गुणाकर मुळे- शिंदी ते दिल्ली

0
115

अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक या गावी जन्मलेले आणि गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले गुणाकर मुळे यांनी विज्ञान लेखन साहित्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी मराठी भाषिक असूनही दिल्लीत हिंदी आणि इंग्रजीतून लेखन केले आहे.

          त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण (गणित) अलाहाबाद विश्वविद्यालयातून घेतले. त्यांनी विज्ञानाचा इतिहास, पुरातत्त्व, पुरातन लिपीशास्त्र, मुद्राशास्त्र आणि भारतीय इतिहास व संस्कृतीशी संबंधित अशा विषयांवर विपुल लेखन केले आहे. मौलिक अशी त्यांची त्रेचाळीस पुस्तके आणि तीन हजारांहून अधिक लेख हिंदी भाषेत तर दोनशेपन्नास लेख इंग्रजीत राष्ट्रीय दैनिकांतून प्रकाशित झाले आहेत. त्यांनी विज्ञान, आणि इतिहास या विषयांतील अनेक ग्रंथांचा हिंदी अनुवादही केला आहे.

          त्यांच्या विज्ञान लेखनावर अनेक विद्यापीठांमध्ये शोधप्रबंध लिहिले गेले आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शन यांवरही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. ते महापंडित बौद्ध राहुल सांकृत्यायन यांचे शिष्य. गुणाकार यांनी सांकृत्यायन यांच्या जीवनावर पुस्तक लिहिले आहे. ते नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केले आहे. त्यांना हिंदी अकादमीचा साहित्यकार सन्मान, केंद्रीय हिंदी संस्थेचा ‘आत्माराम पुरस्कार’, बिहारच्या राजभाषा विभागाचा जननायक कर्पुरी ठाकूर स्मृती सन्मान आणि मेघनाद सहा असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान विभागाची फेलोशिपही मिळाली होती.

त्यांची ‘अंक-कथा’, ‘अक्षर-कथा’, ‘भारत : इतिहास आणि संस्कृति’, ‘आकाश-दर्शन’, ‘विश्वातील महान गणितज्ञ’, ‘तारांनी भरलेले आकाश’, ‘भारतीय इतिहासातील विज्ञान’, ‘नक्षत्रलोक’, ‘अंतरीक्ष प्रवास’, ‘सौर-मंडल’, ‘ब्रह्मांड परिचय’, ‘आशियातील  प्रमुख वैज्ञानिक’, ‘रॉकेट ची गोष्ट’, ‘सूर्य,चंद्र, तारे’, ‘आर्यभट’, ‘अल्‍बर्ट आइंस्‍टाइन’, ‘पास्‍कल’, ‘केपलर’, ‘आर्किमिडीज’, ‘भास्कराचार्य’, ‘मेंडेलीफ’, ‘महापंडित राहुल सांकृत्यायन’, ‘महाराष्ट्रातील दुर्ग’, ‘कृषि-कथा’, ‘महान वैज्ञानिक महिला’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत.

गुणाकर मुळे नम्र आणि साधे स्वभावाचे होते. त्यांना आपल्याला एखाद्या विषयाचे ज्ञान नाही हे मान्य करण्यात अजिबात संकोच नसे. गुणाकर मुळे यांचा जन्म 3 जानेवारी 1935 रोजी अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथे झाला. त्यांनी दिल्लीत नोकरी करण्याचे टाळून लेखनातच रमणे पसंत केले. त्यांनी त्यांच्या लेखनाच्या आधारे दिल्लीत वेगळीच छाप पाडली आहे. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. गुणाकर मुळे यांचा मृत्यू 16 ऑक्टोबर 2009 रोजी दिल्लीतील पांडवनगर येथे झाला.

प्रतिनिधी

——————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here