मराठीच्या सुवर्णकाळाचे स्वप्न (Dream of golden period of Marathi language)

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देऊन आणि विविध धर्मांच्या आणि जातींच्या एकशेपाच हुतात्म्यांचे बलिदान देऊन जिंकलेल्या महाराष्ट्र राज्याच्या जनतेने ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे महाराष्ट्राचे पारंपरिक मूलतत्त्व स्वीकारून राज्याची लोककल्याणाची नीती आणि सामाजिक प्रगती साधण्याचे ठरवले. मृणाल गोरे आणि तशाच इतर काही स्वाभिमानी नेत्यांनी पेरलेल्या मराठी भाषाभिमानाच्या बीजांमधून मुंबईत मराठी भाषेच्या संवर्धनाची मोहीम जोमाने फोफावली. त्यातूनच मराठी माणसाच्या मनात ‘माझे राज्य, माझी भाषा, माझी संस्कृती’ ह्या भावनेची पाळेमुळे घट्ट पसरू लागली. तत्कालीन राजकीय नेत्यांनीदेखील त्या भावनेला प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती (1960) झाल्यावर साठी-सत्तरी-ऐंशीच्या दशकांत महापालिकेच्या धोरणाच्या आग्रहामुळे मुंबई शहरात जागोजागी मराठी भाषा डोळ्यांना दिसू लागली आणि कानांवर पडू लागली. रस्त्यांच्या नावाच्या पाट्यांवर, बेस्ट बसेसचा पहिला व अंतिम थांबा आणि मार्गक्रमांक सांगणार्‍या पाट्यांवर, तसेच दुकानांवरील आणि विविध आस्थापनांच्या इमारतींवरील पाट्यांवरदेखील मराठी दिमाखात शोभू लागली. मराठी माणसाला ‘हे माझे शहर’ अशी ओळख पटू लागली. त्यातून मराठी माणसाची अस्मिता अधिकच दृढ झाली. महाराष्ट्रधर्म संवर्धनाच्या मोहिमेत महाराष्ट्रातील सर्व जातिधर्मांच्या मराठी बांधवांनी उत्साहाने आणि हिरिरीने भाग घेतला. खरोखरच “लाभले अम्हांस भाग्य, बोलतो मराठी” असे वाटण्याचा तो काळ होता.

स्वसंस्कृतीचे आणि स्वभाषेचे संस्कार घराप्रमाणेच शाळेमध्येही होत असतात. तसे संस्कार करणार्‍या नवनवीन मराठी शाळा निघाल्या. त्या काळचे राज्यशासनही मराठी शाळांना सावत्रपणाची वागणूक न देता, स्वतःच्या अपत्यांप्रमाणे त्यांचे पालनपोषण करून विविध प्रकारे प्रोत्साहन देत होते. कारण बहुसंख्य स्थानिक नागरिकांचाही तशा कृतीला पाठिंबा होता. मराठी शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग, व्यवसाय इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांचे चांगले नाव कमावले आणि मराठी शाळांत जाणार्‍या कोवळ्या मुलांपुढे आदर्श ठेवले. आमच्या बालपणी आम्ही अभिमानाने आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेचे नाव सांगत असू.

“इंग्रजी ही इतिहासातील परतंत्र भारताच्या सत्ताधार्‍यांची भाषा. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर, इंग्रजीचे अस्तित्व किमान गरजेपुरतेच असावे आणि तिच्या जागी भारतीयांनी त्यांच्या त्यांच्या राज्यात त्यांच्या स्थानिक भाषेला आणि संस्कृतीला आदरपूर्वक सर्वोच्च स्थानी स्थानापन्न करायला हवे”, असे त्या काळी स्वभाषाप्रेमी आणि स्वसंस्कृतीप्रेमी भारतीयांना वाटत होते. त्यातूनच महाराष्ट्रात दैनंदिन व्यवहारातील इंग्रजी संज्ञांना उत्तमोत्तम मराठी (देशी किंवा संस्कृतोद्भव) प्रतिशब्द शोधून काढून प्रत्यक्ष वापराने ते रूढ करण्याच्या विचाराने जोम धरला. इंग्रजी शब्दांना पर्याय म्हणून घडवलेले मराठी प्रतिशब्द हिंदीच्या केंद्र सरकारी भाषापंडितांनी शोधून काढलेल्या प्रतिशब्दांपेक्षा अर्थ आणि सांस्कृतिक संदर्भ अशा दोन्ही निकषांवर अधिक सरस आणि चोख असत. उदाहरणार्थ, Martyr (इंग्रजी) – शहीद (हिंदी) – हुतात्मा (मराठी), Academy -अकादमी – प्रबोधिनी, Psychology – मनोविज्ञान – मानसशास्त्र/ मानसिकता, Surrender-आत्मसमर्पण- शरणागती इत्यादी. त्यामुळे अनेक उत्तमोत्तम मराठी प्रतिशब्द पुढे भारतात राष्ट्रीय पातळीवरही स्वीकारले गेले. त्या काळी क्रिकेटच्या खेळाचे समालोचनही मराठीत उत्तम प्रकारे होत असे आणि गावोगावी तशाच भाषेत क्रिकेटबद्दल चर्चा होत असत. उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीनेच मुंबईत मराठी साहित्य, संस्कृती, संगीत, नाटक, चित्रपट ह्या क्षेत्रांचीही भरभराट झाली. मुंबईत आणि मुंबईच्या आजूबाजूच्या औद्योगिक परिसरात ‘स्थानीय लोकाधिकार समिती’मुळे सामान्य मराठी माणसांना मोठ्या संख्येने नोकर्‍या मिळाल्या. अशा विविध घटनांमुळे मुंबई हे मराठ्यांचे शहर आहे ह्यावर शिक्कामोर्तब झाले. काही बाबतीत मुंबईने मराठी संस्कृतीचे माहेरघर मानल्या जाणार्‍या पुण्यालाही मागे टाकले. मुंबई महानगरपालिकेप्रमाणे पुणे ‘मनपा’ने मराठी भाषेच्या वापराच्या बाबतीत फारसा उत्साह आणि आग्रह न दाखवल्यामुळे मुंबईतील सेनापती बापट मार्ग, महात्मा गांधी मार्ग, हुतात्मा भगतसिंह मार्ग, दलाल पथ अशा रस्त्यांच्या नावांच्या तुलनेत पुण्याची मराठी भाषा ‘रोड’च राहिली. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पहिल्या तीन दशकांत महाराष्ट्रात मराठीच्या भरभराटीचा आलेख चढता होता. मी आयआयटीच्या निमित्ताने पाच वर्षे बंगालमध्ये काढली. मी तिथल्याप्रमाणेच महाराष्ट्रातही स्थानिक भाषेला आणि संस्कृतीला सर्वोच्च आदर आणि आब प्राप्त होईल असे स्वप्न पाहत होतो. “हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं । जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें, हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ।” हा ध्यास आम्ही घेतला होता.

दुर्दैवाने पुढील काळात निव्वळ सत्ताकारण आणि अर्थकारण ह्यांच्या मागे लागलेल्या महाराष्ट्राच्या नेत्यांना ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा’ ह्या वचनाचे विस्मरण पूर्णपणे झाले. राजकारण्यांनी सामान्य जनतेची दिशाभूल करणे सुरू केले. महाराष्ट्रीय जनतेचा स्वभाषा आणि स्वसंस्कृती ह्यांच्याबद्दलचा अभिनिवेश हळूहळू ओसरू लागला आणि त्याची जागा न्यूनगंडाच्या भावनेने घेतली. राजकारणाची दिशा सत्ताप्राप्ती आणि अर्थप्राप्ती ह्या दोनच उद्दिष्टांनुसार ठरत गेल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण महाराष्ट्रधर्माची आणि लोककल्याणाची दिशा सोडून भलत्याच दिशेला भरकटू लागले आणि आज ते किती खालच्या पातळीला पोचले आहे, त्याबद्दल काही न बोललेले बरे. आज मागे वळून पाहिल्यावर सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर पन्नास-साठ वर्षांपूर्वीचा तो मराठीचा सुवर्णकाळ स्वप्नवत वाटतो आणि पुढे वाढून ठेवलेला भविष्यकाळ भयावह वाटतो. पण ह्याला जबाबदार कोण? आपण स्वतः सुवर्णकाळ उपभोगल्यावर पुढल्या पिढीच्या पुढ्यात भेसूर भविष्यकाळ ठेवणारी आमचीच पिढी अशा भयंकर चुकीसाठी जबाबदार नाही काय, असा विचार मनात आल्यावर मन विदीर्ण होते.

– सलील कुळकर्णी 9850985957 saleelk@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here