सध्या आम्ही वेल्स येथे आहोत. पंधरा दिवसांची सुट्टी मिळालेली आहे. अहमदाबादच्या भयंकर दुर्घटनेची बातमी आम्हाला कालच कळली. तसं पाहिलं तर जवळ जवळ दर महिन्यात जगात कुठेना कुठे एअर क्रॅश होत असतात. आम्ही कासावीस होऊन त्याबद्दल वाचतो. त्याचा होईल तितका अभ्यास करतो आणि अशी दुर्घटना आपल्याबरोबर सुद्धा होण्याची बऱ्यापैकी शक्यता आहे या व्यथित जाणिवेने पुन्हा धाडस दाखवून कॉकपिटमध्ये चढतो. काल अहमदाबाद येथे एवढा मोठा एअर क्रॅश घडला. ड्रीम लाइनर अर्थात बोईंग 787 विमानाचा हा आजपर्यंतचा पहिला एअर क्रॅश.
कॅप्टन सुमित सभरवाल आणि को-पायलट क्लाइव्ह कुंदर हे दोघेही आमच्या ओळखीचे. कॅप्टन सुमित हा ट्रेनर आणि अतिशय शिस्तबद्ध माणूस आणि कोपायलटसुद्धा फार चांगला वैमानिक होता. हवामान अगदी स्वच्छ होते. धोके, वादळ किंवा कसला पाऊस नव्हता. विमानाच्या उद्दिष्टाची नोंददेखील अतिशय चांगली होती. सर्व काही उत्तम असताना हा दुर्दैवी अपघात कसा घडला ते केवळ ब्लॅकबॉक्स सांगू शकेल.
विमानातील एक प्रवासी वगळता सगळेजण मृत्युमुखी पडले, एवढेच नाही तर मेडिकल कॉलेजमध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांच्या ध्यानी मनी तरी असेल का, की एखादे विमान आपल्यावर येऊन कोसळेल? रस्त्यावर चाललेली मंडळीसुद्धा जखमी झाली. हा सगळा विचार केल्यानंतर असं वाटतं की आत्मविश्वास, अनुभव आणि आपल्या कामातील वाकबगिरी या गोष्टी गौण आहेत; भाग्य, प्रारब्ध, नशीब, दैव या मंडळींनी रचलेले कारस्थान हे आपल्या मानवी योजनांना सहजपणे पराभूत करतं. बरं, असंही नाही की ही मंडळी नेहमी खलनायकाच्या भूमिकेत असतात. या अपघातात एकमेव पॅसेंजरला वाचवणारीसुद्धा हीच गॅंग! या चांडाळ चौकडीच्या मनमौजीपणाचे रहस्य कुणाला कळले आहे का?
मी गेल्या वीस वर्षांमध्ये असंख्य फ्लाईट केल्या आहेत. पण माझी प्रत्येक फ्लाईट सुखरूपपणे पूर्ण झाल्यानंतर एखादा गड जिंकल्यासारखा आनंद होतो. रॉबिन आणि मी ‘लँड’ झाल्यानंतर एकमेकांना जेव्हा विचारतो, की ‘How was the flight?’ तेव्हा ‘Flight was uneventful’ हेच फार मोलाचे उत्तर अपेक्षित असते.
(रॉबिन आणि नीलम इंगळे-लोबो हे जोडपे एअर इंडियात मुख्य वैमानिक (कमांडर) आहेत.)
– नीलम इंगळे-लोबो
this is BS.
पाहिली गोष्ट म्हणजे “भाग्य, प्रारब्ध, नशीब, दैव” हे समानार्थी शब्द आहेत. वेगवेगळ्या फोर्सेस ची चौकडी नव्हे.
आणि त्यावर विश्वास ठेवला की विधिलिखितावर सुद्धा विश्वास ठेवावा लागतो. होनी को कौन टाल सकता है. वगैरे..
विधिलिखितवाद हे circular argument असते. काय घडले? तर “नशिबात होते तेच” आणि नशिबात काय होते? तर “जे घडले तेच” असा हा सगळा घोळ.
असो. कुणाच्या मनाला यात शांती मिळत असेल तर मिळो. पण त्याचे व्यापक तत्वज्ञान न होणेच चांगले.