गावगाथा
माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी त्याचा गाव त्याच्या मनातून दूर जात नाही. आठवणी, अनुभव, संस्कार, तेथे झालेली शरीर व मन यांची घडण यांच्या मिश्रणातून गावाबद्दलची जी ओढ तयार होते, ती विलक्षण असते. म्हणूनच माणसाने त्याच्या गावाचे नाव कोठेही निव्वळ वाचले-पाहिले तरी त्याला आनंद होतो ! प्रत्येकाचे ते गाव कायमस्वरूपी नोंदले जावे आणि तेथील प्रथा-परंपरा-जत्रा-इतिहास या तऱ्हेची माहिती जगभर सर्वत्र पोचत राहवी याकरता महाराष्ट्रातील सर्व गावांची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. प्रत्येक व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकते. तुम्ही तुमच्या गावाची माहिती शक्य तर ललित रीत्या लिहून पाठवावी. मात्र त्यातील माहिती शंभर टक्के सत्य, दोनदा तपासून पाहिलेली असावी. ती माहिती लेखकाचा फोटो-नाव-संपर्क यांसह ‘थिंक महाराष्ट्र’चे वेबपोर्टल आणि अॅप यांवर प्रसिद्ध केली जाईल. हेच काम ऑडिओ – व्हिडिओ – फोटो प्रेझेंटेशन या प्रकारेदेखील सादर करता येऊ शकेल.