आठवे साहित्य संमेलन बडोदे येथील सातव्या संमेलनानंतर (1909) तीन वर्षांनी, 1912 साली विदर्भातील अकोला येथे श्रीराम नाटकगृहात भरले होते. कादंबरीकार आणि गुजगोष्टीकार हरी नारायण आपटे हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
हरिभाऊंचा उल्लेख अर्वाचीन मराठी कथेचे आद्य शिल्पकार म्हणून केला जातो. मराठी कथेचे युग त्यांच्यापासून सुरू झाले असे मानतात. ते त्याहूनही जास्त श्रेष्ठ कादंबरीकारम्हणून वाचकांस अधिक माहितीचे आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचे अभ्यासक त्यांना महाराष्ट्राचे ‘सर वॉल्टर स्कॉट’म्हणूनच ओळखत. हरिभाऊंनी ‘करमणूक’ हे साप्ताहिक 1890 साली ऑक्टोबर महिन्यात सुरू केले. त्यांनी दर आठवड्याला एक ह्या प्रमाणे हजारभर गोष्टी ‘करमणूक’मधूनच प्रसिद्ध केल्या असतील. त्यांनी त्यांच्या सर्व कादंबऱ्याही ‘करमणूक’मधूनच क्रमश: प्रसिद्ध केल्या. त्यांची पहिली कादंबरी 1885साली पुण्याच्या ‘पुणे वैभव’ या साप्ताहिकातून क्रमश: प्रसिद्ध होणार होती. तिचे नाव ‘मधली स्थिती’. पण कादंबरीचे एकच प्रकरण तेथे प्रसिद्ध होऊ शकले. त्यांची ‘गणपतराव’ही कादंबरीही मासिक ‘मनोरंजन’मधून (1886) क्रमश: प्रसिद्ध होणार होती, ते मासिक रेंगाळत रेंगाळत अपूर्ण स्थितीत बंद पडले. नंतर हरिभाऊंनी स्वत: ‘करमणूक’ साप्ताहिक सुरू केले आणि ते एकहाती अठ्ठावीस वर्षें चालवले. ‘करमणूक’मध्ये दीर्घ गोष्टी, शास्त्रविषयक माहिती देणाऱ्या गोष्टी, वर्तमान घडामोडी, चुटके, थोर पुरुषांची चरित्रे, प्रवासवर्णने ते कविता, नाटके व कादंबरीलेखन प्रसिद्ध होत असे.
हरिभाऊंनी भरपूर लिहिले. लहान लहान प्रहसने, कविता लिहिल्या. त्यांनी एकूण तेवीस कादंबऱ्या (बारा सामाजिक आणि अकरा ऐतिहासिक) लिहिल्या. त्यांतील ‘पण लक्षात कोण घेतो’ ह्या कादंबरीचा उल्लेख मराठी वाङ्मयेतिहासात कादंबरीतील उच्चांक म्हणून झाला. त्यांनी त्यांच्या कादंबऱ्यांतून सामाजिक आशय जिवंतपणे उभा केला. त्यांतील ‘उष:काल’हीताजेपणाने वाचली जावी अशी आहे. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली. ते प्रतिभावान शैलीदार लेखक म्हणून महाराष्ट्राला ज्ञात होते. आपटे यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले यांचा वैचारिक प्रभाव होता. त्यांनी हजारभर गुजगोष्टी, ‘संत सखू’ आणि ‘सती पिंगला’ ही दोन नाटके व कितीतरी स्फूट असे लेखन केले. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. ह.ना. आपटे यांनी ‘आठ स्त्रीरत्ने’ या सदराखाली भास्कराचार्यांची ‘लीलावती’, ‘राणी दुर्गावती’ इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. हरीभाऊ आपटे यांनीच केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे ‘शारदा’ हे नाटक प्रकाशात आणले. हरिभाऊंच्या कादंबर्यांत मध्यमवर्गीय समाजातील स्त्रीपुरुषांच्या, विशेषतः स्त्रियांच्या समस्यांना विशेष स्थान प्राप्त झाले. त्यांनी पुनर्विवाहाचा प्रश्न, सासरच्या छळामुळे पिचल्या जाणाऱ्या सुना- त्यांच्यावर अल्पवयात लादले जाणारे मातृत्व, कमावती होऊन स्वतःच्या पायांवर उभी राहू पाहणाऱ्या स्त्रीला समाजाशी करावा लागणारा संघर्ष यांचे प्रभावी चित्रण केले. त्यांनी त्यांच्या कादंबर्यांतून तत्कालीन तरुणांनी जोपासलेली ध्येये, त्यांच्या मनातील वैचारिक संघर्ष, स्त्रीशिक्षणाला अनुकूल होऊ लागलेली त्यांची मनोवृत्ती हे विषय समर्थपणे मांडले आहेत. त्यांनी कालिदास आणि भवभूती ह्यांच्या श्रेष्ठत्वासंबंधी ‘केसरी’तून चाललेल्या वादात कालिदासाच्या बाजूने मार्मिक पत्र लिहिले आणि त्यांची आगरकर यांनी शेक्सपीयरच्या हॅम्लेटवरून रचलेल्या ‘विकारविलसिता’ नाटकावरील अभ्यासपूर्ण टीका लक्षणीय आहे.
हरी नारायण आपटे यांचे मूळ नाव बाळकृष्ण होते. त्यांचा जन्म 8 मार्च 1864 रोजी खानदेशातील पारोळे येथे झाला. त्यांचे मॅट्रिकचे शिक्षण 1883 साली झाले. ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजात 1888 पर्यंत होते. त्यांना महाविद्यालयाच्या पहिल्याच परीक्षेत अपयश, गणित कच्चे असल्यामुळे आले. त्यांनी उच्च शिक्षणाचा विचार नंतर सोडून दिला. त्यांची लेखन-वाचनाखेरीज अन्य व्यवसाय करण्याची इच्छा नव्हती. ते आनंदाश्रम ह्या संस्थेत चालक व व्यवस्थापक होते. ती संस्था त्यांच्या चुलत्यांची होती. त्यांचे चुलते महादेव चिमणाजी हे मोठे कर्तृत्ववान वकील होते. त्यांनी भरपूर पैसा मिळवला आणि पुतण्या, हरी नारायण ह्यांचे भरपूर कोडकौतुक पुरवले. हरिभाऊंना वाचनाचे वेड होते. त्यांना चुलत्यांनी हजारो रुपयांची पुस्तके पुरवली आणि हरिभाऊंना सुस्थितीत ठेवले. एक मोठा कादंबरीकार चुलत्यामुळे संपन्न, शांत आयुष्य जगू शकला. त्यामुळेच हरिभाऊ स्वत:च्या इच्छेप्रमाणे त्यांचे वाङ्मयीन कार्य पुरे करू शकले आणि ‘करमणूक’ हे वाङ्मयीन नियतकालिक चालवू शकले. ‘करमणूक’ हरिभाऊंच्या मृत्यूपूर्वी दोन वर्षें बंद पडले. त्यांनी स्वतः संपूर्ण मजकूर अठ्ठावीस वर्षें लिहून एक विक्रमच केला! ते स्वत: जरी पदवीधर नसले तरी मुंबई विश्वविद्यालयात ते एम ए चे परीक्षक होते. त्यांनी ‘विल्सन भाषाशास्त्र व्याख्यानमाला’गुंफली. ते फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकले होते.
त्यांनी अध्यक्षीय भाषणात वाङ्मय हे राष्ट्राच्या उन्नतीचे कारण आहे आणि कार्यही आहे. राष्ट्राचा जसजसा उत्कर्ष होतो तसा वाङ्मयचाही उत्कर्ष होतो… मातृभाषेचा अभिमान आपण धरला पाहिजे. तो ज्यांनी धरला त्यांच्या अभिमानामुळेच मराठी भाषेला अर्थसघनता आली आहे. ती इतकी, की वाटेल ते शिक्षण तिच्याद्वारे देता येईल, वाटेल तो विचार तिच्याद्वारे उच्चारता येईल असे मुद्दे मांडले. त्यांनी साहित्याबरोबर समाजसेवाही केली. त्यांचा पुण्याचे ‘नूतन मराठी विद्यालय’ आणि ‘किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल’ यांच्या स्थापनेत पुढाकार होता. त्यांनी पुणे नगरपालिकेत बरीच वर्षें काम करून पुणे शहराची सेवा केली. त्या नगरपालिकेचे अध्यक्षपदही काही काळ त्यांच्याकडे होते. त्यांचे निधन 3 मार्च 1919 रोजी पुण्यात झाले.
– वामन देशपांडे91676 86695, चित्रकार –सुरेश लोटलीकर 99200 89488
———————————————————————————————-——————————–