गिरवीचा गोपालकृष्ण (Giravi’s Gopalkrishna Temple)

गिरवी येथे असलेल्या गोपालकृष्ण मंदिरातील कृष्णाची मूर्ती सुंदर तर आहेच; परंतु तिच्या पाठीमागे, म्हणजे ती मूर्ती तयार व स्थापन होण्यामागे एक कथा आहे, तीही रोचक आहे. मूर्ती धेनुसहित श्रीकृष्णाची आहे. मंदिराभोवती दगडी चुनेगच्ची तट आहे. त्या सभोवतालच्या ओवऱ्यांवर मात्र आदिलशाही वास्तुरचनेची छाप आहे. गिरवी हे गाव फलटणपासून दक्षिणेला बारा किलोमीटरवर आहे.

बाबुराव देशपांडे नावाचे सद्गगृहस्थ गिरवी येथे सातशे वर्षांपूर्वी राहत होते. ते श्रीकृष्णभक्त होते. त्यांनी कृष्णदर्शनाचा ध्यास एवढा घेतला, की लोक त्यांना महाराज म्हणू लागले. ते समाधिस्थ अवस्थेत असताना म्हणे, त्यांना गोपालकृष्णाने दृष्टांत दिला. त्यामुळे त्यांना अमुक एका ठिकाणी शाळिग्राम मिळेल अशी माहिती झाली. बाबुराव यांनी संबंधित जागी उत्खनन केल्यावर खरोखरच शाळिग्राम मिळाला ! त्यावर विष्णूची चिन्हे होती. बाबुराव महाराजांना तीव्र इच्छा झाली, की त्यातून गोपाळकृष्णाची साजिरी मूर्ती घडवून घ्यावी. मात्र, त्यांना त्यांच्या मनासारखी मूर्ती घडवणारा कारागीर मिळेना. पुढे, गोष्ट आणखीच अद्भुत वळण घेते आणि दंतकथेच्या पातळीला जाऊन पोचते. गोष्ट अशी-

योग असा जुळून आला, की ‘जय-विजय’ नावाचे दोन कारागीर बाबुराव महाराजांना येऊन भेटले. कारागीरांची ती जोडी अजबच होती ! त्यांच्यातील एक थोटा होता, तर दुसरा आंधळा. त्या दोघांनी एकांत मागून घेतला आणि एका खोलीत स्वत:ला बंदिस्त करून घेतले. त्यांनी काही काळातच मूर्तीचे काम पूर्ण करून ती बाबुराव महाराजांसमोर ठेवली. बाबुराव महाराज त्यांच्या मनातील छबी सगुण साकार झालेली पाहून भावविभोर होऊन गेले.

एकाच पाषाणाची चार फूट उंचीची मूर्ती ! त्यात कृष्ण एका पायावर उभा आहे. दुसऱ्या पायाची अढी घातली आहे. कृष्णाने केवळ अंगठ्यावर पाय टेकलेला आहे. त्यात त्या मूर्तिकारांचे कौशल्य आहे. मूर्तीची घडण रेखीव आहे. चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. नेत्र विशाल व आकर्षक आहेत. मूर्तीच्या शरीरावरील, गळ्यातील, हातातील, कमरेवरील अलंकार पाषाणातूनच घडवलेले आहेत. दोन्ही हात जणू मुरली वाजवत आहेत, अशा रीतीने दोन्ही हातांची बोटे उजव्या बाजूस कोरली आहेत. त्या बोटांमध्ये फक्त लाकडी मुरली ठेवायची, तोंडाचा भाग बरोबर मुरलीवर येतो. अलंकारांची सर्व घडण गोकुळ वृंदावन भागातील शैलीची आहे. हातावरील रेषा (शिरा) देखील स्पष्ट दिसतात. कृष्णाच्या पायाजवळ दोन्ही गायी तल्लीन होऊन कृष्णाची मुरली ऐकत आहेत असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहे. तसेच, दर्शनी पट्टीवर मानवी चार लहान आकृती आहेत. त्या जय-विजय व दोन मूर्तिकार यांच्या आहेत. त्या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते दुर्लभ दर्शन हरिहर ऐक्याचे आहे. मूर्तीत हरिहर भेट साकारल्यामुळे त्यांचे सेवक हनुमंत, गरुड आणि नंदीही तेथे अवतरले आहेत. ज्या सिंहासनावर श्रीगोपाळकृष्ण स्थापित आहेत ते सिंहासन शिवलिंगाकार (साळुंका रूपाचे) आहे. तशी मूर्ती अन्यत्र कोठे सापडणे अशक्यच !

बाबुराव महाराजांची दंतकथा संपतेही तशाच अद्भुत घटनेने. बाबुराव महाराजांनी त्यांच्या मनासारखी मूर्ती घडवली गेली ह्या आनंदात त्यांच्या घरी कारागिरांना जेवणाचे आमंत्रण दिले. परंतु कारागीर जेवणाआधी विहिरीवर स्नानासाठी जातो असे सांगून गेले ते अंतर्धान पावले ! जणू काही, स्वत: भगवान श्रीकृष्णच त्याच्या भक्ताला अभिप्रेत असलेली मूर्ती साकारून निघून गेले.

बाबुराव महाराजांनी मूर्तीची यथोचित पूजा करून प्रतिष्ठापना केली. मंदिराची सेवा योग्य माणसांच्या हाती सोपवली आणि इहलोकीचे कार्य संपले आहे असे ठरवून मूर्तिस्थापनेनंतर वर्षभरातच समाधी घेतली. ती जागा गोपालकृष्ण मंदिराच्या खाली तळघरात स्थित आहे.

त्या कथेचा अर्थ असाही लावता येतो, की बाबुराव महाराजांना अपेक्षित असलेली प्रतिमा अपंग व्यक्तीने ज्ञानेंद्रियांनी जाणून घेतली, तर अंध व्यक्तीने तिच्या साथीदाराच्या सूचनेनुसार ती मूर्ती कर्मेंद्रियांनी घडवली. थोडक्यात, श्रीकृष्णाच्या उपदेशाप्रमाणे ज्ञानयोगाचा आणि कर्मयोगाचा पुरस्कार केला आणि भक्तीमार्गामुळे ज्ञानयोग व कर्मयोग प्रकट झाले.

बाबुराव महाराजांचे वंशज जयंत देशपांडे हे गोपालकृष्ण मंदिराची ही कथा रसाळपणे वर्णन करून सांगतात. ते असेही म्हणतात, की देशपांडे यांची आमची सतरावी पिढी याच मंदिरकार्यात गुंतलेली आहे. मंदिराचा ट्रस्ट सरकारी नियमानुसार 1957 मध्ये करण्यात आला. त्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार 2005 ते 2010 मध्ये करण्यात आला. जन्माष्टमीचा उत्सव गोपालकृष्ण मंदिरात दरवर्षी गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि देशपांडे कुटुंबीयांच्या सहभागाने साजरा केला जातो. भजन-कीर्तन-भागवत-ज्ञानेश्वरी पारायणे होतात. गोपाळकृष्णाच्या प्रतिमेची आणि पादुकांची मिरवणूक आषाढी आणि कार्तिकी एकादश्यांना काढली जाते. कार्तिक महिन्यात काकड आरती होते. बाबुराव महाराजांच्या समाधीवर अभिषेक व पूजा वैशाख वद्य प्रतिपदेला केली जाते. गोपाळकाल्याचे कीर्तन होते. त्या वेळेस संपूर्ण गाव गोळा होते आणि उत्सवात सहभागी होते. गोपालकृष्ण मंदिराचा आतील आणि बाहेरील परिसर शांत आहे. त्यामुळे तेथे साधक येऊन नित्य उपासना करतात. कृष्णमंदिराच्या परिसरात असलेल्या ओवरीत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गोपालकृष्ण मंदिराला करवीर पीठाचे शंकराचार्य, स्वामी गोविंददेव गिरी ऊर्फ किशोरजी व्यास, गुजरातचे स्वामी सवितानंद, स्वामी अवधूतानंद, भागवताचार्य धनंजयराव देशपांडे, मनोहर दीक्षित महाराज, वेदाचार्य विवेकशास्त्री गोडबोले, राजमाता कल्पना सरकार आदी मंडळींनी भेट दिली आहे.

जयंत देशपांडे ह्यांनी मंदिराचे प्रचार-प्रसार कार्य यास वाहून घेतले आहे. ते पुण्याला मुलासोबत राहतात. तरी महिन्यातून किमान दोन वेळा तरी गिरवीला जातात. स्वत: देशपांडे सर्व तऱ्हेच्या अनुष्ठानांत सहभागी होतात. त्यांनी मंदिराचा इतिहास, मूर्तीची माहिती, उत्सवाचे उपक्रम अशी माहिती पुस्तिका प्रकाशित केली आहे. तिचे प्रकाशन फलटणचे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रा. ना. शुक्ला व जागतिक मूर्तिशास्त्र तज्ज्ञ डॉ. जी.बी. देगलुरकर यांच्यावरही या गोपालकृष्णाने मोहिनी घातली असल्याचे नमूद केले आहे.

जयंत देशपांडे यांचे वडील कृष्णाजी आणि काका राजाभाऊ व विष्णूपंत. ते फलटणला राहत आणि निमित्ताने जाऊन देवळाचा कारभार पाहत. देवळाची पडझड झाली होती आणि आवार ओसाड पडले होते. जयंत बँकेत नोकरी करत. त्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी ती नोकरी सोडली व समर्पण भावनेने मंदिर कार्यास वाहून घेतले. जयंत देशपांडे हे कायम वास्तव्यास पुण्याला असतात. त्यांनी कोरोना काळात लिखित नामजप, कोरोना मुक्तीसाठी अनुष्ठान असे प्रकल्प हाती घेतले होते. देशपांडे यांचा जन्म गुरुपौर्णिमेला झाला. तो योग त्यांना महत्त्वाचा वाटतो. ते एकाहत्तर वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नी सुनीता. जयंत व सुनीता ही दोघे मंदिर ट्रस्टचे विश्वस्त होते. त्यांनी ती जबाबदारी मुलगा निखिल, सून मृण्मयी यांच्यावर सोपवली आहे. ती दोघे व विवाहित कन्या या त्यांच्या कार्यास हातभार लावतात.

जयंत देशपांडे 9823009589 info@gopalkrishnagirvi.org

– ज्योत्स्ना गाडगीळ 9969057930 jyo.gadgil@gmail.com
(‘लोकमत’वरून उद्धृत-संस्कारीत-संपादित)

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here