कोतापूर हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील डोंगररांगांनी वेढलेले आणि दोन नद्यांच्या (मुचकुंदी आणि अर्जुना) मध्यभागी वसलेले छोटेसे निसर्गसंपन्न जुने गाव आहे. ते राजापूर-धारतळ्याच्या आडमार्गी आहे. ते राजापूरपासून पंधरा किलोमीटर, रत्नागिरीपासून त्रेसष्ट किलोमीटर तर सोलगावपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे.
कोतापूर हे लहान गाव आहे. लोकवस्ती सुमारे दीड हजार माणसांची आहे. गावाच्या इतिहासासंदर्भात ‘कुतापूर ताम्रपट’ हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहे. त्यात प्राचीन काळातील उल्लेख सापडतात. पावसाचे प्रमाण भरपूर आहे. गावातील लोक प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहेत. भात-आंबा-नारळ-सुपारी-कोकम-फणस ही तेथील मुख्य पिके होत.
कोतापूर नावाची दंतकथा आहे. कोतापूर हे पांडवकालीन गाव असून, त्याला ‘कुंतीपूर’ नाव होते. नंतर त्याचे कुंतापूर, कुतापूर… असा अपभ्रंश होत होत कोतापूर झाले. पांडवांपासूनच्या काही कथा आणि आख्यायिका ज्येष्ठ मंडळी सांगतात. इतिहासकार सांगतात, की गावातील विहिरी पुराण्या आहेत. तेथून जवळच्या देवीहसोळ गावातील प्रसिद्ध आर्यादुर्गा मंदिराजवळही तशाच जुन्या विहिरी आहेत. त्यांचे उल्लेख ऐतिहासिक दस्तावेजात सापडतात.
एकविरा देवी ही गावची ग्रामदेवता आहे. त्या शिवाय गावात गारगेश्वर (शंकर), लक्ष्मी केशव, सिद्धिविनायक (गणपती) आणि हनुमान यांची मंदिरे आहेत. ती अडीचशे-तीनशे वर्षांपूर्वीची असावीत. मंदिरांचे बांधकाम कोकणातील इतर प्राचीन मंदिरांप्रमाणे लाकूड आणि चिरे वापरून झालेले आहे. गावातील गणपती मंदिर हे उजव्या सोंडेच्या मूर्तीचे आहे. पशुपतीनाथ यांच्या (गारगेश्वर) मंदिरातील दोन खांबांच्या कोनाड्यात दोन नाग वस्तीला आहेत. अनेकदा मंदिरात येणाऱ्यांना महादेवांबरोबर त्या नागांचेही दर्शन घडल्याचे सांगतात. नवल म्हणजे गावकऱ्यांना देवळात जाण्याचे भय वाटत नाही. नदीकाठी वसलेल्या त्या मंदिरांचा परिसर रमणीय आहे.

कोकणातील सण-उत्सवांचे वैभव कोतापूरलाही लाभले आहे. ग्रामवासी विविध सणांच्या निमित्ताने एकत्र येऊन उत्सव साजरे करतात. ग्रामदैवत एकविरा देवीचा उत्सव देव दिवाळीच्या वेळी होतो. त्यावेळचे आकर्षण ‘दशावतार कलाविष्कार’ हे असते. दशावताराचे सादरीकरण पाहण्यास पंचक्रोशीतून लोक जमतात. गावकरी त्या दिवशी मंदिरात भजन आणि कीर्तन करत जागरण करतात. आषाढी एकादशीला देवीला माहेराहून परत आणण्यासाठी पालखी सोहळा आयोजित केला जातो. गणेश चतुर्थीला मूर्तीवर रोज अभिषेक आणि अथर्वशीर्षाचे सहस्रावर्तन उत्साहाने केले जाते. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर लघुरुद्र पठण केले जाते.
शिमगोत्सव (होळी) पूर्ण गाव एकत्र येऊन ‘होलियो ! होलियो !’ च्या गजरात साजरा करतात. त्यात शारीरिक बळ, बुद्धी चातुर्य या गुणांवर आधारित विविध पारंपरिक खेळ खेळले जातात. त्या दिवशी गावात जत्रा भरते. तेथे लहान मुलांना आवडणाऱ्या खाद्यपदार्थांचे, नवनव्या खेळण्यांचे स्टॉल लावलेले असतात. त्यामुळे बच्चे कंपनी शिमगोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असते. शहरात गेलेले चाकरमानीही यात्रेच्या काळात आवर्जून गावी येतात. गावात आनंदाचे वातावरण असते.

कोतापूरतिठा या ठिकाणी असणाऱ्या प्रवासीमार्ग निवारा शेडच्या मागील बाजूस साधारण शंभर मीटर अंतरावर जंगलमय भागात पायऱ्यांची विहीर (बारव) आहे. ती बारव पूर्णतः कातळात खोदलेली आहे. ती साधारण पन्नास ते साठ फूट खोल आहे. त्या बारवेला एका बाजूने आतमध्ये उतरण्यासाठी पूर्वेकडून पश्चिमेकडे पायऱ्या आहेत. त्यांची संख्या साधारण पन्नासच्या आसपास आहे. ती बारव मध्ययुगीन जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहे.
गावात शिक्षणासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा (सातवीपर्यंत चार शाळा) आहेत, पण उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना राजापूर, लांजा किंवा रत्नागिरीकडे जावे लागते. रूग्णालय आणि आरोग्य सुविधा गावापर्यंत पोचलेल्या नसल्यामुळे तशा मूलभूत सोयीसुविधांचा अभाव जाणवतो. दिवसेंदिवस शेतीसाठी प्रतिकूल होत चाललेल्या वातावरणामुळे गाव कोकणातील बहुतांश गावांसारखे ओस पडू लागले आहे -लोक शहरांची वाट धरत आहेत. पूर्वी वीस-पंचवीस माणसांचे असणारे घर चार-पाच माणसांचे होऊन गेले आहे. या सगळ्या परिस्थितीत आशेचा एक किरण म्हणजे गावातील तरुण पिढी. गावातील तरुणांमध्ये गावासाठी आणि गावकऱ्यांसाठी काही वेगळे करून दाखवण्याची जिद्द आणि चिकाटी दिसते. जिल्हास्तरीय नासा-इस्रो स्पर्धेत (2025) गावातील तीन मुली इस्रो आणि नासा या दोन्ही संस्थांना भेटी देऊन आल्या. त्यात शमिका संतोष शेवडे, देवयानी नरेश आंग्रे, शिवाली संदीप घुमे या तीन विद्यार्थिनींचा समावेश होता.


कोकणातील पारंपरिक खाद्यपदार्थांमध्ये ढकू भात, सांदण, खांडवी, रस घावने ही गावाची खाद्यसंस्कृती सांगता येईल. ‘ढकू’ ज्याला कोकणातील आमटी असे म्हणता येईल – ती सुकी मिरची, धणे, सुके खोबरे, मिरी, दालचिनी, लवंग, पांढरे तीळ हे सर्व भाजून त्याची केलेली पावडर (मसाला) तुरडाळीच्या आमटीत घालून केली जाते. फणसाच्या रसामध्ये गूळ, चवीपुरते मीठ आणि तांदुळाच्या भाजलेल्या कण्या घालून इडलीप्रमाणे उकडवून बनवलेले सांदण म्हणजे गोड आवडीने खाणाऱ्यांसाठी स्वर्गसुख वाटते. खांडवी म्हणजे तांदुळाच्या कण्या भाजून, त्यांत गूळ घालून त्याचा शिरा करून तो खोबऱ्याच्या वड्यांप्रमाणे थापणे आणि त्यावर ओले खोबरे व तूप घालून खाणे… अहाहा ! रस घावने हे साधे परंतु अत्यंत चविष्ट – तांदुळाच्या पिठाचे घावने आणि नारळाचा रस (गूळ व वेलची घातलेला) असे एकत्र खाणे याला रस घावने असे म्हणतात.

गावाजवळ राजापूर रोड रेल्वेस्टेशन आहे. ते मुंबई-गोवा येथील प्रवासासाठी महत्त्वाचे ठरते. रस्ते अद्याप अपूर्ण आहेत. एकंदर सोयीसुविधा बघता गावातील जीवन शहरांपेक्षा तीस वर्षे मागे आहे असे बाहेरून येणाऱ्या लोकांना वाटते. पण खरे तर पर्यावरणाशी समतोल राखून आनंदाने समृद्ध जीवन जगण्याची गावातील जीवनशैली आहे. ती शहरांसाठीसुद्धा आदर्श ठरावी अशीच आहे.
गावाच्या चार-पाच किलोमीटर परिसरात भू, देवीहसोळ, दासूर, भालवली, सोलगाव यांसारखी गावे आहेत. कोतापूरचे वैभव हा तेथील निसर्ग आहे. तो जपून प्रगती करण्याचे ठरवले आणि तेथील प्राचीन ज्ञान वापरले गेले तर गाव समृद्ध आणि प्रगत होईल. त्यामुळे गावातील स्थलांतराचे प्रमाण कमी होऊन लोक समाधान पावतील व आनंदाने राहतील.
कोतापूर गाव नव्हे, तर ती एक भावना आहे -इतिहास आणि श्रद्धेने नटलेली, सुसंस्कृत माणसांनी सजलेली आणि एकतेने टिकलेली.
– चिन्मय प्रभुघाटे 9969260618 chinmayprabhughat@gmail.com