पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे…
महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्
दाते आणि इतर चित्रा पक्षीय पंचांगे महाराष्ट्रात बहुतांश भागांत वापरली जातात, तर टिळक पंचांग हे प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी, आंजर्ले, कोळथरे, पंचनदी, दाभोळ या भागांत वापरले जाते. त्या गावांतील उत्सव टिळक पंचांगांप्रमाणे तिथीवार धरून साजरे केले जातात आणि तेथील ग्रामस्थ त्याचे कसोशीने पालन करतात. केळशी येथील महालक्ष्मी मंदिरातील उत्सव असो किंवा कोळथरे येथील कोळेश्वरचा उत्सव असो, ते प्रसंग टिळक पंचांगातील तिथीनुसारच होत असतात.
दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत, महाराष्ट्रातील सर्व पंचांगे किंबहुना संपूर्ण भारतातील पंचांगे ही सोळाव्या शतकात रचलेल्या ‘ग्रहलाघव’ या ग्रंथानुसार तयार केली जात. तो ग्रंथ गणेश दैवज्ञ या मराठी माणसाने रचला होता ! त्यानुसार ग्रहगणित करणे तुलनेने सोपे असल्याने तो ग्रंथ पंचांग गणितकर्त्यांमध्ये लोकप्रिय होता. गणित आणि खगोलगणित यांत अनेक क्रांतिकारक शोध सोळाव्या शतकापासून युरोपात लागले. तसेच, आकाशाचे वेध घेण्यासाठी नवनवीन दुर्बिणी उपलब्ध झाल्या. त्यामुळे युरोपातील तज्ज्ञांचे आकाशाचे गणितीय वेध अचूक नोंदले जाऊ लागले; तसेच, अनेक खगोलीय घटनांची गणितीय सिद्धता देणे शक्य झाले. ते ज्ञान भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी अंमलाबरोबर आले. तोपर्यंत भारतात पंचांग गणित हे प्रामुख्याने गुरु-शिष्य परंपरेने शिकवले जात असे.
सिद्धांत हा एक ग्रंथ प्रकार आहे. त्यात खगोल शास्त्र, आकाश निरीक्षणे यासाठीचे गणित, सिद्धांत लिहिणाऱ्यांचे स्वत:चे निरीक्षण या गोष्टी असतात. हा खगोलशास्त्राचा सिद्धांत प्रस्थापित करणारा ग्रंथ म्हणता येईल. या ग्रंथावरून थेट पंचांग करणे कठीण असते. त्यासाठी अशा ग्रंथातील प्रस्थापित सिद्धांतावर आधारित करण ग्रंथ करण्यात येतो. करण ग्रंथ हा केवळ पंचांग करण्यासाठी उपयुक्त गणित, खगोल यावर आधारित कोष्टके असा असतो. त्यामुळे पंचांग करणे सोपे असते. ग्रहलाघव हा एक करण ग्रंथ आहे. तो सूर्य सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ग्रहलाघव वापरुन केलेली पंचांगे एका अर्थी सूर्य सिद्धांतावर आधारलेली होती असे म्हणता येते. असेच आर्यभटचा आर्यसिद्धांत, ब्रम्हगुप्तचा ब्रम्ह स्फुटसिद्धांत, वराह मिहीर याने उल्लेख केलेले प्राचीन पाच सिद्धांत असे अनेक सिद्धांत भारतात प्रसिद्ध होते.
प्रथमच, त्या पारंपरिक ज्ञानाची तुलना आधुनिक गणिताचा अभ्यास करून आलेल्या आणि नवीन साधने वापरून प्राप्त केलेल्या निरीक्षणांशी केली जाऊ लागली. पंचांग गणित पारंपरिक आणि आधुनिक या दोन्ही पद्धतींनी शिकलेले लोक तशी तुलना करू शकत होते. त्यात प्रामुख्याने दोन व्यक्ती होत्या त्या म्हणजे प्रा.केरोपंत छत्रे आणि पं. बापू देव शास्त्री. त्या दोघांनी स्वतंत्रपणे पारंपरिक पंचांग गणित पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न आरंभले. सुरुवातीस, त्या दोघांना विरोध बराच सहन करावा लागला. पण तरुण उच्च शिक्षित जसजसे होऊ लागले तसतशा त्या सुधारणा स्वीकारल्या जाऊ लागल्या. त्या सुधारणा नेमक्या काय होत्या? 1. सौर वर्ष सूर्य सिद्धांतानुसार न घेता आधुनिक विज्ञानाने मोजल्याप्रमाणे घेणे (यात वास्तविक फार थोडा फरक आहे, याबद्दल सूर्य सिद्धांतकारांचे कौतुकच करण्यास हवे), 2. वसंत संपातास वार्षिक गती आहे, ती आधुनिक विज्ञानाने मोजल्याप्रमाणे 50.2 सेकंद अशी घेणे (ती सामान्यत: साठ सेकंद घेण्यात येत होती), 3. निरयन राशी चक्र आरंभ रेवती नक्षत्रातील झीटा या ग्रीक अक्षराने ओळखल्या जाणाऱ्या तारखेपासून करावा. या प्रमुख सुधारणा होत्या व त्यामुळे सण आणि उत्सव यांच्या तारखांमध्ये फरक पडणार होता !
केरोपंत यांनी इतर अनेक सुधारणाही सुचवल्या. त्यांतील शेवटची, झीटा अक्षराची सुधारणा वगळता बाकी सर्व पुढील काळात स्वीकारल्या गेल्या. पंचांग करणारे सर्वजण आधुनिक गणित शिकलेले नव्हते. त्यांना गणित आधुनिक प्रमाणे (मानके) वापरून करता यावे यासाठी केरोपंतांनी ‘ग्रहलाघवा’च्या धर्तीवर ‘ग्रहगणिताची कोष्टके’ हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक हे केरोपंतांचे शिष्य; त्याचप्रमाणे ते गणित, संस्कृत आणि पौर्वात्य विज्ञानाचे अभ्यासक व जाणकार. त्यांनी त्या सुधारणा पंचांगात झाल्याच पाहिजेत आणि ‘आमची पंचांगे फ्रेंच नाविक पंचांगांच्या तोडीची असलीच पाहिजेत’ असा आग्रह धरला व तशा प्रेरणेने पंचांग सुधारणा घडवून आणल्या. त्या सुधारणा करणे हे सांगली येथे लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली 1920 मध्ये झालेल्या परिषदेत सर्वमान्य झाले.
पुढील काळात पंचांग गणित हे आधुनिक साधने वापरून केले जाऊ लागले. गेली काही वर्षे तर संपूर्ण पंचांग हे संगणकाच्या मदतीने मांडले जाते. त्यासाठी लागणारे खगोलीय स्थिरांक आणि गणितीय पद्धती भारत सरकारतर्फे कोलकाता येथील ‘पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी’ ही संस्था प्रकाशित करते. त्यामुळे सर्व पंचांगांत एकवाक्यता आढळते. या सगळ्या सुधारणा पंचांगकर्ते हळुहळू स्वीकारू लागले आहेत आणि सर्व पंचांगे गणितीय व खगोलीय दृष्ट्या अचूक आहेत. लोकमान्यांचे ते स्वप्न सत्यात उतरले आहे. त्या अर्थाने प्रसिद्ध होणारी सर्वच पंचांगे ही एका अर्थी ‘टिळक पंचांगे’ आहेत. पंचांगात दर्शवलेल्या तिथी, नक्षत्र, ग्रहांच्या स्थिती, गती; तसेच, सूर्य-चंद्र ग्रहणांच्या वेळा या वास्तविक असून त्यात कोणताही फरक राहिलेला नाही.
मग प्रश्न असा उरतो, की केरोपंत छत्रे यांनी सुचवलेल्या सर्व सुधारणा अंमलात आल्या पण नक्षत्र चक्र आरंभ हा रेवती नक्षत्रातील झीटा ताऱ्यापासून करावा ही सूचना काही सर्वमान्य झाली नाही. लोकमान्य असतानादेखील त्या सूचनेस लोकांचा विरोध होता आणि तो पुढे तसाच राहिला. त्याचे कारण म्हणजे त्या सूचनेचा स्वीकार केला असता तर, ‘अधिक’ महिने मोजण्याच्या पद्धतीत फरक येईल आणि त्यामुळे लोक नवीन कोणत्याच सुधारणा पंचांगात स्वीकारणार नाहीत. त्यामुळे सर्वजण ती सूचना वगळून बाकी सुधारणा करण्यास तयार झाले. त्यांतील अग्रणी म्हणजे व्यंकटेश बापुजी केतकर.
व्यंकटेश बापुजी केतकर यांनी एक आकाशीय बिंदू कल्पिला. तो बिंदू जुन्या सूर्य सिद्धांत नक्षत्र चक्र आरंभाजवळ आहे. चित्रा नक्षत्रातील स्पायका ताऱ्यापासून 180 अंशांवर येतो. त्यामुळे त्या पद्धतीला चित्रा पक्ष असे म्हणतात. त्यामुळे व्यवहारात कोणताच नजरेत भरणारा फरक पडणार नव्हता, त्यामुळेच ती पद्धत सर्वांना मान्य झाली. पुढील काळात रेवती पक्ष आणि चित्रा पक्ष या दोन्ही पक्षांच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या पक्षांच्या समर्थनार्थ अनेक पुरावे सादर केले. त्यांचा मुख्य उद्देश पूर्वी झालेल्या वराहमिहीर, आर्यभट्ट; तसेच, इतर सिद्धांत ग्रंथकारांना कोणता नक्षत्र चक्र आरंभ अपेक्षित होता हे सांगणे. परंतु ते पुरावे नि:संदिग्ध नसल्याने कोणताच दावा पूर्णपणे मान्य होऊ शकला नाही. शेवटी, भारत सरकारने स्थापन केलेल्या कॅलेंडर रिफॉर्म कमिटीने चित्रा पक्षास मान्यता देऊन त्या वादावर पडदा टाकला.
असे असूनसुद्धा रेवती पक्षाचे अभिमानी त्यावर आधारित टिळक पंचांग वापरतात. त्या पंचांगानुसार ‘अधिक’ मास, ‘क्षय’ मास यात फरक पडतो आणि त्यामुळे सर्वच नाही पण काही वर्षांत टिळक पंचांगाच्या आणि चित्रा पक्ष पंचांगांच्या सणांच्या तारखांमध्ये फरक पडतो. तो फरक अधिक महिन्याच्या गणनेमुळे पडतो. त्यामुळे काही वर्षी (उदा. सन 2012) टिळक पंचांगानुसार गणपती ऑगस्ट मध्ये बसले आणि दाते पंचांगानुसार सप्टेंबरमध्ये ! तोच प्रकार दिवाळीच्या बाबतीत घडताना दिसतो. मग स्वाभाविक प्रश्न हा पडतो की नक्की खरे पंचांग कोणते, टिळक की दाते? वास्तविक, दोन्ही योग्यच. आपण मोजण्यास सुरुवात कोठून करतो यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे गणितीय दृष्टिकोनातून पाहता दोघांत फरक काही नाही. पण पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. त्यामुळे त्या दृष्टीने अशा विसंगती लोकांमध्ये भ्रम निर्माण करतात. तेव्हा वाद विसरून सर्वांनी एकच प्रमाण मानून धार्मिक आचरण करणे योग्य.
– मंदार दातार 9422615876 m.datar76@gmail.com
——————————
नमस्कार सर, आपला लेख विषयाबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
त्याच अनुषंगाने ज्योतिषशास्त्रात सायन आणि निरयन कुंडली बाबत मतभेद आहेत. तरी आपल्या आधुनिक पध्दतुनुसार ग्रहस्थिती साठी कोणती पध्दती वापरणे योग्य होईल?
टिप – मला दिलेल्या वेळेनुसार, दिलेल्या स्थानाशी निगडित ग्रहस्थिती माहिती करुन घ्यायची आहे. या प्रश्नाचा फलज्योतिषाशाशी कोणताही संबंध नाही.