इंदुताई पाटणकर व त्यांचे पती बाबूजी ऊर्फ विजय हे दोघेही रोजनिशी लिहून ठेवत. ती दोघे चळवळीनिमित्त एकमेकांपासून लांब राहत असल्यामुळे त्यांच्यात नेहमी पत्रव्यवहार असे. तसेच मायलेकांचाही पत्रव्यवहार होत होता. त्यांचा लेक भारत पाटणकर. तो संपूर्ण पत्रव्यवहार भारत यांनी सांभाळून ठेवला आहे. त्यानुसार त्यांनी त्यांची आई ‘क्रांतिवीरांगना इंदुताई’ असे एक पुस्तक लिहिले. पुस्तक असे लिहिले, की जणू काही त्या स्वतः वाचकांशी बोलत आहेत !
इंदुताई या कर्तृत्ववान, ध्येयनिष्ठ आणि धैर्यवान अशा होत्या. इंदुतार्इंचा जन्म सातारा जिल्ह्यात 15 सप्टेंबर 1925 रोजी झाला. बाबूजींचा जन्मही त्याच सातारा जिल्ह्यात 1915 साली झाला. ते कौटुंबिक संघर्षामुळे जमीनजुमला सोडून कासेगावला आले. तेथील दिनकरराव निकम आणि द्वारका निकम यांचे पहिले अपत्य म्हणजेच इंदू. इंदुमती बांध्याने मजबूत, गुटगुटीत अशा होत्या. त्यांना त्यांच्या घरी आचार्य अत्रे, साने गुरूजी, काँग्रेस व राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते आदींच्या चर्चा ऐकण्याची संधी मिळत गेली. इंदू यांचे व्यक्तिमत्त्व त्या सर्वांच्या सहवासात घडत गेले. त्यांचा संबंध रक्ताच्या नातेवाईकांपेक्षा चळवळीच्या लोकांशी जास्त घनिष्ट आला.
इंदू यांनी 1942 च्या ‘चले जाव’ चळवळीत ‘करेंगे या मरेंगे’ या जिद्दीने झेप घेतली. त्यांनी जीवनाचे ध्येय देशाचे कार्य, दलितांचे कार्य हे ठरवले आणि वयाच्या सतराव्या वर्षी, आजन्म ब्रह्मचारी राहून कार्य करण्याची शपथ घेतली. त्या घरातून बाहेर पडल्या आणि सेवा दलाच्या केंद्रातच सामील झाल्या.
इंदुतार्इंनी त्यांच्या स्वतंत्र प्रवासात बाबूजी पाटणकर यांना त्यांचा समविचारी जीवनसाथी म्हणून निवडले. त्यांनी गांधर्वविवाह केला. बाबूजी व इंदुताई खांद्याला खांदा लावून काम करू लागले. इंदू स्वतंत्रपणे स्त्रियांचे संघटन आणि पक्षाचे काम करू लागल्या. त्या दोघांचे पहिले अपत्य लहान असतानाच अतिसाराच्या आजाराने दगावले. त्यांचा उल्लेख ‘पहिला भारत’ असा होत गेला. त्यानंतरचे गोंडस बाळ म्हणजेही भारत, कारण दुसऱ्या अपत्याचे नावही ‘भारत’ असेच ठेवले गेले. इंदू यांना चळवळीचे काम करताना त्या भारतला बरोबर घेऊनच फिरत असत.
कासेगावच्या चावळी चौकात 15 ऑगस्ट 1947 च्या रात्री बाराचा ठोका पडून गेल्याबरोबर राष्ट्रध्वजाचे आरोहण इंदूताई पाटणकर यांच्या हस्ते झाले ! मात्र इंदुतार्इंचा जीवनसाथी त्यांच्या वयाच्या सव्वीस-सत्ताविसाव्या वर्षी अचानक आणि क्रूरपणे या जगातून नाहीसा केला गेला. संभाजीराजांच्या मृत्यूच्या घटनेसारखीच, पण घरभेद्यांनी संपूर्णपणे घडवलेली ती क्रूर घटना होती. इंदुतार्इंनी नंतर शिक्षिका म्हणून प्राथमिक शाळेत नोकरी केली. वाट्याने केलेली आणि थोडी मालकीची शेती होती. त्या शेतीच्या खरेदीचे हप्ते पगारातून फेडले. सासू-सासरे वयस्कर होते. तशा स्थितीत छोट्या भारतला हृदयाशी कवटाळून इंदुताई खंबीर उभ्या ठाकल्या. त्यांनी नोकरी, सामाजिक-राजकीय काम असे सर्व कार्यक्रम चालू ठेवले. बाबूजी-इंदुतार्इ यांचे घर सामाजिक परिवर्तनाचे केंद्र म्हणूनच चालू राहिले. ते त्यांच्या मृत्यूनंतरही तसेच चालू आहे.
भारत एम डी (स्त्रीरोगतज्ज्ञ) झाला. तो ‘मागोवा’मध्ये काम करू लागला व पूर्णवेळ कार्यकर्ता झाला ! गेल ऑम्वेट त्याच्या जीवनात आली. दरम्यान, इंदुतार्इंना अर्धांगाचा झटका आला. त्यांना सारख्या फीट्स येऊ लागल्या. संघटनेतील मुले-मुली त्यांना भेटण्यास येत. त्या कोणाला ओळखायच्या तर कोणाला ओळखू शकत नव्हत्या. पण त्या त्या आजारातून सावरल्या आणि परत कामाला लागल्या. त्यांनी क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन व प्रबोधन संस्थेच्या वतीने प्रेमविवाह करणाऱ्या तरुण-तरुणींना आधार आणि धीर देऊन, त्यांची सत्यशोधक पद्धतीने लग्ने लावून दिली. बहुतांश लग्नांमध्ये ते तरुण-तरुणी वेगवेगळ्या जातींचे किंवा धर्मांचे असत. इंदुतार्इंच्या पुढाकाराने पन्नासपेक्षा जास्त लग्ने पार पडली आहेत. इंदूताई म्हणत, ‘माझी सून (गेल ऑम्वेट) मला साथ देणारीच मिळाल्याने माझ्या कामाच्या उत्साहाला आणखीनच उधाण आले. ती अमेरिकन असूनही पुणे-मुंबई सोडून, कासेगावसारख्या लहान गावामध्ये वास्तव्य करून सांगली, सातारा जिल्ह्यांत जास्तीत जास्त वेळ देऊ लागली आणि तेथे स्वायत्त स्त्री संघटना स्थापन झाली. जातिमुक्ती आंदोलनातील संघर्ष यात्रेच्या वेळी कासेगावला चावळी चौकात 2016 साली सभा होती. इंदुतार्इंना हात धरून मंचावर बसवले गेले. त्यावेळी त्यांनी नव्वदी पार केलेली होती. चळवळ आणि आंदोलन हा त्यांचा ध्यास होता. तो ध्यासच त्यांचा अखेरपर्यंत श्वास होता. ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान’ या साने गुरूजींच्या कवितेचा इंदुतार्इंवर प्रभाव होता. ती त्यांची आवडती कविता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे योग्य चित्रण करते. त्याच भावनेने प्रेरित होऊन वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या त्या हाडाच्या कार्यकर्त्या होत्या. जेव्हा जेव्हा त्या त्यांच्या खड्या आवाजात ती कविता गात असत, तेव्हा समोरचे लोकही तेवढेच प्रभावित होत असत. देशाच्या इतिहासातील महत्त्वाच्या लढ्यांमध्ये सहभाग घेतलेल्या इंदुतार्इंचा जीवनप्रवास 14 जुलै 2017 रोजी, वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी समाप्त झाला. ‘आपण प्रयत्न केला तर बदल घडवून आणणे शक्य आहे’ ह्यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यासाठी त्या अखेरपर्यंत काम करत राहिल्या.
पुस्तकाचे नाव- क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर
लेखक- भारत पाटणकर (02342)249241
– रत्नकला बनसोड 9503877175
——————————————————————————————