जामनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख तालुका आहे. तो जळगाव शहरापासून साधारणपणे छत्तीस किलोमीटर अंतरावर आहे. जामनेर तालुका पाचोरा, भुसावळ, बोदवड, जळगाव, बुलढाणा या गावांनी वेढलेला आहे. जामनेर तालुक्यात एकशेअठ्ठावन्न गावे आहेत. त्यांपैकी शेंदुर्णी, फत्तेपूर, तोंडापूर, कापुसवाडी, नेरी, पहूर, देऊळगाव, वाकडी ही मोठी अशी गावे आहेत. जामनेर हे गाव टेकडीवजा एका डोंगराच्या कोपऱ्यात पायथ्याशी वसले आहे. मात्र त्या डोंगराला सिद्धगड या भारदस्त नावाने संबोधले जाते. गाव सुखी, संपन्न आणि समृद्ध असे आहे. जामनेर गाव नदीमुळे दोन विभागांत विभागले गेले आहे- जामनेर आणि जामनेरपुरा. दोन्ही गावांना सांधण्यासाठी नदीवर दोन ठिकाणी पूल बांधलेले आहेत. नदीचे नाव कांग असे आहे.
जामनेर तालुका कापूस आणि केळी या पिकांसाठी प्रसिद्ध आहे; तसे, काही भागांत संत्री-मोसंबी यांचे मळेसुद्धा आहेत. जामनेर व शेंदुर्णी येथे फळविक्री संस्था आहेत. केळीचे पीक पळसखेडा, हिवरखेडा, गारखेडा, सामरोद, नाचणखेडा या ठिकाणी जास्त प्रमाणात घेतले जाते. तो भाग बागायती म्हणून ओळखला जातो. जामनेरवर जलसंपदेची कृपा आहे. तोंडापूर, सोनाळा, शैवगा, वाघूर या धरणांचा तालुक्याला पाणीपुरवठ्यासाठी उपयोग होतो. शेतीला पाणीपुरवठा व्हावा म्हणून अजून काही कामे प्रगतिपथावर आहेत.
जामनेर तालुक्यातील काही गावांना भौगोलिक दृष्टिकोनातून नावे प्राप्त झाली आहेत- जसे की ज्या गावात पिंपळाची भरपूर झाडे आहेत ते पिंपळगाव, ज्या ठिकाणी वडाची झाडे जास्त आहेत ते वडगाव झाले आहे, बोरे आहेत त्या गावाला बोरगाव असे नाव मिळाले आहे. काही काही गावांना त्या ठिकाणी राहणाऱ्या जास्त समाजाच्या नावांनी ओळखले जाते- जसे, की कोळ्याचे मांडवे, धोब्याचे मांडवे, पळसखेड गुजरांचे असे. आठवडे बाजार गावागावांत भरवले जातात; जसे, की जामनेर-गुरुवारी, तोंडापूर- शुक्रवारी, वाकोद- शनिवारी, पहूर- रविवारी, फत्तेपूर- सोमवारी, नेरी- मंगळवारी.
जामनेरला शैक्षणिक वारसा मोठा आहे. जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय; तसेच, त्यांचे महाविद्यालय शहरात नावाजलेले आहे. संस्थेची कला, वाणिज्य, विज्ञान, फार्मसी, डी एड महाविद्यालये आहेत. त्यांच्या विद्यालयांची नावे एकलव्य, मुलींचे कन्या माध्यमिक, बोहरा इंटरनॅशनल अशी आहेत. तालुक्यात नेरी, पहूर, तोंडापूर, फत्तेपूर, शेंदुर्णी या ठिकाणी माध्यमिक विद्यालये आहेत. दुसरी ‘शेंदुर्णी’ ही महत्त्वाची शिक्षणसंस्था तालुक्यात आहे. जामनेरचे राजमल शेठ व शेंदुर्णीचे आचार्य गजाननराव गरुड यांच्या पुढाकाराने जामनेर व शेंदूर्णी या दोन संस्थांची निर्मिती झालेली आहे.
गावामध्ये आणि तालुक्यामध्येही अनेक ठिकाणी ऐतिहासिक काळातील राजेसरदारांचे वाडे आहेत. ते जहागीरदार, देशमुख, बाजीराव पाटील, देशपांडे, बाबाजी पाटील यांच्या नावांनी प्रसिद्ध आहेत. तसेच मोठमोठे वाडे खेड्यापाड्यांवरही अनेक ठिकाणी आहेत. दगड, विटा, माती आणि लाकूड हे त्या वाड्यांच्या बांधकामाचे घटक, त्या घरांचे दरवाजे टोलेजंग असून ते चार माणसांशिवाय हलू शकत नाहीत. काळानुसार त्यात पडझड झाली आहे. पण चांगल्या परिस्थितीतील वाडे अजूनही काही ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी लोकांचा रहिवास आहे. पाडलेल्या वाड्यांच्या ठिकाणी नवीन पद्धतीचे बांधकाम केले गेले आहे.
गावाला धार्मिक पार्श्वभूमी फार प्रभावी आहे. गावामध्ये विठ्ठल, राम, दत्त, रेणुका देवी अशी मंदिरे आहेत. नदीच्या पलीकडे महादेवाचे पुरातन मंदिर, गजानन महाराजांचे व दत्त ही मंदिरे आहेत. जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. नगारखाना हा गावाचा अतिशय जुना भाग आहे. विठ्ठल मंदिरात सकाळीच नगारा वाजवला जात होता त्यामुळे त्या भागाला नगारखाना असे नाव पडले आहे. त्या ठिकाणी रामाचे आणि विठ्ठलाचे अशी जुनी मंदिरे होती. त्यांचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिरे स्थापित करण्यात आली आहेत. ती सुंदर आणि प्रशस्त अशी आहेत. मंदिरात गणपती, श्रीराम, विठ्ठल-रुख्माई, महादेव अशा देवांची स्थापना करण्यात आलेली आहे. नगारखाना भागात दरवर्षी श्री रामनवमीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. आठ-नऊ दिवस कीर्तन-प्रवचन; तसेच, समस्त गावकरी मंडळींना एक दिवस महाप्रसादाचे जेवण असे. त्यालाच बारभाईची पंगत म्हणत असत. ती सर्वसमावेशक असे. ती प्रथा बंद पडलेली आहे. रामजन्मानंतर पंजिरीचा प्रसाद वाटप होतो. पंजिरी म्हणजे धण्याची पावडर, सुंठ पावडर, गुळ, भाजलेल्या खोबऱ्याचा किस, काजू-बदाम-खारीक पूड असे एकत्रित केलेल्या खाद्यवस्तू/पदार्थांचा प्रसाद. चैत्र शुद्ध प्रतिपदेला (गुढी पाडव्याला) नगारखान्यात गुढी उभारली जाते. नगारखाना येथे चैत्र महिन्याच्या चतुर्दशीला संत गोविंद महाराज संस्थानतर्फे रथ ओढण्यात येतो. गावातील सर्व लोक आनंदाने त्या रथोत्सवात सहभागी होतात. गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, हनुमान जयंती असे सर्व धार्मिक कार्यक्रम नगारखाना भागात साजरे होत असतात. समस्त गावकरी त्यात हिरिरीने-उत्साहाने सामील होतात.
कोकणात जशी दशावतारी सोंगे असतात, त्याचप्रमाणे दशावतारी जामनेरमध्ये काढण्यात येतात- देवी, मत्स्य, खंडोबा, नरसिंह, महिषासुर असे अवतार असतात. चैत्र पौर्णिमेला श्रीरामाचा रथ निघत असतो. गावाला त्या रथाची प्रदक्षिणा असते. त्यासोबत लेझीम पथक असते. त्यात सहभाग प्रतिष्ठेचा मानला जातो. सकाळी साडेसात-आठ वाजता निघालेला रथ चार-साडेचार वाजता नगारखान्यात परत येतो. गुढीपाडव्याला आणि दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन असते. संध्याकाळी रावण दहनाचा कार्यक्रम असतो. दास नवमी आणि परशुराम जयंती हे कार्यक्रमही दरवर्षी होतात. भगवान परशुरामाची गावातून मिरवणूक काढली जाते.
तोंडापूर गावातील टेकडीवर प्रसिद्ध असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरात दररोज आरती होत असते. जामनेर गावात नवरात्रात अष्टमीला मंदिरात होमहवन होत असते. गावात बऱ्याच ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने काही कार्यक्रम असतात. नगारखाना चौकातही नवरात्रात देवीची स्थापना होत असते. तालुक्यातील शेंदुर्णीला रथ निघत असतो. तेथेच त्रिविक्रमाचे मंदिर आहे. त्या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर स्थापण्यात आलेले आहे. त्यामध्ये असलेली त्रिविक्रमाची मूर्ती सुंदर आणि मोहक आहे; दर्शनाने मन प्रसन्न होते. तालुक्यात ‘रोटवदचा मारुती’ प्रसिद्ध आहे. तेथील मूर्ती भव्य आहे. त्या ठिकाणी लोकांची दर्शनासाठी गर्दी असते.
जामनेर तालुक्यात शेंगोळा, शेंदुर्णी, चिंचखेडा, ईधासी माता, पहाडीबुवा या यात्रा भरवल्या जातात. ती पर्वणी आजूबाजूच्या गावांना खरेदीसाठी असते. यात्रांत फिरती चित्रपटगृहे असतात, हॉटेले असतात- तेथे गुळाची जिलेबी, गरम मिरचीची भजी व चहा यांना विशेष पसंती असते.
जामनेरची सोनबर्डी टेकडी प्रसिद्ध आहे. ते गाव पंधरा-वीस टेकड्यांच्या सुळक्यांवर वसलेले आहे. सोनबर्डी हे स्थळ धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. सोनबर्डीवर सोमेश्वर महादेवाचे तीर्थस्थळ आहे. मंदिर सुंदर बांधण्यात आले आहे. बाजूला बगीचा-कारंजे आहे. रोषणाई केलेली असते. येणाऱ्या भक्तांना बसण्यासाठी योग्य अशी सोय आहे. भाविक हजारोंच्या संख्येने महाशिवरात्र आणि दर सोमवारी दर्शनाला येत असतात. श्रावणी सोमवारी तर ही अशी भली मोठी रांग लागते ! जिल्ह्यातूनही अनेक भाविक येत असतात. तेथील वातावरण निसर्गरम्य आहे. त्याच्याच बाजूला जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. गावाला शुद्ध पाणीपुरवठा तेथून होतो.
सिद्धगड टेकडी जामनेर गावापासून तीन किलोमीटर दूर आहे. त्या टेकडीला सिद्धगड म्हणावे असे वैशिष्ट्य काही नाही. सिद्धगड डोंगरावर देवीचे पुरातन मंदिर आहे. तिला ‘बिडातली देवी’ असेही म्हणतात. गिरीश महाजन यांनी त्या मंदिराच्या परिसरात आमूलाग्र बदल घडवून आणला. त्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या; तसेच, मोठा हॉलही बांधला आहे. नवरात्रात तेथे यात्रा भरते. असंख्य भाविक दर्शनाला येत असतात. तो परिसरसुद्धा निसर्गरम्य आहे. त्याच्या जवळपास रामबन (रामवन) आहे. त्यात बगीचा असून देवाधिकांच्या मूर्ती आहेत. रामवनात प्रभू श्रीरामाचे आणि सप्तशृंगी मातेचे अशी मंदिरे आहेत. स्थानिक लोक सकाळ-संध्याकाळी फिरण्यासाठी, शुद्ध हवेचा आस्वाद घेण्यासाठी रामवनात येतात. रामवनात आवळे, बोरे, आंबे अशी फळझाडे आहेत. एकूणच जामनेर गावाला आणि बाजूच्या गावांना निसर्ग चांगला लाभला आहे आणि तो गावाने चांगला राखला आहे.
जामनेरमध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. भागवत सप्ताह- कीर्तन असे कार्यक्रम सर्वत्र होत असतात. वारकरी बहूउद्देशीय संस्था जामनेरमध्ये आहे. तेथे वारकरी कीर्तन-भजनाचे पाठ चालतात. जामनेर गावाच्या मधोमध मंगल कार्यालयदेखील संत सावता माळी यांच्या नावाने बांधले आहे आणि चौकातील भाजी मंडईला सावता माळी यांचे नाव देण्यात आले आहे. गावात संत सावता मंदिर आहे, त्या मंदिरात तसेच नगारखान्यातील विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन सुरू असते. सावता महाराजांच्या पुण्यतिथीला गावभोजन दिले जाते. भगवान परशुराम, महावीर यांच्या जयंतीला गावातून मिरवणुका काढल्या जातात. शिवजयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती साजऱ्या केल्या जातात. गजानन महाराज प्रकट दिनाची पालखी व पायी वारी ही गजानन महाराजांचे जन्मगाव असलेले थळ (बुलढाणा) हे गाव व समाधी स्थान (शेगाव) या ठिकाणी जात असते. बैलपोळा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ‘बारा गाड्या’ काढल्या जातात. बारा बैलगाड्या एकमेकांना जोडलेल्या असतात. त्यांच्यावर लोक बसलेले असतात. भगत त्या गाड्या एका विशिष्ट ठिकाणापर्यंत ओढत नेतो.
निवृत्तिनाथ हे ज्ञानदेवांच्या समाधीनंतर मुक्ताबाईला घेऊन तीर्थयात्रेला निघाले. ते 12 मे 1297 रोजी वेरूळ येथून निघून जामनेरमार्गे भुसावळकडे रवाना झाले. मुक्ताबाई व निवृत्तिनाथ यांच्या पदस्पर्शाने जामनेरची भूमी पावन झालेली आहे. संत मुक्ताई ज्या ठिकाणी अदृश्य झाली ते कोथळी हे ठिकाण जवळच आहे. साईबाबा यांचाही चरणस्पर्श जामनेर नगरीला झाला आहे. साईबाबा जामनेर येथील स्टेशन मास्तर चांदोरकर यांच्याकडे मुक्कामी असल्याचा उल्लेख त्यांच्या पोथीमध्ये आहे.
जामनेर येथे पाचोरा -जामनेर अशी रेल्वे असून स्टेशन फार जुने, ब्रिटिशकालीन असे आहे. त्याला शंभर वर्षे पूर्ण झाली. ती पी.जे. रेल्वे म्हणून ओळखली जाते. आता मलकापूर-बोदवड-जामनेर-पाचोरापर्यंत रेल्वेमार्ग होणार आहे. जळगाव विमानतळ तीस किलोमीटर अंतरावर आहे. तेथून पुणे-मुंबई उड्डाणे होत असतात.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जामनेरपासून चाळीस किलोमीटरवर येतात; पद्मालयाचे प्रसिद्ध गणपती मंदिर तेवढ्याच अंतरावर आहे. मंदिरासमोर तलाव असून त्यात कमळाची फुले असतात. एके काळी साहित्य संस्था विशेष सक्रिय होत्या. अशोक कोळी हे महाराष्ट्रात राज्यभर प्रसिद्ध साहित्यिक नाव. त्यांचे कवितासंग्रह, कादंबरी, लेखसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जामनेरमध्ये साहित्य मंडळ, लोकहितवादी मंडळ, सन्मित्र नाट्य संस्था अस्तित्वात होत्या. त्या मार्फत अनेक साहित्यिक कार्यक्रम राबवले जात. एकांकिका स्पर्धा भरवणे; तसेच सन्मित्र नाट्य संस्थेमार्फत नाटक-एकांकिका बसवणे, राज्य नाट्य स्पर्धेतील सहभाग, गणेशोत्सवातील नाटकाचे प्रयोग अशा विविध गोष्टी होत असत. अरविंद चौधरी, सुधीर साठे, दिलीप देशपांडे, विद्या देशपांडे, माधुरी देशपांडे, नीता साबद्रा, स्वाती पाठक, प्रसाद पाठक, प्रकाश कारंजकर यांचा त्यात सहभाग असे. कालांतराने काम करणारी ती कलाकार मंडळी पांगल्यामुळे पोकळी निर्माण झाली असे भासते. तरीही गावात नवीन साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली गेली. त्या मार्फत कथा-कविता स्पर्धा, तालुका पातळीवर साहित्य संमेलन असे कार्यक्रम होत असतात. तेथील वाचनालय जुने आहे. वाचनालयाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे कार्यक्रमाची अपेक्षा लोकांकडून केली जाते. जामनेरला साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम नियमित होत असतात. त्यांचे मंगल कार्यालय साहित्यिक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले जाते. ‘ग्रंथाली वाचक चळवळी’चे कार्यही गावच्या सांस्कृतिक वातावरण निर्मितीत महत्त्वाचे होते. प्रस्तुत लेखक (दिलीप देशपांडे) जामनेरमध्ये जवळपास पंधरा वर्षे ‘ग्रंथाली वाचक चळवळी’चे केंद्र ‘ग्रंथाली’चे केंद्र संचालक म्हणून चालवत होते. त्या अंतर्गत पुस्तक प्रदर्शने, लहान मुलांसाठी बाल झुंबड यांसारखे कार्यक्रम होत. त्यानिमित्ताने विजय तेंडुलकरांपासूनचे लेखक गावात येऊन गेले. नवीनवीन पुस्तके ‘ग्रंथाली केंद्रा’तून उपलब्ध होत असल्यामुळे गाव परिसरात वाचनवाढीसाठी प्रयत्न झाले.
चित्रकार एल.जी. (लक्ष्मण गणपत) महाजन सर हे चित्रकलेत सर्वत्र माहीत असलेले नाव. कला संचालक माधव सातवळेकर यांचे ते सहाध्यायी. महाजन न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चाळीस वर्षे चित्रकला शिक्षक होते. ते ऐंशी वर्षे वयापर्यंत चित्रे रेखाटत. सरांची व्यक्तिचित्रे आणि निसर्गचित्रे लोकप्रिय होती. त्यांनी गावातील निसर्ग-पहाड व राशीभूशी टेकड्या, गावामधून वाहणारी नदी, नगारखान्याचा चौक, तसेच अनेक जुने वाडे-मंदिरे असे विषय घेऊन शेकडो चित्रे रंगवली. त्यांना बक्षीसेही मिळाली. मात्र ते प्रसिद्धीपासून दूर राहिले.
जैन उद्योग समूह आणि ‘जैन इरिगेशन’चे भवरलाल जैन हे जामनेर तालुक्यातील वाकोद येथील रहिवासी. वाकोदला त्यांची शेतजमीन आहे. तेथे त्यांनी कृषीविषयक अनेक प्रयोग केले. जामनेर तालुक्यात सहकारी तत्त्वावर मालदाभाडी या गावी प्रल्हादराव पाटील यांनी स्टार्च फॅक्टरी काढली. ईश्वरलाल जैन यांनी रम फॅक्टरी आणि साखर कारखाना, सुरेश जैन यांनी सुतगिरणीसाठी प्रयत्न केले, ते सगळे प्रयत्न असफल ठरले. जामनेर एम.आय.डी.सी.मध्ये नवीन मोठमोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. शेतीसंबंधात मात्र शेततळी, विहीर खोदाई, पाटाचे पाणी तसेच शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या साधनांची उपलब्धी, त्याला मिळणारी सबसिडी याकडे लक्ष दिले जाते. भरपूर पाणीपुरवठा असलातरी मासेमारी उद्योग थोड्या प्रमाणावर चालतो, कच्च्या केळ्यांपासून तळलेले वेफर्स, ऊसापासून रस-रसवंत्या यांसारखे काही उद्योग जामनेरमध्ये चालतात, नारळाच्या फांद्यांपासून कुंच्या बनवणे, झाडू-परडी, सुपडी-ताटी बनवणे, भाकऱ्या ठेवण्यासाठी दुरडी बनवणे असे विविध उपक्रम ग्रामोद्योगाच्या माध्यमातून चालतात.
जामनेर हे जळगाव जिल्ह्यात शांततेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. सर्व जातिधर्माचे व पंथांचे लोक मिळून-मिसळून राहतात. एकमेकांच्या सुखदु:खांत सहभागी होतात, सहिष्णुता जपतात. मुस्लिम बांधव हिंदूंच्या दसरा-दिवाळीत सहभागी होतात, गणेशोत्सव- नवरात्रीत आनंदाने जल्लोष करतात, तर हिंदू बांधव मुस्लिमांना ईदच्या शुभेच्छा देतात. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, हम सब भाई-भाई हा भाईचारा जामनेर सतत जपत आला आहे.
(विजय सुर्यवंशी यांनी दिलेली काही माहिती या लेखात समाविष्ट केली आहे.)
विजय सुर्यवंशी 9168314090 vijaysuryawanshi751@gmail.com
– दिलीप देशपांडे 8999566917 dilipdeshpande24@gmail.com
चांगली माहिती मिळाली. जामनेर व परिसरातील बोली भाषेचा उल्लेख या ठिकाणी होणे गरजेचे आहे. काही गावांमध्ये वेगवेगळ्या जातीय संस्कृती अनुभवायला व पाहायला मिळतात. त्या संस्कृतीची माहिती नव्या पिढीला झाली पाहिजे.
मोहनजी तुम्ही त्याबाबत माहिती दिल्यास आम्ही ती लेखात समाविष्ट करू. तसेच, तुम्ही तुमच्या गावाच्या माहितीचा लेख दिल्यास आम्हाला प्रसिद्ध करण्यास आवडेल.
– नितेश शिंदे
सहाय्यक संपादक, थिंक महाराष्ट्र
छान माहिती दिली