प्रा. गंगाधर बाळकृष्ण ऊर्फ अण्णासाहेब सरदार हे बार्शी येथे, 1980 साली झालेल्या चोपन्नाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. सरदार यांनी मराठी साहित्य आणि समाजसुधारणा या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांनी विसाहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यामध्ये संत साहित्य, समाजसुधारणा आणि महाराष्ट्राचे सामाजिक जीवन यावर आधारित लेखन आहे.
त्यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील जव्हार गावी 2 ऑक्टोबर 1908 रोजी झाला. त्यांचे वडील बाळकृष्ण महादेव सरदार. आईचे नाव रुक्मिणी. त्या दांपत्यास पाच मुली व गंगाधर हा एकच मुलगा होता. सरदार परिवाराचे मूळ गाव ‘भालावळी’ हे होते. सरदारांचे पूर्वज ‘तेंडुलकर-भालावळकर’ असे नाव लावत. जव्हार हे छोटेसे संस्थान होते. सरदार यांच्या बालमनावर तेथील परिस्थितीचा खोल ठसा उमटला.
सरदार यांचे बालवर्गापासून व्हर्नाक्युलर फायनलपर्यंतचे शिक्षण जव्हारच्या ‘कृष्ण विद्यालया’त झाले. सरदार त्यांच्या चुलत्याकडे इंग्रजी शिक्षणासाठी मुंबईस राहिले. ते दादरच्या छबिलदास हायस्कूलमधून 1924 मध्ये मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण झाले. सरदार महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आले. तो काळ राष्ट्रीय चळवळीचा होता. सरदार महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झाले. त्यांनी गांधीवादाचा स्वीकार केला. त्यांची राहणी खादीचा कुडता, पंचेवजा धोतर व अनवाणी चाल अशी साधी होती. ते 1930 सालच्या मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले. तुरुंगात गेले. परिणामी, त्या वर्षीची त्यांची बी ए ची परीक्षा हुकली. सरदार बी ए 1932 मध्ये झाले आणि त्यांनी एम ए ची पदवी 1934 साली मिळवली. दरम्यान, त्यांचा विवाह मुलुंड येथील गुलाब लोटलीकर यांच्याबरोबर फेब्रुवारी 1933 मध्ये झाला होता आणि गुलाब लोटलीकर या सुमती सरदार झाल्या.
सरदार यांनी मराठी संतांचे वाङ्मय, महात्मा गांधींचे साहित्य, कार्ल मार्क्स यांचा ‘कॅपिटल’ हा ग्रंथ, तसेच अन्य वैचारिक वाङ्मय या सर्वांचे वाचन व चिंतन भरपूर केले.
सरदार यांना नोकरी पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालयात मराठीचे व्याख्याते म्हणून 1941 मध्ये मिळाली. तेथूनच ते मराठीचे प्रपाठक म्हणून 1968 मध्ये सेवानिवृत्त झाले. सरदार यांनी महर्षी कर्वे, वामन मल्हार जोशी, रा.कृ. लागू, वा.दा. गोखले, कमलाबाई देशपांडे, चित्रकार स.कृ. पिंपळखरे अशा ख्यातनाम व ज्येष्ठ प्राध्यापकांबरोबर काम केले. शिक्षणप्रेमी विद्यापीठीय अधिकाऱ्यांना सरदार यांच्या व्यासंगाविषयी व कर्तव्यनिष्ठेविषयी आदर होता.
सरदार यांनी, लेखणी आणि वाणी यांच्या माध्यमांतून अध्यापनाव्यतिरिक्तही भरीव काम केले. ‘अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका’ (1937), ‘महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी’ (1941) आणि ‘संतवाङ्मयाची सामाजिक फलश्रुती’ (1950) ही त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली. सरदार यांनी अनौपचारिक अभ्यास मंडळ काही वर्षे चालवले.
सरदार यांनी 1958 व 1963 या दोन वर्षी आकाशवाणी लाड स्मारक व्याख्यानमालेत संतसाहित्यावर विचार मांडले. त्यांची समाजमनस्क विचारवंत आणि प्रभावी वक्ता अशी प्रतिमा त्यांतून लोकांसमोर उभी राहिली. सरदार यांच्या लेखनाला आणि प्रबोधनकार्याला सेवानिवृत्तीनंतर वेग आला. सरदार यांच्या संत ज्ञानेश्वर, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर व महात्मा फुले यांच्यावरील व्याख्यानमालांच्या संहिता ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाल्या. त्यांना मुंबई व उपनगर मराठी साहित्य संमेलन (1975), दलित साहित्य संमेलन (1978) आणि बार्शी येथे भरलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (1980) यांची अध्यक्षपदे लाभली. सरदार यांनी महाराष्ट्रातील युवा पिढीला व तळागाळातील बांधवांना मार्गदर्शन केले.
सरदार यांचे जे स्फुट लेख विविध नियतकालिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध होत गेले, त्या लेखांचे चार संग्रह संपादित स्वरूपात अभ्यासकांनी सिद्ध केले. ‘प्रबोधनातील पाऊलखुणा’ (निर्मलकुमार फडकुले, 1978), ‘नव्या युगाची स्पंदने’ (प्र.चिं. शेजवलकर, 1982), ‘नव्या ऊर्मी, नवी क्षितिजे’ (ल.रा. नसिराबादकर, 1987) आणि ‘परंपरा आणि परिवर्तन’ (वि.शं. चौघुले व गो.स. गोसावी 1988) या चार लेखसंग्रहांतून सरदार यांचे बरेच विचारधन सामावलेले आहे.
‘परंपरा आणि परिवर्तन’ हा सरदार यांचा लेखसंग्रह 2 ऑक्टोबर 1988 रोजी पुण्यात थाटाने प्रकाशित झाला. त्या दिवशी त्यांचा ऐंशीवा वाढदिवस होता. ‘स्फुट स्वरूपात मी वेळोवेळी जे काही लिहीत आलो, त्यांतील एकही लेख आता संग्रहित करायचा राहिला नाही !’ असे समाधानाचे उद्गार त्या समारंभात सरदार यांनी काढले. त्यानंतर महिनाभराने ते बरेच आजारी पडले. काही दिवस ते घरीच निजून होते. औषधोपचार चालू केले होते, पण आजारपण वाढत गेले. दम्याचा जुना विकार बळावला. शेवटी, पुण्यातील अलका टॉकीजजवळच्या ‘पूना हॉस्पिटल’मध्ये त्यांना ठेवण्यात आले. तेथे ते आठवडाभर होते. त्यांचे 1 डिसेंबर 1988 रोजी पुणे मुक्कामी निधन झाले.
बार्शी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, की “मराठी साहित्य आणि संक्रमणकाळ यांचे आव्हान गेल्या तीन दशकांत आणि त्यातही संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या वीस वर्षांत आपल्या समोर ठाकले आहे. समाजात फार मोठे स्थित्यंतर घडून आले आहे. राजकीय चळवळी आणि सार्वत्रिक निवडणुका यांमुळे खेड्यापाड्यांत जागृती होऊन जनसामान्यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक हक्कांची जाणीव झाली आहे. जीवनसमृद्धीच्या त्यांच्या आकांक्षा पालवल्या आहेत. सत्ता व संपत्ती यांत जास्तीत जास्त वाटा मिळावा म्हणून समाजाचा प्रत्येक घटक प्रयत्नशील आहे. आर्थिक विषमता वाढत असल्याने वेगवेगळ्या घटकांतील तणाव उत्तरोत्तर तीव्रतर होत आहेत. त्याचबरोबर या काळात शिक्षणाचा प्रसार खूप झपाट्याने झाला आहे. तालुक्या तालुक्यात महाविद्यालये निघाली आहेत. त्यामुळे ग्रामीण परिसरात बहुजातीय व बहुवर्गीय असा नवशिक्षित समाज निर्माण झाला आहे. त्यांपैकी अनेक संवेदनक्षम व चिंतनशील तरुण त्यांचे मनोगत वाङ्मयीन माध्यमातून प्रगट करण्यास उद्युक्त होत आहेत. ग्रामीण जीवनाशी त्यांचे जवळचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या आप्तस्वकियांची हलाखी ते रोजच्या रोज प्रत्यक्ष पाहत आहेत. त्यांना आधुनिक शिक्षणामुळे नवविचारांची व नव्या मूल्यसरणीची ओळख पटली आहे. प्रथमच, समाजतळाच्या थरातून एक नवा जिज्ञासू वाचक व उदयोन्मुख लेखकवर्ग अस्तित्वात आला आहे. त्याच्या जिज्ञासेला खाद्य पुरवण्याची व त्याची सांस्कृतिक भूक भागवण्याची कामगिरी सध्याचे मराठी साहित्य बजावत आहे का? काळाच्या प्रवाहाशी संवादी अशी भूमिका घेण्याची समयज्ञता आपल्या साहित्यिकांनी दाखवली आहे का? हे प्रश्न आपणास यापुढे डावलता येणार नाहीत.
“गेल्या वीस-पंचवीस वर्षांत महाराष्ट्रात जो नवा वाचक निर्माण झाला आहे आणि जो नवा लेखक पुढे येण्यासाठी धडपडत आहे, त्यांना प्रचलित मराठी साहित्यक्षेत्रात पुरेसा वाव मिळेल असा विश्वास वाटत नाही. त्यामुळे ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, ख्रिस्ती साहित्य, महिलांचे साहित्य, नवोदितांचे साहित्य या वाङ्मयीन प्रवाहांनी आपापले विभक्त संसार थाटले आणि त्यांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र संमेलने भरू लागली आहेत.”
“ललित लेखकांच्या निर्माणक्षमतेला मर्यादा का पडतात? अल्पावकाशातच त्यांच्या कल्पकतेला ओहोटी का लागते? या प्रश्नांचा उलगडा आपण केला पाहिजे. स्वतःचे अनुभव, चिंतन आणि विद्याव्यासंग यांच्या साहाय्याने आपल्या भोवतालच्या सामाजिक वास्तवाची दृढ पकड घेता आल्याखेरीज केवळ कल्पकता व अंतःस्फूर्ती यांच्यावर विसंबून राहून कोणालाही उच्च प्रतीचे कलात्मक साहित्य निर्माण करता येणार नाही. सृष्टीतील घडामोडींचे आणि सामाजिक जीवनातील वेगवेगळ्या प्रवाहांचे सत्यस्वरूप शोधणाऱ्या शास्त्रांचा अगदी प्राथमिक स्वरूपात का होईना, परिचय असल्याखेरीज लेखकाची जीवनदृष्टी वस्तुनिष्ठ व सर्वस्पर्शी होणार नाही. या बाबतीत मराठी साहित्यिक उदासीन आहेत. त्यांचे वास्तवाचे आकलन पुष्कळच तोकडे पडते.”
– नितेश शिंदे 9892611767 info@
फारच छान परिचय करून दिला आहे! शुभेच्छा!