मी गावकी हा शब्दच मूळात ऐकला तो 2014 साली. आम्ही रोहा रोडवरील गरूडपाडा गावात डिसेंबर 2014 ला राहण्यास आलो. पंचावन्न-साठ घरांचे चिमुकले गाव. तोपर्यंतचे सगळे आयुष्य शहरात गेले आणि त्यातील अर्ध्याहून अधिक महानगरात घालवले, त्यामुळे ‘खेड्यातील घरा’चे स्वप्न अनुभवणे बाकी होते.
गावातील योगिता ही मला मदतीला येऊ लागली. “आज वरच्या अंगाला अमुक ठिकाणी बारसे आहे, मी उशिराने येईन, आज खाली साखर खायला जायचे आहे.” असे नवनवीन शब्दप्रयोग मी ऐकू लागले. बारसे समजले, पण ‘साखर खायला’ म्हणजे काय? वरचे अंग, खालची बाजू म्हणजे नेमकी कोणती दिशा? कुतूहल दाटू लागले. हळूहळू, मला बऱ्यापैकी गावकी कळू लागली. केवळ आमच्या गावात नाही तर जिल्ह्यातील प्रत्येक गावात गावकीने, म्हणजे गावकीच्या नियमांनी गावे बांधून ठेवली आहेत. मी पूर्वजांनी किती छान प्रथा घालून दिल्या आहेत ते पाहून थक्क झाले. प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या काळात एकमेकांबरोबर असावे, यासाठी घातलेली ती बंधने होत.
गावाचे गरूडपाडा हे नाव कसे पडले, कधीपासून गाव वसले असे प्रश्न मनात आले. खरे तर, शासन दरबारी गरूडपाडा गाव अस्तित्वात नाही. समोर काविर नावाचे गाव आहे त्याचाच उल्लेख सापडतो. काविरच्या रहिवाशांची शेते या गावात होती. ते त्यासाठी येथे येत आणि ‘पाड्यावर जातो’ असा उल्लेख करत. तो फक्त पाडा होता. साधारण तीन पिढ्या आधी गावातील व्यक्तीला एका बाजूला गवत-झाडाझुडुपांत एक मूर्ती सापडली. ती मूर्ती विष्णूची होती. ती जेथे सापडली तेथेच साफसफाई करून लोकांनी ती जागा तयार केली. गरुड हा विष्णूचे वाहन त्यावरून कोणीतरी त्याचे नाव गरुडबाप्पा असे ठेवले. आधीचा पाडा आता गरूडपाडा म्हणून नावारूपाला आला.
लहानसे- सर्वसाधारण गाव, शेतकरी समाज, हातावर पोट असणारी माणसे. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ माध्यमिक शाळा हे आमच्या गावाचे विशेष. तेथून गावात शिरले की डावीकडे एकेक घरे, शेते सुरू होतात. फॉरेस्ट ऑफिस चौकी ओलांडली, की होळीचा फाटा. तेथून आत शिरण्यास दोन रस्ते फुटतात. कोठूनही गावात शिरले तरी वर्तुळ पूर्ण करून इच्छित स्थळी पोचता येते. सुबक गणेश मंदिर गावाच्या अगदी मधोमध आहे. त्या मंदिराची देखभाल करणे या रीतीपासून… गावकीची शिस्त कळू लागते. कसे उत्तम नियम केलेत बघा !
दर महिन्याला अमावस्या झाली, की दुसऱ्या दिवशी एका घराकडे गुरवकी जाते. तेथून पुढे महिनाभर देवळाची स्वच्छता, रोज सकाळी-संध्याकाळी देवापुढे दिवा-पूजा ही त्या कुटुंबाची जबाबदारी. आवार स्वच्छ ठेवणे, तिन्हीसांजेला वेळेवर दिवा लावणे- देवापुढे आणि मंदिरातही. रात्री झोपण्याच्या आधी मंदिरातील बाकीचे दिवे बंद करून मंदिर बंद करणे… त्या एका महिन्यात गावकीची मीटिंग, काही सणसमारंभ देवळात झाले तर तेव्हाची सफाई हीदेखील जबाबदारी त्या कुटुंबाची. हे सारे अव्याहत नियमानुसार बिनचूक पार पडते. त्या कुटुंबाला काही अडचण आली तर त्या महिन्यात दुसरे कोणी पुढे होऊन काम बिनबोभाट तडीस नेतात.
मी आमच्या गावात अशीच अजून एक सुंदर प्रथा अनुभवली. कृष्णजन्म हा मंदिरात थोडक्यात होतो. गुरुजी पारायणे करतात, लोक आवर्जून हजेरी लावतात. दुसऱ्या दिवशी गावात छोट्या छोट्या हंड्या बांधल्या जातात. लहानथोर पुरुष मंडळी गाणी म्हणत, झांजाढोल वाजवत निघतात. एकजण एक मोठे पातेले घेऊन असतो. ते लोक प्रत्येक घराच्या अंगणात जातात. तेथे पाणी उडवून त्यांचे स्वागत होते. जमेल तसे पोहे, साखर, काकडी असे जिन्नस त्या घरची गृहिणी त्या लोकांनी बरोबर आणलेल्या पातेल्यात जमा करते. तो दोनतीन तासांचा कार्यक्रम. कोणालाही वगळले जात नाही. मग हंड्या फोडल्या जातात आणि जमलेला प्रसाद एकत्र करून त्याचे वाटप होते. मी त्या कार्यक्रमात कोणताही घाणेरडा प्रकार इतक्या वर्षांत पाहिला नाही. छोटी बाळे ते सीनिअर मंडळी, सगळे आनंदाने सामील होतात. सण आहे त्याचे सुंदर वातावरण निर्माण होते, नक्कीच ! असेच एका श्रावणी सोमवारी शिवलीलामृत पठण दिवसभर होते. जमेल तशी मंडळी हजेरी लावतात, जमेल तितके वाचतात. संध्याकाळी प्रसाद-आरती करून कार्यक्रम समाप्त होतो. गाव बांधून ठेवणारेच हे उपक्रम.
तीन पिढ्या मागे पर्यंत फार वेगळी प्रथा या गावाची होती. पुरुषांची उभ्याने लावणी आणि त्यातील सवालजबाब त्यावेळी गावागावात होत. त्यात हे गाव अग्रेसर होते. स्पर्धा घडत असत आणि त्यात नेहमीच हे गाव मानाचे स्थान मिळवत असे. त्या कवनांचे, सवालजवाबांचे लेखन करणारी माणसे गावातीलच होती. नंतर मात्र त्यावरून वाद, तंटे वाढू लागले आणि स्वखुशीने पुढील पिढीला त्या प्रथेपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला गेला ! दसऱ्याचे सीमोल्लंघन हाही एक विशेष बघण्यासारखा सण गावात साजरा होतो. त्यादिवशी संध्याकाळी साडेसात वाजता गावातील यच्चयावत पुरुष मंडळी होळीच्या फाट्यावर न चुकता येतात. पाटील मंडळी आपट्याचे झाड उभे करतात. तो मान त्यांचा. त्यानंतर ते त्याची पूजा करतात. पूजा झाली, की गावकरी गाणी म्हणत झाडाभोवती पाच प्रदक्षिणा घालतात मग सोने लुटले जाते. सोने लुटले की सगळे लोक गावच्या मंदिरात येतात. एकेकजण आत जाऊन बाप्पाला सोने अर्पण करतात आणि बाहेर येऊन समवयस्क एकमेकांना आलिंगन देतात तर लहान माणसे थोरांना नमस्कार करतात. उत्साहाने सगळे बैजवार केले जाते. बोकडाचा बळी हाही गावकीचा एक भाग. ते मला वैयक्तिक पटत नाही. पण पिढ्यानपिढ्या तो विधी चालत आला आहे. मान देणे ही गावकीची प्रथा आहे, ती ते इमानेइतबारे पाळतात. त्यानंतर त्या पशुबळीचे प्रसाद म्हणून वाटप होते.
गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण. घरोघरी गणपती येतात. गावात आधीपासूनच गडबड सुरू होते. प्रत्येक घर रंगवले जाते. प्रत्येकाचे सगळे घर धुऊनपुसून स्वच्छ होते. गावातील मुले घरे रंगवण्यास मदत करतात. कोणाची अडवणूक होत नाही, हे विशेष. प्रत्येकाकडे घरी गणपती असला तरी प्रत्येकाने प्रत्येकाकडे दर्शनाला जायचे हाही गावकीचा नियम. त्यामुळे गाव त्या दहा दिवसांत कायम गजबजलेले असते. शेजारच्या घरात बरेच नातेवाईक असतात, तेही येत असतात. रोज रात्री एका घरी भजन असते. सगळे गावकरी जमतात. मनापासून रमतात. सर्वांना भजन संपल्यावर नाश्ता असतो. कोकणातील गणेशोत्सव कसा असतो हे अशा लहान गावात पाहावे.
आमच्या गावात गणेश मंदिर ज्या दिवशी स्थापन झाले त्या दिवसापासून दरवर्षी गणेशोत्सव होतो. पूजा घातली जाते. त्या महिन्यात ज्यांची गुरवकी असेल ते दांपत्य त्या पूजेला बसते. तो खूप मोठा मान गावात समजला जातो. तेव्हा गावजेवण असते. तो दिवस उत्साहात साजरा होतो. आजूबाजूची किंवा गावाबाहेर गेलेली मंडळी मुद्दाम हजेरी लावतात. माहेरवाशिणी येतात. कोणाला गावासाठी काही देण्याचे असेल तर मंडळी ते त्या दिवशी देतात. ते गावकीकडे जमा होते. मोठमोठी भांडी असोत, खुर्च्या-टेबले असोत, सतरंज्या असोत, पंखे असोत… गावाला उपयोगी असे सामान भरपूर प्रमाणात गावकीच्या ताब्यात येते. प्रत्येकाला गरज पडेल तेव्हा ते नाममात्र भाडे घेऊन दिले जाते. सगळी लहानमोठी कार्ये सहज गावकीच्या मदतीने अशी पार पडतात.
गावकीने एकमेकांना जन्मापासून मरणापर्यंत जोडून ठेवले आहे. गावातील मुलगी माहेरी आली किंवा सून माहेरी गेली तरी तिच्या ओटी भरणाला, बारशाला सगळ्यांची हजेरी असायलाच हवी. सुनेच्या माहेरी आणि मुलीच्या सासरी गावकरी जातात हे किती विशेष आहे! शहरी समाजजीवनाच्या पार्श्वभूमीवर हे फारच विशेष वाटते. सून बाळंतपण झाल्यावर पहिल्यांदा बाळ पाळण्यात घालून आणि तो पाळणा डोक्यावर घेऊन सासरच्या दारात येते आणि सासू कौतुकाने बाळ छातीशी कवटाळून त्या दोघांचे स्वागत करते. फार सुंदर, हृद्य स्वागत असते बाळाचे ते !
अर्थात काही बाबतीत अतिरेक होतो. बाळंतिणीला अगदी लगेच दवाखान्यात भेटण्यास गर्दी करणे, पाचवीच्या पूजेला जेवणावळी घालणे हा प्रकार लहानशा बाळाला इन्फेक्शन होईल या विचाराने नकोसा वाटत असला तरी तो टाळणे अशक्य होते. तोच प्रकार कोणी आजारी पडले की होतो. नियमाप्रमाणे प्रत्येकाने घरी भेट द्यायलाच हवी. अशा वेळी तारतम्य बाळगावे ना ! अर्थात एकमेकांसाठी उभे, पाठीशी असण्याचा यातून संदेश मिळतो.
गावात लग्न ठरले, की या एकी असण्याचा सर्वात मोठा फायदा दिसून येतो. लग्न ठरले की आधी गावकीला ‘साखर खायला’ आमंत्रण. ते फक्त पुरुष मंडळींना असते. त्यावेळी गावाला माहिती दिली जाते- ‘अमुक गावातील अमुक घराशी सोयरिक जोडतोय.’ तारीख ठरवणे तेव्हाच होते. त्यानंतर साखरपुडा होतो आणि गाव दुमदुमत राहते. मुलीचे लग्न असेल तर पुरुष मंडळी तिच्या दारात मांडव स्थापणी करतात. मग बायकांची लग्नातील वडे बनवण्यासाठी तांदूळ धुणे, पापड करणे अशी समुदायाने करण्याची कामे सुरू होतात. लग्न, बारसे, साखरपुडा किंवा काहीही कार्यक्रम असला तरी सगळा स्वयंपाक गावातील स्त्रिया करतात. बायका व्हेज, नॉनव्हेज पदार्थ शेकडो माणसांसाठी सहज करतात. त्यात एक्स्पर्ट जशा लागतात त्याचप्रमाणे मदतीला तत्पर आणि एक्स्पर्ट हातही लागतात. ती एकी बघण्यासारखी. त्यामुळे मुलीच्या घरच्यांचा हॉल घेणे, आचारी आणणे हे मोठे खर्च टळतात. ते कार्य परस्पर सामंजस्याने पार पडते. गाव हळदीपासून गोंधळ होईपर्यंत एकजुटीने कार्यात गुंतलेले असते. एखाद्या घरात कर्ता पुरुष नसतो, देवाघरी गेलेला असतो, अशा वेळीही गावकीतील मुख्य मंडळी पुढे होऊन आधारभूत ठरतात.
जी गोष्ट तोरणाची तीच मरणाची. मृत्यू झाल्यावरसुद्धा गावकी खंबीरपणे मागे उभी असते. त्या विधींचा सगळा खर्च त्यावेळी गावकी करते. सगळे आटोपल्यावर त्या माणसांनी ते पैसे भरावे. पण त्या दुःख काळात कोणी काही मागत नाही. कार्य होईपर्यंत बारा दिवस त्या घराच्या पडवीत, ओटीवर गावातील माणसे रात्री बारापर्यंत सोबत म्हणून बसण्यास जातात. मला ही गोष्ट इतकी ग्रेट वाटते की तिला तोडच नाही ! गावातील प्रमुख मंडळी दिवस पूर्ण झाले की त्या घरातील मुलाला चहाला घेऊन जातात. त्याला त्यावेळी टोपी घालतात. ते ती कृती त्याचे तोंड गोड करणे आणि पुन्हा एकदा रूटीन सुरू करणे यासाठी करतात. खूप हृद्य आहे ना !
बाहेरचे जग खूप झपाट्याने बदलत आहे. नवनवीन शोध लागत आहेत, जग जवळ येत आहे. तरीही माणूस एकटा पडत चालला आहे. गर्दीत असून एकटा. छोट्या कुटुंब पद्धतीमुळे एकटेपण अजून वाढत आहे. अशा वेळी गावकीचे हे सगळे सोपस्कार आवश्यक असे वाटतात. ते सोपस्कार काही वेळा फक्त गावकीच्या नियमासाठी केले जात असतील. त्यात प्रत्येकाची आपुलकी शंभर टक्के असेल असे नाही. पण ते बंधन आहे म्हणून माणसे कर्तव्यभावनेने एकत्र असतात. गावकीचा प्रश्न आहे असे म्हटले, की तेवढ्यापुरते का होईना सगळे खांद्याला खांदा लावून उभे राहतात.
गाव रोज रात्री दहा-साडेदहा वाजता झोपून जाते. कष्टकरी माणसे दमलेली असतात. पण गावात लग्न आहे, तीन दिवसांचे सोपस्कार पूर्ण झालेत. आता वरात निघेल, पोरगी जाईल म्हणून सगळे त्यांच्या त्यांच्या पडवीत, घरासमोर खुर्च्या टाकून ताटकळत बसून राहतात. वरात बारा-एक वाजता वाजतगाजत निघते. प्रत्येक घरावरून जात असताना त्या नवरीला हाताची चार बोटे इवलीशी हलवून, डोळ्यांच्या पापण्यांची उघडमीट करून निरोप देणारी काकू, मामी, मावशी पाहिली की मला भरून येते. हा ओलावा, जिव्हाळा बाजारात मिळत नाही !
– वर्षा कुवळेकर 8766569136 varshakuvalekar11@gmail.com
वर्षा,
लेख छानच झाला आहे.
अशीच लिहीत रहा.
संध्या जोशी (रानडे)
दादर.(अलिबाग)
वर्षाताई खूप छान…तुमच्या गावाचे चित्र डोळ्यासमोर उभे केलेत. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!