान्याकडून बाबल्याच्या हॉटेलात भजी-चहा व्हायचा.. भूक असेल तर एखादी प्लेट आणखी खायची, नाही तरी भूक असल्यावर खाणे म्हणजे प्रकृती, भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती असते; पण आपल्यातील अर्धी भाकरी समोरच्या उपाशी माणसाला देणे ही संस्कृती जपणारे लोक कोकणात होते. आजही आहेत.
मुंबई-राजापूर रातराणी (एसटी) होती. ती गाडी वाटूळ तिठ्यावर थांबायची. रात्री गाडीत बसले की सकाळी आमचा वाटूळ तिठा यायचा. बॉम्बे टू गोवा हा नॅशनल हायवे वाटूळ गावातून गेला आहे. पूर्वी तो ‘नॅशनल हायवे 17’ म्हणून ओळखला जायचा; आता ‘नॅशनल हायवे 66’ म्हणून ओळखला जातो. आमचे चेहरे तिठ्यावर उतरल्यावर बघण्यासारखे असत. केसात, अंगावर धुरळा उडालेला असायचा. पण गावात पाऊल पडल्यावर तितकाच आनंदही व्हायचा. घरी जायला पायवाटच होती. कोणी भेटले तर ट्रंक पत्र्याची पेटी घेऊन चालू लागे. किती देणार? किती घेणार? ह्याच्याशी काहीही संबंध नसायचा. प्रेमाने दिलेल्या चार-आठ आण्यांत समाधान असायचे. सुखी जीवन ! घरचे सकस अन्न, विहिरीचे पाणी, शेतात कामे, त्यामुळे मिळणारा सूर्यप्रकाश आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने आजाराला थारा नसायचा. किरकोळ सर्दी-खोकला किंवा ताप आलाच तर काही ठरावीक झाडांची पाने, मुळे ह्यांचा काढा केला की माणूस मोकळा.
वाटूळ गाव तसा शिक्षणातही अग्रेसर होता. गावात दोन शाळा होत्या. एक महादेववाडीत तर दुसरी बेलाच्या कोंडात कड्यावर होती. तिला कड्यावरची शाळा म्हणून ओळखत. ती शाळा चौथीपर्यंत होती. चारी वर्गाना गुरुजी एकच होते. महादेववाडीतील शाळा सातवीपर्यंत होती. तिला गावातली शाळा असे म्हणत. शाळेची वेळ 11 ते 5 अशी होती. पण वेळ बघायला घड्याळे नव्हती. सूर्याच्या उन्हामुळे पडणाऱ्या घराच्या सावलीवरून आमची आजी किती वाजले हे अंदाजे सांगायची. आम्ही कापडी पिशवी, त्यात पाटी-पेन्सिल घेऊन शाळेला जायचो. फायनल पास झालेला माणूस मास्तर होत होता. मुलेमुली सातवी पास झाली की मुंबईत येऊन पुढील शिक्षण घेत. तर काही जण ओणी-लांजा अशा ठिकाणी पायी जात. लाईट नव्हता, घड्याळे नव्हती. तरीही मुले कंदिलाच्या किंवा दिवटीच्या उजेडात अभ्यास करत असत.
मार्च महिन्यात कुणबी समाजाचे तरुण ‘खेळे’ घेऊन येत. मस्त नाचून गाणी म्हणत असत. त्यांचा नाच बघण्यासारखा असे. तसेच ‘नमन‘ म्हणून करमणुकीचा कार्यक्रम असे. त्यात देवादिकांच्या गोष्टी सांगत. त्यात मजेशीर विनोदही काही असायचे. जेणेकरून लोकांनाही हसू येत असे. थकल्याभागल्या जिवाला तेवढाच विरंगुळा मिळे. नमन पहाटेपर्यंत चालायचे. गणपतीचे सोंग घेतलेला माणूस मध्येच नाचून जायचा. ‘जाकडी नाच’ असायचा. वाजवणारा मध्ये बसून भोवताली मुले मस्त नाचायची. श्रावण महिन्यात फुगड्या, झिम्मा खेळत. बायकांना तेवढेच हसता-खेळता यायचे, तर पुरुष मंडळी भजनात दंग असायची. थोड्याफार करमणुकीत आनंद घेणारी ही पिढी सुखी-समाधानी होती.
पावसाळ्यात शेतीच्या कामासाठी धो धो पावसात बायका ‘इरले’ घेऊन काम करायच्या; तर पुरुष घोंगडीची खोळ करून डोक्यावर घेत. जो तो जांगली (चांगली) घोंगडी घेऊनच पावसापासून संरक्षण करत असे. संध्याकाळी ते घरी आल्यावर पिरस्याजवळ बसत. पिरस्यावर एक दांडी असे. त्यावर घोंगड्या सुकवत असत. पिरसा म्हणजे पडवीच्या एका कोपऱ्यात पेटवलेला विस्तव. त्या विस्तवावर हातपाय शेकत पुरुष मंडळी पावसाच्या, तसेच शेतीविषयक गप्पा मारत बसायचे. चारी बाजूला पडव्या, ओटी, मधला खण; तसेच, देवघर अशी घरांची रचना असायची. चारपाकी उतरत्या छपराचे कौलारू घर, समोर खळे (अंगण), तुळशी वृंदावन आणि पुढे बगिचा, म्हणजे जणू स्वर्गसुख ! शेणाने सारवलेली जमीन, लाल मातीने सारवलेल्या भिंती आणि सुबक आकाराच्या लाल चुली. त्या चुलींमधून येणारा धूर आणि चुलीवर खदखदणारा भात !! सगळे अवर्णनीय होते ते.
पानचूल घराच्या बाहेर असायची. वर्षानुवर्षे त्यावर तांब्याचा हंडा असायचा. चुलीतील विस्तवामुळे तो खूप काळाकुट्ट असे. थंडीच्या दिवसांत आम्ही लहान मुले तेथे शेक घेता घेता हंड्यावर बोट चोळून त्याची मशेरी लावत असू, तर मोठी माणसे तंबाखू भाजून मशेरी लावायचे. लहान मुलांसाठी मशेरी माळावरील शेणीचीही (गोवरी) भाजून करत. मशेरी लावत लावतच बायका परसाकडे जात असत. शौचालये नसल्याने प्रातर्विधीपैकी हा एक विधी बांधाच्या आडोशाला कोठेतरी उरकला जाई. पुरुष विडी ओढायचे. तर काही जण कुड्याच्या पानांत तंबाखू टाकून गुंडाळी करत आणि विस्तवावर पेटवून चिलीम ओढत. पावसाळ्यात मात्र पऱ्यावर जावे लागे. पऱ्याला पूर आला तर साकवाचा उपयोग करत. अलिकडील माणसे पलीकडे जाण्याचा हा साकव म्हणजे एकमेकांना भेटण्याचा दुवाच म्हणावा लागेल. दुसरे म्हणजे पऱ्याच्या बाजूला पाट काढून तेथे मासे पकडण्यासाठी खोयन् लावत. तर इंद टाकूनसुद्धामासे पकडले जात. खूप काही डोळ्यांसमोर उभे राहते. हा सगळा आठवणींचा खजिना ओतलाय तुमच्यासमोर !!!
जाता जाता, खेळ्यातील एक गाणे आठवले. ते होळीत रंगपंचमीच्या दिवशी म्हणत आणि मस्त नाचत असत. “रत्नागिरी जिल्हा पेठा हे लांजा, मुक्काम वाटूळ गाव | अरे देवा, गांगोबा देवा तू पाव”
लेखातील शब्दांचे अर्थ –
घिरट – मोठे जाते.. ह्यामध्ये भात (टरफलासहित) टाकून गोल फिरवतात. मग टरफल निघून जातात, पण सर्व निघत नाहीत.
व्हाइन – गोलाकार आकार असलेला वीतभर मापाचा दगडी खड्डा, जो जमिनीत बसवलेला असतो. त्यात म्हणजेच व्हायनात घिरटलेले भात मुसळाने कांडत.
घोळणा – कोंड्याच्या बिळाची बनवलेली मोठी चाळण. ह्यात कांडलेले भात घोळून घेतात.
भाजावळ – जमीन भाजणे. गोवरी, गवत, सुका पालापाचोळा
कवळ – झाडांच्या फांद्या (रानटी झाडे) तोडून सुकवून ठेवतात. गोवरी, गवत, सुका पालापाचोळा यांचा अनुक्रमे एकावर एक थर लावतात व दुसऱ्या दिवशी पहाटे त्यावर माती लावून साधारण दुपारी आग लावतात.
गोलीम – सुका जवला (लहान सुकी मच्छी) गोलीम हा गावचा शब्द. गोलम्याचे सार (पातळ आमटी).
इंद – मासे पकडण्याचे त्या काळातील एक साधन.
– प्राची तावडे 8308930503