काळे-पाटील यांचे सोपे गणित (Kale-Patil teachers make Mathematics easy for students)

0
371

गणित हा साऱ्या तर्कबुद्धीचा पाया असतो. गणिताला सोपे करणारे एन.डी. पाटीलसर आमच्या दहिवडी जिल्हा परिषद शाळेत आहेत. त्यांचे ते कौशल्य आमच्या शाळेपुरते मर्यादित का ठेवावे असा विचार मनात आला आणि मग आम्ही गणिताला सुलभ बनवण्यासाठी मार्गदर्शन करणारे यू ट्यूब चॅनल 2017 सालापासून सुरू केले- Ajay Kale- Tech Guru या नावाने !! तंत्रज्ञानाच्या या आमच्या प्रवासाची सुरुवात झाली 2009 साली. मी आणि पाटीलसर पहिलीच्या अभ्यासक्रमासाठीचे प्रशिक्षण घेण्याकरता गेलो होतो. ते सरकारच्या शिक्षण विभागातर्फे होते. आम्हा दोघांच्या शाळा तासगाव तालुक्यातच मात्र वेगवेगळ्या होत्या. मी सिद्धेवाडीच्या प्राथमिक शाळेत होतो, तर पाटीलसर वायफळेच्या शाळेत. त्या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकांनी आम्हांला एक प्रश्न विचारला, “घरात पडलेली गाडगी-मडकी, चाक, मातीने मळलेले कपडे पाहून कुंभाराचं घर सहज ओळखू येते. शिक्षकाचं घर समाजात असं वेगळं ओळखता येईल का? त्यासाठी काय करावं लागेल?”

त्या प्रश्नाने आम्हाला विचारात पाडले. आम्ही ज्ञानदानाचे काम करतो, विद्यार्थ्यांना घडवतो, तर मग आमच्या घरी काही वेगळे चित्र दिसते का? शिक्षक म्हणून आम्ही आमचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यास हवे, वेगवेगळ्या विषयांची किमान शंभरेक पुस्तके, उत्तमोत्तम मासिके, जागतिक दर्ज्याचे चित्रपट आमच्या संग्रही हवेत. आधुनिक काळाच्या अनुषंगाने मुलांना घडवायचे असेल, तर या काळाची गरज बनलेला कॉम्प्युटरही शिक्षकाच्या घरी हवा याची जाणीव झाली. आम्ही भरपूर वाचले पाहिजे, चांगले ऐकले पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे, तरच चांगले शिक्षक म्हणून आम्ही काम करू शकू हे आम्हांला पटले.

एन. डी. पाटीलसर गणित शिकवताना

मी आणि पाटीलसर त्या प्रशिक्षणातून नवीन दृष्टी घेऊन बाहेर पडलो आणि आम्ही स्वत:च्या कमाईतून सर्वप्रथम दोन लॅपटॉप 2009 मध्येच खरेदी केले. त्यासाठी आम्हांला सत्तर हजार रुपयांचा खर्च आला. आम्ही मुद्दाम डेस्कटॉप कॉम्प्युटरऐवजी लॅपटॉपची निवड केली, कारण लॅपटॉप आम्हाला शाळेत आणि घरी, दोन्ही ठिकाणी सहज उचलून नेता- आणता येणे शक्य होते. शिवाय गावाकडील विजेच्या सततच्या भारनियमनामुळे घरून एकदा चार्ज केलेला लॅपटॉप शाळेत किमान तीन तास, वीज पुरवठा नसतानाही वापरणे शक्य होणार होते. लॅपटॉप हा आम्ही त्यावेळी केलेला खर्च जादाचा नव्हता, तर ती योग्य गुंतवणूक होती हे वेळोवेळी सिद्ध होत आहे.

क्यूआर कोड मुलांच्या पुस्तकास चिकटवताना

आम्ही दोघे आमच्या शाळांत लॅपटॉपचा वापर करून अभ्यासक्रमाच्या सीडी दाखवत असू. पण नव्वद मिनिटांत पूर्ण पुस्तक संपवणाऱ्या त्या सीडी काही मुलांना फार मार्गदर्शक ठरत आहेत असे आम्हांला वाटेना. त्यामुळे मग आम्ही शाळेत वेगवेगळ्या पाठांवरील पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करून वर्गातील मुलांना दाखवू लागलो. उदाहरणार्थ, इतिहासातील ‘पन्हाळगडास वेढा’ आणि ‘बाजीप्रभूंचा पराक्रम’ हे पाठ शिकवण्याचे असतील तर कोल्हापूर जिल्हा, पन्हाळगड, सिद्दी जोहरने दिलेला वेढा, शिवाजी महाराजांचा वेष घेणारे शिवा काशिद आणि छत्रपती शिवराय विशाळगडावर पोचेपर्यंत जिद्दीने घोडखिंड लढवणारे बाजीप्रभू देशपांडे ही सगळी कथा आम्ही शक्य त्या फोटो आणि व्हिडिओ, संगीत यांच्या सहाय्याने सांगून घोडखिंडीचे नाव पावनखिंड कसे झाले हे समजावावत असू. विद्यार्थ्यांनाही ते सगळे आवडे.

विद्यार्थी क्यूआर कोडचा वापर करून व्हिडिओ पाहतात

पुढे, गावोगावी इंटरनेट पोचले आणि आम्ही वेगवेगळे विषय शिकवताना इंटरनेटचा उपयोगही करू लागलो. दरम्यान, पाटीलसर दहिवडीच्या शाळेत 2014 मध्ये रूजू झाले आणि मी सुद्धा त्याच शाळेत 2016 साली दाखल झालो. एन.डी. पाटीलसर म्हणजे गणित सोपे करून शिकवणारा जादूगार, अशी त्यांच्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांची भावना असते. पाटीलसरांचे सुमारे सतरा वर्षांचे ज्ञान आणि गणित सोपे करण्याची हातोटी त्यांच्या शाळेपुरती मर्यादित ठेवणे मला योग्य वाटेना. मला तंत्रज्ञानाची आवड आहे. मी पाटीलसरांच्या गणिताच्या छोट्या छोट्या क्लृप्त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण स्मार्टफोनच्या साहाय्याने करू लागलो. ते व्हिडिओ आमच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून प्रोजेक्टरवर मुलांना दाखवू लागलो. तो प्रयोग मुलांना फारच आवडला. पारंपरिक पद्धतीच्या वह्या- पुस्तके तुलनेने निरुपयोगी वाटू लागली. मुले विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले ते व्हिडिओ पाहून गणिताचा तो घटक समजून घेण्यात रंगून जात.

आमचा तो प्रयोग तासगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनाही आवडला. मग कल्पना सुचली- यू ट्यूब चॅनेलची !! मला यू ट्यूब चॅनल सुरू करताना शिक्षण विभागातर्फे झालेली तंत्रस्नेही शिक्षकांची प्रशिक्षणे, त्यात उपक्रमशील शिक्षकांशी झालेली ओळख, त्या तंत्रस्नेही शिक्षकांचे ब्लॉग या सगळ्याचा उपयोग झाला. मी यू ट्यूब चॅनेल कसे सुरू करावे, ते कसे चांगले बनवावे हे ऑनलाईन ट्युटोरियलमधूनच शिकलो. आणि मग आकाराला आले आमचे- Ajay Kale- Tech Guru चॅनेल. मी या यू ट्यूब चॅनेलचे चित्रीकरण, संकलन, संपादन यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि एन.डी. पाटीलसरांनी गणितासारख्या अवघड मानल्या गेलेल्या विषयाला मराठीतून सोपे करण्याचे आव्हान पेलले.

गणिताचा अभ्यास फक्त घोकंपट्टी करून होत नसतो, त्यातील नियम-सूत्रे फक्त पाठ करण्यापेक्षा ते नियम तसे का आहेत, त्यामागची कारणे- तर्क काय ते समजावले, की गणित सोपे होते असे पाटीलसर मानतात. त्यामुळे आमच्या यू ट्यूब चॅनेलवर ‘एक’ ही संख्या संयुक्त नाही आणि मूळ संख्याही नाही, त्या पाठीमागील कारण, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढताना नेहमी एक द्वितियांशच (1/2) का वापरतो किंवा पायची (π) किंमत नेहमी 22/7 किंवा 3.14 च का घेतात, भागाकाराची सुरुवात नेहमी डावीकडून का करावी, अशा अनेक ‘का?’ ची उत्तरे या यू ट्यूब चॅनेलवर मिळतील. त्याशिवाय भागाकार करताना होणाऱ्या सामान्य चुका, 2 ते 10 चे पाढे वापरून पुढील कोणत्याही संख्येचा पाढा कसा तयार करावा, अपूर्णांकाचा लहान-मोठेपणा ठरवण्याच्या सोप्या पद्धती, गुणोत्तर आणि प्रमाण कसे ठरवावे, सरळव्याज कसे काढावे, अपूर्णांकांचा गुणाकार- भागाकार सोप्या पद्धतीने कसा करावा अशा अनेक गोष्टींच्या सोप्या युक्त्या पाहण्यास मिळतील. यू ट्यूब चॅनेलवर जसे कोन आणि कोनाचे प्रकार यांसारखे पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारे व्हिडिओ आहेत तसेच अगदी एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडणारे त्रिकोणी संख्येबाबतच्या प्रश्नांवरील मार्गदर्शनही आहे.

Ajay Kale- Tech Guru हे यू ट्यूब चॅनेल शिक्षकांना गणिताचा बागुलबुवा कसा दूर करावा हे शिकवते आणि विद्यार्थ्यांना ‘अवघड सोपे झाले हो’ म्हणण्यास लावते !

‘थिंक महाराष्ट्र’ टीमशी बोलताना पाटील म्हणाले, की ते सोशल मीडियावर फार ‘अॅक्टिव्ह’ नाहीत. किंबहुना ते शाळेच्या वेळात फोन सायलेंटवर ठेवतात. ते गणितासंबंधात मात्र जागरूक आणि तत्पर असतात. त्यांचा गणित मंडळ नावाचा गणित शिक्षकाचा ‘व्हॉट्स अॅप ग्रूप’ आहे. त्याचे दोनशे सभासद आहेत. त्याबाबत बोलताना मात्र पाटीलसर उत्साहात येतात व गणिताच्या गमतीजमती सांगू लागतात. ते व्हिडिओ चॅनेलबाबत म्हणतात, की त्याचा प्रतिसाद चांगला असतो. विशेषत: स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी वेगवेगळ्या शंका, प्रश्न उपस्थित करत असतात. मी रोज रात्री ‘व्हॉट्स अॅप’वर सर्व शंकांना उत्तरे देतो. एरवी पाटीलसर धिम्मे-शांत असतात आणि काळेसर त्यांची कामगिरी उत्साहाने सांगत असतात- त्याबाबत लिहीत असतात.

काळे-पाटील हे दोघेही बालमित्र. ते एका शाळेत शिकले, एकत्र खेळले- एकत्र अभ्यास केला. त्यांना नोकऱ्याही एका शाळेत मिळाल्या. त्यामुळे त्या दोघांची जोडी अभंग राहिली आहे. दोघांचे छंदही एक आहेत. काळे व पाटील हे त्यांच्या मित्रांसमवेत खूप फिरतात. त्यांची भटकंती आतापर्यंत न ठरवता झाली असे ते सांगतात. ते आणि तिघे-चौघे मित्र असे त्यांनी भारताचे एकेक राज्य फिरण्याचे ठरवले आहे. काळे यांच्या पत्नी- शुभांगी गृहिणी आहेत. त्यांची मुलगी तिसरीला आहे. तर पाटील यांची पत्नी माधुरी यासुद्धा गृहिणी असून त्यांना दोन मुले आहेत.

एन.डी. पाटील

अजय काळे शिकवतात दहिवडी (ता. तासगाव, जिल्हा – सांगली) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गास. ते तंत्रज्ञान प्रवीण शिक्षक आहेत. त्यांचे शिक्षण एम ए, बी एड, डी एड व डीएसएम असे झाले आहे. त्यांनी ई-लर्निंगच्या कामास 2009 पासून सुरुवात केली. त्यांनी तेथपासून विविध तऱ्हेचे उपक्रम केले, त्यांना 2019 मध्ये NCERT चा (नवी दिल्ली) नॅशनल अॅवार्ड फॉर इनोव्हेशन हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याच साली त्यांना एससीइआरटीतर्फे (पुणे) घेतलेल्या नवोपक्रम स्पर्धेत जिल्ह्यात पहिला क्रमांक आला आहे. काळे यांना विविध संस्थांचे राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

अजय काळे

त्यांना सर फाउंडेशनचा इनोव्हेटिव्ह टिचर्स पुरस्कार 2018, 2019 व 2020 असा सलग तीन वर्षे मिळाला आहे. त्यांना VIPNET (भारत सरकार विज्ञान प्रसार नेटवर्क), रामन विज्ञान आणि तंत्रज्ञान फाउंडेशन, नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट यांच्या मार्फत आयोजित स्पर्धेत साराभाई शिक्षक वैज्ञानिक राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्यांचे लेखन जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, साधना, जडणघडण आदी मासिकांत प्रसिद्ध झाले आहेत.

नंदकिशोर दिनकर (एनडी) पाटील हेही त्याच शाळेत सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवतात. त्यांना तालुका स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार 2008-09 साली मिळाला आहे. त्यांना गणित अध्यापनाचा वीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांची प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ख्याती आहे. त्यांना एससीइआरटीच्या (पुणे) नवोपक्रम स्पर्धेत चौथा क्रमांक (2019-20), ‘सर’ फाउंडेशनचा इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार (2019), गणित ई-साहित्यनिर्मितीसाठी निवड (जिल्हा परिषद, सांगली) असे अन्य सन्मान लाभले आहेत.

एन.डी. पाटील 9975122727 ndpndp78@gmail.com

अजय काळे 9921689468 kajay1877@gmail.com
जिल्हा परिषद शाळा दहिवडी, ता. तासगाव, जि. सांगली.

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here