जातिभेदाला सरकारी उत्तेजन ! (Government Promotes Casteism Indirectly)

0
101

मी एका लेखात असे वाचले, की अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर गावातील मागील दोन पिढ्यांतील लोक जात न मानता, ‘अजातीय’ बनून हयात घालवत आहेत. वास्तविक, तो अभिनंदनाचा विषय असण्यास हवा. त्याऐवजी त्या लोकांना त्याचा त्रास होत आहे ! त्या गावातील शाळेच्या पूर्वीच्या दाखल्यावर ‘अजातीय’ असा शिक्का असे, पण आता जात लिहिली नाही तर सुविधा मिळणार नाहीत असे समजले. सरकारी कागदांवर जात लिहिण्यास हवी अशी त्यांची माहिती आहे. म्हणजे दोन पिढ्या जातिभेद संपवल्यानंतर तो पुन्हा ठळक करायचा? पुण्यातही बालवाडीत प्रवेश मिळवताना बालकांना धर्म व जात यांची माहिती द्यावी लागते, हे समजल्यावर मला फार दुःख झाले. सरकारी नियम जातिभेद पक्के करण्यास उत्तेजन का देतात? जातिभेद हा हिंदू समाजावर असलेला कलंक आहे, त्यामुळे अनेक लोकांवर पिढ्यान् पिढ्या अन्याय झाला आहे हे आम्ही शाळेत असल्यापासून शिकत आहोत. तो कलंक दूर करण्यास हवा ते पटते. पण शिक्षण आणि प्रत्यक्ष जीवन यांतील फरक सतत जाणवत असतो. स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली, तरी जातीनिहाय आरक्षण ठेवण्यात राजकारणी लोकांना रस आहे. त्यासाठी मोर्चे काढण्यास, कोर्ट-कचेऱ्या करण्यास भरपूर पैसे व वेळ खर्च करणारे लोक आहेत, पण जातिभेद खरोखर नष्ट करण्यास उत्तेजन देणारे लोक किती आहेत? मंगरूळ दस्तगीरमधील लोकांचा अनुभव सुधीर भारती यांनी अन्य प्रकाशनातील एका लेखाद्वारे मांडला, तो खरेच फार खिन्न करणारा आहे.

या पार्श्वभूमीवर देवेंद्र राक्षे या तरुणाशी झालेले दूरध्वनी संभाषण दिलासादायक ठरले. त्याने त्याची मुलगी इरा हिला शाळेत प्रवेश घेताना तिचा धर्म ‘माणुसकी’ आणि जात ‘माणूस’ अशी नोंद केली आहे असे सांगितले. अर्थात, देवेंद्र आणि त्याची पत्नी यांना ते करण्यास थोडा त्रास झाला. पण ते पुण्यात तरी साध्य झाले. शिवाय, त्याच्या श्रीगोंदे या अहमदनगर जिल्ह्यातील गावी लोक जातिभेद पाळत नाहीत, तेथे धर्मभेददेखील फारसा नाही असे समजले. श्रीगोंदे या गावाने बाबुमियाँ बँडवाले, संतश्री शेख महंमद हे सुफी संत, वामनराव पै यांचे गुरू नानामहाराज श्रीगोंदेकर यांच्यासारखी नररत्ने दिली. शेख महंमद यांच्या मठात वेद आणि कुराण या दोन्हींचे पठण एकाच वेळी होते. जाती आणि धर्म यांमुळे समाजाचे विभाजन टाळणे श्रीगोंदे गावात जसे जमले, ते अनेक गावांत झाले पाहिजे, त्यासाठी उत्तेजन दिले पाहिजे. जनसामान्यांनीच त्यांना जातिभेद नको असे पक्के ठरवण्यास हवे. मग राजकारण्यांना विशिष्ट जातीला आरक्षण मिळवून देत, त्या जातीचा तारणहार होण्याची स्वप्ने पडणार नाहीत.

निदान ज्या लोकांना जातीनिहाय आरक्षण नको आहे, त्यांना तरी त्यांची जात ‘माणूस’ अशी लिहिता आली पाहिजे. ज्यांना हिंदू धर्म ठेवायचा आहे, पण जातिभेद पाळायचा नाही, त्यांना आवश्यक असेल तेथे धर्म ‘हिंदू’ आणि जात ‘माणूस’ अशी नोंद करता आली पाहिजे. जातिभेद नाहीसे किंवा निदान कमी करण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल असेल. सरकारी कागदपत्रांत तशी नोंद करण्याची मुभा हवी. त्यासाठी कायदा जाणणारे लोक मदत करतील का?

देवेंद्र राक्षे 8308314900

– मंगला जयंत नारळीकर

(‘लोकसत्ता’, 24 जानेवारी 2022 ‘लोकमानस’वरून उद्धृत)

(मंगला नारळीकर या गणिताच्या अभ्यासक व लेखिका आहेत)

———————————————————————————————————

मी मंगरूळ दस्तगीर गावातील स्थितीबाबत माहिती घेत आहे. परंतु हे खरे आहे, की सर्व सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेताना जाती-धर्म-आर्थिक गट यांबद्दलचे उल्लेख करावे लागतात. अन्यथा, शिक्षकांनी सर्व कॉलम का भरले नाहीत अशी विचारणा त्यांना शिक्षण विभागाकडून होते. दुसरे म्हणजे हल्ली अनेक प्रकारच्या सवलती शाळेच्या माध्यमातून मिळतात. जातीच्या दाखल्यासाठी तो एक पुरावा असतो. त्यासाठी जात आणि धर्म यांचे तपशील आवश्यक झाले आहेत. परंतु ज्यांना कोणतीही सवलत नको आहे, अशा व्यक्तींना ते तपशील भरण्याची सक्ती करणे हे संविधानातील स्वातंत्र्यासंबंधीच्या तरतुदींना धरून नाही. त्याबाबत शिक्षणव्यवस्थेत अज्ञान आहे. मी श्रीगोंदे गावाबाबत पुढील वस्तुस्थिती सांगू इच्छितो. श्रीगोंदे हे गाव महादजी शिंदे यांच्या वतनाचे गाव होते. तेथे वारकरी संप्रदायाची धुरा ज्यांनी खांद्यावर घेतली, त्या संत शेख महंमद महाराजांचे मंदिर आहे. स्वातंत्र्य चळवळीत श्रीगोंदे तालुक्यातील प्रमुख स्वातंत्र्यसैनिक म्हणजे बाबुमिया बँडवाले हे होत. त्यांनी मुस्लिम सत्यशोधक समाजाची चळवळ तेथे सुरू केली. ते हमीद दलवाई यांचा आधार होते. त्यांच्या मंदिरात कोणाही व्यक्तीने कोणत्याही धर्माचे पुस्तक घेऊन वाचले तरी चालते ! श्रीगोंदेकर महाराज यांच्याबाबत देखील नारळीकर यांच्या लेखनातील उल्लेख सत्य आहे. ते गाव भारतीय संस्कृतीमधील सहिष्णुतेचे प्रतीक आहे. लोकांतील जातिवाद अशा प्रेरणास्थळांमुळे कमी होतो. श्रीगोंदे येथे कधीच जातीय आणि धार्मिक दंगल झालेली नाही हा याचा पुरावा.

– गिरीश कुलकर्णी girish@snehalaya.org

(गिरीश कुलकर्णी हे नगरचे सामाजिक कार्यकर्ता आहेत)

———————————————————————————————

मंगलातार्इंचे पत्र अस्वस्थ करणारे आहे. विदर्भात जात न मानणाऱ्यांची मोठी संख्या आहे असे मीही ऐकून आहे. पण कालांतराने त्यांना जात म्हणून ‘अजात’ या नावाने ओळखले जाऊ लागले आणि त्यांच्या मुलाबाळांच्या दाखल्यात ‘अजात’ असे लिहिले जात होते. मी सध्या पुण्यात स्थायिक आहे. जाती-धर्माबाबत माझी मते आणखी काही वेगळी आहेत. माझा विवाह आंतरजातीय आहे आणि माझ्या दोन मुलींपैकी मोठ्या मुलीच्या वेळी मी दाखल्यात धर्म ठेवला, पण जात काढून टाकली. दुसऱ्या मुलीच्या वेळी दोन्ही काढून टाकले. पण दोन्हीकडे जागा रिकामी ठेवली, डॅश केले. मलाही दोन्ही वेळेस त्रास झाला. पण मी तो निपटून काढला. ती एक वेगळी गोष्ट आहे. असो, म्हणजेच नसो !

– श्रीनिवास हेमाडे 9158658066

(श्रीनिवास हेमाडे हे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आहेत)

———————————————————————————————-

जात नाकारणाऱ्यांचे गाव

‘जातपात, धर्म यांचा विचार मनात बिंबवणाऱ्या काही घटना समाजात अवतीभोवती घडत असताना, कोणी व्यक्ती ‘अजातीय’ म्हणून जीवन जगू शकते का?’ असा प्रश्न मनात घेऊन अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीरकडे जाणारा कच्चा रस्ता पार करत आम्ही पुढील प्रवास करत होतो. त्या गावात मागील दोन पिढ्यांपासून काही कुटुंबे अजातीय म्हणून त्यांची हयात घालवत असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्या कुटुंबांतील सदस्यांना भेटण्याचे स्थान ठरले ते गावातील गणपती मंदिर ! मनात विचार आला, अजातीय म्हणजे कोठलीही जात न मानणारे, कर्मकांडापासून कोसो दूर, देवधर्माचा पत्ताच नाही, मग गणपती मंदिर हे कार्यक्षेत्र कसे? अनेक प्रश्न मनात घर करून होते.

गावात शिरताच, वेशीवर शाळेत मुलांना घेऊन जात असलेल्या एका महिलेला गणपती मंदिराबाबत विचारणा केली. तिने थोडा वेळ आमच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि खुणेने पुढे जाण्यास सांगितले. आम्ही पुढे मंदिराचा शोध घेत अगदी ‘अजातीय बालेकिल्ला’ असलेल्या गणपती महाराजांच्या ‘कचेरी’समोर, म्हणजे समाधिस्थळासमोर येऊन उभे ठाकलो. त्याच वेळी पांढरीशुभ्र दाढी असलेली, अंगात सफेद शर्ट आणि धोतर, तसेच डोक्यावर त्याच रंगाचा दुपट्टा बांधलेली, अनुभवी वाटत असलेली एक ज्येष्ठ व्यक्ती समोर आली. तिची वेशभूषा व हालचाली पाहून वाटले, की ती व्यक्ती त्या ठिकाणी कर्ताधर्ता असावी. त्यांनी त्यांचा परिचय श्यामबाबा भभूतकर असा करून दिला. त्यांच्या सोबत हरिश्चंद्र निमकर होते.

मंदिरसदृश वाटणाऱ्या छोटेखानी सभागृहात प्रवेश करताच आमच्या नजरा कल्पनेतील गणपतीच्या मूर्तीकडे खिळल्या, कारण गणपती मंदिराचा पत्ता विचारत आम्ही त्या ठिकाणी पोचलो होतो. मात्र, गणपतीची मूर्ती कोठेच दिसली नाही. दिसले ते संत गणपती ऊर्फ हरी महाराजांचे छायाचित्र. जरा वेळ छायाचित्राकडे नजर खिळली. थोडा अंदाज आला, की हा देवधर्माचा मामला नाही. ‘आम्ही फार कष्टाने हा लढा दिला आहे; मात्र आता नाइलाज आहे,’ काही कळायच्या आतच श्यामबाबा भभूतकर बोलते झाले. त्यांच्या डोळ्यांत काहीसा संताप दिसत होता. चर्चा सुरू असतानाच ‘जय हरी’चा आवाज आला. अशोक अवघड आले होते. मी ‘नमस्कार’ म्हटले, त्यांनी त्याला ‘जय हरी’ने प्रतिसाद दिला. मी ‘जय हरी?’ असा प्रश्नार्थक चेहरा करत त्यांच्याकडे पाहिले. ‘होय ना, आम्ही सर्व हरीचीच लेकरं आहोत ना?’ पलीकडून उत्तर मिळाले. ‘‘अजातीय म्हणजे दुसरं-तिसरं काहीच नसून, पांढऱ्या कपड्यांप्रमाणे मनसुद्धा पांढरं, म्हणजे स्वच्छ ठेवून जीवन जगणं एवढं मर्यादित आहे’’ असे अवघड म्हणाले.

“आजोबा, बाप यांनी ‘अजातीय’ म्हणून हयात घालवली; मात्र सरकारी कागदांवर जात लिहिणं आवश्यकच झालं,” हरिश्चंद्र निमकर काहीशा निराशाजनक सुरात म्हणाले. गणपती महाराजांच्या सान्निध्यात कोठल्याही जातीचा झेंडा न घेता, स्वतंत्र अजातीय झेंडा अंगाखांद्यावर घेत त्या मंडळींनी तत्कालीन जातीवर आधारित वर्णव्यवस्थेविरूद्ध लढा दिला होता. ‘‘दोन पिढ्या खपल्या. आम्हाला लग्नातही कुणी बोलवत नव्हतं. समारंभातून हाकलून द्यायचे, पांढरे झेंडेवाले नकोच असं म्हणायचे,’’ डोळे पुसत अशोक अवघड म्हणाले.

माणसाचे माणूसपण “आजवरच्या जाती-धर्मांच्या अभेद्य भिंतींनी हिरावले, कर्मकांडांत अनेक पिढ्या गेल्या; मात्र माणूसपण काही आले नाही. म्हणून आम्ही अजातीय असा उल्लेख आमच्या कागदपत्रांवर केला,” श्यामबाबा भभूतकर म्हणाले. “अजातीय म्हणूनच आमचीही कारकीर्द संपत आली आहे. गावात अजातीय म्हणवून घेणारी दहा-बारा कुटुंबच शिल्लक राहिली आहेत. कोणत्याच जातीत नसल्याने आम्हाला कोणी मुली देत नव्हते, म्हणून आम्ही आमच्या आमच्यातच सोयरिका करत गेलो,” अशोक अवघड सांगत होते. प्रवाहाच्या विरूद्ध लढा दिला, कागदपत्रांवरील जातीच्या रकान्यात ‘अजातीय’ हा शब्द लिहून त्यांच्या निर्णयावर ठाम असणारे श्याममहाराज भभूतकर, जितेंद्रनाथ निमकर, संतोष बिरस्कर, अशोक अवघड, हरिश्चंद्र निमकर, चैतन्यप्रभू भभूतकर यांची कुटुंबे गावात त्यांच्या घरासमोर श्वेत म्हणजे पांढरा ध्वज लावत मोठ्या अभिमानाने आम्ही ‘अजातीय’ असल्याचे ठामपणे सांगण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, परिस्थिती काहीशी बदलली आहे. नवीन पिढीच्या शिक्षणाची मोठी समस्या अजातीयमुळे निर्माण झाली आहे. शैक्षणिक कागदांवर इच्छा नसतानाही जातीचा उल्लेख करावा लागत असल्याची खंत हरिश्चंद्र निमकर यांनी व्यक्त केली. पर्यायाने ज्यांनी अनेक पिढ्या अजातीय म्हणून समाजात अढळ स्थान निर्माण केले, त्याच मंडळींवर आज कागदपत्रांवर जात लिहिण्याची वेळ नाइलाजाने का होईना, आली आहे.

गावाबाहेर असलेल्या ‘श्वेत निशाणधाऱ्यां’च्या स्मशानभूमीवर नेत हरिश्चंद्र पाटलांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. ‘‘आयुष्यभर प्रस्थापितांच्या शिव्याशाप खात जीवन काढलं, गावाबाहेरील स्मशानभूमीतही भेदाभेद होताच. आम्हाला वेगळी व्यवस्था करून देण्यात आली. जमाना बदलला आहे. पुतण्याच्या प्रमाणपत्रावर जात लिहिण्याचा नाइलाज झाला आहे, कारण तो पुढील शैक्षणिक सुविधा मिळवू शकत नव्हता,’’ डोळे पुसत हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितले. त्यांनी गणपती महाराजांचे साहित्य पुनर्लिखित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

– सुधीर भारती sudhir.sakal99@gmail.com

(सकाळ, सप्तरंग पुरवणीवरून उद्धत)

पूर्वी आमच्या वाडवडिलांना व आम्हालाही खूप त्रास सोसावा लागला, अजातीय म्हणून जगताना काही वेगळे असल्याचा भास होत गेला. समाजाच्या तीक्ष्ण नजरांमुळे मनाचे खच्चीकरण होत होते; मात्र नाइलाज होता, ‘मिशन’ तर पुढे चालवायचेच होते. त्या वेळी आम्हाला सांभाळून घेणारे कोणीच नव्हते, आज थोडेफार समजून घेतात.

– अशोक अवघड

समाजात धर्म-जातीची दरी आहे; मात्र ती पूर्वीइतकी नाही. गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील दरी प्रकर्षाने दिसून येते. सोन्याचा काळ सुरू आहे, मात्र कर्मकांडांत तास न् तास घालवले जातात, याचेच दुःख आहे.

– श्यामबाबा भभूतकर

(सुधीर भारती यांनी भेट घेतलेल्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया)

—————————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here