बारावे साहित्य संमेलन मुंबई येथे 1926 साली साजरे झाले. ते अकराव्या संमेलनानंतर पाच वर्षांनी भरले होते. त्याचे अध्यक्ष सरदार माधवराव विनायकराव किबे होते. साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर यांच्यासारखा चतुरस्र अध्यक्ष झाल्यावर पुढील साहित्य संमेलनाचा अध्यक्ष किमान उत्तम साहित्यिक असावा अशी अपेक्षा होती. पण सरदार किबे यांचे नाव साहित्य क्षेत्रात त्या तोडीचे मानले गेले नाही. किबे यांचा व्यासंग अनेक विषयांचा होता. पण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा तोलामोलाचा साहित्यिक असावा तसे ते नव्हते. मुंबईत 1915 साली भरलेल्या, नवव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मिरज संस्थानचे संस्थापती, मल्लविद्याविशारद गंगाधर पटवर्धन होते; अगदी तसेच, पुन्हा एकदा 1926 साली मुंबईतच घडले. सरदार किबे यांचे भाग्यच थोर असावे. त्यांना मुंबई संमेलनानंतर पुन्हा कोल्हापूर येथे 1932 साली भरलेल्या अठराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची संधी योगायोगाने मिळाली. त्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सयाजीराव गायकवाड हजर राहू न शकल्यामुळे व सरदार किबे साहित्य परिषदेचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांची नियुक्ती अध्यक्षपदी झाली. एकच व्यक्ती संमेलनाची दोनदा अध्यक्ष असल्याची इतिहासात ती एकमेव नोंद आहे! त्यांचे ‘लंकेचे मूळ स्थान कोणते?’ या नावाचे एक इंग्रजी संशोधित पुस्तक वादग्रस्त ठरले. कारण रावणाची लंका ही भारताच्या दक्षिण टोकाला नसून ती मध्यप्रदेशात आहे हे त्यांनी मांडले होते.
किबे यांचे सारे आयुष्य इंदुरात गेले. माधवराव विनायकराव किबे यांचा जन्म 5 एप्रिल 1877 रोजी झाला. ते देवास संस्थानचे 1914 ते 1916 अशी दोन वर्षे दिवाण होते. ते इंदूरला 1916 ते 1926 होम मिनिस्टर व 1926 ते 1933 पर्यंत डेप्युटी प्राईम मिनिस्टर होते. त्यांचा विवाह रत्नागिरी जिल्ह्यात भरभराटीला आलेल्या कोल्हापूरच्या सरदेसाई यांच्या घराण्यातील कमला यांच्याशी झाला. त्या मराठी कवयित्री, लेखिका आणि वक्त्या होत्या.
त्यांचा वाङ्मयविषयी राजनितीस असा दबदबा होता. ते साहित्य परिषदेचे पहिल्यापासून कार्यकर्ते होते. त्यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेशी घट्ट संबंध होता. त्यांचा मृत्यू 12 ऑक्टोबर 1963 रोजी झाला.
– वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 99200 89488
———————————————————————————————–