मैं वो झेलम नहीं हूँ (I am not that Zelum)

2
568

‘मोगरा फुलला’ या दालनाचे उद्दिष्ट आहे, जाणीव जागृती आणि संवेदनशीलतेचा जागर. आज भोवताली घडणाऱ्या अनेक घटनांकडे ‘हे असेच चालायचे’ किंवा ‘माझा काय संबंध’ असे म्हणत दुर्लक्ष केले जाते किंवा असेही म्हणता येईल की या घटना आपल्या जाणिवेच्या अंतर्केंद्रापर्यंत पोचतही नाहीत इतका मूढपणा आलेला आहे. हे वाईट घटनांच्या बाबतीच घडते असे नाही तर अनेक चांगल्या, सकारात्मक घटनाही दुर्लक्षिल्या जातात.

आजचा लेख ‘मैं वो झेलम नहीं हूँ ।’ हेच घटीत अधोरेखीत करत आहे. हा याच नावाच्या सिनेमाचा केवळ परिचय नाही. दहशतवादाच्या प्रादुर्भावापायी स्थानिकांच्या पुढे उभे राहणारे विपत्तींचे डोंगर आणि या विषाक्त वातावरणातही स्थानिकांमध्ये टिकून राहिलेले सौहार्द याचे चित्रण करणाऱ्या चित्रपटाविषयी, त्याच्या तंत्राविषयीही सांगत आहेत चित्रपट क्षेत्रातल्या जाणकार, रेखा देशपांडे.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्याकरता येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

मैं वो झेलम नहीं हूँ (I am not that Zelum) 

मी नंद ऋषींचं कवन नाही
मी नाही लालदेदची कविता…
मी नाही रसूल मीरची प्रेमिका पोश माल
मी नाही पालखीत बसलेली मेंदीरंगल्या हातांची नववधू…
मैं वो झेलम नहीं हूँ
कोणताच चेहरा नसलेली मी अनोळखी,
थरथरणारी सावली – तुटलेल्या चपलेपाशी आणि चिखलापाशी
मी उद्ध्वस्त, बलात्कारित आणि वेडी
मैं वो झेलम नहीं हूँ

ही नुसती शब्दबद्ध कविता नाही. ‘मैं वो झेलम नहीं हूँ।’ याच नावाच्या चित्रपटात ती समोर घडताना दिसते.

गेल्या 21 डिसेंबरला काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर केलेल्या लष्करी कारवाईदरम्यान चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन नागिरकांची हत्या कथितरीत्या लष्करी कोठडीत झाली. बातमीमध्ये म्हटले होते त्या हत्यांमुळे काश्मीरमध्ये नाराजीचे सूर उमटले. संरक्षणमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली. लष्कराला ‘चुका टाळा’ असा उपदेश केला ! लष्करी किंवा पोलीस कोठडीतल्या हत्यांची ही पहिलीच वेळ नाही. ताब्यात घेतलेल्या नागरिकांना संशयित दहशतवादी ठरवून घडवलेल्या अशा घटना महाराष्ट्रातही आहेत. ठळक उदाहरण ख्वाजा यूनुस प्रकरण. काश्मीरमधली नवी बातमी वाचताना मनात जागी झाली ती पडद्यावरची कविता. ‘मैं वो झेलम नहीं हूँ ।’

उदास निळसर राखी रंगाच्या वातावरणातले झेलमचे पात्र हलके हलके अफीफाच्या क्लोजअपमध्ये रूपांतरित होते आणि स्क्रीनवरच्या त्या दर्दभऱ्या दृश्यकवितेला सुरुवात होते. पार्श्वसंगीत या चित्रपटात नाही. आहेत ते वातावरणातले ध्वनी. पाखरांचे, पाण्याचे, वाहनांचे, सायरनचे, गोळीबारांचे, बाँम्बस्फोटांचे, कर्फ्यूच्या अनाऊन्समेंट्सचे, कोठडीतल्या छळाने किंचाळणारे, विव्हळणारे, अंगावर काटा आणणारे आवाज, संथ उदास शब्द आणि धुमसणारे घुसमटलेले मौन. दृश्ये आहेत ती अंधारातली, धुकंधुकं अंधारल्या उजेडातली. उदास निळसर राखी.

भारतीय लष्कराची, पोलिसांची दहशत आणि दहशतवाद्यांच्या कारवाया या दोन पात्यांच्या कात्रीत सापडलेले, भेदरलेले आणि हतबलपणे धुमसणारे काश्मीर अफीफा या पंधरा-सोळा वर्षांच्या शाळकरी मुलीच्या अक्षरशः ‘नजरे’तून उलगडते. अफीफा हीच झेलम आहे जणू. झेलम हीच अफीफा. ज्या झेलमच्या पात्रातून नंद ऋषींच्या भक्तीची धारा वाहात होती, लालदेदची कविता ज्या पाण्यावर फुलली, ‘राजतरंगिणी’च्या रूपात जिच्या काठावर कल्हणाने ऐतिहासिक दस्तावेज सिद्ध केला, रसूल मीरच्या प्रेमकवितांना जिच्या तुषारांनी तरोताजगी दिली, त्या झेलमच्या पाण्यात आता रक्ताच्या धारा मिसळल्या आहेत. बलात्कारितांची चिरगुटे तिथे धुवावी लागताहेत, शोकग्रस्त कुटुंबीयांचे अश्रू त्यात येऊन मिसळताहेत. पाण्यात मारलेल्या वल्ह्याच्या तालावर धास्तावलेल्या आई-बापांची हृदये कायम धडधडत असतात. झेलम भेदरलेल्या, छऴग्रस्त, मृत्युग्रस्त काश्मीरचे प्रतीक बनते.

कथापट, डॉक्युमेंटरीजचे फूटेज, टीव्ही न्यूजचे कव्हरेज, रंगमंचीय आविष्कार अशी अनेक तत्त्वं (असे अनेकविध फॉर्म्स) डिझॉल्व्हच्या साहाय्याने झेलमच्या तरंगांत एकत्र गुंफत हा चित्रपट एक सलग अनुभव सांगू पाहतो. आठवणींच्या या प्रतिमांची अमूर्त अशी अंतर्मुख प्रतिक्रिया आहे ही. ती अंतर्मुख प्रतिक्रिया मूर्त होते ती अफीफाच्या रूपात. शब्दातून कोणतेही भाष्य न करणाऱ्या अफीफाचे अस्तित्व स्वतःच परिस्थितीवरचे एक भाष्य बनते.

व्हॉइस ओव्हरचा (पडद्यावर प्रत्यक्ष न दिसणाऱ्या व्यक्तीचा आवाज) अतिशय परिणामकारक वापर हे या चित्रपटाच्या शैलीचे आणखी एक वैशिष्ट्य. चित्रपटातही लयीचे फार महत्त्व असते. लय दृश्यांची आणि ध्वनीची- शब्द, संगीत, वातावरणातले ध्वनी या सर्वांच्या आपापल्या लयी असाव्या लागतात. त्या सर्व लयींचा मेळ साधला की ती लय चित्रपटाचा विषय प्रेक्षकापर्यंत नुसता पोचवत नाही तर तो त्याच्या संवेदनांमध्ये झिरपवत  नेते. ‘मैं वो झेलम नहीं हूँ’ लयीचा हाच अनुभव देतो.

अफीफाला गुरुत्वाकर्षण आणि न्यूटनची कथा सांगता सांगता घराबाहेर पडावे लागलेले आणि कायमचे दृष्टीआड गेलेले बिलाल चाचाजान अफीफाच्या आठवणीत राहून राहून येतात. सर्व पुरुषांनी ओळखपत्रे घेऊन घरांबाहेर जमावे अशी लष्कराची अनाऊन्समेंट आणि मग त्यातल्या काहींचे कायमचे गायब होणे ही नित्याची बाब. बिलाल चाचा हे संवेदनशील, कवी वृत्तीचे, विज्ञानवादी सभ्य गृहस्थ. त्यांची एखाद्या रहस्यमय अस्तित्वासारखी देहाकृती पडद्यावर अवतरते. झेलमच्या पाण्यातून पावले टाकीत ती आकृती लष्करी कोठडीतल्या छळाचे वर्णन करते. ‘गावात लपलेल्या दहशतवाद्यांचा ठावठिकाणा सांग’ म्हणून दरडावणाऱ्या व्यवस्थेला ते परोपरीने सांगतात, ‘मला काही माहीत नाही’. पण कोणत्याच काश्मीरी माणसावर व्यवस्थेचा विश्वास नसावा ! तरुण, मध्यमवयीन, वृद्ध अशा कोणत्याही पुरुषाला नग्न करून, मारहाण करून, त्याच्या गुप्तांगात सुई घुसवून विजेचे शॉक देऊनही लष्कराच्या हाती माहिती लागत नाही. नसते ती सांगणार कोठून ? परिणाम एवढाच की कोणी बशीरसारखा वेडा होतो, तर कोणी बिलालसारखा मृत्युमुखी पडतो.

अफीफा, शिबू, इशरत आणि मन्सूर. या शाळकरी मुलांना परीक्षेचा फॉर्म कसा काय भरता येणार ही काळजी पडली आहे. वर्गात शिक्षिका येते तर तिथे फक्त तीन मुली आणि एक मुलगा. ती मुख्याध्यापकांकडे कैफियत घेऊन जाते, ‘मुलं शाळेत येत नाहीयेत, परीक्षाही पुढे ढकलल्या जात नाहीत. काय करायचे?’ कर्फ्यूपायी बंद राहणाऱ्या शाळांची दखलच सरकारने घेतलेली नाही. मुख्याध्यापक फारूक- अफीफाचे अब्बूच – विद्यार्थ्यांना घरोघरी नोट्स पाठवण्याची व्यवस्था करतात. मन्सूर आणि शाळेचा शिपाई रहमान धोका पत्करून ते काम करतात. पण तेवढ्यातच मुख्याध्यापकांच्या डोळ्यादेखत शाळेला आग लागते. शाळा पेटते. शेक्सपियरची पात्रं, गालिबचा दीवान, महजूरच्या मिश्र परंपरा, इकबालची अस्मिता, गांधी-नेहरूंची पुस्तकं, फैजची स्वातंत्र्याची गाणी – सगळं सगळं जळून राख होतं.

शिबू आणि अफीफाला रस्त्यात लष्कराचा आवाज हटकतो. त्या पळत सुटतात. अचानक शिबू गायब होते. शिबूची आई अफीफाकडे चौकशी करायला येते. ‘शिबू तीन दिन से घर नहीं आई’- ती म्हणते. आणि मग पडदाभर मोठा क्लोजअप. आईच्या डोळ्यात बाईच्या काळजातली चिरंतन काळजी दाटलीय आणि दाटलाय हतबल क्रोध. पोलीस कम्प्लेंट करण्यात काही हशील आहे का?

बने हैं अहल-ए-हवस मुद्दई भी, मुन्सिफ भी;
किसे वकील करें, किससे मुन्सफी चाहें ?

वासनांधच वादी आणि तोच न्यायाधीश. कोणाला वकील नेमायचं, कोणाकडून न्यायाची अपेक्षा ठेवायची ?’ शिबू तीन दिन से घर नहीं आई, क्या आपने उसे देखा है?’- जप चालू होतो. आणि मग याच वाक्याचे असंख्य पडसाद उमटू लागतात, शब्द एकमेकांवर स्वार होत राहतात, कोलाहलाचा कोलाज तयार होतो. पडसादांच्या प्रतिमा होतात, रंगमंचीय आविष्कारात तरुण मुली याच शब्दांचे जप करत राहतात. त्यांच्या मधोमध एक पुरुष लष्करी वर्दीत कठोर मख्खपणे उभा. अखेर मुली आपापल्या सलवारी फेडतात… शिबूचं काय झालं असेल हे सांगायलाच हवं का?

शांतपणे धुमसणारा मन्सूर आता पोस्टर रंगवू लागतो- काश्मीर की आझादी. सरकारने सतत दाखवलेल्या अविश्वासाचं हे फलित ! ‘तुझ्या अब्बूंसारखं तुलाही गायब व्हायचंय का’ असं म्हणत धास्तावलेली आई पोस्टर्स फाडते. तरीही मन्सूर रस्त्यावर पोस्टर घेऊन मौन आंदोलन आरंभतो. त्याच्याबरोबर इतर विद्यार्थी-विद्यार्थिनी जमू लागतात. कर्फ्यूच्या अनाऊन्समेंट्स पुन्हा पुन्हा, स्फोट आणि धुऱाचे लोट पुन्हा पुन्हा. लाल चौकातली दगडफेक, लष्कराचे गोळीबार आणि लोकांची पळापळ पुन्हा पुन्हा.

अखेर अफीफाचे अब्बू अफीफाची रवानगी शिक्षणासाठी दिल्लीला टीकू अंकलकडे करतात. हळूहळू दृश्याचा पोत आणि रंग बदलू लागतो. उजळ होऊ लागतो. वृद्ध  टीकू अंकल-आंटी हे काश्मिरी पंडित दांपत्य. ते अफीफाचं मायेनं स्वागत करतात. तिची मनःस्थिती समजून घेतात. शाळेत जाताना अफीफा दिल्लीच्या रस्त्यात बोलकी आंदोलने पाहते. फी वाढ विरोधी निदर्शने, आझादीची मागणी करणाऱ्या घोषणा, सरकार विरोधात अनेक गटांची अनेक आंदोलने. जोरदार नारेबाजी ऐकते. इथल्या आंदोलनात किमान घुसमटलेले मौन तरी नसते. अफीफाला काश्मीर नजरेआड करता येत नाही. झोप येत नाही. टीकू आंटी तिच्याजवळ बसते. म्हणते, ‘तुझ्या बिलाल चाचांनी आम्हाला खूप मदत केली होती. चार महिने आम्ही त्यांच्या घरी राहिलो होतो. अगदी आपल्या कुटुंबात राहिल्यासारखे.’ टीकू आंटी निदर्शनाला आणून देते तो काश्मीर प्रश्नाचा एक महत्त्वाचा पण बहुतेकांना माहीत नसलेला कोन ! आणि मग ती अफीफाच्या हातातलं पुस्तक घेऊन जगन्नाथ आझाद यांची कविता वाचू लागते. काश्मीरच्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर टीकू आंटीचा आवाज –

ऐ वादी-ए-कश्मीर
तू हिंद के माथे पे है इक ताज-ए-दरख्शाँ
और ताज भी वो ताज जो है मायह-ए-तौक़ीर
ऐ वादी-ए-कश्मीर…
अल्लाह करे जल्द वो दिन आए के जिस दिन
चमके तेरी दुनिया में मेरी फ़िक्र की तन्वीर
ऐ वादी-ए-कश्मीर…
(ताज-ए-दरख्शाँ= चमकता हुआ ताज, मायह-ए-तौक़ीर = प्रतिष्ठारूपी संपदा, फ़िक्र की तन्वीर = विचारांचं तेज)

प्रभाषचंद्र हा या चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक. तो कोणी काश्मिरी तरुण नाही. बिहारमधल्या एका तरुणाला हा चित्रपट करावा असे वाटावे हे मला फार महत्त्वाचे वाटते. जोरदार संस्कृतीचं राजकारण राबवले जाण्याच्या काळात, ‘मैं वो झेलम नहीं हूँ’ ( I Am Not Jhelum) थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन प्रेक्षकांपुढे कधी येऊ शकेल का, मला माहीत नाही. चित्रपट 2022 सालचा आहे. 2024 साल उजाडले आहे. ‘कलाकृती’ला प्राधान्य देणाऱ्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2022 मध्ये हा चित्रपट दाखवला गेला. ‘आर. के. मोहनन पुरस्कारा’च्या ज्युरीच्या तिन्ही सदस्यांनी- फिल्म सोसायटी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते-चित्रपट अभ्यासक अमृत गांगर, सिनेमाटोग्राफर- मल्याळम चित्रपट दिग्दर्शक सनी जोसेफ आणि प्रस्तुत लेखिका यांनी- एकमताने या चित्रपटाची निवड केली होती.

रेखा देशपांडे 9821286450 deshrekha@yahoo.com

About Post Author

Previous articleतू सिंगल आहेस?…
Next articleछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Vastusangrahalay)
रेखा देशपांडे या पत्रकार-लेखक-चित्रपटसमीक्षक-अनुवादक आहेत. त्यांनी माधुरी, जनसत्ता, स्क्रीन, लोकसत्तामधून पत्रकारिता, चित्रपट-समीक्षा केली आहे. त्यांची चित्रपट विषयक ‘रुपेरी’, ‘चांदण्याचे कण’, ‘स्मिता पाटील’, ‘मराठी चित्रपटसृष्टीचा समग्र इतिहास’, ‘नायिका’, ‘तारामतीचा प्रवास : भारतीय चित्रपटातील स्त्री-चित्रणाची शंभर वर्षे’ आणि ‘दास्तान-ए-दिलीपकुमार’ अशी सात पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच इतिहास, समाजकारण, राजकारण, साहित्य अशा विविध विषयांवरील अनुवाद प्रकाशित आहेत. त्यांनी दूरदर्शनसाठी ‘सावल्या’, ‘कालचक्र’, ‘आनंदी गोपाल’ या मालिकांचे पटकथा-संवाद-लेखन केले आहे. त्यांनी अनेक माहितीपटांसाठी लेखन, तसेच ‘कथा तिच्या लग्नाची’ या चित्रपटाचे सहलेखन केले आहे. त्या फीप्रेस्की या आंतरराष्ट्रीय चित्रपट-समीक्षक संघटनेच्या सदस्य व देशी-विदेशी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून क्रिटिक्स ज्युरीच्या सदस्य म्हणून सहभागी झाल्या आहेत.

2 COMMENTS

  1. खुप ह्रदयस्पर्शी लेखन
    OTT वर येण्याचे पण काही चान्सेस वाटत नाहीत.
    असेच लेख पाठवत रहा .
    ये दिल मांगें मोर !

  2. रेखाताईंनी या सुरेख लेखातून ‘मैं वो झेलम नही हूँ’ हा सबंध चित्रपट डोळ्यासमोर उभा केला.लेख पुन्हा वाचताना तर लेखात उल्लेखलेले डॉक्युमेंट्रीज फूटेज, टि.व्ही.न्यूज कव्हरेज किंवा रंगमंचीय अविष्कार कुठे कुठे वापरले असतील याचे ठोकताळे मांडता यावेत,इतक्या सहजतेने आणि सुलभतेने त्यांनी तांत्रिक अंगासह चित्रपटाची कथा सांगितली आहे.
    चित्रपटाची कथा मात्र मनाला वेदना देते.इतक्या भयावह आणि अत्यंत वाईट परिस्थितीत स्थानिक जनतेचा जो काही कोंडमारा होत असेल तो वर्णना पलीकडचा आहे.स्थानिक लहान मुलं,तरुण पिढी,त्यांचे आईवडील, व त्यांचेही आईवडील हे सर्व या परिस्थितीत कसे रहात असतील हा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.ही परिस्थिती बदलेल अशी आशाही ठेवायला जागा नाही.सध्याची व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्या बाबतीत असलेली संचारबंदीची परिस्थिती पहाता हा चित्रपट थिएटर्स मध्ये तर नाहीच पण ओ.टी.टी. वर तरी येईल का अशी शंका वाटते.चित्रपटाशी ओळख करून दिल्याबद्दल रेखाताईंना धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here