बदनापूर हा जालना जिल्ह्यातील एक तालुका. बदनापूर गाव हे मुंबई-नागपूर राज्य महामार्गावर वसलेले आहे. बदनापूर हे जालन्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. ते समुद्रसपाटीपासून पाचशेचौतीस मीटर उंचीवर येते. जालना हा जिल्हा मराठवाड्याच्या उत्तर दिशेस येतो व तो महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आहे. जालना हा वेगळा जिल्हा औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 मे 1981 रोजी अस्तित्वात आला. जालना शहराचे महत्त्व व्यापारी दृष्ट्या पूर्वीपासून आहे. बदनापूर हेदेखील जालना तालुक्यातील फार मोठे शहर एकेकाळी होते. शहराची अवस्था पाहिली तर तसे सांगूनही खरे वाटणार नाही. पण गावाचे विखुरलेले अवशेष गोळा केले तर त्याच्या जुन्या वैभवाची साक्ष पटेल.
निजाम आणि बाजीराव पेशवा यांच्यात जालना येथे 1717 मध्ये चकमक झाली होती. इंग्लिश फौजांनी जालना शहर शिंदे यांच्या ताब्यातून काढून निजामाकडे 1803 मध्ये सोपवले. कर्नल स्टिव्हन्सन याने जालना येथून मराठ्यांना हुसकावले आणि पहिल्या ब्रिटिश कँपची स्थापना केली.
बदनापूर तालुक्यात फक्त एक्क्याण्णव गावे आहेत. जालना जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या राज्याच्या मध्यभागी येत असल्याने केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने इंदेवाडी या गावी उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र उभारले आहे. तेथून अंतराळात सोडलेल्या उपग्रहांशी सातत्याने संपर्क ठेवणे सोयीचे ठरते.
जालना जिल्हा मोसंबी फळासाठी राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे बदनापूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रात कडधान्याच्या वेगवेगळ्या जातींची बियाणी यांबाबत संशोधन चालते. त्या संशोधन केंद्राचे नाव कृषी क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते. कृषी महाविद्यालयही त्या संशोधन केंद्रात आहे. तेथे कृषी क्षेत्रात काम करणारी पिढीच घडत आहे. त्याशिवाय शेती साह्य मंडळाकडून शेतीविषयक मार्गदर्शन केले जाते.
श्रीवर्धनपूर हे बदनापूरचे जुने नाव. श्री म्हणजे लक्ष्मी हिची वृद्धी जेथे आढळते ते श्रीवर्धन, पुढे श्रीवर्धनला ‘पूर’ हे उपपद जोडले गेले व श्रीवर्धनपूरचे बदनापूर असे नाव शिल्लक आहे ! त्याचे श्रीवर्धनपूर हे नाव संपले अन् नावाबरोबर वैभवही संपले. परंतु मूळ गावात सहज फेरफटका मारला तर गावातील काही रस्ते, घरे यांची आखणी पाहून कधी काळी ते मोठे शहर असावे हे ध्यानी येते. त्या शहराचे वर्णन आकाशाला भिडणारी मंदिरे, भले- मोठमोठे रस्ते- त्यांवर रथांची वर्दळ, ठिकठिकाणी बागा असे केलेले आहे. उत्तरेतून जैन लोक दक्षिणेत आले तेव्हा त्या शहराचे वैभव पाहून ते तेथेच थबकले असे कागदोपत्री आढळते. चिनी प्रवासी हुएनत्संग यानेही शहराची नोंद गौरवाने केलेली आहे असे सांगितले जाते. तेथील श्रेष्ठी श्री चक्रेश्वर यांनी वेरूळच्या जैन लेण्यांतील पार्श्वनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तेथे शिलालेख कोरला आहे, त्यावरून यादवांच्या काळी बदनापूर हे जैन पीठ असावे. हेमाद्रीच्या ‘राजप्रशस्ती’ या ग्रंथात भिल्लमोन याने प्रथम जिंकलेल्या ठाण्यांच्या यादीत श्रीवर्धनपूरचा समावेश आहे; भिल्लमोन हा देवगिरीचा यादव राजा. तो बदनापूरचा असावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. तेथे सापडलेल्या अवशेषांवरून त्या स्थानाचे प्राचीनत्व ताम्रकाळापर्यंत होते. शिलालेख आणि वाङ्मयीन साधने यांवरून शहराचे प्राचीन वैभव लक्षात येते.
काबिल खान याने एक किल्ला शहराच्या पूर्वेला 1725 मध्ये बांधला होता. तो मस्तगड या नावाने ओळखला जातो. त्या सोबत बांधलेल्या बालेकिल्ल्यात पूर्वी नगरपरिषदेचे कार्यालय हेाते. मीर गुलाम दर्गा इशान्येला गावात, गर्द वनराईत आहे.
बदनापूर या शहराची लोकसंख्या वीस हजार आहे. तेथे हिंदू आणि मुस्लिम यांची संमिश्र वस्ती आहे. तेथे रोज बाजार भरतो, त्याशिवाय आठवडी बाजारही वेगवेगळ्या ठिकाणी भरतो. तेथे स्थानिक प्रवासासाठी वाहने एस टी बस, डुगडुगी आणि टॅक्सी ही आहेत. मात्र बारा-तेरा माणसे खाजगी छोट्या गाड्यांत कोंबून तशी वाहतूक गावभर चालते. कारण एस टी फक्त महत्त्वाच्या ठिकाणी थांबते. बदनापूर हे रेल्वे स्टेशनही आहे. दहा-बारा रेल्वे गाड्या दिवसभरात तेथून ये-जा करतात.
श्री रेणुका मातेचे भव्य मंदिर बदनापूर तालुक्यात सोमठाणा येथे आहे. ते तेथील निसर्गसौंदर्यामुळे पर्यटनस्थळ म्हणूनही पुढे येत आहे. तेथील दुधना नदीवर सोमठाणा धरण आहे. दुधना नदीच्या जवळ अकोलानी हे गाव आहे. त्या गावात भगवान बाबा ह्यांचे भव्य मंदिर आहे.
बदनापूर हा तालुका छोटा असला तरी तेथे सोयीसुविधा सगळ्या आहेत. बदनापूर येथे पदवी महाविद्यालय (कला, वाणिज्य, विज्ञान), तंत्रनिकेतन महाविद्यालय, कृषी संशोधन केंद्र, मोसंबी संशोधन केंद्र, नर्सिंग कॉलेज अशी विविध शिक्षणाची सोय आहे. तेथे बचत गट आणि वाचनालये आहेत. तसेच, तेथून बदलता महाराष्ट्र, दुनियादारी, जालना नायक, आनंद नागरी, पार्श्वभूमी आणि साप्ताहिक जनकपूर पत्रिका ही नियतकालिके प्रसिद्ध होतात. बदनापूर तालुक्याचा पिनकोड 431202 असा आहे.
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विद्यालयामुळे फळबागांवरही लक्ष केंद्रित केले आहे. मोसंबी, संत्री, चिकू, केळी, पपई, लिंबू, पेरू या व अशा फळबागा तेथे वाढत आहेत. त्यांतील काही फळांची निर्यात परदेशी होते. मात्र बदनापूर सिंचन क्षेत्रात मागासलेला आहे. तेथील काही गावांचा पाण्याचा प्रश्न ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’ यांसारख्या संस्थांच्या कामामुळे सुटला आहे.
मुख्य संदर्भ – आपला जालना जिल्हा – भगवान काळे व जी.यू. जैन (जालना) यांचा लेख
– संकलन नितेश शिंदे niteshshinde4u@gmail.com
——————————————————————————————————————-