ह.ना. जगताप हे शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांचा भर अध्यापक महाविद्यालये शिक्षक निर्मितीचे कारखाने न बनता, त्यातून धडपड्या विद्यार्थी हे दैवत मानणारे आणि अभ्यास व वाचन प्रचंड असणारे शिक्षक घडले पाहिजेत, त्यासाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण व शिक्षणपद्धत यावर आहे. जगताप यांनी शिक्षक-प्रशिक्षणातील सूक्ष्म अध्यापन, मूल्यमापन पद्धत, मानसशास्त्र व संशोधन पद्धत यांकडे वेळोवेळी लक्ष वेधले आहे…
सोलापूरचे ह.ना. जगताप यांनी शिक्षणपद्धत व शिक्षकी पेशा या दोन्हींमध्ये विचार व कृती या अंगांनी मोलाची भर घातली आहे. त्यांच्या विचारांचा विशेष असा, की शिक्षणपद्धत व त्या पद्धतीचे मुख्य वाहक जे शिक्षक त्यांच्यात एकमेवता, एकवाक्यता हवी. शिक्षक जेथे घडतात ती म्हणजे प्रशिक्षण महाविद्यालये व विद्यापीठेही होत. त्यांनी शिक्षकांना योग्य प्रशिक्षण दिले तरच उद्याचे शिक्षक व त्या शिक्षकांद्वारे जे विद्यार्थी घडणार आहेत, ते योग्य पद्धतीने तयार होतील. जर ही साखळी तशीच पुढे न्यायची असेल तर शिक्षणपद्धत व शिक्षक यांची गुणवत्ता मूलत: सुधारावी लागेल. त्यासाठी जगताप यांचा भर प्रशिक्षण महाविद्यालये व विद्यापीठे या ठिकाणी कसे प्रशिक्षण द्यावे यांवर आहे. ते म्हणतात, की अध्यापक महाविद्यालये हे शिक्षक निर्मितीचे कारखाने न बनता त्यांनी गुणवान शिक्षक बाहेर काढले पाहिजेत. त्यासाठी जगताप यांनी शिक्षक-प्रशिक्षणातील सूक्ष्म अध्यापन, मूल्यमापन पद्धत, मानसशास्त्र व संशोधन पद्धत यांकडे वेळोवेळी लक्ष वेधले आहे.
जगताप यांनी शिक्षणक्षेत्रातील अनेक पदे भूषवली. अनेक समित्या, अभ्यास मंडळे, व्यवस्थापन समित्या यांवर काम केले आहे व ते निवृत्त जीवन जगत आहेत. शिक्षणविषयक चिंतन हा त्यांचा ध्यास मात्र सुटलेला नाही.
त्यांनी शाळेतील समृद्ध ग्रंथालयाच्या माध्यमातून अभ्यास केला. त्यांनी तेथे मराठी व इंग्रजी या भाषांवर व गणित विषयावर प्रभुत्व मिळवले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण (विज्ञान शाखा) ‘अकलूज कॉलेज’मध्ये झाले. त्यांनी त्या काळात अवांतर वाचन भरपूर केले. पुरा शेक्सपीयर वाचून काढला. ते पंढरपूर येथील ‘पंढरपूर कॉलेज’मध्ये शिकण्यास गेले. एका प्राध्यापकांनी त्यांना ऑर्गेनिक केमिस्ट्रीच्या ट्युटोरियलमध्ये कमी गुण पडल्यामुळे वर्गाच्या बाहेर काढले. ती गोष्ट ह.ना. यांच्या मनाला फार लागली आणि त्यांनी जिद्दीने अभ्यास करून त्या विषयात पहिला नंबर मिळवला! ते सहासष्ट टक्के गुण मिळवून बी एस्सी ला प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांना मराठीची फार आवड आणि म्हणूनच, ते मराठीचा व्यासंग असणारे प्रा.र.बा. मंचरकर यांच्या तासिकेस अधूनमधून बसतअसत.
ह.ना. जगताप यांनी पदव्युत्तर शिक्षण नोकऱ्या करून घेतले. त्यांनी पुणे विद्यापीठातूनच 1976 साली ‘प्रायोगिक मानसशास्त्र आणि शैक्षणिक संख्याशास्त्र’ या विषयात एम एड केले. त्यांनी एम फिल ही पदवी 1986 मध्ये व पीएच डी ही पदवी 1992 मध्ये पुणे विद्यापीठातूनच मिळवली. त्यांचा संशोधन विषय ‘इयत्ता नववीच्या बीजगणितासाठी नैदानिक कसोट्या व उपचारात्मक अध्यापन’ हा होता.
ह.ना. यांनी स्वत:ला शिक्षणविषयक पुस्तकांच्या लेखनास वाहून घेतले आहे. त्यांच्या त्या प्रवासास सुरुवात ते एम एड झाल्यानंतर 1978 मध्ये झाली. त्यांचे पहिले पुस्तक ‘गणित अध्यापन पद्धती’ हे. ‘शैक्षणिक तंत्रज्ञान’ हे त्यांचे दुसरे पुस्तक. त्या पुस्तकाच्या चार आवृत्ती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी सहा पुस्तके 2010 सालच्या सेवानिवृत्तीनंतरही लिहिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस विद्यार्थ्यांनी पीएच डी व बारा विद्यार्थ्यांनी एम फिल पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे लेखन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संक्रमण, जीवन शिक्षण व भारतीय शिक्षण या शैक्षणिक मासिकांमध्ये; तसेच, विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होत असते. त्यांची व्याख्यानमाला ‘विज्ञानाचा दैनंदिन जीवनात वापर’ या विषयावर सोलापूर आकाशवाणीवरून प्रसारित झाली आहे.
त्यांचे विचारवैशिष्ट्य हेच की ते गुणवान शिक्षक घडणे असेल तर धडपड्या विद्यार्थी हे दैवत मानणारा आणि त्यासाठी अभ्यास व वाचन प्रचंड असणारा शिक्षक हवा असे सांगतात. जगताप यांचा स्वत:चा छंद वाचन हा आहे. ते म्हणाले, की त्यातून त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होत गेली आणि त्यातूनच ते लिखाणही करू शकले.
ह.ना. अतिशय सहृदय आहेत. ते इतरांचे दुःख समजून घेता आले पाहिजे, त्यांची दुःखे निवारण्याचे प्रयत्न सतत केले पाहिजेत असे सांगतात. त्याचे कारण त्यांनी गरिबी व उपेक्षितांचे दुःख जवळून पाहिले आहे. त्यांनी स्वत: शालेय जीवनात अनेक वर्षे अनवाणी काढली आहेत. ते म्हणतात, इतरांच्या दुःखाचे कारण कधीही व्हायचे नाही ही माझी जीवननिष्ठा आहे.
जगतापसर हे विविध विद्याशाखांमध्ये आस्था असलेले गृहस्थ आहेत. त्या उलट, विद्यार्थी सायन्स, आर्ट्स वा वाणिज्य यांपैकी ज्या शाखेचा असेल त्याने तीच शाखा अभ्यासावी असा प्रवाह आजकाल दिसतो, पण जगतापसर यांना ते मान्य नाही. ते सायन्स शाखेचे अभ्यासक असूनही त्यांना मराठी विषयाची आवड फार व त्यांचे मराठी वाचन मोठे. ते म्हणतात, की प्रत्येक व्यक्तीला किमान पातळीवर तरी प्रत्येक शाखेचे ज्ञान हवे. शिक्षणात आंतरविद्याशाखीय व बहुविद्याशाखीय दृष्टिकोनामध्ये पुन्हा एकदा जीव आला आहे. विद्यार्थी दोन वा जास्त विद्याशाखा एकत्र घेऊन शिक्षण घेतात-देतात.
चर्चा ही जगताप यांची आवडती गोष्ट आहे. शाळा असो, नोकरीचे ठिकाण असो, घर असो, वा मित्रमंडळींतील गप्पागोष्टी… चर्चा या झडल्याच पाहिजेत असे त्यांना वाटते. एखादी गोष्ट जोपर्यंत चर्चिली जात नाही, तोपर्यंत तिची पडताळणी होत नाही आणि पडताळलेली गोष्टच सिद्ध होते, ज्ञानात रूपांतरित होते व मगच लोक तिचा स्वीकार करतात. जगताप यांनी तीच विचारसरणी शिक्षणशास्त्रास दिली. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, शासनाने, अभ्यास मंडळांनी चर्चेद्वारे अभ्यासक्रम निर्मितीचे, ज्ञान देण्याचे काम स्वीकारले आहे.
जगताप यांनी जीवनात पक्षपाती व्यवहार कधी केला नाही; ही गोष्ट ते आग्रहाने सांगतात. ते म्हणतात, की नि:पक्षपातीपणाने जीवनाला अर्थ येतो! त्यांचे कामांदरम्यान वाद अनेकांशी होत, पण त्यांनी वस्तुनिष्ठ असण्याचा गुण कधी सोडला नाही. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मंडळींपैकी एक, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील व्ही.एन. शिंदे सांगतात, की “ते पारदर्शी जीवन जगले व त्यांनी तो गुण कामातही उतरवला!”
त्यांची मार्गदर्शनाची पद्धत साधी व सरळ आहे. ते त्यांच्याकडे अनुभव व भरपेट ज्ञान आहे, म्हणून समोरच्याला कमी कधीच लेखत नाहीत. समोरच्याचा वयोगट, अनुभव व गरज ओळखून त्याला पचेल व रुचेल अशा भाषेत मार्गदर्शन करतात. त्यांच्या विविध पुस्तकांतून हेच दिसेल, की साधी गोष्ट कठीण पद्धतीने न मांडता तिची साध्या स्वरूपात मांडणी आणि कठीण गोष्टीचीही साधी मांडणी करणे शक्य असते.
त्यांना मिळालेले पुरस्कार व त्यांनी भूषवलेली पदे यांची मालिकाच आहे. त्यांच्या पत्नी आशालता एम ए, एम एड, पीएच डी आहेत. चिरंजीव अभिजित हे एमबीबीएस व आशुतोष हे रसायनशास्त्रामधील पीएच डी आहेत. ह.ना. यांनी त्यांच्या प्राजक्ता (अध्यापक) व अर्चना (डॉक्टर) या दोन्ही सुनांना लग्नानंतर शिकण्यासाठी आणि नोकरी करण्यास प्रेरित केले. असा उदारहृदयी व विद्याभ्यासप्रेमी माणूस आहे ह.ना. जगताप!
ह.ना. जगताप 9822615464 hnjagtap@rediffmail.com
– नगिना माळी 8975295297 naginamali2012@gmail.com
———————————————————————————————————————————————–