दापोलीचे जयवंत जालगावकर हे जवळजवळ गेली तीस वर्षे स्थानिक अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष असले तरी ते त्या कामाच्या ओझ्याने कावलेले वा वाकलेले केव्हाच दिसत नाहीत. त्यांच्यावर जिल्हा बँकेच्या व कधी कधी राज्य बँक फेडरेशनच्या जबाबदाऱ्याही असतात. तरीसुद्धा जयवंत हे केव्हाही दिलखुलास असतात. त्यांना त्यांच्या कामाच्या तडाख्यातच पकडले तर म्हणतात, तीन तासांनी बोलुया का? त्या वेळच्या संपर्कात निदान चार वेळा तरी “सॉरी, मगाशी तुम्हाला थांबावे लागले” असे म्हणतील. तसाच उलटा उपचार ‘थँक यू’ स्वरूपाच्या कामाच्या वेळी पार पडतो. असा प्रेमळ लाघवी माणूस. त्यांचा हा मनमोकळा व खुल्या दिलाचा स्वभाव त्यांना त्यांच्या छंदांमुळे लाभला असावा. ते जितके जीवनवेडे व लोकवेडे आहेत तेवढेच छंदवेडे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा हा सरमिसळ अनुभव असतो. ते जीवनानुभवाबद्दल म्हणजे बँकेच्या कामाबद्दल बोलतात, तेव्हाच लोकांबद्दल काही सांगतात आणि त्याच वेळी त्यात छंदांच्या गमती जोडून टाकतात.
ते दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष 1992 सालापासून सलग तीस वर्षे आहेत. ते 2023 च्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आले. त्यामुळे 2028 पर्यंतची त्यांच्या पदाची निश्चिती झाली. ते म्हणाले, की मी त्यावेळी पंचाहत्तर वर्षांचा होईन. त्यानंतर मात्र मी बँकेत असणार नाही, पण तेव्हा कदाचित माझा मुलगा निलेश ती निवडणूक लढवेल. तोही बँकेचा संचालक म्हणून 2023 च्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आला आहे.
जयवंत म्हणाले, की दापोली शहर जसे स्वच्छ, निसर्गरम्य, साधे आणि बिनगुंतागुंतीचे आहे तशीच आमची बँक व तेथील माणसे आहेत – सरळ, साधी, आढ्यता नसलेली, कार्यावर विश्वास ठेवणारी. त्यामुळेही बँकेच्या कामाचे ओझे अध्यक्ष म्हणून माझ्यावर येत नाही.
जयवंत जालगावकर यांचे स्वतःचे शू मार्ट आहे. ते दुकान ते व त्यांचा मुलगा निलेश मिळून पाहतात. त्यांचे एकत्र कुटुंब आहे. ते राहतात दापोलीपासून तीन किलोमीटर दूर, टाळसुरे गावी. त्यांना त्या साडेतीन हजार लोकवस्तीच्या गावाचाही अभिमान आहे. ते म्हणाले, की पेशव्यांपैकी राघोबादादाची बायको आनंदीबाई ही आमच्या गावची. तिचे महाराष्ट्राच्या इतिहासात खास स्थान आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अजून गावात जमिनीचा सातबारा आहे.
जयवंत यांना दोन महत्त्वाचे छंद आहेत. पहिला विविध वस्तू, विशेषतः नाणी जमवण्याचा. त्यांच्याकडे सत्तावीस देशांची चलनातील नाणी व नोटा आहेत. त्याचे प्रदर्शन ते शाळा-कॉलेजांत जाऊन मांडतात. अशी पन्नास प्रदर्शने त्यांनी जिल्हा परिसरात भरवली आहेत. पण ते म्हणाले, की मी बँक व्यवसायिक असल्याने नुसते प्रदर्शन मांडून थांबत नाही. त्याबरोबर त्या त्या देशाचा चलनाचा त्या दिवसाचा विनिमय दर सांगतो. मग स्वाभाविकच, मुलांना विनिमय दराची आणि त्या ओघात जगातील बँकिंग व्यवहाराची माहिती सांगणे होते. माझी प्रदर्शने अर्थसाक्षरता वाढवण्यासाठी असतात, त्या प्रदर्शनांतून बँकेचे खातेदार वाढतात असा अनुभव आहे.
त्यांच्या विविध वस्तुसंग्रहात पाचू-पुतळ्या अशा जुन्या दागिन्यांपासून ते मापटं-निठव-शेर-पायली-अधेली अशा वजनमापांपर्यंत आणि ताक घुसळण्याच्या, शेवया बनवण्याच्या पाटापर्यंत, जुन्या आठवणींतील वस्तू आहेत. त्यांच्या त्या वस्तूंमध्ये जुन्या काळातील चिलीम ते सिगार असे पन्नास प्रकार आहेत. ते म्हणाले, की मी प्रदर्शनाच्या आरंभस्थळी अशा दागिन्यांपासून बनवलेले देवीचे रुपडे मांडत असतो. त्यामुळे विद्यार्थी व लोकही पुढील वस्तूंकडे गांभीर्याने पाहतात. तो सारा आपल्या संस्कृतीचा भाग आहे हे त्यांना जाणवते.
जयवंत यांचा दुसरा छंद अनोखा आहे. ते दारूच्या भरलेल्या बाटल्या जमा करतात. अशा विविध आकारांच्या, विविध शैलींच्या, विविध देशांच्या पाचशेदहा मिनी चेअर व बाटल्या त्यांच्या संग्रही आहेत. ही माहिती देत असताना ते परत परत बजावून सांगतात, की त्यांना दारूचेच काय -कसलेच व्यसन नाही ! त्यांनी दारूची चवदेखील चाखलेली नाही. त्यांचे म्हणणे असे, की दारू वाईट नसते, माणूस तिच्या अधीन जाऊन तिला वाईट बनवतो. माझ्याकडे दारू दिमाखात राहते- येणाऱ्या पाहुण्यांसमोर मिरवते. त्यांना बाटल्या जमा करण्याचा हा छंद गोव्यात लागला. ते म्हणाले, की आम्ही तेथील एका मोठ्या दारूच्या दुकानात गेलो होतो. तेथे दारू भरलेल्या दोन बाटल्या शिंपल्यांनी एकत्र गुंफलेल्या पाहिल्या. त्यावर बेडूक आकाराचा प्राणी गिटार वाजवत आहे असे विचित्र चित्र साकारले आहे. ते चित्र विक्षिप्तवेडे वाटले तरी दिसत होते आकर्षक. मी ती बाटली विकत घेतली. तेथून मला बाटल्या जमवण्याचा छंद जडला. मी कोठेही प्रवासास गेलो, की आवर्जून दारूच्या दुकानात जातो; बाटल्या खरेदी करून संग्रही ठेवतो. तेवढी बाटली तरी संभाव्य दारुड्याकडून वाचली जाते/ बचावते !
टाळसुरे येथे घळीत एकदोन मूर्ती आहेत. तेथे लेणी व त्याच परिसरात कातळशिल्पे असावीत असा जयवंत यांचा अंदाज आहे. दापोलीचा तो कलात्मक वारसा शोधून त्याची व्यवस्था लावण्याचा त्यांचा इरादा आहे.
जयवंत जालगावकर यांचा टाळसुरे गावी परंपरागत जमीनजुमला आहे. त्यांनी शू मार्ट मात्र स्वतः 1970 साली सुरू केले. त्यांना सामाजिक कार्याची आवड वडिलांपासून लाभली. ते दापोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पक्षस्थापनेपासून आहेत. त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी कौटुंबिक संबंध आहेत. ते म्हणाले, की मी बाबुराव बेलोसे यांच्यामुळे राजकारणाकडे खेचलो गेलो. ते स्वतःही टाळसुरे गावचे सरपंच वीस वर्षे होते. ते म्हणाले, की टाळसुरे व सभोवतालची अशी गावे लवकरच दापोली नगरपालिका हद्दीत येतील.
जयवंत यांच्या पत्नी नीता, मुलगा निलेश, सून श्यामल आणि नात तन्वी असा परिवार आहे. त्याखेरीज त्यांच्या तीन मुली लग्न होऊन गेल्या. त्या मुंबईत राहतात.
जयवंत जालगावकर 9422429346 nil.jalgaonkar@gmail.com, jaywantjalgaonkar@gmail.com
-नितेश शिंदे 9892611767 info@thinkmaharashtra.com
——————————————————————————————————————–