यवतमाळ येथे 1973 साली झालेल्या एकोणपन्नासाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘गीतरामायण’कार ग.दि. (गजानन दिगंबर) माडगूळकर ऊर्फ गदिमा. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 या दिवशी औंध संस्थानातील शेटपुळे या ठिकाणी झाला. ते गणित या विषयात नापास झाल्यामुळे मॅट्रिक होऊ शकले नाहीत.
‘गदिमा’ हे केवळ ‘गीतरामायण’ एवढे अप्रतिम काव्य लिहून साहित्यविश्वात अजरामर झाले असते. ते प्रासादिक, प्रतिभाशाली आणि प्रसन्न असे गीतकार होते. त्यांच्या गीतरचनेला कवितांचा दर्जा लाभला. त्यांच्या पटकथा-संवादांनीदेखील मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरशः चमत्कार केला ! ग.दि. माडगूळकर यांचे आयुष्य हा मराठी साहित्य व चित्रपटसृष्टीतील विलक्षण असा चमत्कारच होय !
माडगूळकर हे कोठल्याही मैफिलीचा ताबा घेत असत. त्यांचा संत वाङ्मयाचा आणि शाहिरी वाङ्मयाचा अभ्यास दांडगा होता, मीरा, कबीर, सूरदास अशी हिंदी संत मंडळी हा माडगूळकर यांचा ध्यास होता. त्यांचे साहित्यही त्यांना मुखोद्गत होते. माडगूळकर यांच्या काव्यात ज्ञानदेव आणि तुकाराम यांच्या काळातील रसाळ, प्रासादिक असे गुण पाझरत आले होते. माडगूळकर यांच्या गीतांमधील संदर्भसंपन्नता थक्क करणारी आहे. त्यांची गीतरचना संस्कृतीची संपन्न किनार लेवून आली होती. त्यांची गीतरचना हा महाराष्ट्र संस्कृतीचा अभिमानास्पद असा मानदंड ठरला. माडगूळकर यांच्या काव्याच्या लावण्या-पोवाडे-ओव्या-अभंग अशा साऱ्या बाजू बळकट होत्या. ते त्यांचे सामर्थ्य होते.
माडगूळकर यांनी चरितार्थासाठी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी कोल्हापूरच्या चित्रसृष्टीत ‘हंस’ पिक्चर्समध्ये बिनपगारी प्रवेश 1938 साली केला. ते त्या काळात उपजिविकेसाठी शिकवण्या करत होते. पण नंतर त्यांना चित्रपटात लहानमोठ्या भूमिका मिळाल्या. त्यांचा संबंध जवळजवळ पावणेदोनशे चित्रपटांशी अनेक नात्यांनी आला. त्यांनी ‘पहिला पाळणा’ या चित्रपटासाठी 1942 साली, वयाच्या तेविसाव्या वर्षी गाणी लिहून गीत-लेखनास आरंभ केला. त्यांनी चित्रपटगीते पस्तीस वर्षे लिहिली आणि चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा उमटवली. ते के. नारायण काळे यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून नवयुग चित्रकंपनीत होते. तो सरस्वतीपुत्र पुढे त्याच चित्रपटसृष्टीत एखाद्या राजासारखा वावरला ! त्यांनी तेथे अभिनेत्यापासून सर्व भूमिका वठवल्या, अनेक मानसन्मान मिळवले. ‘जगाच्या पाठीवर’मधील गीतरचना अमर रचना म्हणून मराठी काव्यात निनादत राहिली.
माडगूळकर हे सुरुवातीला वि.स. खांडेकर यांचे लेखनिक होते. त्यामुळे माडगूळकर यांनी लहान वयात अनेक पुस्तके वाचली. त्यांनी सुरुवातीला मेळ्यातील पदे लिहिली. ते महाराष्ट्राचे आधुनिक ‘वाल्मिकी’ म्हणून प्रसिद्धी पावले. त्यांनी हजाराच्या वर चित्रपट गीते लिहिली. त्यांची गीते हा मराठी काव्यप्रवाहातील हवाहवासा वाटणारा आविष्कार आहे. त्यांनी केलेल्या चरित्रात्मक गीतरचना ‘गीतगोपाळ’, ‘गीतसौभद्र’, ‘गीतरामायण’, ‘चैत्रबन’ अशा नावांनी प्रसिद्ध झाल्या. ‘जोगिया’सारखे त्यांचे काव्यसंग्रह त्यांची कवी म्हणून उंची दाखवतात. त्यांनी ‘तीळ आणि तांदूळ’ यांसारखी व्यक्तिचित्रे लिहिली आहेत. त्यांच्यासारखा हरहुन्नरी प्रतिभासंपन्न शीघ्रकवी हे महाराष्ट्राचे भूषण होते. त्यांच्या नावाने आधुनिक काळातही अनेक कथा-दंतकथा प्रसृत होत राहिल्या आहेत.
ते विधान परिषदेचे नियुक्त सभासद 1957 ते 1962 या काळात होते. त्यांनी ग्वाल्हेरच्या पन्नासाव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद 1969 साली; तसेच, एकोणपन्नासाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद 1973 साली भूषवले. त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब 1969 साली देण्यात आला होता.
त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात “कवीच्या व लेखकाच्या लेखनस्वातंत्र्याला स्वाभाविक मर्यादा असाव्यात. नवे साहित्य त्या मर्यादा मानत नाही असे दिसते. नवीनतेच्या हव्यासामुळे कोणी भलतेच काही केले तर ते क्षम्य ठरणार नाही” असे बजावले होते. ते पुढे म्हणाले, की साहित्यकाराला कोणताही विषय वर्ज्य नाही. त्याला स्वातंत्र्य आहे. पण हे स्वातंत्र्य समुद्राच्या स्वातंत्र्यासारखे असावे. त्याने अनेक जलप्रवाह त्याच्या प्रतिभेच्या सागरात सुखेनैव घ्यावेत-उसळावे, खवळावे, पूर्ण चंद्र कवेत घेण्याची जिद्द बाळगावी आणि तरीही काही निश्चित मर्यादा मात्र कधी सोडू नयेत. समुद्र त्याच्या स्वाभाविक मर्यादा सोडून सत्यार्थाने उत्छृंखल झाला, तर प्रलय होईल. कवीच्या-लेखकाच्या लेखनस्वातंत्र्याला कवीच्या व लेखकाच्याच स्वाभाविक मर्यादा असाव्यात. मानवी स्वभावाचे मर्म शोधत-शोधत वाचकाला सत्याकडे नेणे हे साहित्याचे काम. वाचकाला शुद्धानंदाचे दान करणारे साहित्य हे चांगले साहित्य. जे केवळ मनोरंजन करते, त्या साहित्याला मी केवळ गौण म्हणेन. आजच्या साहित्याने काही काळासाठी तरी समाजकारण केले पाहिजे. आपली सृजनशक्ती दधीचीच्या अस्थींसारखी देशाच्या उत्कर्षासाठी दिली पाहिजे.”
त्यांचे देहावसान 14 डिसेंबर 1977 या दिवशी झाले.
– संकलित, टीम ‘थिंक महाराष्ट्र’, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 99200 89488
——————————
लेख अतिशय छान!
अतीव कष्ट भोगून साहित्यात सम्राट पदी विराजमान झालेला हा महाकवी !
रामकथा जशी अजरामर तसेच आण्णांचे गीतरामायण