देविदास गुंजकर या शिक्षकांकडे सहा हजार शिक्षकांनी जाऊन त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे ! ते कसले? तर पहिलीचे विद्यार्थी दहावीच्या पुस्तकातील शब्द कसे लिहू शकतात ते रहस्य त्यांनी सांगावे याबाबतचे. शिक्षक चांगली शाळा बघण्यासाठी गावोगावी जात असतात, पण सहा हजार शिक्षक दिवसभर थांबून दुसऱ्या शिक्षकाकडून अध्यापन तंत्र जाणून घेत आहेत हे प्रथमच घडत आहे. गुंजकर हे हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील तरोडा या छोट्या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. गुंजकर म्हणाले, की हा सिलसिला दहा वर्षे चालू आहे, पण गेल्या पाच-सात वर्षांत ती चळवळच होऊन गेली आहे ! गुंजकर गुरुजींची कार्यशाळा काय असते? शिक्षक आरंभी मोठ्या संख्येने गुंजकर यांना बघण्यास येत असत, पण त्यांनी ज्या पद्धतीने शिकवले ते केवळ भेट देऊन समजत नसे. म्हणून गुंजकर भेटीस येणाऱ्या शिक्षकबंधूंना प्रत्यक्ष शिकवून दाखवू लागले. त्यातून तेथे कार्यशाळाच सुरू झाल्या ! गुंजकर यांनी परभणी, यवतमाळ, नांदेड, वाशीम जिल्ह्यांतील सहा हजार शिक्षकांच्या दोनशेत्र्याऐंशी कार्यशाळा घेतल्या असे सांगितले. त्यांची मुलांची शाळा सकाळी असते. त्यामुळे ते दुपारी दोन नंतर इतर शिक्षकांना भेटीची वेळ देऊ शकतात.
गुंजकर तरोडा शाळेत येण्यापूर्वी ती त्या परिसरातील निकृष्ट शाळा म्हणून गणली जात असे. स्थानिक पालकांनी मुले शिकण्यास बाहेरगावी टाकली होती. निम्मी मुले दिवाळीनंतर पालकांसोबत ऊसतोड कामावर स्थलांतर करत. गुंजकर तेथे आल्यावर त्यांनी पालकांच्या भेटी घेऊन त्यांना मुले नातेवाईकांकडे शिकण्यास ठेवा पण गावातच ठेवा. अशी विनंती केली. गुंजकर यांनी जी मुले थांबली त्यांना शैक्षणिक साहित्य दिले.
गुंजकर मराठी व इंग्रजी विषय नेमके कसे शिकवतात? सुरुवातीला चित्र दाखवणे, नंतर त्याचे नाव दाखवणे, प्रत्येक शब्दाचे अवयव जोडण्यास लावणारे कार्ड, जोडाक्षराचे कार्ड, ‘र’च्या खुणांचे सराव कार्ड असा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. इंग्रजी विषयातही तशाच प्रकारे चित्र दाखवून, नंतर शब्दकार्ड दाखवून सराव घेतला जातो. गुंजकर यांच्याकडे मराठी, इंग्रजी अशी प्रत्येकी सहाशेपेक्षा जास्त शब्दकार्डे आणि किमान पाचशे वाक्यकार्डे आहेत. त्यातून मुलांचा सराव होतो. मुलाखत तंत्र, प्राणी-पक्षी यांच्याशी गप्पा, निर्जीव वस्तूंसोबत गप्पा, वाहनांचे एकमेकांशी संवाद अशा वेगवेगळ्या कल्पना राबवून भाषेचा विविधांगी वापर करण्यास शिकवले जाते. मुलांच्या इंग्रजी विषयातील क्षमता विकसित झालेल्या बघून बावीस पालकांनी त्यांचे पाल्य इंग्रजी शाळेतून गुंजकर यांच्या शाळेत घातले. गुंजकर म्हणाले, की मी भारतीय राज्यघटनेतील दोन हजार शब्द एकत्र करून त्यांचाही सराव घेतो. त्यातून मुलांना राज्यघटना वाचावीशी वाटते !
गुरुजींनी विद्यार्थ्यांचे मराठी, इंग्रजी हस्ताक्षर सुधारावे यासाठी कागदावर लेखनाचे नमुने टिंबाटिंबांनी तयार केले. त्यांचे तक्ते बनवले. मुलांनी त्यावर गिरवणे सुरू केले. प्रत्येक मुलाला किमान पंधरा कागद दिले जातात. त्यांचे अनुलेखन घेतले जाते. त्यांचा सराव रांगोळीने वा मातीवर लिहिण्याचा घेतला जातो. अनुलेखन, श्रुतलेखन यांमधून मुलांचे अक्षर सुंदर होत जाते.
गुरुजींचा वेळ शाळेत बराच जातो. ते अनेकदा शाळेत सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असतात. ते शैक्षणिक साहित्य बरेच बनवत राहतात. ते विद्यार्थ्यांची सर्व विषयांची चाचणी रविवारी घेतात व पालकांना निकाल कळवतात. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढतो.
गुरुजी म्हणतात, की सरावाला प्राथमिक स्तरावर खूपच महत्त्व आहे. जो शिक्षक वेगाने शिकवेल त्याचे विद्यार्थी हळुहळू शिकतील आणि जो शिक्षक हळुहळू शिकवेल त्याचे विद्यार्थी वेगाने शिकतील, असे हे उलटे सूत्र आहे. ते पुढे सांगतात, की इतर व्यवसायांत फक्त ती व्यक्ती विकसित होते, पण शिक्षकी व्यवसायात शिक्षकासोबत समाजही विकसित करता येतो, म्हणून तर मी शिक्षक झालो व म्हणूनच हे सारे उद्योग करतो. गरीब कुटुंबातील मुलांना खूप चांगले शिक्षण मिळावे या धडपडीतून मला हे काम करावेसे वाटते.
गुंजकर गुरुजींची कळमनुरीची शाळा दोन शिक्षकी आहे. ती 2000 सालापासून ग्रामपंचायतीकडे आहे. कोरोनानंतर शाळेत एकावन्न विद्यार्थी आहेत. पटावर चौऱ्याहत्तर मुले होती, पण ती आजुबाजूच्या खेड्यांतील. ती मुले लॉकडाऊननंतर पांगली. शाळा पहिली ते चौथीपर्यंतच आहे, पण तरी मुले शिकण्यास तयार नसत. म्हणून मग गुंजकर यांनी बारा पायऱ्यांत शब्द शिकवण्याची पद्धत काढली. ती चित्रे व खेळ यांवर आधारित होती. त्यामुळे मुले दीड-दोन महिन्यांत शब्दाक्षर लेखनात प्रवीण होतात. गुरुजींनी इंटरनेटच्या माध्यमातून फिनलंडपासूनच्या अनेक देशांतील अध्यापन पद्धती जाणून घेतल्या आहेत. ते मुलांना तंत्रज्ञान येण्यास हवे याचा आग्रह धरतात.
गुंजकर शाळेपासून आठ किलोमीटर अंतरावर राहतात. तरी ते सकाळी साडेआठपर्यंत शाळेत पोचतात व मग दिवसभर शाळेतच असतात. ते म्हणाले, की मी वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस शाळेत असतो. गुंजकर यांचे आई-वडील-भाऊ-त्याचे कुटुंब असे शेतकऱ्याचे संयुक्त कुटुंब आहे. त्यांना स्वत:ला पत्नी सोनू व देवराज नावाचा एक मुलगा आहे. त्यांनी मुलांच्या शिक्षणावर विविध प्रयोग करून पाहिले आहेत. त्यांतील एक लक्षणीय म्हणजे त्यांच्या तालुक्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा मुलगा दिव्यांग होता- त्याला विविध प्रकारची शारीरिक दुर्बलता होती व तिचा परिणाम त्याच्या मनबुद्धीवर झाला होता. गुंजकर अभिमानाने सांगतात, की तो माझ्या प्रयोगपूर्ण शिक्षणानंतर, पाच वर्षांच्या प्रयत्नांनी स्वावलंबी झाला आहे. तो वाचू शकतो, आता शाळेत शिकत आहे.
गुंजकर यांना त्यांच्या कामासाठी विविध पुरस्कार मिळाले आहेत. पुण्याच्या एका ट्रस्टने तर त्यांच्या सन्मानापोटी त्यांना एक लाख रुपयांची रक्कम दिली. गुंजकर गुरुजींनी ती रक्कम शाळेला देणगी म्हणून दिली.
देविदास गुंजकर 8010854175 devidasgunjkar6822@gmail.com
मूळ लेख – हेरंब कुलकर्णी 8208589195 herambkulkarni1971@gmail.com