किरण भावसार हे वडांगळी, तालुका सिन्नर (नाशिक) येथील रहिवासी आहेत. ते कवी-ललित लेखक आहेत. त्यांच्या ‘शनिखालची चिंच’ या ललित लेखाने चमत्कार घडवून आणला. ई-साहित्य प्रतिष्ठानने त्यांचे त्याच नावाचे पुस्तक प्रकाशित केले. ते इंग्लंडमधील सुधीर बर्वे यांनी वाचले. बर्वे त्या लेखाने प्रभावित झाले. त्यांनी किरण भावसार यांना कळवले, की “तू लिहिलेल्या चिंचेच्या झाडाची पिल्ले जर ठिकठिकाणी लावलीस तर किती झाडे तयार होतील!” किरण यांनी मधुकर गीते या मित्राच्या मदतीने दीडशे झाडे लावता येतील अशी जागा शोधली. झाडे लावण्याच्या कामास पंचवीस हजार रुपये खर्च अपेक्षित होता. किरण यांनी तसा मेसेज सुधीर बर्वे यांना पाठवला. बर्वे यांनी उलट मेसेजने एकवीस हजार रुपये पाठवले. किरण यांनी त्यानुसार मेंढी गावात ‘जयहिंद विकास संस्थे’च्या जागेवर चिंचेची झाडे लावली. ही किमया एका ललित लेखाने घडून आली.
किरण भावसार यांनी लॉकडाऊनच्या काळात त्यांचे निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील संस्थाचालक मित्र रवींद्र गोरडे यांच्या सांगण्यावरून कोरोना जनजागृती संबंधी गीत लिहिले. गोरडे हे स्वतः संगीतकार असल्याने त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी ते संगीतबद्ध केले. भावसार यांच्या त्या गीताचे बघता बघता एक गमतीदार पण प्रभावी व्हिडियोगीतच घडले. (सोबत व्हिडियो)
क करी ‘कटकट’ व ला वाटे ‘वटवट‘
गुबूगुबू खातेस अशी बरे दिसत नाही ठेवतील ना नावे लोक तुला वाटते का काही
त्यातून त्यांचे ‘स्वप्नवेड्या पंखांसाठी’, ‘आपडी थापडी’ आणि ‘इरिंग मिरींग’ हे तीन बालकवितासंग्रह छापील पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाले. त्यांच्या कवितांना ठिकठिकाणी विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना त्यांची कवी म्हणून नासिक जिल्ह्यात ओळख झाल्यामुळे विविध शाळांत कार्यक्रमांसाठी बोलावले जाते. त्यांनी एक बाल कादंबरी लिहिली आहे. तीही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ते सांगतात, की त्यांच्या आजीच्या तोंडी म्हणींचा साठा होता, दर वाक्यागणिक तिच्या तोंडून म्हण बाहेर पडायची. त्या म्हणींचा त्यांच्यावर संस्कार झाला.
त्यांनी आयटीआय झाल्यानंतर ‘सकाळ’ आणि ‘लोकमत’मध्ये पत्रकारिता केली. त्यावेळी विविध संपादकांकडून भावसार यांच्यावर लेखनाचे, शिस्तीचे व वक्तशीरपणाचे संस्कार झाले असे ते म्हणतात. त्यांनी पत्रकारिता करताना वडांगळी गावातील महत्त्वाच्या गोष्टी प्रकाशात आणल्या. सतीदेवीच्या यात्रेत बंजारा समाजातील लोक येतात आणि बोकडबळी देतात ही कुप्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले. त्याला वर्तमानपत्रातून प्रसिद्धी दिल्यामुळे गावकऱ्यांकडून विरोध झाला. त्यांच्या गावी जावयाची धिंड काढण्याची प्रथा आहे तिलाही त्यांनी वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिली. भावसार हे उपक्रमशीलही आहेत. त्यांनी पाहिले, की गावात शिमग्याला चार म्हातारे लोकगीते म्हणतात, ती फक्त त्यांनाच येतात. त्यांच्यासोबतच्या इतरांना ती पाठ नाहीत. ती लोकगीते त्या म्हाताऱ्यांनंतर नष्ट होतील, त्यामुळे त्यांनी त्या गाण्यांचे मोठ्या परिश्रमाने पुस्तिका प्रसिद्ध केली व अलीकडे त्यांचे रेकॉर्डिंग करून घेतले. ती गीते गावातील पिढी वाचून/ध्वनिफीत ऐकून शिमग्याच्यावेळी म्हणते व अशाप्रकारे प्रथा साजरी केली जाते. टिप्परघाई – वडांगळी गावचा शिमगाया ‘थिंक महाराष्ट्र’वरील लेखाच्या लिंकवरून ती गीते वाचता-ऐकता येतील. (सोबत व्हिडियो)
भावसार यांच्या मोठ्यांसाठी असलेल्या कवितांचे विषय कामगार आणि शेतकरी हे आहेत. त्यांचे दु:ख, त्यांच्या वेदना, त्यांची सामाजिक जाणीव यांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटले आहे. किरण यांच्या या कवितांसाठी सार्वजनिक वाचनालयाचा प्रतिष्ठेचा कवी गोविंद काव्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांनी मराठी साहित्याच्या प्रेमापोटी एमए मराठी केले आहे.
वडांगळीचे ‘दिग्विजय कला क्रीडा साहित्य केंद्र’ आणि गावातील वाचनालय यांच्या उभारणीत किरण यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. (सोबत व्हिडियो) ते वाचनालय त्यांच्या समवयस्क तरुणांनी सुरू केले. त्यासाठी डॉ.चतुर्भुजी राठी यांनी लाकडी कपाट दिले, ग्रामपंचायतीने जागा दिली. त्या वाचनालयासाठी कुसुमाग्रजांनी पुस्तके दिली होती. त्याचा किस्सा ते सांगताना म्हणाले, की त्यांच्या कानी आले, की कुसुमाग्रज त्यांच्याकडील पुस्तके वाचनालयांना देतात. एके दिवशी, मित्रमंडळींसोबतकिरण भेट न ठरवता कुसुमाग्रजांच्या घरी गेले. त्यांनी त्यांच्यासमोर धडाधड आम्ही गावात किती चांगली कामे करत आहोत असे नाट्यपूर्णरीत्या सांगितले. कुसुमाग्रजांनी सर्व ऐकून घेतले आणि ते म्हणाले, “झाले तुमचे सांगून? हे बघा, पलंगाखाली जो गठ्ठा बांधलेला आहे तो उचला आणि पळा. पुस्तकांची यादी गेल्यांनतर बनवायची आणि पुस्तके मिळाल्याची पोच पाठवायची” असे त्यांनी बजावले. ते वाचनालय आजही सुरू आहे. त्यावेळी त्यांनी गावात वाचनालयाच्या माध्यमातून व्याख्याने, कविसंमेलने प्रत्येक महिन्याला आयोजित केली व गावकऱ्यांना भजन-कीर्तनाच्या पलीकडे काही वेगळे ऐकण्याची सवय लावली.
ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या ‘नाशिक जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी तेथील यात्रा, प्रथा-परंपरा, कर्तृत्ववान व्यक्ती यांविषयी लेखन केले. ते म्हणतात, “थिंक महाराष्ट्रमुळे मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. गावागावात कर्तबगार माणसे आहेत, त्यांची धडपड नोंदून ठेवावी ही दृष्टी मला ‘थिंक महाराष्ट्र’मुळे लाभली”. त्यांचे सध्या लॉकडाऊनच्या काळात सिन्नर तालुक्याच्या एका गावातील एका सामान्य कार्यकर्त्याच्या जीवनकार्यावर चरित्र लिहिण्याचे काम चालू आहे.
———————————————————————————————-
वा खुपच कल्पकता .चिंचेच्या झाडलंसाठी किरणजी व बर्वे यांचे अभिनंदन .लेख वाचुन असे वाटले परत लहान होऊ आणि त्यांचे सगळे बालसाहित्य वाचु
किरण भावसार जी, आपल्यावरील हा लेख वाचून खूपच आनंद झाला. आपल कौतुक करावं तेवढं कमीच आहे, एवढ्टुमच काम आहे. सोप्या सहज कविता मस्त आहेत. थिंक mhaaraashtraache, श्री गांगल यांचं ही कौतुक. अशी वेगवेगळी तुफान डोक्याची माणसं शोधत रहायचं v त्याच्या बद्दल लिहीत बसायचं हे सोप्प काम नाही. धन्यवाद.
Great!Hangal Saheb hats off to you !!!
मनोरजंक व बाल उपयोगी आहे
किरणजी, अभिनंदन.आपला वड़ांगळीवरून निघालेला मुळावरच्या मातीचा साहित्य प्रवास इंग्लंड पर्यंत पोहचला.आपलं व्यावसायिक व साहित्यिक जीवन यांची सुयोग्य सांगड़ घालून आपण दैदीप्यमान प्रवास चालू ठेवला आहे. तेही इरिंग-मिरिंगच्या बालगोपाळांना सोबत घेऊन. .खरंच एक साहित्यिक व व्यावसायिक मित्र म्हणून मला सार्थ अभिमान वाटत आहे..पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
किरण खरोखर एक सामाजिक भान ठेवुन वेगवेगळ्या कार्यात भाग घेऊन तु स्वताला फारच मोठं बनवलंस, काव्य करत तु सामाजाची पण जवळीक वाढवलीस आणि लहानांचा तर चाहताच झालास कोरोना वर लिहिले गीत तर सुंदरच आहे.असेच अनेक काव्य आणि कार्य तुझ्या हातुन घडोत हिच सदिच्छा
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ji thank you.खूप खूप अभिनंदन किरण दादा. अप्रतिम लेख आहे.- हबीब निफाड