रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील महालक्ष्मी मंदिराची जी इमारत आहे, तिच्यावर दाक्षिणात्य आणि मोगलकालीन कलेचा ठसा आढळतो. तेथील ध्वनीवर्धन, उगवतीच्या व मावळतीच्या सूर्यकिरणांचा देवीच्या चरणांना होणारा स्पर्श, झरी, पोळी या आगळ्यावेगळ्या गोष्टी मंदिराचे सौंदर्य वाढवतात…
केळशीचे महालक्ष्मी मंदिर गावाच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या उटंबर गावाच्या डोंगराच्या पायथ्यापाशी वसले आहे. ते वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. त्या देवळाची जी इमारत आहे, तिच्यावर दाक्षिणात्य आणि मोगलकालीन कलेचा ठसा आढळतो. ते बांधकाम चुना, दगड यांचा वापर करून परंपरागत पद्धतीने केलेले आहे. श्रीमहालक्ष्मीचे स्वयंभू स्थान दोन घुमटांपैकी एका घुमटाच्या खाली आहे. दुसरा घुमट हा सभागृहाचा आहे. तो पहिल्यापेक्षा मोठा आहे. त्या घुमटाखालील प्रशस्त सभागृहात प्रवेश करण्यास तीन दरवाजे आहेत. चौथा दरवाजा हा पहिल्या घुमटाखाली असणाऱ्या श्री महालक्ष्मीचे दर्शन घडवणारा असा आहे. त्या घुमटामध्ये काही बोलल्यास त्याचा प्रतिध्वनी ऐकू येतो. त्या घुमटाची उंची खूप असल्यामुळे ऊन बाहेर कितीही असले तरी आतील हवा थंडगार राहते. ती वातानुकूलित तसेच, ध्वनिवर्धनाची अफलातून व्यवस्थाच म्हणावी लागेल. सूर्य उगवल्यावर विशिष्ट वेळी, त्याची किरणे महालक्ष्मीवर पडतील; तसेच, सूर्य मावळताना सूर्यकिरणे महालक्ष्मीचे चरणस्पर्श करतील अशा तऱ्हेची बांधकाम रचना त्या देवळाची आहे. अत्याधुनिक कोणतीही साधनसामुग्री नसताना ते जमले कसे असावे हेच मुळी आश्चर्य आहे ! मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. देवळातील शंकराची पिंड ही तिळा तिळाने वाढते अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या प्रांगणात वड-पिंपळ आदी पुरातन वृक्ष आहेत. मंदिर परिसर स्वछ ठेवण्यात येतो.
मंदिराच्या परिसरात एक धर्मशाळा आहे. तो परिसर एका पुरूषभर उंचीच्या दगडी भिंतींनी बंदिस्त केलेला आहे. त्याला स्थानिक भाषेत ‘पोळी’ असे म्हणतात. तटबंदी कशी असावी त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे ती ‘पोळी’ होय. त्या ‘पोळी’ला चार प्रवेशद्वारे आहेत. एका बाजूला पुरातन असे तळे आहे. त्या तळ्याला बारा महिने पाणी असते. त्याला घाटासारख्या पायर्या बांधलेल्या आहेत. ते तळे पुष्कळसे सुस्थितीत आहे. काही वर्षांपूर्वी उटंबरच्या डोंगरातून जिवंत झऱ्याचे पाणी मंदिरात आणण्याची व्यवस्था केलेली होती. ते पाणी ज्या ठिकाणी येई त्याला ‘झरी’ असे स्थानिक भाषेत म्हणतात. पूर्वीच्या काळातदेखील नळपाणी व्यवस्था अस्तित्वात होती त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ती ‘झरी’ होय. ते पाणी डोंगरातील गोड्या पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘दक्षिण माडी’ या प्रसिद्ध विहिरीतून आणले गेले होते. दक्षिण माडी पाहण्यास मिळते. श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात एक विहीर बांधलेली असून तिलादेखील बाराही महिने पाणी असते. पूर्वी त्या विहिरीतील पाणी काढण्यासाठी रहाटाची सोय केली होती; त्याची जागा विद्युतपंपाने घेतली आहे. तरीसुद्धा पाणी अपुरे पडते म्हणून देवस्थान ट्रस्टच्या निरनिराळ्या उपाययोजना चालू आहेत.
मुख्य प्रवेशद्वाराजवळ चौघडा असून, पूर्वी त्या ठिकाणी सकाळ-सायंकाळ चौघडा झडायचा. त्याची जागा सनई रेकॉर्डने घेतली असून, सनईची रेकॉर्ड देवळामध्ये नित्यनियमाने सकाळी आणि सायंकाळी लावली जाते. तशीच व्यवस्था गावातील श्रीराम व श्रीकालभैरव देवस्थानातदेखील आहे.
श्री महालक्ष्मीच्या मंदिर परिसरात गावामधील सर्व प्रमुख शाळा म्हणजे मराठी शाळा, कन्या शाळा, परशुरामभाऊ दांडेकर विद्यालय, काकासाहेब दांडेकर कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थी वसतिगृह, संगणक केंद्र इत्यादी संस्था आहेत. त्यामुळे सरस्वती व (महा)लक्ष्मी यांचा अनोखा संगम त्या ठिकाणी पाहण्यास मिळतो. आजूबाजूला असणारा मोकळा परिसर, मोठमोठे पिंपळ व वटवृक्ष- त्यांच्या बुंध्याशी बांधलेले सुंदर दगडी पार अशा प्रसन्न वातावरणात मंत्रघोष म्हणजे सरस्वतीची आराधना चालते. त्यावेळी मन हरखून जाते. त्या ठिकाणी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला केलेला नवस फेडला तरी चालतो असे म्हणतात. तर काही आख्यायिका आंबेजोगाईची देवीसुद्धा मूळ केळशीची आहे असे सांगतात. केळशीची महालक्ष्मी हे काही कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबांचे कुलदैवत आहे.
(श्रीनिवास घैसास यांच्या ‘केळशीची महालक्ष्मी – एक स्वयंभू देवस्थान’ पुस्तकावरून उद्धृत)
———————————————————————————————————————————————-
चांगली जोड माहिती मिळाली आहे .