आकाशवाणीने 1983च्या डिसेंबर महिन्यात नागपूरला होणार्या भारत-पाकिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याचे समालोचन मराठीतून न करण्याचा निर्णय घेतला असल्याची ‘टीप’ मला ज्येष्ठ समालोचक असलेले बाळ पंडित यांनी दिली. मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो. अर्थातच, ती बातमी मोठी होती. मी केवळ बातमी दिली नाही तर एक मोठे आंदोलन उभे करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात नागपूर श्रमिक पत्रकार संघ, विदर्भ साहित्य संघ या संस्थाही सहभागी झाल्या. त्या आंदोलनाचे नेतृत्व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, महानुभाव संशोधक भाऊसाहेब कोलते यांनी केले. त्यात चित्रकार भाऊ समर्थ, विचारवंत भास्कर लक्ष्मण भोळे, साहित्यिक राम शेवाळकर, यशवंत मनोहर, मनोहर म्हैसाळकर अशी थोर थोर मंडळी सहभागी झाली होती. त्या मागणीसाठी आम्ही एक मोर्चा काढण्याचे ठरवले. नेमके, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन त्याच वेळेत नागपुरात होत होते. आम्ही मोर्चा काढत असल्याचे पोलिसांना रीतसर एका पत्राद्वारे कळवले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही असा असा मोर्चा काढणार असल्याचे कळवले. बाकीच्या तपशीलाचे सोडून द्या, पण आम्ही मोर्च्याला सुरुवात केली न केली तोच, पोलिसांच्या दोन गाड्या आमच्यापाशी आल्या. क्षणभर मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली, की हे सरकार साहित्यिकांना, पत्रकारांना अटक करणार आहेत की काय ! पण प्रत्यक्षात तसे काही नव्हते. एक पोलिस अधिकारी जीपच्या खाली उतरले. त्यांनी भाऊसाहेब कोलते आणि अन्य प्रमुख मंडळी यांना विनंती करून जीपमध्ये आणि बाकीच्यांना मागील व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले. त्यांनी आम्हाला “तुम्ही मोर्चा काढायचा नाही. तुमचा मोर्चा गाडीतूनच घेऊन येण्याचा आदेश देणारा फोन मुख्यमंत्री कार्यालयातून आला” असल्याचे सांगितले. मग आम्हाला पोलिसांच्या वाहनांतून विधिमंडळाच्या परिसरात नेण्यात आले.
आम्ही मोर्चेकरी विधिमंडळाच्या परिसरात पोचलो तर मुख्यमंत्र्यांचे तेव्हाचे सचिव शामकांत सोहनी आम्हाला घेण्यासाठी पोर्चमध्ये उभे होते. त्यांनी भाऊसाहेब कोलते आणि आम्ही सर्व यांचे स्वागत केले. ते आम्हाला घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेले. त्यांनी सभागृहात बसलेल्या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना आम्ही आल्याचा निरोप दिला. वसंतदादा पाटील धोतराचा सोगा सावरत, लगबगीने सभागृहातून केबिनमध्ये आले. त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला. भाऊसाहेब कोलते यांना तर प्रणामसदृश्य अभिवादन केले; आणि चक्क, ते मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडून भाऊसाहेब कोलते यांच्या शेजारच्या एका खुर्चीत बसले. मग त्यांनी सांगितले, “तुम्ही निवेदन वगैरे आणलं असेल तर ते द्या; पण मी दिल्लीत नभोवाणी मंत्र्यांशी बोललेलो आहे. मराठीतील समालोचन पुन्हा सुरू केलं जाईल. त्यांनी आकाशवाणीवरून या सामन्याचं समालोचन मराठीतूनही करण्याच्या सूचना आकाशवाणीला दिलेल्या आहेत आणि नभोवाणी मंत्रालयाकडून मला त्या संदर्भात कळवण्यातही आलं आहे. पण तुमच्या समाधानासाठी म्हणून नभोवाणी मंत्र्यांशी आता पुन्हाही बोलून घेतो”; त्यांनी तसे म्हणून, फोन उचलून त्यांच्या सहायकाला नभोवाणी मंत्र्यांना फोन लावण्यास सांगितले. फोन लागल्यावर, वसंतदादा पाटील त्यांच्या मराठळलेल्या हिंदीत नभोवाणी मंत्र्यांशी बोलले. मग त्यांनी आम्हाला चहा आणि अल्पोपहार दिला. आम्ही आमचे काम संपलेले असल्यामुळे उठलो. भाऊसाहेब कोलते काठी टेकत टेकत बाहेर आलेले होते. वसंतदादा पाटील जातीने आमची सोबत करत भाऊसाहेब कोलते आणि आमचे शिष्टमंडळ यांना सोडण्यासाठी बाहेर पोर्चमध्ये पोलिसांच्या वाहनापर्यंत आले. त्यांनी पोलिसांना “बाबांनो, हे साहित्यिक आणि पत्रकार आहेत. त्यांना नीट जिथून आणलं तिथं व्यवस्थित सोडा. तक्रारीला जागा ठेवू नका” अशा सूचना दिल्या आणि नमस्कार करून पुन्हा सभागृहात जाण्यासाठी वळले.
(‘वसंतदादा’ या दशरथ पारेकर संपादित पुस्तकातून उद्धृत)
– प्रवीण बर्दापूरकर 9822055799 praveen.bardapurkar@gmail.com
———————————————————————————————————————————-
धन्य ते मुख्यमंत्री आणि धन्य ते मोर्चेकरी! तो काळच वेगळा होता!!