कुकडी प्रकल्पात बोरी गावाच्या वरील बाजूस येडगाव व त्या पाठीमागे माणिकडोह अशी दोन धरणे बांधली गेली. त्यामुळे कुकडी नदीचे पात्र कायम वाहते होते, ते कोरडे पडले. परंतु त्या उघड्या पात्राचा फायदा असा झाला, की त्यातून आदिमानवाची सत्यकथा प्रकट झाली ! ही गोष्ट 1987 सालातील. पुण्याजवळच्या परिसरात भौगोलिक सर्वेक्षण सुरू होते. विश्वास काळे यांना बोरी गावाजवळ कुकडी नदीकाठी राखेचे आगळेवेगळे थर आढळले. तसे थर नदीकाठाने तब्बल दहा किलोमीटरच्या परिसरात पसरलेले होते. पण ती राख नव्हती, तर तप्त ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबर हवेत उडालेले खनिज, सिलिका अशा द्रव्यांच्या सूक्ष्मकणांचा तो थर होता. कधी काळी, कोठे तरी झालेल्या ज्वालामुखीचे ते कण हवेत दूरवर उडाले आणि पृथ्वीच्या परिभ्रमणाने बोरीत येऊन पडले, तेथेच स्थिरावले ! राखेसारख्या त्या कणांना भू-शास्त्रीय भाषेत ‘टेफ्रा’ म्हणतात. टेफ्रा पडण्याच्या घटनेला टेफ्रांचा पाऊस पडणे असे म्हणतात.

बोरीत टेफ्रांचा तो पाऊस कधी झाला असावा? त्यांतील काही अंश गुजरातच्या अहमदाबाद येथील पदार्थविज्ञान प्रयोगशाळेत तपासले गेले. त्यांनी काढलेल्या निष्कर्षांनी सारे संशोधन विश्वच उडाले. कारण त्या टेफ्रांचे वय निघाले तब्बल चौदा लाख वर्षे ! बोरीत टेफ्रांचा पाऊस ज्या ज्वालामुखीतून पडला तो बोरीपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या इंडोनेशियातील असावा. त्यातून जुन्नरजवळच्या संशोधनास वेगळीच चालना मिळाली. पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे शरद राजगुरू, शीला मिश्रा, सविता घाटे, नितीन करमळकर, सुषमा देव, सोनाली नाईक यांच्या नेतृत्वाखाली बोरीत संशोधनास सुरुवात झाली. टेफ्रांचे थर मोकळे करण्यात आले. त्यातून ताम्रपाषाणयुगापासून ते अश्मयुगापर्यंतच्या अवशेषांचे भांडार संशोधकांच्या हाती आले. त्यात अश्मयुगीन हत्यारे, विविध प्राण्यांचे जीवाश्म असा मोठा खजिना हाती लागला आहे– त्यामध्ये हत्तीचा तब्बल दोन मीटर लांबीचा दात (मध्य पुराश्मयुग), शहामृगाच्या अंड्याचे कवच (अंतिम पुराश्मयुग) असे जीवाश्म मिळाले. सात लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या टेफ्रांचा पाऊस झाला तेव्हा ही जीवसृष्टी त्याखाली गाडली गेली- मृत झाली.

या संशोधनामुळे चौदा लाख वर्षांपूर्वीचे अस्तित्व प्रकाशात आले आहे. त्यापूर्वी मानवाच्या प्राचीन अस्तित्वाबाबत आफ्रिकेकडे पाहिले जाई, पण बोरीच्या संशोधनाने तो समज दूर झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मानवाचे अस्तित्व इतक्या जुन्या काळात होते हे सिद्ध झाले. त्यामुळे भारतातही आफ्रिकेच्या समकालीन मानवी अस्तित्वाचे पुरावे मिळू शकतील याची शक्यता वाढली.
– रमेश खरमाळे 8390008370 ramesh.kharmale@gmail.com