मधू दंडवते – झुंजार समाजवादी नेता (Madhu Dandavate- Birth centenary of a socialist leader)

4
371

मधू दंडवते यांचे नाव संसदेत ठसा उमटवणाऱ्या काही महत्त्वाच्या मराठी नेत्यांमध्ये आवर्जून घेता येईल. ते लोकसभेवर राजापूर मतदार संघातून जवळजवळ वीस वर्षे सातत्याने निवडून आले. त्यांनी जनता पक्षाचे सरकार केंद्रात आले तेव्हा मंत्रिपदही भूषवले. दंडवते यांनी मोरारजी देसाई यांच्या सरकारात रेल्वे मंत्री म्हणून (1977त्यांचा कार्यकाळ गाजवला. त्यानंतर ते व्ही.पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. ते व्यवसायाने प्रोफेसर होते. मधू दंडवते यांची जन्मशताब्दी 21 जानेवारी 2024 रोजी साजरी झाली.

त्यांचे पूर्ण नाव मधू रामचंद्र दंडवते. त्यांचा जन्म अहमदनगर येथे 21 जानेवारी 1924 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथील म्युनिसिपल शाळेमध्ये झाले. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे माध्यमिक शिक्षण अहमदनगर एजुकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये झाले. त्यांचे वडील रामचंद्र दंडवते हे सिव्हिल इंजिनीयर होते. वडिलांनी मधू यांची शिक्षणातील आवड पाहून त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईला पाठवले. त्यांनी मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजात शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. तेथे दोन वर्षे काढली. त्यांनी पुढे, मुंबईमध्येच रॉयल इन्स्टिटयूट ऑफ सायन्समध्ये भौतिक शास्त्रातील उच्च पदवी संपादन केली. दंडवते यांनी प्राध्यापक म्हणून मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेज आणि मुंबई विद्यापीठात 1946 ते 1971 अशी पंचवीस वर्षे काम केले. त्या दरम्यान, 22 ऑक्टोबर 1953 मध्ये त्यांचा विवाह प्रमिला दंडवते यांच्याशी झाला. प्रमिला यांनी मधू दंडवते यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनातच नव्हे तर राजकीय जीवनातदेखील अखेरपर्यंत साथ दिली.

दंडवते यांना तरुण वयातच राजकीय क्षेत्रातील कार्याची आवड निर्माण झाली. त्यांच्यावर ना.ग. गोरेएस.एम. जोशीसाने गुरुजी यांच्यासारख्या राजकीय नेत्यांचा प्रभाव पडला. दंडवते सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकवत असल्याने ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपर्कात आले. त्यातून आंबेडकरांच्या कार्यशैलीचाही प्रभाव त्यांच्यावर पडला. दंडवते यांनी वयाच्या अठराव्या वर्षी, 1942 मध्ये गांधीजींच्या चले जा’ चळवळीत भाग घेतला. त्याच सुमारास त्यांनी अच्युत पटवर्धनसाने गुरुजी यांच्या भूमिगत पत्रकांचे वितरण, ब्रिटिशांची दळणवळण प्रणाली विस्कळीत करणे यांसारख्या क्रांतिकारी कृतींमध्येदेखील भाग घेतला. रॉयल इंडियन नेव्हीच्या सैनिकांनी केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये मोर्चा निघाला, त्यातही दंडवते यांनी भाग घेतला. ते त्या वेळी झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले.

दंडवते यांचा जयप्रकाश नारायण यांच्याशी संपर्क 1942 मध्येच झाला. दंडवते जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी भारावून गेले. दंडवते यांचे तरुण मन जयप्रकाश नारायणराम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धनअरुणा असफ अली यांच्या समाजवादी विचारांनी प्रभावित झाले. ते काँग्रेस सोशालिस्ट पार्टीचे सभासद झाले. ते काँग्रेस सोशालिस्ट पार्टीच्या बाँम्बे विभागाचे सेक्रेटरी (1946) झाले. काँग्रेस सोशालिस्ट पार्टी राष्ट्रीय काँग्रेसचा एक भाग 1948 पर्यंत होती. त्याच वर्षी सोशालिस्ट विचारांच्या नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र सोशालिस्ट पार्टीची स्थापना केली. सोशालिस्ट पार्टीचे नाव पुढील काळात समविचारी पक्षांचे विलीनीकरण इत्यादी कारणांनी अनेकदा बदलले. परंतु दंडवते पक्षाशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिले.

दंडवते यांनी गोवा मुक्ती संग्रामात (1955) भाग घेतला. त्यांनी मुंबईहून निघालेल्या बाराशे सत्याग्रहींचे नेतृत्व केले. निदर्शनास सुरुवात 19 ऑगस्ट रोजी बांद्याजवळच्या नेतर्डा या गोव्याच्या सीमेवर झाली. आरंभीच्या मोहिमेसाठी त्र्याण्णव सत्याग्रही निवडण्यात आले. दंडवते यांनी त्या तुकडीचे नेतृत्व केले. त्यांनी हातात तिरंगी झेंडे घेऊन गोव्यात प्रवेश केला. ते सीमेच्या आत सात ते आठ किलोमीटर चालत गेल्यावर, गोवा पोलिसांनी तुकडीला अडवले. दंडवते यांनी पोलिसांना न जुमानता पदयात्रा चालू ठेवली. अखेर, पोलिसांनी तुकडीवर लाठीहल्ला केला. दंडवते जखमी झाले आणि मूर्च्छित होऊन पडले. तुकडीतील काही सहकाऱ्यांनी त्यांना उचलून बेळगाव मिलिटरी इस्पितळात आणले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार अनेक दिवस मुंबई येथे केले गेले.

दंडवते यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत (1956-57) भाग घेतला. मुंबईसहित मराठी भाषिक संयुक्त महाराष्ट्राची मागणी महाराष्ट्रातील जनतेने केली. लढ्याची सुरुवात 21 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथे सत्याग्रहींवर गोळीबारापासून झाली. त्यात एकशेसहा सत्याग्रही नाहक हुतात्मा झाले. दंडवते हे एस.एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली चळवळीत उतरले. दंडवते मुंबई प्रभागाचे सेक्रेटरी होते. त्यांना अटक करण्यात आली. पुढे, संयुक्त महाराष्ट्र समितीला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (1957) भरघोस यश आले. केंद्राने अखेर संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य केली.

दंडवते यांनी मुंबईमध्ये झालेल्या भूखंड मुक्ती चळवळीत (1960-70 चे दशक) महत्त्वाची भूमिका निभावली. समाजवादी पार्टीने शहरातील बड्या कारखानदारांनीं बळकावलेले भूखंड कामगार आणि सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. दंडवते यांना त्यात अटकही (1969) झाली. समाजवादी पार्टीने आणि पर्यायी दंडवते यांनी मिल मजदूर सभातसेच रेल्वेगोदी, BEST इत्यादी कामगार युनियनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. समाजवादी पार्टीने मुंबईमध्ये सहकारी संस्थांच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलला होता. अपना बाजारसारख्या ग्राहक संस्था; तसेच, गृहनिर्माणविणकामवित्तसंस्था इत्यादी क्षेत्रात सहकारी तत्त्वावर संस्थांच्या स्थापनेत समाजवादी पार्टीने महत्त्वाची भूमिका बजावली.

दंडवते निवडणुकीच्या राजकारणात 1970 साली उतरले. ते बॉम्बे पदवीधर मतदार संघातून विधानपरिषदेवर 1970 साली निवडून आले. परंतु लोकसभा निवडणुका एका वर्षातच, 1971 मध्ये जाहीर झाल्या. तेव्हा दंडवते यांनी विधान परिषदेचा राजीनामा देऊन केंद्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. समाजवादी पार्टीचे नाथ पै राजापूर मतदार संघातून लोकसभेवर निवडून येत असत. राजापूर हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला समजला जाई. नाथ पै यांचे 1971 मध्ये निधन झाले. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षाची लाट होती. समाजवादी पार्टीने राजापूरची जागा राखण्यासाठी दंडवते यांना राजापूरमधून निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. दंडवते 1971 च्या पाचव्या लोकसभेच्या निवडणुकीत राजापूरमधून भरघोस मतांनी विजयी झाले. महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी सत्तेचाळीस जागा काँग्रेसने जिंकल्या तर मधू दंडवते हे एकमेव उमेदवार विरोधी पक्षाचे म्हणून निवडून आले. मधू दंडवते यांनी त्यानंतर 1990 सालापर्यंत वीस वर्षे सलग पाच लोकसभा निवडणुका राजापूर मतदार संघातून जिंकल्या !

पाचव्या लोकसभेचा काळ (1971 ते 1977) हा दंडवते यांच्यासाठी संसदेच्या कारकिर्दीची सुरुवात होती. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तीनशेसाठ जागा मिळवून प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले होते. परंतु दंडवते यांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीवक्तृत्वकौशल्य आणि सामाजिक जाण या गुणांनी लवकरच एक लक्षणीय विरोधी नेता म्हणून नाव कमावले. त्यांनी अभ्यासपूर्वक आक्षेप सरकारच्या अयोग्य धोरणांवर वेळोवेळी घेतले. इंदिरा गांधी यांनी संस्थानिक आणि राजेरजवाडे यांचे मानधन (तनखेरद्द करणेदेशातील बँकांचे राष्ट्रीयीकरण यांसारखे समाजवादी निर्णय घेतले. परंतु दंडवते यांच्या मते हे निर्णय शेतकरी आणि कामगार यांच्या हिताकडे लक्ष देऊन घेतलेले नसून ते मतांचे राजकारण होय.

जयप्रकाश नारायण यांनी राजकारणात पुनःप्रवेश 1974 मध्ये केला. त्यांना जनतेचा भरभरून पाठिंबा मिळाला. त्यातच अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणूक अवैध ठरवली. त्या सर्वांचा परिणाम होऊन, इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. अनेक विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली. दंडवते यांना 25 जून 1975 रोजी अटक करण्यात आली. दंडवते अठरा महिने बंगलोर कारागृहात बंदिस्त होते. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी एकवीस महिन्यानंतर, 1977 साली उठवली. दंडवते यांचीदेखील इतर विरोधी नेत्यांसोबत सुटका करण्यात आली.

जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने जनता पक्षाची स्थापना 1 मे 1977 रोजी झाली. समाजवादी पार्टी जनता पक्षात विलीन इतर पक्षांसोबत झाली. दंडवतेदेखील जनता पक्षाचे सदस्य पार्टीनिर्णयास अनुसरून झाले. जनता पक्षाचा विजय 1977 च्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत झाला. दंडवते राजापूर मतदार संघातून पुन्हा निवडून आले. जनता पक्षाने मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. दंडवते यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देऊन त्यांच्याकडे रेल्वे खाते सुपूर्द करण्यात आले. दंडवते यांची कारकीर्द रेल्वे मंत्री या नात्याने गाजली. त्यांच्या सक्षम प्रशासनाचा बोलबाला देशभर झाला. मात्र मोरारजी देसाई यांचे सरकार केवळ अठ्ठावीस महिने टिकले.

दंडवते यांनी रेल्वे मंत्री म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मागील सरकारने काढून टाकलेले पाच हजार रेल्वे कर्मचारी आणि कामगार यांना परत नोकरीत घेण्याचा त्यांचा निर्णय धाडसी होता. दंडवते यांनी कामगारांना विश्वासात घेऊन त्यांची कार्यक्षमता वाढवली आणि पहिल्याच वर्षी रेल्वे नफ्यात आणली ! दंडवते यांनी कामगारांना विशेष बोनस दिला; त्याचबरोबर दंडवते यांनी डबल इंजिन गाड्यागाड्यांच्या सुरक्षिततेत सुधारणावर्गरहित गाड्यासर्व डब्यांत कुशन कव्हरची बाके अशा प्रवाशांना सोयीच्या व सुखकर काही सुधारणा अमलात आणल्या आणि केंद्र सरकारातील सर्वात सक्षम खाते हा बहुमान मिळवला.

काँग्रेसचा 1980 मधील सातव्या लोकसभेत विजय होऊन इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, तर आठव्या 1985 च्या लोकसभा निवडणुकांनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. दंडवते दोन्ही वेळांना राजापूर मतदार संघातून निवडून आले. राजीव गांधी यांच्या कार्यकाळात बोफोर्स प्रकरण पुढे आले. दंडवते यांनी विरोधी पक्षातर्फे त्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

व्ही.पी. सिंग यांचे सरकार डिसेंबर 1989 मध्ये निवडून आले आणि दंडवते यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. दंडवते यांच्याकडे त्या वेळी अर्थखाते आले. परंतु व्ही.पी. सिंग यांचे सरकार जेमतेम एक वर्षात कोसळले. दंडवते यांनी अर्थमंत्री या नात्याने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. दंडवते यांनी सोन्याचा साठा करण्यावर असलेली बंदी उठवली. त्यामुळे सोन्याचा काळा बाजार आणि तस्करी थांबली. बंदी उठवल्याने परकीय चलनाच्या मागणीत वाढ होईल ही भीतीदेखील फोल ठरली. दंडवते यांच्या काळात हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आला. तो घोटाळा आर्थिक व्यवहारातील पळवाटांचा फायदा घेऊन निर्माण केला गेला होता. दंडवते यांनी योग्य उपाय योजून त्या पळवाटा बंद केल्या. दंडवते यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनदेखील महत्त्वाची कामगिरी 1996 मध्ये बजावली.

दंडवते यांचा जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्था या धोरणाला विरोध होता. त्यांचे मत त्यात स्थानिक रोजगार नष्ट होईल आणि भारतासारख्या गरीब देशाला ती व्यवस्था हानिकारक आहे असे होते. ते विचार सर्वांना पटणार नाहीत. परंतु ते धोरण विसाव्या शतकात भारताच्या विकसनशील परिस्थितीत विचार करण्यासारखे होते. दंडवते यांचे समाजवादी विचार मान्य असोत अथवा नसोतत्यांची भारताच्या विकासाबाबतची आस्था आणि देशप्रेम निर्विवाद होते. दंडवते यांचे भारताच्या उभारणीतील योगदान अनन्यसाधारण होते यात वाद नाही. त्यांचा वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी 12 नोव्हेंबर 2005 साली मृत्यू झाला.

– गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com

About Post Author

4 COMMENTS

  1. स्वतंत्र भारताच्या संसदेतील सर्वच पक्षातील सर्वजण बुद्धिमान, आपापल्या क्षेत्रात झोकून देणारे होते. नाथ पै, मधु लिमये, अटलजी असे अनेक इतरही आणि महाराष्ट्रात एस. एम. ना. ग. गोरे, मृणाल गोरे असे सारेच देशप्रेमी आणि देशाच्या विकासात मोलाचं काम करणारे होते. या कुणीही राजकारणाचा व्यापार आणि व्यवसाय केला नाही. रेल्वेमंत्री झाल्यावर मधु दंडवते यांनी गाड्यांना सह्याद्री, सिंहगड, कोयना अशी सुंदर ओळख दिली.

    • सामाजिक विकासासाठी स्वतःला निःस्वार्थ भावनेने झोकून देणारी ही माणसे!

  2. सुंदर लेख व्यक्ती अन तिचे कर्तृत्व सांगणारा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here