मला माझ्या प्रवासवर्णने वाचण्याच्या आवडीमुळे काही शोध लागले. जसे, की -मराठीतील पहिले प्रवासलेखन गोडसे गुरुजींचे ‘माझा प्रवास’ हे नाही; -राघोबादादा यांनी त्यांच्या हणमंतराव नावाच्या कारभाऱ्यांना इंग्रजांची मदत मिळते का ते पाहण्यासाठी इंग्लंडला 1761 मध्ये पाठवले होते; -हिंदुस्थानातील भारतीय भाषांपैकी पहिले प्रवासलेखन मल्याळी भाषेत झाले, ते 1785-1786 मध्ये, परंतु ते प्रकाशित होण्यास दीडशे वर्षें लागली; इत्यादी.
इतर देशांतील प्रवासी हिंदुस्थानात त्याआधी काही शतकांपासून येत होते. त्यांनी ते सिद्ध करणारी प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत. ती इंग्रजी भाषेत अनुवादितही झालेली आहेत. त्यांचा अभ्यास सतत होत असतो. माझ्या हाती काही महिन्यांपूर्वी Early travels in India 1583-1619 हे, 1925 साली प्रकाशित झालेले पुस्तक आले. त्यांत वेगवेगळ्या सात प्रवासलेखनांचे पुनर्मुद्रण आहे – म्हणजे त्या त्या प्रवाशांनी त्यांच्या त्यांच्या हकिगती वेळोवेळी लिहून ठेवल्या होत्या आणि नंतर, जवळ जवळ तीनशे वर्षांनी कोणी अभ्यासकाने त्या हकिगती त्यांना नेटकी प्रस्तावना लिहून पुन्हा छापल्या. ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिने त्यांतील पहिल्या प्रवाशाला दोन परिचयपत्रे सम्राट अकबर याच्या नावे दिली होती. त्यात अकबराचा उल्लेख king of cambay असा केला गेला आहे. ते वाचल्यावर माझ्या मनात साहजिकच प्रश्न आला, की अकबर हा खंबायतचा राजा गणला जात होता का? आणि त्याहून महत्त्वाचा म्हणजे हिंदुस्थानी लोक त्याकाळी वा त्यापूर्वीही परदेशी जात होते की नव्हते? आणि जात असतील तर ते त्यांच्या हकिगती लिहून ठेवत होते की नाही? त्या हकिगती भारतीय इतिहास अभ्यासकांनी शोधल्या आणि त्या मिळाल्या नाहीत की त्या शोधल्याच नाहीत? त्या शोधल्या नसतील तर त्याचे कारण काय?
थोडक्यात, प्रश्न आणि उपप्रश्न यांची माळ तयार होते. पान सडले, घोडा अडला आणि भाकरी करपली याचे कारण जसे एकच- न फिरवल्याने, तसे या प्रश्नमालेचे उत्तर एकच आहे का – हा संसार आणि त्यापासून होणारे हर्ष-खेद तात्कालिक आणि आभासी असतात; त्यामुळे अधिक संपत्ती मिळवण्यासाठी विदेशात जाऊ नये, गेला तर त्याचे कौतुक म्हणून काही लिहून ठेवू नये, लिहिले तर त्याचा अभ्यास करू नये, कारण त्यात नवीन असे काहीच नसते – व्यासांनी सारे सांगितलेच आहे ना महाभारतात ! ही भारतीयांची वृत्ती !
वरील प्रश्न आणि त्याचे संभाव्य उत्तर कदाचित धर्मविरोधी वगैरे वाटू शकेल. परंतु इतिहास काय सांगतो ते बघितले तर, पाश्चिमात्य देशांतील धर्मोपदेशक त्यांना सर्वश्रेष्ठ वाटणारा त्यांचा धर्म जगभर पसरावा म्हणून अनेक संकटे सहन करून देशविदेशी गेलेले आहेत. पोर्तुगीज धर्मोपदेशक हिंदुस्थानातही गोव्यात येऊन त्यांनी तेथे तीनशे-चारशे वर्षे राज्य केले. मग भारतीय पूर्वजांना त्यांचा धर्म सर्वश्रेष्ठ वाटत नव्हता, की तो वाटत असला तरी त्याचा प्रसार जगभरात करणे मान्य नव्हते? ते मान्य नसावे बहुधा.
‘इंग्लंडातील प्रवास’ या 1865 मधील पुस्तकात करसनदास मुलजी यांनी विल्सन यांच्या ऋग्वेदसंहितेचा उल्लेख करून म्हटले आहे, “कोणी मरावयास टेकलेला पुरुष जसा संपत्तीला सोडतो तसे तुग्र याने त्याचा पुत्र भुज्यु याला समुद्रात पाठवले.” (ऋग्वेद मंडल, पहिले सूक्त 116, ऋचा दुसरी आणि पाचवी). म्हणजे धर्मप्रसार करण्यास विदेशी जाऊ नये असे सूचित होतेच. नवल वाटू नये, पण हिंदुस्थानातील प्रादेशिक भाषांतील पहिले प्रवासलेखन करणारा मल्याळी माणूस हा ख्रिस्ती धर्मोपदेशक होता !
– रामचंद्र वझे 9820946547 vazemukund@yahoo.com
———————————————————————————————-