चुनाभट्टीचा इतिहास (History of Chunabhatti)

4
204

निवृत्त पत्रकार नीला उपाध्ये यांचा वावर मुंबईच्या मराठी सांस्कृतिक जीवनात सभासमारंभांना हक्काने हजेरी लावणाऱ्या म्हणून आहे. त्यांना स्वतःला मराठी भाषासंस्कृतीची विलक्षण आस्था. श्री.पु.भागवत व दि.वि.गोखले हे त्यांचे गुरू आणि कथाकार अरविंद गोखले हा हळवा कोपरा, कारण अरविंद गोखले यांनी त्यांची करिअर नौका पत्रकारितेच्या सागरात सोडली! उपाध्ये यांनी जवळजवळ एकहाती अरविंद गोखले यांची जन्मशताब्दी दोन वर्षांपूर्वी साजरी केली, त्या निमित्ताने दोन पुस्तके संपादित-प्रकाशित केली. दुसऱ्या पुस्तकाची कल्पनाच अभिनव आहे. त्यांनी आशा बगे यांच्यानंतरच्या आजच्या पंचवीस कथाकारांना अरविंद गोखले यांची सर्वात आवडणारी कथा विचारली, त्या त्या कथेबद्दल त्यांच्याकडून लिहून घेतले, त्या संग्रहाला मोठी रसपूर्ण प्रस्तावना लिहिली. तो ग्रंथराज मराठी सारस्वतात मानाने मिरवला जावा असाच झाला आहे.

          मराठी कथेच्या अभ्यासक सुधा जोशी यांनी या पुस्तकानिमित्ताने खास कार्यक्रम घडवून आणला. जोशी पुस्तकाबद्दल भरभरून बोलल्या. उपाध्ये यांची पत्रकारिता प्रदीर्घ झाली आहे. त्या तडफदार महिला पत्रकार म्हणून मुंबईतील वर्तमानपत्रांच्या जगात माहीत होत्या. निवृत्तीनंतर त्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचे संचालन करतात. त्या म्हणाल्या मी गेल्या पन्नास वर्षात सतत सर्वत्र भटकत राहिली आहे. ‘कोरोना’च्या कारणामुळे प्रथमच घरात डांबली गेले आहे.
          उपाध्ये दोन कार्यक्रम स्वतः घडवतात. एक – त्यांचे पती पत्रकार वसंत उपाध्ये यांचा जन्मदिन. त्यांच्या स्मृत्यर्थ त्या एक छोटा पुरस्कारही देतात. दुसरा कार्यक्रम पत्रकार लेखक दि.वि.गोखले यांचा स्मृतिदिन. तो 25 मार्चला असतो. तो कोरोनामुळे यावर्षी रद्द झाला. यंदा त्यासाठी दिविचे चिरंजीव किरण येणार होते. ते गेली काही वर्षे पुण्यात स्थिरावले आहेत. त्यांनीही पिताजींप्रमाणे दुसऱ्या महायुद्धाबाबतच अभ्यास व लेखन करून पुस्तक अलीकडेच लिहिले आहे.
          उपाध्ये यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत आणखी एक उद्योग केला, तो म्हणजे मुंबईतील चुनाभट्टी गावाचा इतिहास लिहिला. ती मूळ खजूरभट्टी. मुंबईचे बांधकाम गेल्या शतकात वाढू लागले तेव्हा चुन्याची गरज खूप वाढली. सिमेंट 1940 नंतर मुंबईत मोठ्या प्रमाणावर येऊ लागले. त्या आधीच्या इमारती चुन्याने बांधलेल्या आहेत. तो चुना प्रथम मेमन लोक करायचे, मागणी वाढल्यावर त्यात स्थानिक आगरी-कोळी जातीचे लोक आले. त्यांनी तो व्यवसाय शीवपुढील भागात म्हणजे चुनाभट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर विस्तारला. म्हणून त्या परिसराला चुनाभट्टी नाव पडले, हार्बर रेल्वेवर त्या नावाचे स्टेशन झाले.
नीला उपाध्ये ह्या आगरी-कोळी समाजातून आल्या. संपादक अरुण टिकेकर यांनी नीला उपाध्ये यांना एशियाटिक सोसायटीची फेलोशिप देऊन, चुनाभट्टीचा इतिहास लिहिण्यास लावला असे त्या म्हणतात. उपाध्ये यांनी तो निष्ठेने व बरीच माहिती संकलित करून लिहिला. त्या पुस्तकाचे प्रकाशन टिकेकर यांच्या स्मृतिदिनी जानेवारीत झाले. भारतात अशा स्थानिक इतिहासाची माहिती जवळजवळ नाही, त्यामुळे अभ्यासक त्यासाठी बुभुक्षित असतात. तसेच, चुनाभट्टीच्या इतिहासाचे झाले. मुंबईच्या राजा शिवाजी वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक सव्यसाची मुखर्जी यांच्या नजरेस ते पुस्तक आले. त्यांनी नीला उपाध्ये यांना ते इंग्रजीत करण्यास सुचवले. नीला उपाध्ये म्हणाल्या, की कोरोनाची भीती व संचारबंदी माझ्या अचानक कामी आली. एकाग्रपणे इंग्रजी भाषांतराच्या कामात लक्ष घालता आले. पण आता इंग्रजी सरसर लेखनाचा सराव राहिलेला नाही. ते कॉलेजात केले तेवढेच!
          त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये असताना इंग्रजी चित्रपटांची ओळख करून देणारा ‘चित्रपश्चिमा’ नावाचा कॉलम यशस्वीपणे चालवला होता. तो नोकरीतील वारसा त्यांच्याकडे कै.अशोक जैन यांच्याकडून आला होता.
          अरविंद गोखले यांच्या जन्मशताब्दीच्या उल्लेखावरून आठवले. तुमच्या एक लक्षात आले आहे का, की हे शतक सुरू झाल्यापासून सतत एकामागोमाग एक महत्त्वाच्या जन्मशताब्दी साजऱ्या होत आल्या आहेत? ती सारी मातब्बर नावे आहेत. ती यादी पत्रकार-लेखक ग.त्र्यं.माडखोलकर (२८ डिसेंबर १८९९२७ नोव्हेंबर १९७६) यांच्यापासून सुरू होते. त्यातील कळस म्हणजे पुल, गदिमा व सुधीर फडके या तिघांची जन्मशताब्दी गतवर्षी साजरी झाली! तेव्हा त्या तिघांबद्दलची रसिकजनांची कृतज्ञता कार्यक्रमांतून, लेखनातून, ग्रंथांतून, सोशल मीडियावरून सर्वत्र भरभरून वाहिली. अजूनही पुलंचे जोक्स व त्यांचे लेख प्रसृत होत असतातच.  
          मी, माझा सहकारी राजेंद्र शिंदे आणि विनय नेवाळकर, आम्ही त्या तिघांच्या जन्मशताब्दीचा विचार करताना वेगळीच कल्पना लढवली. गेल्या शतकातील व या शतकाच्या पहिल्या काही दशकांत सामाजिक-सांस्कृतिक जीवन घडले गेले ते ढोबळपणे 1900 ते 1930 या काळात जन्मलेल्या महनीय व्यक्तींच्या संस्कारांतून. त्यांच्याच जन्माची शंभर वर्षे विद्यमान ज्येष्ठ जनांना महत्त्वाची वाटत आहेत व तो वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जावा असेही वाटत आहे. तर आम्ही तशा व्यक्तींची नावे काढत गेलो ती जवळजवळ अडीचशेझाली. त्या लोकांनी महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या जीवनाचा पाया रचला! या संबंधात कल्पना बर्‍याच आहेत. त्या ‘शेअर’ही करता येतील, आणखी सुचू शकतील. फक्त तो कृतज्ञताभाव मनात जागृत हवा!
नीला उपाध्ये 7021346033
दिनकर गांगल  9867118517

(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)

———————————————————————————————————                                          
                  नीला उपाध्ये संपादित पुस्तके

About Post Author

Previous articleझाडांची दुनिया (Dr. Ravin Thatte)
Next articleजन्मशताब्दी साजरी होत असलेल्या व्यक्ती (Janmashatabdi Sajari Hot Asalelya Vyakti)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

4 COMMENTS

  1. नीला उपाध्ये यांचे नाव ऐकून होते पण आपण त्यांच्या कार्याचा विस्तृत परिचय करून दिलात. धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here