जी.व्ही. – आप्पा मंडलीक – गरिबांचे डॉक्टर (G V Mandalik- Dapoli’s doctor with heart)

0
171

डॉ.जी.व्ही. ऊर्फ आप्पासाहेब मंडलीक यांचे शिक्षण मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून झाले. त्यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय एम बी बी एस झाल्याबरोबर, 1939 साली सुरू केला. डॉ. जी.व्ही. हे दापोलीतील पहिले एम बी बी एस डॉक्टर होत. डॉ. जी.व्ही. यांचा विवाह पुण्याच्या शकुंतला गोखले यांच्याशी 1939 सालच्या डिंसेबर महिन्यात झाला. तो प्रेमविवाह होता. दोघेही एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर त्या शैलजा ऊर्फ शैला मंडलीक झाल्या. कोकणासारख्या ठिकाणी त्या काळी वैद्यकीय व्यवसाय करणे खूप कठीण होते. दापोली हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी खेडेगावासारखे होते. डॉक्टर आप्पांना सायकलने वा पायी जाऊन त्यांचे रुग्ण तपासावे लागत होते. रुग्णाकडे लांब जायचे असेल तर डॉक्टर बैलगाडीने जात. त्यांची ती ‘व्हिजीट’ दोन दिवसांची होई. डॉक्टर आप्पांचे रुग्णनिदान आणि नाडी परीक्षा उत्तम होती. त्यामुळे त्यांच्या औषधाने रुग्णांना बरे वाटत असे. त्यांच्या अंगी पेशंटची अनुषंगिक परिस्थिती समजून घेऊन त्याचा निम्याहून अधिक भोगवटा तेथल्या तेथे कमी करण्याची किमया होती.

डॉ. जी.व्ही. यांना त्यांच्या स्वत:च्या वैद्यकीय व्यवसायाखेरीज कौटुंबिक अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या होत्या. दापोलीला घरालगत असलेली शेती व बागायत; त्याचप्रमाणे कुंभवे या त्यांच्या खोतीच्या गावी असलेली जवळजवळ आठ एकरांत पसरलेली सुपारीची बाग आणि बागेपासून जवळ असलेले आंबा-काजूचे लाग… त्यांना या सर्व कार्याकडे लक्ष द्यावे लागत असे. ते काम ते तेथल्या तेथे पार पाडत असत. त्यांनी शैला यांना, लग्न झाल्यावर शेतीची सर्व कामे शिकवली. शैला यांनीही ती जबाबदारी आनंदाने आणि समर्थपणे निभावली.

शिवाय ते सार्वजनिक कामेही भरपूर करत. डॉ.जी.व्ही. यांच्या दवाखान्यात सर्वांना मुक्तद्वार असे. त्यांच्याशी अनेक मुस्लिम घराणी प्रेमाने जोडलेली होती. त्यांचे डॉक्टरी व्यवसायातून प्रपंचासाठी पैसे मिळवणे हे उद्दिष्ट होते, तरी कोणताही रुग्ण त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्याची त्यांच्या दवाखान्यात अडवणूक होत नसे. राजकारणापासून समाजकारणांच्या अनेक गोष्टींची चर्चा आणि उकल तेथे होत असे. मुस्लिम धरून अनेक कुटुंबे लग्न ठरवण्यासाठी डॉ. जी.व्ही. यांच्याकडे येऊन मुलाची अगर मुलीची माहिती काढत असत, कारण डॉ.जी.व्ही. त्या मंडळींच्या स्वयंपाकघरापर्यंत पोचलेले होते. त्यावेळी दापोली तालुक्यात अगदी मोजकी ख्रिश्चन कुटुंबे होती. ती वेगवेगळ्या गावी होती. ते सर्वजण डॉक्टरांचे पेशंट होते. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीही आजारी असले तर डॉ.जी.व्ही. यांचाच आधार त्यांना असे. दापोली परिसरात बंदरकाठी खूप मोठा कोळी आणि भंडारी समाज पसरला आहे. त्या कोळी समाजाच्या अनेक महिला डॉक्टरांच्या पेशंट होत्या. त्या सकाळी लवकर दवाखान्यात येत असत. त्यांना घरी जाण्याची धांदल असे. त्यावेळी त्या डॉक्टरांना बिनदिक्कत ‘आप्पा, आमची गाडी आहे. आम्हाला तुझ्या ड्रायव्हरला सोडण्यास सांग.’ असे मागणे मागत आणि डॉक्टर लगेच त्यांचे म्हणणे मान्य करून त्यांच्या ड्रायव्हरला त्यांना स्टँडपर्यंत सोडण्यास सांगत.

संबंधित लेख –
दापोलीचे सुजाण मंडलीक घराणे
रावसाहेब मंडलिक – अव्वल इंग्रजी अमदानीतील रामशास्त्री
पी. व्ही. मंडलीक : सार्वजनिक कार्याचा आदर्श

डॉ. जी.व्ही. सकाळी घरातून जाताना दोन मोठ्या बाटल्या ताक घेऊन जात असत. त्यांचे ठरलेले पेशंट दवाखान्यात येऊन ताक पिऊन घरी जात असत. त्यांच्या पोतडीत अनेक घरगुती उपायही असत. उदाहरणार्थ बिब्ब्याच्या तेलाची दुधात फुले पाडून घेणे वगैरे. काहींच्या पोटाच्या तक्रारी असत. त्या निवारण्यासाठी डॉ. जी.व्ही. पोतडीतील घरगुती उपायांचा उपयोग करत. मुस्लिम महिला पेशंट डॉक्टरांच्या नावाने चलाखी करत, हे त्यांना ठाऊक होते, परंतु ते त्यास आक्षेप घेत नसत – त्या स्त्रिया खेडेगावातून एस टी ने येत असत. त्यांना डॉक्टरांकडे जाण्यास घरातून परवानगी मिळत असे. ते निमित्त घेऊन त्यांना दवाखाना झाला की बाजारात चक्कर टाकता येत असे. त्या तसे सांगतही, की डॉक्टरांच्या निमित्ताने आम्हाला घराबाहेर पडता येते !

डॉक्टर जी.व्ही. सुरुवातीला निष्ठावान काँग्रेसवाले होते. नंतरच्या काळात ते कोण्या एका पक्षाचे साधे सभासदही राहिले नाहीत. निवडणुका आल्या की त्यांच्या दवाखान्यात निवडणुकीची चर्चा चालत असे. त्यांचे सर्व पक्षांतील उमेदवार आणि नेते यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. ते त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहत असत आणि त्याला मदत करत असत. केवळ त्यांचे संघटना चातुर्य आणि कौशल्य व त्यांची लोकप्रियता यांमुळे त्यांचे मोठे बंधू डॉ. पी.व्ही. मंडलीक दोन वेळा दापोली परिसरातून आमदार म्हणून निवडून आले होते. सर्व पक्षांचे उमेदवार त्यांच्या घरी एकाच टेबलावर जेवण्यास बसलेले अनेकांनी काही वेळा पाहिले आहे !

त्यांची तयारी कोणाही गरजूचे कोणतेही काम करण्याची असे. मग ते वैद्यकीय असो की सामाजिक-आर्थिक असो. तो त्यांचा स्वभाव होता. रेशनच्या काळात कोणाला तांदूळ लागायचे, कोणाला गहू लागायचे, ते कित्येक वेळी घरात असलेले धान्यही गरजूंना देत असत. पत्नी शैला रागावल्या की ते म्हणायचे, ‘मी आहे ना ! काळजी करू नको, उद्या आणून देईन.’ त्यांच्याकडे माणुसकी हा मोठा गुण होता. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आणि प्रेम होते.

एखादा पेशंट जास्त आजारी आहे आणि त्याला मोठ्या तज्ज्ञ हातांची गरज आहे असे त्यांच्या लक्षात आले तर ते क्षणाचाही विचार न करता त्याला त्यांच्या एखाद्या नातेवाईकाबरोबर घेऊन किंवा स्वतःच्या जबाबदारीने स्वतःच्या गाडीतून वाईच्या मिशन हॉस्पिटलमध्ये किंवा पुण्याला घेऊन जात असत. त्यावेळी त्यांनी रोग्याच्या तब्येतीखेरीज दुसरा कसलाही विचार कधी केला नाही. पेशंट बरा होणे आणि त्याला तज्ज्ञहाती सोपवणे हे त्यांचे काम आहे असे ते मानत.

दापोलीसारख्या गावात कोणी डॉक्टर सिझेरियन करत नसत. पण जी.व्ही. त्यांच्या जबाबदारीवर दापोलीच्या ग्रामीण रुग्णालयात एखाद दुसरी तशी कठीण शस्त्रक्रिया कौशल्याने पार पाडत असत. रात्री-अपरात्री एखादी बाई बाळंतपणात अडली तर मागचा-पुढचा, कसलाही विचार न करता ते त्या गावात जात आणि बाईची सुखरूप सुटका करत. आप्पा गरिबांचे, न अडवणारे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर ‘दापोलीचा राजा गेला’ अशी लोकांची भावना होती.

आप्पांचे घर म्हणजे एक संस्थान होते. त्या छोट्याशा संस्थानाचा कारभार म्हणजे पूर्ण वेळेचे काम होते. पण आप्पांनी शैला यांना त्यांच्या मनासारखे काम करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांना सामाजिक काम करण्यास मुभा दिली- त्याचप्रमाणे आर्थिक व राजकीय स्वातंत्र्यही दिले. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात शैला यांना पुढे जाण्यासाठी मदत केली. शैला ग्रामपंचायत, जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. आप्पाच त्यांचे कर्ते करवते होते. शैला यांनीही आप्पांना खूप छान साथ दिली- मग ते शेतीचे काम असो की कोणतेही सामाजिक काम.

आप्पा यांना चार मुले- मोठी मुलगी नीला – विवाहानंतर नीला पटवर्धन- प्रस्तुत लेखिका, डॉ. अरुण मंडलीक, अनिल मंडलीक आणि अशोक मंडलीक.

नीला यांचे पती श्रीपाद शंकर पटवर्धन, ते महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्यात सुपरिटेण्डिंग इंजिनीयर होते. ते निवृत्त झाले आहेत. नीला या डॉ. पी.व्ही. मंडलीक ट्रस्टच्या कार्यकारी विश्वस्त आहेत. त्यांचे वास्तव्य मुंबईतील मालाड येथे असते. नीला यांची मोठी मुलगी- डॉ. माया. त्यांचे असाध्य आजाराने 1999 च्या मे महिन्यात निधन झाले. केतकी ही डॉ. मायाची मुलगी. ती वास्तूशास्त्र तज्ञ(आर्किटेक्ट) आहे. अमेरिकेत नोकरी करते.

नीला यांचा मुलगा अनीश यांचे एम ए (समाजशास्त्र) असे शिक्षण झाले आहे. ते स्वतंत्र व्यवसाय करतात व घरची शेती सांभाळतात. ते दापोलीतील सहकार क्षेत्रात गेली तीस वर्षे कार्यरत आहेत. नरेंद्र दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर या अनीश यांच्या पत्नी होत. त्यांचे एम ए (शिक्षण शास्त्र), एलएल बी असे शिक्षण झाले आहे. त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व डॉ. पी. व्ही. मंडलीक ट्रस्टच्या कार्यात सक्रिय सहभागी असतात. त्यांना दोन मुले, मोठी मुलगी- मितवा सध्या बंगलोर येथील अझीम प्रेमजी विद्यापीठात शिक्षणशास्त्रात एम ए करत आहे. मुलगा असीम, दहावीत शिकत आहे.

आप्पा यांचे चिरंजीव डॉ. अरुण मंडलीक दापोली तालुक्यात हर्णे येथे वैद्यकीय व्यवसाय करत असत. त्यांच्या पत्नी डॉ. अपर्णा दापोलीतच वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांच्या घराजवळच त्यांचे हॉस्पिटल आहे. डॉ. अरुण यांचे अल्पशा आजाराने 2009 साली निधन झाले. डॉ. अरुण यांना दोन मुली, मोठी मुलगी प्रिया विवाहित आहे. ती वास्तव्यास पुणे येथे असते. धाकटी मुलगी डॉ. जया विवाहित आहे. ती अमेरिकेत असते.

आप्पा यांचे दुसरे चिरंजीव अनिल मंडलीक हे मेकॅनिकल इंजिनीयर आहेत. ते ‘लार्सन टुब्रो’मधून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नी अरुणा पार्ले महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. त्याही निवृत्त झाल्या आहेत. ती दोघे मालाड येथे असतात. त्यांना दोन मुले, मोठा मुलगा डॉ. मिलिंद हे ऑकलंड (न्यूझीलंड ) विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांची पत्नी नोकरी करते. त्यांना दोन मुली- त्यांचे शिक्षण सुरू आहे. मुलींची नावे- मोठी रेवा व धाकटी आर्या.

अनिल यांची धाकटी मुलगी माधवी. तिचे शिक्षण बी एससी आणि डिप्लोमा इन ज्वेलरी असे झाले आहे. ती अमेरिकेत असते. तिचे यजमान संगणक तज्ज्ञ आहेत. त्यांना दोन मुलगे- आर्यन व रिहान. ते शाळेत शिकत आहेत.

आप्पा यांचे तिसरे चिरंजीव अशोक मंडलीक हे दापोली कृषी विद्यापीठातील शेतीतज्ज्ञ होते. ते अल्पायुषी ठरले. त्यांचे वयाच्या बत्तीसाव्या वर्षी मोटरसायकलच्या अपघातात निधन झाले. ते दापोलीची कुंभव्याची शेती करत असत. त्यामध्ये आई शैला यांची त्यांना मदत असे. शिवाय, त्यांचा छोटासा दूध व्यवसायही होता. त्यांच्या पत्नी स्वजिता मंडलीक. त्या सायन्सच्या पदवीधर आहेत. त्यांचे वास्तव्य कोल्हापूर येथे असते. त्यांना दोन मुली. मोठी मुलगी शिल्पा, पदवीधर आहे. तिचे वास्तव्य रायगडजवळील पाली येथे असते. दुसरी मुलगी ऋता ही पदवीधर आहे. ती विवाहित असून नोकरी करते. तिचे वास्तव्य बंगलोर येथे असते.

नीला पटवर्धन 9869620946 patwardhanneela6@gmail.com

————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here